जांबात्तीस्ता व्हीकोव्हीको, जांबात्तीस्ता : (२३ जून १६६८–२३ जानेवारी १७४४). इटालियन विचारवंत. नेपल्समध्ये जन्म. जेझुइट कॉलेजात धर्मविषयक शिक्षण पण इतिहास व कायदा या विषयांत स्वतंत्रपणे सखोल अध्ययन. पुढे नेपल्सच्या विद्यापीठात प्राध्यापक (१६९९). त्यांच्या वाट्यास जीवनात बरेच वैफल्य आले. त्यांना अतिशय इष्ट वाटणारे ‘नागरी जीवनविषयक कायदा’ (सिव्हील लॉ) या विषयाचे प्राध्यापकपद प्रयत्न करूनही मिळाले नाही. ‘ऑटोबायग्राफी’ (१७२८, इं. शी.) आणि ‘द न्यू सायन्स’ (१७४४ इं. शी.) हे त्यांचे ग्रंथ बरेच गाजले.

व्हीको हे आरंभी ⇨ रने देकार्तच्या तत्त्वज्ञानाने आणि गणितीय पद्धतीने प्रभावित झाले होते, परंतु नंतर त्यांना दोहोंतील वैगुण्ये दिसू लागली. गणितीय विचारपद्धतीवरील व्हीको यांचे आक्षेप असे की, निसर्गसृष्टीची रहस्ये जाणून घ्यावयास अनुभवाश्रयी वैज्ञानिक निरीक्षण उपयोगी पडते तेथे अनुभवपूर्व अशा गणितीय पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही. दुसरे म्हणजे, मानवी व्यवहारात ज्ञानसंपन्नता (विझडम) आणि चिकित्सक दक्षता (प्रूडन्स) या गुणांचा उपयोग होतो पण हे गुण गणितीय आकडेमोड करून संपादन करता येत नाहीत. तिसरे म्हणजे, मानवाचा गतेतिहास, त्याचे कायद्याने नियंत्रित होणारे समाजजीवन, त्याच्या बुद्धीची नवनिर्मितिक्षमता या गोष्टींवर गणितीय पद्धतीने कोणताच प्रकाश पाडता येत नाही.

देकार्तच्या तत्त्वज्ञानातील तीन प्रधान सूत्रे अशी : (१) ज्या अर्थी मी विचार करतो (शंका-संशय व्यक्त करतो ज्ञान मिळवितो) त्या अर्थी मी (माझे विचारप्रवण मन) अस्तित्वात आहे (‘कॉजिटो, एर्गो सुम’) ही आत्मजाणीव (सेल्फ नॉलेज) संशयातीत आहे. (२) सुस्पष्ट, काटेकोर संकल्पना ही नि:संशय सत्य असते. (३) ईश्वराचे अस्तित्व सुस्पष्टपणे जाणता येते ते तर्कशुद्ध युक्तिवादांनी सिद्ध करता येते. ही तिन्ही सूत्रे सदोष आहेत, असे व्हीको यांनी दाखवून दिले : (१) व्हीको विचारतात, आपणास आपले मन कळते काय? त्यांच्या मते, मन हे स्वत:स जाणूच शकत नाही, कारण मनाने स्वत:ची (मनाची) निर्मिती केलेली नसते. जे आपण स्वत: निर्मिलेले असते, तेच आपणास यथार्थ रीतीने जाणता येते. जे (मन) मनाने निर्मिलेले नाही, ते मनास नीटपणे कळणेच शक्य नाही. (२) सुस्पष्ट, काटेकोर संकल्पना या नेहमी सत्य असतात काय? अनेकदा असा अनुभव येतो की, प्रथम दर्शनी सत्य भासणाऱ्या संकल्पना नंतर खोट्या ठरतात. (३) अनन्त अशा ईश्वरास सान्त अशी मानवी बुद्धी कशी जाणू शकेल? जे बुद्धीनिर्मित आहे, तेच बुद्धिगम्य होते, परंतु सकलसृष्टीकर्ता परमेश्वर हा निश्चितच बुद्धिनिर्मित नाही. त्याच्या अस्तित्वाविषयीचे सगळे लंगडे आहेत.

व्हीको यांच्या दृष्टीने इतिहासांचे अध्ययन शास्त्रांच्या अध्ययनापेक्षा अधिकतर महत्त्वाचे आणि मानवास हितावह ठरणारे आहे. शास्त्रांत बाह्य निसर्गसृष्टीमधील वस्तूंचे ज्ञान होते, तर इतिहासात मानवाच्या चैतन्यशाली जीवनाचे दर्शन घडते. इतिहासाच्या आरशात मानवी जीवनाचे यथातथ्य प्रतिबिंब पाहता येते.

तथापि हे जीवनदर्शन घडण्यासाठी भूतकालीन घटनांकडे आधुनिक संस्कृतीच्या आणि विचारसरणीच्या दृष्टीकोनांतून पाहता कामा नये. प्राचीन काळातील लोकांच्या श्रद्धा-समजुती, उद्दीष्टे, हितसंबंध हे सारे आधुनिक कालातील लोकांच्या श्रद्धा-समजुती आदींपेक्षा अगदी वेगळॆ होते. वास्तव, त्यांच्या जीवनाचे यथातथ्य आकलन होण्यासाठी आपणास त्यांच्या काळाशी आणि तत्कालीन परिस्थितीशी समरसून जाणे आवश्यक आहे.

व्हीकोच्या मते ⇨ ह्यूगो ग्रोशिअस, ⇨ टॉमस हॉब्ज आदी पूर्वीच्या इतिहासकारांनी उचित ऎतिहासिक दृष्टी बाळगली नाही. त्यांनी जुन्या काळाकडे नव्या काळाच्या वैचारिक चष्म्यातून पाहिले. मानवी स्वभाव आणि जीवनरहाटी ही सदासर्वकाळ सारखीच असते. तिच्यात कालानुरूप, परिस्थित्यनुरूप बदल होतच नाही असे त्या इतिहासकारांनी गृहीत धरले होते. साहजिकच, जुन्या काळातील लोकांच्या जीवनाविषयीच्या चुकीच्या कल्पना त्यांच्या मनात ठाण मांडून बसल्या. म्हणून त्यांच्या हातून गैर स्वरूपाचे इतिहासलेखन घडले.

इतिहासाचे स्वरूप चक्राकार अथवा वर्तुळाकार असते, असा व्हीको यांचा सिद्धान्त होता. तदनुसार प्रत्येक मानवी समाज हा क्रमश: सुस्थितीच्या आणि दुरवस्थेच्या अवस्थांमधून जात असतो. प्रत्येक समाजात प्रथम उन्नतीचे व नंतर अवनतीचे टप्पे दृग्गोचर होतात.    

प्रारंभी मानवजात पशुवत् अवस्थेत होती. नंतर पितृसत्ताक कुटुंबपद्धती विकसित झाली. पुढे मानवी जीवनात देवदेवतांचे युग अवतरले. धर्म उदयास आला. पुढे क्रमश: नरवीरांचे युग, स्वल्पतंत्र (ऑलिगर्की), सरंजामशाही व लोकशाही या प्रकारच्या व्यवस्था निर्माण होत गेल्या. लोकशाही व्यवस्था हीदेखील हळूहळू भ्रष्टाचाराने पोखरली जात अखेर कोलमडून पडते. या प्रकारे पुनश्च जीवनाच्या विकासाचे चक्र फिरु लागते.    

व्हीको यांनी भाषा आणि मिथके यांच्या संदर्भात लक्षणीय विचार प्रकट केले. त्यांनुसार त्या-त्या मानवी समुदायातील प्रचलित भाषा आणि लोकप्रिय मिथके यांत या समुदायांच्या भूतकालीन जीवनाचे प्रतिबिंब पडलेले असते. यास्तव शब्दांच्या व्युत्पत्तीचा अभ्यास केल्याने गतकालीनांच्या जीवनसरणीची जवळून ओळख होऊ शकते. प्रचलित भाषेतल्या शब्दांची मुळे गतकालीनांच्या जीवनरहाटीत रुजलेली असतात.


भाषा ही कालप्रवाहात सतत उत्क्रांत होत असते. हावभावांच्या आद्य भाषेपासून आधुनिक वैचारिक गद्यभाषेपर्यंत झालेल्या विकासाचे दिग्दर्शनही व्हीको यांनी केले आहे. परंपरागत मिथकांतील कल्पनांची मुळे प्राचीन मनुष्यसंस्कृतीच्या वास्तवात आहेत, हेही व्हीको यांनी स्पष्ट केले.

व्हीको हे ईश्वरनिष्ठ होते तथापि कायदा हा ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे, असे प्रगल्भ मत त्यांनी प्रतिपादन केले. भिन्नभिन्न देशांचे, भिन्नभिन्न मानवसमूहांचे कायदे भिन्नभिन्न आहेत, या वस्तुस्थितीवर त्यांनी नेमके बोट ठेवले.

सर्व देशांत, सर्व मानवसमूहांत लिखित वा अलिखित कायद्याचे राज्य चालते. या काद्यांच्या मुळाशी काहीएक त्रिकालाबाधित, सार्वत्रिक सत्य अथवा सिद्धान्त असतो, असे म्हणता येत नाही. त्या-त्या काळातील जनसामान्यांची सामाजिक जाणीव, त्यांची जीवनपद्धती, त्यांच्या कामधंद्यांचे, उद्योगव्यवहारांचे स्वरूप, त्यांच्या सामाजिक संस्थांची कार्यपद्धती, त्यांच्या नैतिक, धार्मिक समजुती इ. विविध कारणांवर कायद्यांचे स्वरूप अवलंबून असते.

मानवाचे सामाजिक जीवन, इतिहास, कायदा, न्यायदानपद्धती यांसंबंधीच्या व्हीको यांच्या संकल्पना आणि विचार अभिजात, अभिनव आणि विचारप्रवर्तक होते. मात्र त्यांना समकालीनांकडून विशेष प्रतिसाद मिळाला नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची भारदस्त, बोजड, खडबडीत लेखनशैली हे होय.

एकोणिसाव्या शतकात मात्र जर्मनीमधील व्हीको यांच्या ग्रंथांकडे आणि त्यांतल्या विचारप्रक्षोभक सिद्धान्तांकडे विद्वानांचे लक्ष गेले.

व्हीको यांनी मानव्यविद्यांच्या अभ्यासाला तात्त्विक बैठक मिळवून दिली. ‘द न्यू सायन्स’ (इं. शी.) हा त्यांचा ग्रंथ त्यात काही खटकणारी वैगुण्ये असूनही युरोपीय विचारांच्या इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जातो. त्यांनी देकार्तच्या शिकवणीचे तर्कशुद्ध खंडन केले. तसेच गणितीय विचारसरणीच्या मर्यादा निर्विवादपणे दाखवून दिल्या. ही त्यांची कामगिरी ऐतिहासिक महत्त्वाची ठरते.

  व्हीको हे अतिशय धार्मिक वृत्तीचे, ईश्वरवादी, कॅथलिक पंथीय ख्रिश्चन होते. मानवी इतिहासाच्या घटनांत बुद्धिगम्य सुसूत्रता आढळते, कारण त्या घटनांच्या मुळाशी ईश्वरी संकेत आणि योजना अनुस्यूत असते, अशी त्यांची प्रामाणिक श्रद्धा होती. तथापि एकीकडे त्यांचा हा ईश्वरवाद, तर दुसरीकडे मानव हा स्वकर्तृत्वाने ज्ञानसंपन्न, जीवनोद्धारक, प्रगतिसाधक होतो हा त्यांचा मानवतावाद या दोहोंत उघडच विसंगती होती. एकीकडे त्यांची कॅथलिक पंथीय ख्रिश्चन धार्मिक वृत्ती व दुसरीकडे मानव्यविद्यांच्या संशोधनात त्यांनी प्रशंसिलेली व अवलंबिलेली वैज्ञानिक दृष्टी या दोहोंत व्याघात होता.

नेपल्स येथे त्यांचे निधन झाले.

पहा : इटालियन साहित्य इतिहासाचे तत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Caponigiri, A. R. Time and Idea : Theory of History in Giambattista Vico, London, 1953.             2. Croce, Benedetto, The Philosophy of Giambattista Vico, London, 1913.              3. Vico Giambattista Trans.  Bergin, T. G. Fisch, M. H. The Autobiography of Giambattista Cico, New York, 1944.              4. Vico, Giambattista Trans. Bergin, T. G. Fisch, M. H. The New Science of Giambattista Vico, New York, 1968. 

केळशीकर, शं. हि.