बारूख स्पिनोझा

स्पिनोझा, बारूख : (२४ नोव्हेंबर १६३२ — २१ फेब्रुवारी १६७७). विख्यात विवेकवादी तत्त्वज्ञ रने देकार्त (१५९६ — १६५०) ह्याच्या नंतरचा श्रेष्ठ विवेकवादी तत्त्वज्ञ. बारूख हे त्याचे हिब्रू नाव बेनेडिक्ट हे त्याच्या नावाचे लॅटिन रूप. जन्माने ज्यू. ॲम्स्टरडॅम ( नेदर्लंड्स ) येथे जन्मला. त्याचे वडील आणि आजोबा मूळचे पोर्तुगीज होते. हे कुटुंब ज्यू असले, तरी स्पॅनिश धर्म न्यायपीठाने त्यांना सक्तीने ख्रिस्ती होण्यास भाग पाडले होते तथापि हॉलंडने स्पेनविरुद्ध केलेले बंड यशस्वी झाल्यावर आणि धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी ॲम्स्टरडॅममध्ये आश्रय घेतला.

स्पिनोझा हे समृद्ध व्यापारी कुटुंब होते. ज्यू समाजात त्यांना मोठा मान होता. त्यामुळे १६३८ मध्ये ॲम्स्टरडॅममध्ये स्थापन झालेल्या ज्यू शाळेत त्याने धर्मशिक्षण घेतले असावे. शाळेच्या तासांपलीकडे मुलांना लौकिक विषय खाजगी रीत्या शिकता येत. स्पिनोझाला एका जर्मन पंडिताने लॅटिन भाषेचे शिक्षण दिले. त्यानेच त्याला जर्मन भाषाही शिकवली असावी. १६५४ मध्ये स्पिनोझाचे वडील वारले. त्याच्या सावत्र बहिणीने वडिलांच्या मालमत्तेवर दावा सांगितल्यामुळे न्यायालयात जाण्याचा प्रसंग त्याच्यावर आला. निर्णय स्पिनोझाच्या बाजूने झाला तथापि स्पिनोझाने तिला जवळपास सर्वच मालमत्ता देऊ केली.

स्पिनोझाने राब्बी ( ज्यू विद्वान तसेच धार्मिक ग्रंथ व तत्त्वे शिकवणारे ) होण्यासाठी आवश्यक ते शिक्षण घेतले होते तथापि त्याच्या स्वतंत्र विवेकबुद्धीला त्या धर्मातले काही सनातनी सिद्धांत मान्य झाले नाहीत. तसेच धर्मग्रंथांचे लावण्यात आलेले काही अर्थही पटले नाहीत. साहजिकच ज्यू धर्माधिकार्‍यांचा त्याच्यावर रोष झाला. पाखंडी विचार व्यक्त केल्यामुळे १६५६ मध्ये त्याला धर्मबहिष्कृत करण्यात आले होते. तसेच ॲम्स्टरडॅमच्या नागरी प्रशासनानेही त्याला त्या शहरातून अल्पकाळ हद्दपार केले होते. त्याची काही मते अशी होती : ईश्वराला शरीर नाही देवदूत खरोखरीच अस्तित्वात आहेत आत्मा अमर आहे. अशा विचारांना बायबलमध्ये कसलाही आधार नाही. त्याचे असेही प्रतिपादन होते, की बायबलच्या ‘ जुन्या करारा ’ च्या पहिल्या पाच पुस्तकांचा ( पेंटाट्यूक ) लेखक — जो परंपरेने सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित मोझेस हा मानला जातो — भौतिकीत आणि ईश्वरविद्येतही त्याच्यासारख्या विद्यार्थ्यांपेक्षा अधिक ज्ञानी नव्हता. हे विचार ज्यू धर्मविरोधी, तसेच ख्रिस्ती धर्मविरोधीही होते.

स्पिनोझाने काही काळ ॲम्स्टरडॅममधल्या एका शाळेत अध्यापन केले होते. तेथे असताना त्याने आपले लॅटिनचे ज्ञान वाढवले ग्रीक भाषेचाही काही अभ्यास केला नव-स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानाशीही त्याची ओळख झाली आणि तेथेच रने देकार्तच्या तत्त्वज्ञानाशी त्याचा परिचय झाला असावा.

ह्याच सुमारास चष्म्याच्या काचा घासून, तासून तयार करण्यात त्याने प्रावीण्य मिळविले. दुर्बिणींच्या आणि सूक्ष्मदर्शकांच्या काचाही तो तयार करीत असे. त्या व्यवसायातून त्याचा काही चरितार्थ चालत असे. स्पिनोझाच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक-तात्त्विक समस्यांची चर्चा करणारे एक मंडळ अस्तित्वात आले होते तथापि आपल्या विचारांना एका प्रणालीचे स्वरूप देण्यासाठी र्‍हाइन नदीच्या तीरावर शांतनिवांत गावी तो जाऊन राहिला (१६६०). तेथे असतानाच प्रिन्सिपल्स ऑफ कार्टे-शिॲनिझम शॉर्ट ट्रिटाइज ऑन गॉड, मॅन अँड हिज वेल-बीइंग (सु. १६६२, इं. भा. १९१०) आणि ट्रिटाइज ऑन द इंप्रूव्हमेंट ऑफ द अंडरस्टँडिंग (१६६२) हे ग्रंथ त्याने लिहिले. मे १६७० मध्ये द हेग येथे तो वास्तव्यास गेला. तेथे तो अखेरपर्यंत राहिला.

उपर्युक्त ग्रंथांखेरीज त्याने लिहिलेले अन्य ग्रंथ असे : पार्टस् फर्स्ट अँड सेकंड ऑफ देकार्त्स प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी, डेमॉन्स्ट्रेटेड इन द जॉमेट्रिकल मॅनर बाय बेनेडिक्ट दे स्पिनोझा (१६६३, इं. भा. १९०५), एथिक्स डेमॉन्स्ट्रेटेड इन द जॉमेट्रिकल ऑर्डर (५ भाग, १६७० — ७५), थिऑलॉजिकल पोलिटिकल ट्रिटाइज (१६७०). त्याचे काही ग्रंथ त्याच्या मृत्यूनंतर १६७७ ह्या वर्षाच्या अखेरीस बी. डी. एस्. ऑपेरा पोस्ट्यूमा ह्या नावाने संकलित करून प्रसिद्ध केले. यात एथिक्स …, दि कॉरस्पाँडन्स ऑफ स्पिनोझा, पोलिटिकल ट्रिटाइज ( अपूर्ण ), ट्रिटाइज ऑन द करेक्शन ऑफ द अंडरस्टँडिंग ( अपूर्ण ), कंपेंडिअम ऑफ हिब्रू ग्रामर यांचा समावेश होतो.

स्पिनोझाला क्षयाचा विकार होता. त्यातच काचा घासण्याच्या उद्योगा-मुळे काचेचे कण श्वासावाटे त्याच्या शरीरात जात. त्यामुळे त्याचा तो विकार वाढत गेला. द हेग येथे तो निधन पावला. त्याला कुणी वारस नव्हता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे जे काही होते, त्याचा लिलाव करण्यात आला. त्यात १६० ग्रंथ होते. त्यांची सूची आजही जपलेली आहे.

स्पिनोझा हा विवेकवादी तत्त्वमीमांसक म्हणून ओळखला जातो. विवेकवादी तत्त्वमीमांसेचा आरंभ रने देकार्त ह्या फ्रेंच तत्त्ववेत्त्यापासून सुरू होतो. सर्व मानवी ज्ञानाची पुनर्रचना भक्कम पायावर करायची, तर जी विधाने पूर्णपणे संशयातीत असतील, तेवढीच सत्य म्हणून स्वीकारली पाहिजेत, अशी देकार्तची भूमिका होती. अशा संशयातीत विधानांपासून निष्पन्न होणार्‍या विधानांचे पायरीपायरीने निगमन करणे, ही ज्ञानप्राप्तीची प्रमाण रीत होय, असे त्याचे प्रतिपादन होते. गणितामध्ये — उदा भूमिती-मध्ये — ह्या निगामी रीतीचा आदर्श आढळतो, असेही त्याचे म्हणणे होते. देकार्तच्या विवेकवादी तत्त्वज्ञानाचा स्पिनोझाने सखोल अभ्यास केला होता. त्याच्याकडे खाजगी रीत्या शिकावयास येणार्‍या एका विद्यार्थ्याला तो देकार्तचे तत्त्वज्ञान शिकवीत होता. स्पिनोझा हा बर्‍याच प्रमाणात कार्टेशिअन परंपरेतला तत्त्वज्ञ आहे. कार्टेशिॲनिझम ही रने देकार्तच्या तत्त्वज्ञानीय लेखनातून निष्पन्न झालेली एक विचारपरंपरा होय. कार्टेशिअनांनी देकार्तच्या मध्यवर्ती सिद्धांताचा स्वीकार केला होता. स्पिनोझाचे काही मूलभूत तत्त्वमीमांसात्मक आणि ज्ञानमीमांसात्मक ( एपिस्ट्मॉलॉजिकल ) सिद्धांत कार्टेशिअन आहेत. त्याची भौतिकीही बरीचशी कार्टेशिअनच आहे तथापि असे म्हणता येईल, की त्याने देकार्तच्या तत्त्वज्ञानाचा विकास केला आणि त्या तत्त्वज्ञानाला स्वतःची अशी एक प्रतिक्रियाही दिली. पार्ट्स फर्स्ट अँड सेकंड ऑफ देकार्त्स प्रिन्सिपल्स ऑफ फिलॉसॉफी, डेमॉन्स्ट्रेटेड इन द जॉमेट्रिकल मॅनर हे देकार्तच्या तत्त्वज्ञानाचे भौमितिक पद्धतीने केलेले सादरीकरण होय तथापि ह्या ग्रंथाच्या प्रास्ताविकातच हे स्पष्ट केलेले आहे, की ह्या ग्रंथात व्यक्त झालेल्या विचारांत स्पिनोझा सहभागी नाही.

देकार्त आणि स्पिनोझा यांच्यातील मतभेद ईश्वर, भौतिक वस्तू आणि मने यांसंदर्भातील त्यांच्या भूमिकांतून स्पष्ट होतो. देकार्तच्या मते विश्वात दोन प्रकारची, पूर्णतः भिन्न अशी द्रव्ये आहेत. ती म्हणजे भौतिक वस्तू आणि मने. विस्तार हा भौतिक वस्तूंचा सारधर्म असून ( सारधर्म किंवा सार म्हणजे जे धर्म अंगी असल्यामुळे एखादी वस्तू ही अमुक एका विशिष्ट प्रकारची वस्तू आहे, असे ठरते. उदा., तीन रेषांनी बंदिस्त असणे, हे त्रिकोणाचे सार होय ) जाणीव हा मनाचा सारधर्म आहे. विस्तार आणि जाणीव हे पूर्णपणे भिन्न असे धर्म आहेत त्यामुळे ते एकाच वस्तूच्या ठायी नांदू शकणार नाहीत. ह्यांशिवाय आणखी एक द्रव्य आहे. जे स्वतःच्या अस्तित्वाचे पर्याप्त कारण आहे तसेच ते इतर वस्तूंच्या अस्ति-त्वाचेही पर्याप्त कारण आहे. हे तत्त्व स्वीकारावे लागते, कारण ते सत्य असल्याचे साक्षात असंदिग्ध दर्शन आपल्याला घडते. जे आहे ते का आहे, ह्याचे पर्याप्त कारण आपल्याला ह्या दर्शनातून समजते. हे द्रव्य म्हणजे स्वतःसिद्ध ईश्वर, त्याच्यापासून निर्माण झालेल्या भौतिक वस्तू आणि मने अशी एकूण तीन प्रकारची द्रव्ये आहेत.


स्पिनोझाची भूमिका मात्र अशी होती, की द्रव्याला स्वतःचाच आश्रय असतो. त्याचे गुण मात्र द्रव्याच्या आधारे वसतात. म्हणजे ते परावलंबी असतात. त्यामुळे ते गुण होऊ शकत नाहीत. थोडक्यात, ज्याचे अस्तित्व अन्य कशापासून निष्पन्न झालेले असते ते द्रव्य असू शकत नाही पण ज्याचे अस्तित्व त्याच्या स्वतःच्याच रूपापासून निष्पन्न होते, जे स्वतःच आपल्या अस्तित्वाचे पर्याप्त कारण असते, ते द्रव्य होय. सर्व वस्तू ईश्वरापासून अनिवार्यतेने निष्पन्न होतात. म्हणजेच त्यांचे अस्तित्व ईश्वराच्या अस्तित्वावर अवलंबून असते, तर एकमेव असे जे द्रव्य म्हणजे ईश्वर, त्याचे ते विकार असतात. त्यामुळे द्रव्य एकच आणि ते म्हणजे ईश्वर. ईश्वर आणि निसर्ग हे एकच आहेत, असेही स्पिनोझाच्या भूमिकेतून प्रत्ययास येते.

स्पिनोझाच्या भूमिकेप्रमाणे द्रव्य एकच त्याचे सारतत्त्वही एकच पण वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून पाहिले, तर हे सारतत्त्व वेगवेगळ्या रूपांमध्ये बुद्धीला प्रतीत होते. एका दृष्टिकोनातून पाहिले, तर हे सारतत्त्व जाणीव किंवा विचार ह्या स्वरूपात प्रतीत होते तर दुसर्‍या दृष्टिकोनातून पाहिल्यास, हेच सारतत्त्व विस्तार ह्या स्वरूपात प्रतीत होते. त्यामुळे जाणीव आणि विस्तार हे पूर्णपणे भिन्न असे धर्म नाहीत. त्यांना पूर्णपणे भिन्न मानून त्यांच्यात द्वैत आहे, असे समजण्याची आवश्यकता नाही. विचार आणि विस्तार हे द्रव्याचे दोन धर्म आहेत आणि द्रव्यापासून अनिवार्यतेने निष्पन्न होणार्‍या वस्तूंच्या किंवा विकारांच्या ठायीही हे दोन धर्म अस्तित्वात असतात. उदा., मानवी शरीर ही एका दृष्टीने विस्तारलेली वस्तू , तर दुसर्‍या दृष्टीने जाणीव असलेली वस्तू.

प्रत्येक वस्तूमध्ये आपले अस्तित्व टिकवून धरण्याची प्रेरणा असते. ही प्रेरणा म्हणजेच तिचे सत्त्व. ते तिला एकमेव द्रव्य असलेल्या ईश्वरा-कडून प्राप्त झालेले असते. एखाद्या माणसावर त्याच्या परिसरातील वस्तू परिणाम घडवून आणीत असतात. त्याचे मनोविकार, वेदने, कल्पना हे अशा काही परिणामांचे स्वरूप असते. हे परिणाम त्याचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी जेवढे अनुकूल, तेवढे ते सुखद आणि इष्ट जेवढे प्रतिकूल असतील, तेवढे ते दुःखद आणि अनिष्ट. माणसाच्या अक्रियतेमुळे तो ‘ बद्धावस्थेत ’ असतो आणि इतर वस्तू त्याच्यावर परिणाम घडवून आणीत असतात परंतु सर्व वस्तू आणि आपण ईश्वराच्या सत्त्वांपासून अनिवार्यतेने निष्पन्न होतो. हे विवेकजन्य ज्ञान जेव्हा माणसाला होते तेव्हा त्याची ‘ बद्धावस्था ’ संपते तो सक्रिय होतो. ईश्वरावरील बौद्धिक प्रेमाचा अनुभव त्याला येतो आणि त्यातच त्याचे परिपूर्ण कल्याण असते. देकार्तची विवेकवादी ज्ञानमीमांसा स्पिनोझाने बरीचशी स्वीकारली होती तथापि त्याच्या ईश्वरविषयक भूमिकेतून त्याची आध्यात्मिकता प्रकट होते.

बायबलचा आधुनिक काळातील व्यासंग आणि बायबलवरील भाष्य ह्यांना ज्यांनी चालना दिली, त्यात स्पिनोझाचा समावेश होतो. बायबलविषयीचे आपले विचार त्याने थिऑलॉजिकल पोलिटिकल ट्रिटाइज ह्या आपल्या ग्रंथात मांडले. त्याच्या काही पत्रांतूनही ते आले आहेत. बायबलच्या ‘ जुन्या करारा ’ च्या पहिल्या पाच पुस्तकांचा लेखक सर्वश्रेष्ठ ज्यू प्रेषित मोझेस असल्याच्या विश्वासाला जवळपास सार्वत्रिक मान्यता असली, तरी ती पुस्तके मोझेसने लिहिली नाहीत, असे मत स्पिनोझाने मांडले होते. त्याच्या मते, त्या पुस्तकांचा कर्ता मोझेसनंतर होऊन गेलेला कोणीतरी असावा. मोझेसचे पुस्तक वेगळे होते. ते छोटे होते आणि बुक ऑफ द लॉज ऑफ द गॉड असे त्याचे नाव होते. बायबलची चिकित्सा करताना आरंभीच स्पिनोझा म्हणतो, की बायबलचा अर्थ लावण्यासाठी एक खरीखुरी पद्धत शोधून काढली पाहिजे. त्याच्या मते बायबलचा अर्थ लावण्याची पद्धत निसर्गाचा अर्थ लावण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी नाही. बायबलचा अर्थ लावण्याची ही दृष्टी पूर्णतः लौकिक ( सेक्युलर ) होती. बायबलचा चिकित्सक अभ्यास करताना बायबल च्या लेखकांची भाषा, ती कशा प्रकारे वापरली गेली आहे हे आणि ज्या परिस्थितीत बायबलचा भाग असलेली पुस्तके लिहिली गेली, ती परिस्थिती ( परिस्थितीच्या संदर्भात लेखकाचे हेतूही समाविष्ट ) ह्यांचीही चिकित्सा झाली पाहिजे. ही दृष्टी स्वीकारून स्पिनोझाने बायबलला मानवी इतिहासाच्या कक्षेत आणले. थिऑलॉजिकल पोलिटिकल ट्रिटाइज च्या आरंभीच स्पिनोझा असा प्रश्न उपस्थित करतो, की सर्वसाधारण माणसाला विवेक आणि अनुभव ह्यांच्या आधारे जे ज्ञान प्राप्त होऊ शकते, त्याच्यापेक्षा वेगळे असे काही विशेष ज्ञान धर्मप्रेषितांकडे होते काय ? स्पिनोझाच्या मते, त्यांच्याकडे असे विशेष ज्ञान नव्हते पण त्यांची कल्पनाशक्ती अधिक उत्कट आणि तीव्र होती.

स्पिनोझाचा असा दावा होता, की काही ग्रंथ स्वयंस्पष्ट असतात. त्यांत वापरलेल्या संकल्पना स्पष्ट असतात. त्यांतले युक्तिवादही सुस्पष्ट असतात. त्यामुळे ते समजून घेण्यासाठी अधिक माहितीची गरज नसते. ह्या संदर्भात तो यूक्लिडच्या एलिमेंट्स ह्या ग्रंथाचा निर्देश करतो. यूक्लिड समजावून घेण्यासाठी ग्रीक भाषेचे ज्ञान आवश्यक नसते. तसेच यूक्लिडचे व्यक्तिगत जीवन ठाऊक असण्याचीही गरज नसते. यूक्लिडने कोणत्या परिस्थितीत लेखन केले, हेही जाणणे जरूरीचे नसते. बायबलची अशी गोष्ट नाही. बायबल च्या स्त्रोतांचा अन्वयार्थ लावताना स्पिनोझा त्याच्या काळाच्या फार पुढे होता, हे दिसून येते.

स्पिनोझाच्या Ethics चे पाच भाग आहेत. पहिल्या भागात ईश्वर आणि द्रव्याचा ( सब्स्टन्स ) अर्थ ह्या विषयाचा परामर्श त्याने घेतला आहे. दुसर्‍या भागाचा विषय मन आणि ज्ञान हा आहे. तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या भागांत वासना, माणसांची भावनाशरणता आणि विवेक वा बुद्धी ह्या सद्गुणांच्या आधारे माणसांना प्राप्त होणारे स्वातंत्र्य हे विषय विवेचिले आहेत. ईश्वराच्या विचारापासून मानवी स्वातंत्र्यापर्यंतच्या विचारापर्यंत जाणे हा Ethics च्या केंद्रस्थानी असलेला विषय आहे. त्यासाठी स्पिनोझाने ज्ञान आणि वासना ह्यांच्यातील संघर्षाचे विश्लेषण केले आहे. ह्या संदर्भात ऑन द इंप्रूव्हमेंट ऑफ द अंडरस्टँडिंग ह्या त्याच्या ग्रंथाचा आशय पाहता येईल. अत्यंत व्यक्तिगत निवेदन करण्याच्या पद्धतीने स्पिनोझाने ह्या ग्रंथाच्या आरंभीच म्हटले आहे, की अनुभवाने मला हे शिकवले, की आपला नित्याचा परिसर, सामाजिक जीवन आणि सर्व-सामान्य जीवनात घडणार्‍या घटना निरर्थक, निसःत्त्व आहेत. त्यामुळे मी खरे सुख आणि आनंद प्राप्त करून घेण्याचा निश्चय केला. संपत्ती, कीर्ती आणि इंद्रियसुख ह्यांचाच सन्मान माणसे सर्वत्र करीत असतात पण ह्या गोष्टींच्या मागे लागून त्यांचे आयुष्य समृद्ध होण्यापेक्षा निःसत्त्व होत जाते. अशा दुःखमय आयुष्यावर उपाय एकच : आपल्या मानसिकतेत सुधारणा घडवून आणणे, आपले मन शुद्ध करणे. माणसाला काय सत्य आणि महत्त्वपूर्ण वाटते, त्यावर त्याची वास्तवाबद्दलची अभिवृत्ती ( ॲटिट्यूड ) अवलंबून असते. माणसाच्या मनात संवेदनांचे मिश्रण होऊन त्याच्या बुद्धीचा गोंधळ उडतो. त्यामुळे तो नाशवंत वस्तूंची इच्छा बाळगतो. शाश्वत आनंदाचा शोध घ्यायचा, तर स्वतःचे आणि सर्वसाधारण निसर्गाचे नेमके ज्ञान असले पाहिजे. त्यातून त्याला कोणत्या हद्दीपर्यंत त्यात सुधारणा घडवून आणता येतील, ह्याची जाण येईल. हे होण्यासाठी वास्तवाचे अधिकाधिक समावेशक आकलन व्हायला हवे. स्पिनोझाच्या राजकीय विचारांत अपरिहार्यपणे स्वातंत्र्याची आवश्यकता केंद्रस्थानी आहे. विख्यात तत्त्वज्ञ टॉमस हॉब्ज ह्याचे काही विचार तो स्वीकारतो पण त्याचा प्रयत्न हॉब्जच्या पलीकडे जाण्याचा आहे. राजकारण हे पूर्णतः सत्तेशी निगडित असते, हे तो हॉब्जप्रमाणेच पूर्णतः स्वीकारतो. त्याचप्रमाणे हॉब्जने ‘ सामाजिक करारा ’ बद्दल व्यक्त केलेली धारणाही त्याला मान्य आहे. हॉब्जच्या मते, समाजात अराजक माजून शांततेला आणि जगण्या-वाचण्यालाच धोका पोहोचू नये म्हणून एखाद्या सार्वभौम सत्तेला आपण आपली व्यक्तिगत सत्ता हस्तांतरित करीत असतो. हा एक सामाजिक करार असतो. ‘ मला अमुक एक हक्क आहे ’ म्हणजे ‘ मला अमुक एक सत्ता आहे , असे हॉब्जने मांडलेले समीकरण तो स्वीकारतो. त्याचप्रमाणे हा सामाजिक करार आपल्याला लाभदायी नाही, असे वाटल्यास आपण तो करार पाळावयास बांधलेले नाही, असे हॉब्जप्रमाणे तोही मानतो तथापि ‘ लाभ ’ म्हणजे काय, ह्याबाबत मात्र हॉब्जपेक्षा त्याची कल्पना वेगळी आहे. हॉब्जच्या मते लाभ म्हणजे इतरांकडून प्रतिबंध न होता आपल्या जितक्या इच्छांचे समाधान करता येईल तितके ते करता येणे तथापि स्पिनोझाच्या मते हॉब्जच्या कल्पनेतला मनुष्य ज्या इच्छा पूर्ण करण्याची आकांक्षा बाळगतो, त्याच इच्छांच्या बंधनांपासून दूर जाणे. त्यामुळे स्पिनोझा असे राज्य पसंत करतो, की जेथे नागरी शांततेसाठी सर्वप्रथम विविध मतमतांतरे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळविले जाते. फक्त ह्या स्वातंत्र्याचा उपयोग राजद्रोही कृती करण्यासाठी होऊ नये. ज्या जनतेला विवेकशून्य विश्वास मान्य नाहीत, ते तिच्यावर लादले तर जे सामाजिक कलह आपण टाळू पाहतो, तेच समाजात निर्माण होतात, असेही त्याचे मत होते. हे हॉब्जच्या विचारांसारखे नाही. हॉब्जच्या मते, मत म्हणजे विवादाचा स्रोत होय आणि आपण सार्वभौम सत्तेला मतांच्या अभि-व्यक्तीसाठी प्रमाणे ठरविण्याचीही सत्ता देत असतो. स्पिनोझा आणि हॉब्ज ह्यांच्यातला हा मतभेद त्यांच्या दृष्टिकोनांत असलेल्या फरकामुळे झालेला आहे. हॉब्जचे असे प्रतिपादन होते, की आपल्या इच्छांनी जी साध्ये ठरविलेली असतात, ती साध्य करण्याचे एक साधन म्हणजे विवेक किंवा बुद्धी. स्पिनोझाची मात्र अशी धारणा होती, की विवेकी चिकित्सेने विवेकी माणसासाठी जी साध्ये ठरविलेली असतात, त्या साध्यांनुसार आपल्या इच्छांचे रूपांतर घडवून आणले पाहिजे. त्यामुळे हॉब्जला राजेशाहीमध्ये सुरक्षितता दिसत होती, तर स्पिनोझाला लोकशाही सर्वोत्तम वाटत होती.

पश्चिमी जगातल्या बुद्धिमंतांमध्ये आणि बौद्धिक इतिहासामध्ये स्पिनोझाचे स्थान अढळ आहे. अठराव्या शतकात एक नास्तिक म्हणून त्याची संभावना केली जात होती. काही तत्त्वज्ञांनीही त्याच्यावर जहाल टीका केली होती तथापि जर्मन नाटककार आणि समीक्षक गोट्होल्ट एफ्राइम लेसिंग, जर्मन महाकवी गटे, इंग्रज कवी सॅम्युएल टेलर कोलरिज ह्यांनी त्याच्याबद्दल आदर प्रकट केला. स्पिनोझाच्या विचारांनी ते प्रभावित झाले होते. स्पिनोझामध्ये त्यांना कुठल्याही परंपरागत मताला किंवा ठरावीक मताला ( डॉग्मा ) बांधून न घेणारा एक धर्मपरायण मनुष्य आढळला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी त्याच्या ग्रंथांचा अभ्यास आदर्शवादी तसेच मार्क्सवादी विचारवंतांनी केला. स्पिनोझाचे प्रमुख ग्रंथ आर्.एच्.एम्. एल्विस याने The Chief Works of Benedict de Spinoza (खंड १, १९५१) या नावाने अनुवादित केले आहेत.

संदर्भ : 1. Briton, H. H. Trans., The Principles of Descarts Philosophy, Chicago, 1905.

           2. Caird, Edward, Spinoza, London, 1902.

           3. Garrett, Don, Ed., Spinoza, 1996.

           4. Hallett, H. F. Benedict de Spinoza, The Elements of His Philosophy, London, 1957.            

           5. Hampshire, S. Spinoza, London, 1951.

           6. Joachim, H. H. A Study of Spinoza¢s Ethics, Oxford, 1901.

          7. Nadler, Steven, Spinoza : A Life, U. K., 1999.

          8. Parkinsan, G. H. R. Spinozas Theory of Knowledge, Oxford, 1954.

          9. Saw, R. L. The Vindication of Metaphysics : A Study in the Philosophy of Spinoza,   New York, 1951.

        10. Wolfson, H. A. The Philosophy of Spinoza, 2 Vols., New York, 1958.

 

कुलकर्णी, अ. र.