गुण : एक तात्त्विक संकल्पना. ‘देवदत्त शहाणा आहे’ ह्या विधानात देवदत्ताच्या अंगी असलेल्या एका गुणाचे, ‘शहाणा’ ह्या विशेषणाने व्यक्त होणाऱ्या गुणाचे, वर्णन केले आहे असे आपण मानतो. ह्या विधानाचे ‘देवदत्त’ हे उद्देश्यपद आहे व ‘शहाणा’ हे विधेयपद आहे आणि ह्या विधानात, विधेयपदाने व्यक्त होणारा गुण, उद्देश्यपदाने निर्दिष्ट होणाऱ्या व्यक्तीच्या अंगी आहे असे सांगितले आहे. पण सर्वच विधेयपदे गुण व्यक्त करतात असे नाही. ‘देवदत्त माणूस आहे’ ह्या विधानाचे ‘माणूस’ हे विधेयपद आहे, पण ते गुणवाचक नाही. देवदत्त कोणत्या प्रकारची वस्तू आहे, हे ह्या विधानात सांगितले आहे. ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पदांची मिळून विधाने बनलेली असतात, त्या पदांचे आणि त्या पदांनी व्यक्त होणाऱ्या गोष्टींचे वर्गीकरण प्रथम ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४–३२२) केले. पदांच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारांना ॲरिस्टॉटल ‘पदार्थप्रकार’ (कॅटिगरी) म्हणतो. गुणवाचक पदे हा पदांचा एक प्रकार आहे आणि त्यांनी गुण व्यक्त होतात [→ पदार्थप्रकार]. पण ‘गुण’ ही एक पारिभाषिक संज्ञा म्हणून जरी ॲरिस्टॉटलने प्रथम पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात प्रविष्ट केली, तरी त्यापूर्वी गुणांविषयीचा विचार तत्त्वज्ञानात झाला नव्हता असे नाही. वस्तूंचे आपल्या अनुभवास येणारे गुण वस्तूंच्या अंगीच असतात, म्हणजे त्यांच्या स्वरूपाचे ते घटक असतात, की ह्या गुणांचा आरोप आपण वस्तूंवर करीत असतो, असा एक प्रश्न ॲरिस्टॉटल पूर्वी ग्रीक तत्त्वज्ञानात चर्चिला जात होता. वस्तूचे संवेदन जेव्हा आपल्याला होते तेव्हा तिच्या ठिकाणी जे गुण आपल्याला आढळतात ते तिचे स्वतःचे गुण असतात, असे सर्वसाधारणपणे मानण्यात येते. पण परमाणुवाद्यांनी स्वीकारलेली भूमिका वेगळी होती. ती अशी, की वस्तूंच्या म्हणजे परमाणूंच्या ठिकाणी केवळ आकार, रचना इ. गुण असतात त्यांच्या ठिकाणी अनुभवास येणारे इतर गुण केवळ ‘संकेताने’ त्यांच्या ठिकाणी असतात, पण वस्तुतः नसतात. संकेत व्यक्तिपरत्वे बदलू शकतात व म्हणून वेगवेगळ्या व्यक्तींना त्याच वस्तूंच्या ठिकाणी वेगवेगळे गुण आढळतात. 

आधुनिक काळात गणिती भौतिकीची प्रतिष्ठापना करताना वैज्ञानिक व तत्त्ववेत्ते ह्यांनी वस्तूंचे प्राथमिक गुण आणि दुय्यम गुण असा जो भेद केला आहे, तो ह्याच स्वरूपाचा आहे. विशेषतः रॉबर्ट बॉइल (१६२७–९१) हा वैज्ञानिक आणि जॉन लॉक (१६३२–१७०४) हा तत्त्ववेत्ता ह्यांनी असा भेद केला आहे. लॉकने ह्या भेदाचे जे स्वरूप कल्पिले आहे, ते असे : एखाद्या भौतिक वस्तूचे – उदा., एखाद्या सफरचंदाचे – प्रत्यक्ष ज्ञान जेव्हा आपल्याला होते, तेव्हा ती भौतिक वस्तू आणि आपल्या संवेदनेचा साक्षात विषय ह्यांत भेद करावा लागतो. भौतिक वस्तू आपल्या संवदनेचा साक्षात विषय नसते आपल्या संवदनेचा साक्षात विषय त्या भौतिक वस्तूचे प्रतिनिधित्व करतो. आता संवेदनेचा जो साक्षात विषय असतो – उदा., मला दिसणारे एका विवक्षित आकाराचे, रंगीत, सुवासिक, मधुर सफरचंद – त्याच्या ठिकाणी दोन प्रकारचे गुण असतात. आकार, विस्तार, घनता, गती हे त्याच्या ठिकाणचे गुण भौतिक वस्तूच्या ठिकाणीही असतात व ह्यांना लॉक प्राथमिक गुण म्हणतो. उलट, रंग, वास, चव इ. त्याच्या ठिकाणचे गुण भौतिक वस्तूच्या अंगी नसतात पण व्यक्तीच्या ज्ञानेंद्रियांवर क्रिया करून तिला ह्या गुणांचे संवेदन प्राप्त करून देण्याची शक्ती भौतिक वस्तूच्या अंगी असते. ह्या गुणांना लॉक दुय्यम गुण म्हणतो. भौतिक वस्तूच्या ठिकाणी फक्त घनता, आकार इ. गुण असतात असे मानल्याने केवळ गणिती संकल्पनांच्या साहाय्याने तिच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करणे शक्य झाले व भौतिकीचे नियम गणिती सूत्राच्या रूपात मांडता येऊ लागले. पण पुढे जॉर्ज बर्क्लीने (१६८५–१७५३) प्राथमिक गुण व दुय्यम गुण ह्या भेदावर हल्ला चढविला आणि त्याला अप्रमाण म्हणून झिडकारून चिद्‍वादाचा पाया घातला. 

गुणासंबंधी आणखी विचार मार्क्स-एंगेल्सप्रणीत द्वंद्वात्मक जडवाद ह्या तत्त्वज्ञानात आढळतो. ‘संख्येचे गुणात परिवर्तन होते’, ह्या तत्त्वाच्या रूपाने हा विचार मांडण्यात आला आहे. उदा., पाण्याचे तपमान कमी कमी करत नेले, तर एका क्षणाला त्याचे एकाएकी बर्फात रूपांतर होते. म्हणजे तपमानाची संख्या बदलत जाते. विशिष्ट संख्यात्मक बदल झाला, की त्याची जागा गुणात्मक बदल घेतो. पाणी अधिक अधिक थंड होत जाण्याऐवजी त्याचे बर्फात रूपांतर होते किंवा केवळ भौतिक व रासायनिक गुणधर्म अंगी असलेल्या रासायनिक संयुगाच्या रचनेची गुंतागुंत एका मर्यादेला पोहोचली, की ते संयुग एक सजीव वस्तू बनते म्हणजे काही नवीनच गुण, वरच्या स्तरातील गुण, त्याच्या ठिकाणी निर्माण होतात. ह्या गुणांना नवीन गुण म्हणायचे कारण असे, की त्यांचे खालच्या स्तरावरील गुणांत विश्लेषण करता येत नाही. उदा., सजीवत्व ह्या गुणाचे केवळ भौतिक व रासायनिक गुणात विश्लेषण करता येत नाही. सजीवत्व हा गुण म्हणजे काही रासायनिक गुण नव्हे, तर रासायनिक पदार्थांच्या एका विवक्षित गुंतागुंतीच्या रचनेतून निर्माण झालेला तो एक वेगळाच गुण आहे. द्वंद्वात्मक जडवादामध्ये हे तत्त्व सामाजिक प्रक्रियांनाही लावले आहे. ह्याच स्वरूपाचा विचार ⇨सॅम्युएल अलेक्झांडर  याच्या तत्त्वज्ञानातही आढळतो.

रेगे, मे. पुं. 

भारतीय तत्त्वज्ञानातील गुणसंकल्पना : वाक्यातील विशेष्याचे विशेषण म्हणजे ‘गुण’ असा मुळचा व्याकरणशास्त्रातील अर्थ होय. ‘श्वेत अश्व धावत आहे’, ‘पृथ्वी दीर्घ-वर्तुळ आहे’, ‘अर्जुन शूर आहे’ या वाक्यांतील श्वेतत्व, दीर्घ-वर्तुळत्व व शूरत्व ही विशेषणे म्हणजे गुण होत. पूर्वमीमांसेत सामान्यविधी व गुणविधी असे विधींचे दोन प्रकार सांगितले आहेत. सामान्य विधीचे एक उदाहरण ‘अग्निहोत्रं जुहोति’ (अग्निहोत्र होम करावा), असे आहे. अग्निहोत्र हे एका होमाचे नाव आहे. त्या होमाचे विशिष्ट स्वरूप गुणविधिने स्पष्ट होते. येथील गुणविधीचे उदाहरण ‘दध्ना जुहोति’ (दह्याने होम करावा) हे वाक्य होय. ‘दधी’ या होमसाधनाने होमाचा विशिष्ट प्रकार ज्ञापित होतो. हे वैशिष्ट्य दधी होय म्हणजे ‘दधी’ हा गुण होय. सामान्य वस्तूचा परिच्छेद म्हणजे वेगळेपणा ज्या वस्तुधर्मामुळे अस्तित्वात असतो, तो वस्तुधर्म गुण होय. तोच शब्दाने दाखविला म्हणजे त्यास विशेषण म्हणतात. सोमयागात गायीच्या मोबदल्यात सोमक्रयणाचा विधी सांगितला आहे. ‘एक वर्षाच्या तांबड्या गायीने सोम विकत घ्यावा’, असा तो विधी होय. गाय या द्रव्याचे धर्म, वय व तांबूसपणा हे गायीचा परिच्छेद म्हणजे वेगळेपणा दाखवितात. तात्पर्य, द्रव्यपरिच्छेदकत्व म्हणजे गुणत्व होय.


 

वैशेषिक दर्शनात (१) द्रव्य, (२) गुण, (३) कर्म, (४) सामान्य, (५) विशेष व (६) समवाय हे सहा भावपदार्थ म्हणजे अस्तित्वे सांगितली आहेत. त्यांतील गुण व कर्म हे द्रव्याश्रित आहेत सामान्य हा पदार्थ द्रव्य, गुण व कर्म यांच्यात आहे विशेष हा पदार्थ नित्यद्रव्याश्रित आहे आणि समवाय हा द्रव्य, गुण व कर्म यांच्या आश्रित आहे. विशेष व समवाय ह्या वैशेषिक दर्शनाच्याच वेगळ्या पारिभाषिक संकल्पना आहेत. या दोन संकल्पना व्यवहाराच्या सामान्य भाषेत किंवा वाक्यात व्यक्त केलेल्या नसतात परंतु द्रव्य, गुण, कर्म व सामान्य या संकल्पना व्यावहारिक भाषेत अनेक वेळा व्यक्त केलेल्या असतात. वरील गुणादी पाच भाव द्रव्यापासून वेगळे राहू शकत नाहीत. गुण म्हणजे द्रव्याचा परिच्छेदक असा धर्म, या पूर्वमीमांसेतील एका अर्थाप्रमाणे वरील पाच भाव, विशेषतः गुण, कर्म व सामान्य हे भाव, द्रव्यपरिच्छेदक असल्यामुळे हे गुण होत, असे विशिष्ट संदर्भात पूर्वमीमांसेप्रमाणे म्हणता येते. ‘सफेद वाटोळा, पृथ्वीभोवती फिरणारा चंद्र हा एक ग्रह आहे’ या वाक्यात श्वेतिमा, वर्तुलत्व हे गुण, फिरणे ही क्रिया, ग्रहत्व हे सामान्य, चंद्रद्रव्याच्या ठिकाणी असलेले परिच्छेदक गुण होत, असे पूर्वमीमांसेप्रमाणे एका अर्थाने म्हणता येते. परंतु निराळ्या संदर्भात म्हणजे पूर्वमीमांसेच्या तत्त्वदर्शनात वैशेषिकांप्रमाणेच कर्म व सामान्य हे गुणांपासून वेगळे भाव सांगितले आहेत. 

वैशेषिक दर्शनाप्रमाणे द्रव्यात राहणारे व द्रव्याचे परिच्छेदक काही धर्मच गुण म्हणून वेगळे दर्शित केले आहेत. ते चोवीस आहेत. ते असे : रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द, संख्या, परिमाण, पृथक्‌त्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, गुरुत्व, द्रवत्व, स्नेह, ज्ञान, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख, धर्म, अधर्म व संस्कार हे गुण द्रव्यात अविच्छेदसंबंधाने म्हणजे समवाय संबंधाने राहतात. गुण हे द्रव्याशिवाय अस्तित्वात नसतात तसेच कर्म व अवयवी. उदा., अवयवात म्हणजे मातीच्या कणांत घट समवायाने राहतो परंतु घट हा मातीचा गुण नव्हे. आंबा ह्या फळात पीत रूप, मधुर रस, सुगंध, एक प्रकारचा स्पर्श, गुरुत्व व स्नेह हे विशेषगुण आणि एकत्व ही संख्या, दीर्घ वर्तुलत्व हे परिमाण, फणस इ. द्रव्यांहून पृथक्‌त्व, हस्तांचा संयोग, वृक्षापासून विभाग म्हणजे अलगपणा, अपक्व आंब्याहून परत्व (ज्येष्ठत्व) हे सामान्य गुण राहतात. वरील विशेष व सामान्य गुण, कर्म व फलत्व हे सामान्य, यांच्याहून आंबा हे द्रव्य निराळे अस्तित्व किंवा भाव आहे, असे वैशेषिकांचे मत आहे. 

रूप, रस, गंध व स्पर्श हे विशेष गुण पृथ्वी, जल, तेज व वायू यांच्या परमाणूंमध्येही असतात, असे वैशेषिक दर्शन मानते. कारणांच्या गुणांपासून कार्यगुण उत्पन्न होतात, असा सामान्य नियम आहे. परमाणूंच्या रूपरसादी गुणांपासूनच परमाणूंच्या पासून निर्माण झालेल्या अवयवीरूप कार्यात तत्समान गुणच उत्पन्न होतात. पृथ्वी-परमाणूंचे रूप, रस, गंध आणि स्पर्श हे गुण पाकाने म्हणजे अग्निसंयोगाने बदलतात. त्यामुळे अवयवींचेही गुण बदलतात. अग्‍निसंयोगाने परमाणूंचेच गुण केवळ बदलत नाहीत, तर अवयवींचेही गुण बदलतात, असे न्यायदर्शनाचे मत आहे. 

गुण हा प्रत्येक व्यक्तीचा निराळा असतो. शंख हा श्वेत असतो, असे सामान्य विधान केले, तरी प्रत्येक शंखाची श्वेतिमा म्हणजे श्वेतरूप हे भिन्न असते. सर्व शंखांमध्ये एक श्वेतिमा राहत नसते, परंतु श्वेतिमा या गुणाची ‘श्वेतिमात्व’ ही जाती मात्र सर्वत्र एक आहे. याबाबतीत पश्चिमी तत्त्वज्ञानात भिन्न मते आढळतात. 

बाह्यार्थवादी बौद्धांच्या मते वरील गुणसमुदायच द्रव्य होय. द्रव्य हा गुणांहून किंवा सामान्याहून भिन्न असा भाव नाही. द्रव्य, सामान्य अथवा क्रिया केवळ कल्पनामात्र (विकल्प) आहेत. म्हणजे गुणांनाच अस्तित्व आहे द्रव्य, कर्म व सामान्य ह्यांना वास्तविक जगात अस्तित्व नाही, असे बौद्ध तत्त्वज्ञान मानते. 

जीवात्मा व परमात्मा ही स्वतंत्र विभू द्रव्ये वैशेषिकांनी मानली असून त्यांपैकी ज्ञान, इच्छा, द्वेष, प्रयत्न, सुख, दुःख, धर्म, अधर्म व संस्कार हे विशेष गुण जीवात्म्याचे असून नित्य ज्ञान, नित्य इच्छा व नित्य प्रयत्न एवढेच विशेष गुण परमात्म्याच्या ठिकाणी वैशेषिकांनी मानले आहेत. 

कर्माहून भिन्न, अवयवीहून भिन्न व सामान्याहून भिन्न द्रव्यात समवायाने राहणारे जे, ते गुण होत असे गुणाचे लक्षण वैशेषिकांनी सांगितले आहे. वैशेषिक दर्शनातील गुणांचे लक्षण हे गोंधळात पाडणारे आहे, ते असे : कर्म हाही द्रव्याचा एक गुणच का मानू नये, असा प्रश्न गुणचर्चेच्या पूर्वपक्षात उपस्थित केलेला असतो. संख्या व पृथकत्व हे गुण द्रव्यातच का मानावे कारण ते गुण, कर्म व सामान्य यांच्यातही आहेत व ते गुणच का मानावे, असाही प्रश्न उपस्थित केलेला असतो. कर्माला गुण म्हणावयाचे नाही याचे कारण (नामाचा अर्थ) व कर्म (धातूचा अर्थ) यांचा व्याकरणशास्त्रात व पूर्वमीमांसाशास्त्रात वेगळा निर्देश असतो. म्हणजे असे, की व्याकरण व पूर्वमीमांसा यांच्या परंपरेला अनुसरून वैशेषिक दर्शन गुण व कर्म हे भिन्न मानते, असे मानण्यास तात्त्विक उपपत्तीचा आधार मिळत नाही. संख्या व पृथक्‌त्व हे गुण प्रथम द्रव्यामध्येच स्पष्टपणे कळतात. चोवीस गुण, पाच कर्मे, त्याचप्रमाणे बहुत संख्येची पृथक् सामान्ये, असा जो निर्देश होतो, तो निर्देश द्रव्यातील संख्या व पृथक्‌त्व यांच्या गुण, कर्म व सामान्ये यांच्यावरील आरोपामुळे होतो आणि हा आरोप विचाराला उपयुक्त होतो म्हणून त्याचा खरेपणा आपण मानतो, असे वैशेषिकांचे उत्तर आहे. संख्या, पृथक्‌त्व इ. स्वतंत्र भाव आहेत हे गुण नव्हेत, असेही काही वैशेषिक मानतात. 

सांख्यदर्शनात सत्त्व, रज व तम या तीन गुणांची म्हणजे तंतूंची बनलेली प्रकृती विश्वाचे मूळ मानली आहे. यातील गुण शब्दाचा अर्थ द्रव्यपरिच्छेदक किंवा वस्तुपरिच्छेदक असा नाही. धागा, तंतू किंवा रज्जू असा गुण शब्दाचा संस्कृत भाषेत अर्थ आहे. त्याच साध्या व्यावहारिक संकल्पनेवरून सांख्यदर्शनातील गुण ही परिभाषिक संकल्पना बनली आहे. परंतु प्रकृती शुद्ध एकविध असेल, तर विश्ववैचित्र्याची उपपत्ती लागत नाही. म्हणून गुणत्रयाची संकल्पना केली. वस्तुपरिच्छेदकत्व त्याने सूचित होते. तीन रंगांच्या तंतूंची वस्त्रे असावीत, हे भिन्न भिन्न रंगांचे तंतू कमीजास्त प्रमाणात विणून वस्त्रे तयार केलेली असावीत तशा ह्या दृश्य विश्वातील वस्तू सत्त्व, रज व तम यांच्या कमीजास्त मिश्रणाने बनलेल्या आहेत. इंद्रियग्राह्य रूप, रस इ. गुण हे ज्या द्रव्यात राहतात ते द्रव्य व गुण यांचा तादात्म्यसंबंध सांख्य मानतात कारण ते गुण प्रकृतीचे परिणाम आहेत आणि परिणाम व परिणाम पावणारे द्रव्य यांत तादात्म्यसंबंध आहे. भारतीय नैतिक संकल्पनांमध्ये सांख्यांच्या गुणसंकल्पनेवरून सात्त्विक, राजस व तामस असे मानवी स्वभावाचे वर्गीकरण केलेले आहे. सात्त्विक गुण हे उत्तम, राजस गुण हे मध्यम व तामस गुण हे अधम, असे हे वर्गीकरण आहे. व्यावहारिक भाषेत सद्‌गुण व दुर्गुण असे दोन भेद दर्शविलेले असतात व त्यांतही अवांतर तरतमभाव आहे. 

संस्कृत साहित्यशास्त्रात साहित्याचे गुण व दोष सांगितले आहेत. साहित्यात जे प्रसाद, ओज व माधुर्य हे इष्ट धर्म असल्यामुळे साहित्य आस्वाद्य ठरते, त्यास गुण म्हणतात आणि क्लिष्टता, पुनरुक्ती, छंदोभंग, अश्लीलता इ. धर्मांमुळे साहित्यात अरुची पैदा होते, ते धर्म दोष होत. साहित्यशास्त्रातील गुण व दोष ही परिभाषा मानवी व्यवहारातील गुण व दोष या संकल्पनांवरून आली आहे. वस्तूचा चांगला धर्म गुण व वस्तूचा वाईट धर्म दोष, असे व्यवहारात या शब्दांचे अर्थ आहेत.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

संदर्भ : 1. Armstrong, D. M. Perception and the Physical World, New York, 1961.

           2. Bhaduri, Sadanand, Studies in Nyaya Vaisesika Metaphysics, Poona, 1947.

           3. Broad, C. D. Scientific Thought, London, 1923.

           4. Burtt, E. A. The Metaphysical Foundations of Modern Physical Science, London, 1925.

           5. Dasgupta, S. N. History of Indian Philosophy, Vol. I, Cambridge, 1922.

           6. Hirst, R. J. The Problems of Perception, London, 1959.

           7. Stebbing, L. Susan, Philosophy and the Physicist, London. 1937. 

          ८. उदयनाचार्य, किरणावली, एशियाटिक सोसायटी, कलकत्ता, १९५६.

          ९. पार्थसारथीमिश्र, शास्त्रदीपिका, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९१५.

        १०. वाचस्पतिमिश्र, सांख्यतत्त्वकौमुदी, निर्णयसागर प्रेस, मुंबई, १९४०.

        ११. वात्स्यायन, न्यायभाष्यम्, आनंदाश्रम प्रेस, पुणे, १९२२.

        १२. व्यास, श्रीमद्‌‌भगवद्‌गीता, वाणीविलास प्रेस, श्रीरंगम्, १९१२.

        १३. व्योमशिवाचार्य, वैशेषिक दर्शने प्रशस्तपादभाष्यं व्योमवतिसमन्वितम्, चौखंबा संस्कृत माला, वाराणसी, १९२४.