ब्यरद्यायेव्ह, निकोलाई : (१९ मार्च १८७४ – २३ मार्च १९४८). प्रसिद्ध रशियन धार्मिक तत्त्ववेत्ता. जन्म युक्रेनमधील कीव्ह या शहरी. उमराववर्गात जन्मलेल्या ब्यरद्यायेव्ह यांचा विद्यार्थिदशेत मार्क्सवादाकडे ओढा होता आणि त्यामुळेच त्यांना १८९९ पासून तीन वर्षे हद्दपारीची शिक्षाही भोगावी लागली. पुढे रशियात कम्युनिस्ट क्रांती झाल्यानंतर १९२० मध्ये मॉस्को विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली परंतु पोथीनिष्ठ मार्क्सपंथीयांशी त्यांचे फार काळ जुळणे अशक्य होते. तेव्हा त्यांनी देशत्याग केला आणि बर्लिन येथे तत्त्वज्ञान व धर्म यांच्या अध्ययनासाठी एक संस्था स्थापन केली. ती त्यांनी १९२४ मध्ये पॅरिस येथे हलविली. आपले उरलेले आयुष्य त्यांनी तेथेच तत्त्वज्ञानाच्या व्यासंगात आणि लेखनात व्यतीत केले. पॅरिसच्या क्लामार्त ह्या उपनगरातील निवास स्थानी त्यांचे निधन झाले.

मानवी जीवन, समाज आणि इतिहास हे ब्यरद्यायेव्ह यांच्या चिंतनाचे मध्यवर्ती विषय होते. आपल्या तत्त्वज्ञानाची सुव्यवस्थित मांडणी जरी त्यांनी केली नसली, तरी तिला तत्त्वमीमांसक (मेटॅफिजिकल) अधिष्ठान आहे. ह्या अधिष्ठानाचे वर्णन असे करता येईल : स्वातंत्र्य किंवा सर्जनशीलता – नाविन्याला अस्तित्व देण्याची क्षमता व प्रवृत्ती – हे अस्तित्वाचे सम्यक् स्वरूप आहे. ह्या सर्जनशीलतेत दोन प्रवृत्तींचा मिलाफ झालेला असतो.

निकोलाई ब्यरद्यायेव्ह

एक प्रवृत्ती ‘नकारी’, ऋणस्वरून असते. ही प्रवृत्ती म्हणजे केवळ शक्यता असते. ही प्रवृत्ती म्हणजे केवळ शक्यता असते ब्यरद्यायेव्ह यांचे म्हणणे असे, की अस्तित्वाचे स्वरूप जर केवळ निश्चित ‘परिनिष्ठित’ असते, तर सर्जनशीलतेला, खऱ्या नावीन्याच्या उद्‍भवाला वाव राहिला नसता. जे काही असणे किंवा घडणे शक्य आहे ते अस्तित्वाच्या स्वरूपात अभिप्रेत असते, त्याने पूर्णपणे निर्धारित झालेले असे असते आणि मग खऱ्याखुऱ्या नावीन्याच्या निर्मितीला अवकाश राहिला नसता. तेव्हा सर्जनशीलतेचा उलगडा करण्यासाठी अस्तित्वाच्या गाभ्यातच शक्यतेचे असे तत्व असते असे मानावे लागते. ही शक्यता म्हणजे विशिष्ट शक्यता नसते तर ‘केवळ शक्यता’ असते, म्हणजे कोणतेही रूप धारण करू शकणारी अशी ही शक्यता असते. म्हणून तिला स्वतःचे स्वरूप नसते. ह्या अर्थाने ती ‘नकारी’ शक्ती असते. ब्यरद्यायेव्ह तिला ‘असत्स्वरूप स्वातंत्र्य’ असे म्हणतात.

आता अस्तित्व हे निश्चित स्वरूपाचे असते. तेव्हा ह्या केवल शक्यतेला विशिष्ट स्वरूप देणारी हेतुपूर्ण अशी कृती करणारी शक्तीही असावी लागते. ह्या शक्तीला ब्यरद्यायेव्ह ईश्वर म्हणतात. हीसुद्धा सर्जनशील शक्ती आहे आणि ती मूल्यांचे सर्जन करून त्यांना अस्तित्वात उतरविणारी अशी शक्ती आहे. ईश्वराने जी इतर अस्तित्वे निर्माण केली आहेत ती-विशेषतः माणसे-ह्या मूल्यांच्या सर्जनात आणि प्रस्थापनेत सहभागी असतात. सर्जनशील प्रक्रियेला ब्यरद्यादेव्ह ‘चैतन्य’ हे सामान्य नाम देतात आणि सर्वच अस्तित्व सर्जनशील असल्यामुळे सर्वच अस्तित्व चैतन्यमय आहे, असे त्यांचे मत आहे.

चैतन्य हे ब्यरद्यादेव्ह यांच्या मते, विशिष्ट वयक्ती ह्या स्वरूपातच अस्तित्वात असते. सामान्य, व्यक्तिनिरपेक्ष असे चैतन्य नसते. पण प्रत्येक व्यक्तीचा इतर व्यक्तींशी आंतरिक संबंध असतो. कारण व्यक्तीमध्ये सर्जनशीलतेच्या ज्या शक्यता सुप्त असतात त्यांचा परिपोष आणि आविष्कार, इतर व्यक्तिंशी संवाद आणि साहचर्य प्रस्थापित करूनच तिला साधता येतो. ह्या इतर व्यक्तींमध्ये अर्थात ईश्वराचे स्थान मध्यवर्ती असते, तेव्हा ईश्वर ज्याचे केंद्र आहे अशा व्यक्तींच्या समाजाचा घटक म्हणूनच विशिष्ट चैतन्य नांदते आणि कार्यप्रवण असते. सर्जनशीलता आणि हेतुपूर्ण स्वायत्तता – विशिष्ट मूल्यांची स्वतःच निर्मिती करून त्यांना अस्तित्वात उतरविण्याची कृती-ह्या घटकांचे मिळून चैतन्याचे स्वरूप बनलेले असते हे आपण पाहिले. ह्या स्वरूपाचा परमोच्च उत्कर्ष ईश्वराच्या ठिकाणी झालेला असतो आणि म्हणून परिपूर्ण असे व्यक्तिमत्व ईश्वराच्या ठिकाणीच असते, असे ब्यरद्यायेव्ह मानतात. इतर व्यक्तींचे व्यक्तिमत्व अपूर्ण असते. ज्या प्रमाणात स्वतःच्या सर्जनशीलतेचा आणि स्वायत्ततेचा परिपोष त्यांनी केलेला असतो, त्या प्रमाणात त्यांच्या अंगी व्यक्तिमत्व असते. व्यक्तिमत्व ही लाभलेली गोष्ट नसते, ती कमाई असते.

आतापर्यंत आपण ब्यरद्यायेव्ह यांच्या तत्त्वमीमांसेचे विवेचन केले. ते कोणत्याही चैतन्याला (आणि केवळ चैतन्यालाच अस्तित्व असल्यामुळे कोणत्याही अस्तित्वाला) लागू पडते. आता माणूस हे विशिष्ट प्रकारचे चैतन्य आहे किंवा चैतन्याने धारण केलेले विशिष्ट रूप आहे. माणसाचे वैशिष्टय असे, की माणसाला ‘अहंभाव’ असतो. माणसाने ह्या अहंभावाचे परिवर्तन जर व्यक्तिमत्वामध्ये केले, म्हणजे सर्जनशील स्वायत्ततेमध्ये केले, तर त्याने स्वतःचे सम्यक् स्वरूप साध्य केले असे होईल, व्यक्तिंच्या अहंभावाचे व्यक्तिमत्त्वामध्ये परिवर्तन आणि विकसन होण्याला अनुकूल असा जो समज असतो, तो खराखुरा ‘गोतावळा’ (कम्युनिटी) असतो. अशा गोतावळयामध्ये जे परस्परसंबंध असतात, ते संवादाचे संबंध असतात.

व्यक्तीमधल्या संवादावर आधारलेला गोतावळा हे जे मानवी समाजाचे सम्यक् स्वरूप आहे, ते व्यक्तिवादाच्या जितके विरोधी आहे तितकेच व्यक्तीच्या सामाजिकीकरणाविरूद्धही आहे. व्यक्तीच्या सामाजिकीकरणाचा अर्थ असा, की व्यक्तीकडे एक विशिष्ट सामाजिक भूमिक पार पाडणारा सामाजिक घटक एवढ्याच दृष्टीने पहाण्यात येते. म्हणजे व्यक्ती ही काही विशिष्ट कार्ये पार पाडणारी वस्तू बनते. उलट व्यक्तिवादामध्ये व्यक्तीचा इतरांपासूनचा अलगपणा जोपासला जातो. पण असे करण्याचे कारणही सामाजिक व्यवस्थेमध्ये, इतर व्यक्तींना व स्वतःलाही वस्तूंचे जे स्वरूप देण्यात आलेले असते, वस्तू म्हणून जे वागविण्यात येत असते, त्याच्यात असते.


मानवी समाजाविषयी आज ज्या उपपत्ती प्रचलित आहेत त्यांच्यात ब्यहद्यायेव्ह यांच्या मते जो समान दोष आहे तो हा, की त्या वयक्तीचे वरील प्रकारे ‘वस्त्वीकरण’ करतात. पण व्यक्ती अशी वस्तू बनू शकत नाही किंवा तिला वस्तू म्हणून मानता येत नाही. व्यक्ती हे चैतन्याचे रूप असल्यामुळे सर्जनशीलतेची प्रेरणा आणि शक्ती असेच तिचे स्वरूप असते. ज्या समाजात व्यक्ती इतरांशी सुसंवादी संबंध स्थापन करून त्यांच्या द्वारा स्वतःच्या सर्जनशील स्वायत्ततेचा विकास करू शकते, त्याला ब्यहद्यायेव्ह ‘व्यक्तिमत्त्वाधिष्ठित समाजवाद’ (पर्सनॅलिस्ट सोशलिझम) म्हणतात. हा समाजवाद मार्क्सवादी समाजवादाच्या विरोधी आहे. मार्क्सवादी समाजवाद व्यक्तींच्या सामाजिक वस्त्वीकरणावर आधारलेला आहे, असा ब्यरद्यादेव्ह यांचा आरोप आहे.

व्यक्तिमत्वाधिष्ठित समाजवादाची काही वैशिष्ट्ये नमूद करता येतील : हा समाजवाद ‘राष्ट्रवादी’ नसते. व्यक्ती राष्ट्रच्या वैभवासाठी आत्मसमर्पण करण्यात व्यक्तीचे श्रेय असते, हे मत तो मानीत नाही. उलट तो व्यक्तिमत्वाचे तत्तव मानतो आणि व्यक्तीच्या मानवी प्रतिष्ठेशी सुसंगत अशा परिस्थितीत व्यक्तीला जगता आले पाहिजे असा आग्रह धरतो आणि म्हणूनच राज्यसंस्थेला व्यक्तींच्या विकासाचे एक साधन ह्या पलीकडे काही मूल्य आहे, असे हे मत मानीत नाही. त्याचप्रमाणे लोकशीहमध्ये किंवा समाजवादामध्ये सर्व व्यक्तींना एका समान पातळीवर आणण्याची जी धडपड असते तीही त्याला अमान्य असते. व्यक्तिमत्तवाच्या तत्त्वामध्ये आपल्याहून जिची गुणवत्ता श्रेष्ठ आहे अशा व्यक्तींची आदराने कदर करण्याची वृत्ती अभिप्रेत असते. तसेच ह्या मताला उपयुक्ततावादी नीती अमान्य असते. उपयुक्ततावादी नीतीचा सिद्धांत असा, की सुख किंवा (आदर्शवादी उपयुक्ततावादाप्रमाणे) सौंदर्य, प्रेम अशा कोणत्यातरी गोष्टीत माणसाचे श्रेय असते व ज्या प्रकारच्या कृत्यांपासून असे श्रेयस्कर परिणाम निष्पन्न होतात, ती कृत्ये नैतिक असतात. म्हणजे श्रेय कशात असते हे ठरलेले असते आणि नैतिक कृत्ये ही श्रेयसिद्धीची साधने असतात. हे दोन्ही सिद्धांत ब्यरद्यायेव्ह अमान्य करतात. माणसाचे श्रेय पूर्वनिर्धारित नसते. माणसे मूल्ये निर्माण करतात आणि नीती हे केवळ साधन नसते. कृत्यांची नैतिकता हा त्यांचा आंतरिक गुण असतो. मूल्यांना वास्तव जगात सिद्ध करण्याच्या सुसंवादी आणि सर्जनशील प्रक्रियेमध्ये मग्न असलेला गोतावळा, हे नैतिक दृष्ट्या आदर्ख अशा समाजाचे स्वरूप असते.

हे ध्येय इतिहासामध्ये कधीही साध्य होणार नाही. ह्या दृष्टीने इतिहास आपल्याला निराशावादाचा धडा देतो. पण इतिहासात जरी अपयश व निराशा असली, तरी ज्या प्रमाणात ऐतिहासिक व्यक्ती व समाज हे ध्येय आपल्या जावनात मूर्त करतात त्या प्रमाणात इतिहासाला अर्थ असतो.

त्यांचे महत्त्वाचे मूळ रशियनमधून इंग्रजीत भाषांतरित झालेले ग्रंथ असे : द मीनिंग ऑफ हिस्टरी (मूळ व इ. भा. १९२३), फ्रीडम अँड द स्पिरिट (मूळ १९२७, इ. भा. १९३५), द डेस्टिनी ऑफ मॅन (१९३१, इं. भा. १९३५), द ऑरिजिन ऑफ रशियन कम्युनिझम (१९३७, इं.भा. १९३८), ड्रीम अँड रिॲलिटी : ॲन एसे इन ऑटोबायॉग्रफी (१९४९, इ. भा. १९५०) आणि द बिगिनिंग अँड द एंड (१९४७, इं. भा. १९५२).

 संदर्भ : 1. Clarke, Oliver Fielding, Introduction to Berdyaev, London, 1950.

            2. Seaver, Geore, Nicolas Berdyaev, London, 1950.

            3. pinka, Matthew, Nicholar Berdyaev : Capitive of Freedon, Philadelphia, 1950.

            4. Wernham, J. C. S. Two Russian Thinkers : An     ssay in Berdyaev and Shestov, London, 1968.

रेगे, मे. पुं.