योहान

फिक्टे, योहान गोटलीप : (१९ मे १७६२-२९ जानेवारी १८१४). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता. जन्म ल्यूसेशीआतील (पू. जर्मनी) रामेनाऊ ह्या खेडेगावी. फिक्टेचे बालपण गरिबीत गेले पण फोन मिल्टित्स ह्या उमरावाने त्याचे गुण ओळखून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्याचे उच्च शिक्षण येना, व्हिटन्बेर्क, लाइपसिक या विद्यापीठांत झाले. पण विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वीच फोन मिल्टित्सचे निधन झाल्यामुळे दारिद्र्याशी झगडतच आपले शिक्षण त्याला पूर्ण करावे लागले. प्रारंभी ख्रिस्ती धर्मशास्त्राचा विद्यार्थी म्हणून तो विद्यापीठात दाखल झाला पण स्वतंत्र आणि चिकित्सक विचाराच्या ओढीमुळे तो तत्त्वज्ञानाकडे वळला. ⇨ बारूक स्पिनोझा (१६३२-७७), जी. ई. लेसिंग (१७२९-८१) व विशेषतः ⇨ इमॅन्युएल कांट (१७२४-१८०४) हे त्याच्यावर प्रभाव करणारे तत्त्ववेत्ते होत. विचारस्वातंत्र्य, सहिष्णुतेवर आधारलेले शिक्षण व सामाजिक संस्कृती आणि सर्जनशील जीवनाचे महत्त्व ही तत्त्वे त्याला ⇨ जी .ई. लेसिंगपासून मिळाली. स्पिनोझाच्या ⇨ चराचरेश्वरवादाचा (पॅनथिइझम) खोल प्रभाव त्याने रचलेल्या तात्त्विक दर्शनावर आढळतो. पण त्याच्या तत्त्वज्ञानामागील प्रमुख प्रेरणा त्याला कांटपासून, विशेषतः कांटच्या नैतिक तत्त्वज्ञानापासून लाभली.

फिक्टेने प्रसिद्ध केलेला पहिला ग्रंथ म्हणजे क्रिटिक ऑफ ऑल रेव्हिलेशन (१७९२-म.शी. सर्व धार्मिक प्रकटीकरणांची मीमांसा) हा असून तो कांटवादी आहे. त्याचा प्रमुख सिद्धांत असा आहे, की कर्तव्याविषयी शुद्ध आदराची जी वृत्ती आपल्या अंतःकरणात आपल्या प्रत्ययाला येते, तेच खरेखुरे अतींद्रिय व सार्वभौम अस्तित्व होय आणि तोच सर्व धार्मिक प्रकटीकरणांमागचा मूलस्रोत होय. काही कारणाने हा ग्रंथ लेखकाच्या नावाचा निर्देश न करता प्रसिद्ध झाल्यामुळे कांटच त्याचा लेखक आहे असा सर्वसाधारण ग्रह झाला, इतका तो कांटच्या भूमिकेला धरून होता. कांटनेही त्याचा गौरव केला. महाकवी गटेही त्याने प्रभावित झाला. ह्याचा परिणाम म्हणून फिक्टेची येना विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्यासनावर प्राध्यापक म्हणून १७९४ मध्ये नेमणूक झाली. तेथे तो १७९९ पर्यंत होता. येना विद्यापीठात नेमणूक होण्यापूर्वी खाजगी शिक्षक म्हणून फिक्टे कशीबशी गुजराण करीत होता. पूर्वाश्रमीची योहाना मारीआ रान हिच्याशी १७९३ मध्ये तो विवाहबद्ध झाला.

प्रारंभी फिक्टे तत्त्वज्ञानाचा शिक्षक म्हणून अतिशय लोकप्रिय ठरला. पण कडक शिस्तीच्या त्याच्या आवडीमुळे तो विद्यार्थी व सहकारी याना पुढे अप्रिय वाटू लागला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या तत्त्वांचा तो पुरस्कार करीत असल्यामुळे अधिकारीवर्ग त्याच्याविषयी संशयी बनला आणि पाखंडी ठरू शकतील अशा त्याच्या धार्मिक मतांमुळे धर्मगुरूही बिथरले. ह्या साऱ्याचा परिणाम म्हणून १७९९ मध्ये त्याला येना विद्यापीठ सोडावे लागले. नंतर त्याचे वास्तव्य १८०६ पर्यंत बर्लिन येथे होते.

ह्यानंतरचा कालखंड हा नेपोलियनच्या जर्मनीवरील आक्रमणाविरुद्ध जर्मनीने चालविलेल्या प्रतिकाराचा कालखंड होय. ह्या प्रतिकारात फिक्टेने सक्रिय भाग घेतला. जर्मन राष्ट्राने आपली सांस्कृतिक आणि राष्ट्रीय अस्मिता प्रस्थापित केली पाहिजे असे वक्तृत्वपूर्ण आवाहन त्याने केले. आपल्या तत्त्वज्ञानाचा पद्धतशीर विकास व मांडणीही त्याने ह्या कालखंडात केली. १८१० मध्ये बर्लिन विद्यापीठात तत्त्वज्ञानाचा प्रमुख प्राध्यापक ही जागा त्याला देण्यात आली आणि विद्यापीठाचा रेक्टर म्हणूनही त्याची नेमणूक झाली. पण ह्या दुसऱ्या पदाचा त्याने राजीनामा दिला आणि केवळ प्राध्यापक म्हणून तो काम करू लागला. १८१२ आणि १८१३ ह्या वर्षांत नेपोलियनविरुद्ध झालेल्या राष्ट्रीय उत्थापनात त्याने सक्रिय भाग घेतला. त्याची पत्नी सैनिकांची शुश्रृषा करणारी परिचारिका म्हणून युद्धकार्यात भाग घेत होती. तिला टायफस ज्वर झाला पण त्यातून ती वाचली. फिक्टेलाही त्याची लागण झाली आणि त्यातच तो बर्लिन येथे निधन पावला.

फिक्टेचे सर्व लेखन जर्मनमध्ये असून त्याच्या काही ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्यांतील काही ग्रंथ पुढीलप्रमाणे : क्लोज्ड कमर्शल स्टेट (१८००), द व्होकेशन ऑफ द मॅन (१८००), द कॅरॅक्टरिस्टिक्स ऑफ द प्रेझेंट एज (१८०६), द वे टू द ब्लेसिड लाइफ (१८०६), द अड्रेसेस टू द जर्मन नेशन (१८०८) इत्यादी. तथापि त्याच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने त्याचा सर्वोत्कृष्ट व महत्त्वाचा ग्रंथ क्रिटिक ऑफ ऑल रेव्हिलेशन हाच मानला जातो.

तत्त्वज्ञान : नैतिक कृतिशीलतेचा अनुभव हा फिक्टेचा तत्त्वज्ञानाचा गाभा आणि त्याचे अधिष्ठान आहे. ह्या अनुभवाच्या आधारावर त्याने आपली तत्त्वमीमांसा आणि ज्ञानमीमांसा रचली आहे. अंतिम किंवा मूळ अस्तित्त्व हे कोणत्याही स्वरूपाचे द्रव्य-जडद्रव्य किंवा आत्मिक द्रव्य-नसते. मूळ अस्तित्त्व ही एक कृती आहे. ‘अहं’ ची किंवा आत्मतत्त्वाची, स्वतःला प्रस्थापित करण्याची, ती कृती आहे. हे आत्मतत्त्व, स्वतःला प्रस्थापित करताना, स्वतःच्या कृतीसाठी क्षेत्र म्हणून स्वतःहून भिन्न अशा विषयाची स्थापना करते. म्हणजे आत्मतत्त्व स्वतःला मर्यादित करते आणि आत्मतत्त्व व त्याच्यासमोर ठाकलेला विषय असे द्वंद्व निर्माण होते. हा मर्यादित अहं आता समोरच्या विषयाचे ग्रहण करू शकतो. पण विषयाच्या ज्ञानातून अहं आणि विषय यांमधील द्वंद्वाचे पूर्ण निरसन होऊ शकत नाही. नैतिक कृतीतून, स्वतःचा नैतिक आदर्श वास्तव जगात, विषयात मूर्त करण्याच्या कृतीतून, ह्या द्वंद्वाचे निरसन होते आणि अहं अणि विषय यांच्यात पूर्ण एकात्मता साधली जाते. नैतिक संकल्प हा अहंचा स्वतःचा संकल्प असतो आणि म्हणून तो निष्ठेने सिद्ध करण्यात अहंला स्वतःच्या स्वातंत्र्याचा प्रत्यय येतो व ह्या मार्गाने तो स्वतःचे स्वातंत्र्य साधतो. माझ्या नैतिक संकल्पाची सिद्धी मी समाजात राहूनच करू शकतो. तेव्हा व्यक्तीला नैतिकतेने जगायला अनुकूल ठरेल अशी समाजव्यवस्था असली पाहिजे. अशा समाजव्यवस्थेचे चित्र फिक्टेने रंगविले आहे. तिच्यात नैतिकतेशी संबंध नसलेल्या उपभोगाला, कोणत्याही इच्छावासनांचे समाधान करण्यासाठी वस्तूंचे उत्पादन करण्याला स्थान नाही. शिवाय असा समाज आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी असला पाहिजे. परदेशातून होणाऱ्या आयातीवर तो अवलंबून असता कामा नये. त्याच्यात चंगळ असणार नाही, दुर्भिक्ष असणार नाही, सर्वाच्या खऱ्याखुऱ्या गरजांचे समाधान होण्यासाठी सर्वांचे श्रम वापरण्यात येतील व त्यामुळे बेकारी असणार नाही व दारिद्र्यही असणार नाही. प्रत्येक नागरिकाला स्वतःचे जीवन स्वतःच्या आदर्शाप्रमाणे घडविता येईल, अशी ही समाजव्यवस्था असेल.

फिक्टेच्या तत्त्वज्ञानाचे थोडक्यात वर्णन ‘नैतिक चिद्‌वाद’ असे करता येईल. कांट किंवा हेगेल यांच्याइतका श्रेष्ठ तत्त्ववेत्ता तो नसला, तरी त्याच्या काळी जर्मनीच्या झालेल्या पुनरुत्थानावर तसेच एकोणिसाव्या शतकातील वैचारिक आणि नैतिक वातावरणावर त्याचा जाणवण्याइतका प्रभाव निश्चितच पडलेला आहे.

पहा : चिद्‌वाद.

संदर्भ : 1. Everett, C. C. Fichte’s Science of Knowledge A Critical Exposition, Chicago, 1884.

2. Talbot, E. B. The Fundamental Principle of Fichte’s philosophy. New York, 1906.

3. Thompson, A. B. The Unity of Fichte‘s Doctrine of Knowledge, Boston, 1895.

रेगे, मे. पुं.