ज्यू तत्त्वज्ञान : ज्यूंच्या पवित्र धर्मग्रंथातील सारभूत विचार व मूलभूत सिद्धांत किती व कोणते, यासंबंधी सर्वसंमत असा निर्णय कधीच झाला नाही परंतु ईश्वराने प्रेरित द्रष्ट्यांपुढे प्रकट केलेले विचार म्हणजे बायबल (जुना करार) सर्वच निःशंक रीतीने प्रमाण मानले पाहीजे, या बाबतीत ज्यू धर्मियांमध्ये कधीही मतभेद झाला नाही. म्हणजे असे, की स्वतः प्रकट होऊन ईश्वराने प्रकट केलेला उपदेश तोरा  म्हणजे ईश्वराचे शब्द हे स्वतःप्रमाण होत. ते ईश्वराचे शब्द असल्यामुळे त्यांच्या प्रामाण्याबद्दल वादच होऊ शकत नाही. ते शब्द म्हणजे मुख्यतः मोझेसप्रणीत पाच प्रकरणे होत. ते ‘जुन्या करारा’त समाविष्ट आहेत. या प्रकारणांचे मंथन करून वा संबंध ‘जुनाकरार’ व टॅलमुड (तलमूद) यांचे मंथन करून तीन श्रद्धेय सिद्धांत निघतात : (१) ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, परिपूर्ण आणि अमूर्त आहे. (२) तो सर्वशक्तिमान असल्यामुळे आपल्या इच्छेप्रमाणे सृष्टी शून्यातून निर्माण करीत राहतो. जडद्रव्याला मूलभूत अस्तित्व नाही. ते ईश्वरेच्छानिर्मित आहे. (३) माणसाचा आत्मा अमर आहे. ईश्वर कृपाळू असून त्याने माणसाला संपूर्ण आत्मोन्नतीचा, पूर्णतेकडे नेणारा मार्ग अनेक प्रेषित द्रष्ट्यांच्या द्वारा दाखविला आहे. पवित्र शास्त्रांच्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला शाश्वत स्वर्गाची अखेर प्राप्ती होते आणि शास्त्राने निषिद्ध मानलेल्या मार्गाने जाणाऱ्या माणसाला शेवटी शाश्वत नरकवास मिळतो. हे तीन सिद्धांत निरनिराळ्या प्रकारांनी व्यक्त केल्यामुळे ज्यू विचारवंतांमध्ये मतभेद आढळतात परंतु ‘जुन्या करारा’तील मोझेसच्या पंचप्रकरणीवरील श्रद्धा हे सर्वांच्या विचारांचे प्रारंभ स्थान होय, ही गोष्ट निर्विवाद आहे. बुद्धिवाद वा युक्तिवाद याला दुय्यम महत्त्व आहे. बुद्धिवादाने वा युक्तिवादाने मूळ प्रकटीकृत उपदेशाशी सुसंगत असेच निष्कर्ष काढावे लागतात यासंबंधी बुद्धीवादाला स्वातंत्र्य नाही. पवित्र शास्त्रानुसारीच बुद्धिवाद वा युक्तिवाद म्हणजे तर्कशास्त्र स्वीकार्य होय.

ज्यू धर्माला तत्त्वज्ञान नाही किंवा ज्यू धर्माला श्रद्धेय असे सिद्धांत (डॉग्मा) नाहीत, असे अनेक ज्यू पंडीत सांगत आले आहेत परंतु श्रद्धेय मूलभूत तत्त्वांची सविस्तर मांडणी करण्याची आवश्यकता ज्यू धर्मीय विद्वानांना नवव्या शतकापासून अधिक भासू लागली. जास्तीत जास्त वैचारिक सुसंगती निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रद्धेय सारभूत सिद्धांत तपशीलवार रीतीने मांडण्याची गरज त्यांना भासू लागली आणि कमीत कमी मतभेद होतील अशी सिद्धांतमालिका ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून पवित्र शास्त्राधारे माइमॉनिडीझ उर्फ मोशे बेन मैमान (११३०–१२०५) याने ज्यू धर्मपीठाकरिता (सिनॅगॉगकरिता) १३ सूत्रांच्या रूपाने प्रथम मांडली. ती अशी : (१) सृष्टीचा निर्माता आहे. (२) तो निर्माता एकच आहे, अनेक नाहीत म्हणजे देव एकच आहे. (३) तो देव अमूर्त आहे म्हणजे अशरीरी आहे. (४) तो शाश्वत अथवा अनाद्यनंत आहे. (५) त्याचीच सर्व प्रकारे पूजा आणि स्तवने करणे योग्य होय. (६) ‘जुन्या करारा’तील भविष्यवाणी सत्य आहे. (७) ईश्वर हा स्वतःहून द्रष्ट्या प्रेषितांपुढे प्रकट झाला आणि त्याने शास्त्राचे प्रकटीकरण केले. मोझेसपूर्वी झालेल्या व मोझेसनंतर झालेल्या सर्व द्रष्ट्यांमध्ये व प्रेषितांमध्ये मोझेस हा श्रेष्ठ आहे. (८) सिनाई पर्वतावर मोझेसला देवाने प्रकट केलेला तोरा  अर्थात उपदेश पूर्ण प्रमाण होय. (९) हा प्रकटीकृत उपदेश अपरिवर्तनीय आहे. तो म्हणजे विशेषतः दहा धर्माज्ञा अथवा वाक्ये होत. (१०) ईश्वर माणसाच्या सर्व कृती वा हालचाली जाणतो. (११) सत्कर्माचा प्रसाद मिळतो व दुष्कर्माचा दंड भोगावाच लागतो. (१२) मानवजातीच्या उद्धारक प्रेषिताचे भविष्यकाळी आगमन निश्चित होणार आहे. (१३) मृतांचे पुनरुत्थान होणारच आहे.

मैमानच्या या श्रद्धेय मूलभूत सिद्धांतांच्या बाबतीत त्याच्या समकालीन व नंतरच्या ज्यू विचारवंतांमध्ये मतभेद झाले परंतु ही श्रद्धेय तत्त्वे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सर्वांनीच मान्य केली, मतभेद झाला तो कमी-जास्त महत्त्व कोणत्या तत्त्वांना आहे, यासंबंधात. आयझाक आबरबानेल (१४३७–१५०८) या स्पॅनिश विचारवंताने असे म्हटले, की संबंधप्रकटीकृत उपदेश हा स्वतःप्रमाणच आहे. त्यातून मूलभूत श्रद्धेय तत्त्वे कोणती, असा विचार करण्याचे कारण नाही. त्या उपदेशामध्ये ही तेराही सूत्रे अंतर्भूत आहेतच. मैमानच्या विरुद्ध असलेले दुसरे काही विचारवंत सांगू लागले, की या श्रद्धेय तत्त्वांमध्ये सर्वच काही मूलभूत श्रद्धेय तत्त्वे नव्हेत. चासडाई इब्न क्रेस्कॉस हा पंधराव्या शतकातील विचारवंत म्हणतो, की मूलभूत श्रद्धेय तत्त्वे पुढीलप्रमाणे सहाच आहेत : (१) ईश्वर सर्वज्ञ असल्यामुळे माणसाच्या सर्व कृती जाणतो. (२) तो कृपावंत आहे. (३) तो सर्वशक्तिमान आहे, त्यामुळे निसर्गाच्या नियमांचा बाध तो करू शकतो. (४) द्रष्ट्यांचे द्रष्ट्टत्व वा भविष्यवाणी. द्रष्टे म्हणजे ईश्वराशी संवाद करणारे. (५) मानवांचे संकल्पस्वातंत्र्य. (६) प्रकटीकृत उपदेश अशा उद्देशाने केला आहे, की त्यामुळे ईश्वराशी संवाद घडल्यानंतर त्याच्या भेटीबद्दल पुनः आतुरता उत्पन्न होते. या प्रतिपादनाच्या संदर्भात तो म्हणतो, की जगातील सर्व धर्मांचे मूलभूत गृहीतकृत्य ईश्वराची सत्ता हे आहे.

सीमॉन दूराँ  (१३६६–१४४४) म्हणतो, की मैमानचे तेरा सिद्धांत (१) ईश्वराचे अस्तित्व, (२) साक्षात्कार वा प्रकटीकरण आणि (३) प्रसाद व दंडन या तीन सिद्धांतांमध्ये अंतर्भूत होतात. यांपैकी कोणताही सिद्धांत मानला नाही, तर तो न मानणारी व्यक्ती पाखंडी ठरते.

कोणत्याही धर्माचे निश्चित असे श्रद्धेय मूलभूत सिद्धांत असतात. विविध विचार आणि ध्येये त्या सिद्धांतांना धरूनच मांडलेले असतात. हे सिद्धांत म्हणजेच त्या त्या धर्माचे तत्त्वज्ञान होय. ज्यू धर्माचे वरील मूलभूत सिद्धांत हे बौद्धिक तत्त्वज्ञान नव्हे. ते बायबलच्या व विशेषतः मोझेसच्या शब्दप्रामाण्याच्या आधारे काढलेले निष्कर्ष आहेत. ज्यूंचे बौद्धिक तत्त्वज्ञान हे ग्रीक संस्कृतीच्या सहवासात निर्माण झाले आणि त्यानंतर त्या तत्त्वज्ञानाचा आतापर्यंतचा इतिहास घडला आहे.

जोशी, लक्ष्मणशास्त्री

ज्यू तत्त्वज्ञानाचा इतिहास : ज्यू लोकांचा मूळ देश मध्यपूर्वेतील पॅलेस्टाइन हा होय. प्राचीन काळी पॅलेस्टाइन हा देश नाना प्राकारच्या जमातींचा व धर्मपंथांचा देश होता. ईजिप्शियन, ॲसिरियन, ग्रीक, पर्शियन, रोमन, इ. अनेक लोकांची राज्ये तेथे होऊन गेली. कालांतराने हे सर्व लोक एकमेकांत मिसळले एकमेकांची धर्मतत्त्वे एकमेकांनी घेतली एकमेकांचे देव एकमेकांनी घेतले आणि नाना धर्मांचा, नाना देवतांचा, नाना राष्ट्रांचा प्रदेश म्हणून पॅलेस्टाइन प्रसिद्ध झाला. अशा पॅलेस्टाइनमधील ज्यूडा व इझ्राएल या दोन प्रांतांत राहणाऱ्या जमातीने इतिहासातील कुठल्या तरी एका कालखंडात ईश्वर एक आहे व तो म्हणजे आपला  ⇨  येहोवा  असे मानून इतरांपेक्षा आपले वेगळेपण सिद्ध करण्यासाठी स्वतःची वेगळी नीती व वेगळे राष्ट्र या कल्पना रचून एक नवा धर्म उभारला. या धर्माचे नाव जूडाइझम वा ज्यू धर्म वा यहुदी धर्म. अनेकेश्वरवादी पंथोपपंथांच्या सहवासात या लोकांनी एकेश्वरवाद कसा मानला जिकडे तिकडे हिंसामय यज्ञयागात पशूंच्या व मानवांच्या आहुती पडत असताना या जमातीला शांततामय नीतीवाद कसा सुचला व स्वतःला राष्ट्र नसतानाही राष्ट्रीयत्वाची जोपासना ही जमात कशी करू शकली, या ज्यू धर्माच्या समस्या इतिहासकारांना अद्याप सुटल्या नाहीत. 


ज्यू जमातीविषयीचे पहिले ऐतिहासिक दर्शन आपणाला ग्रीक लेखकांच्या लेखनात होते. ॲरिस्टॉटलचे शिष्य क्लिआर्कस व थिओफ्रॅस्टस (?–२८७ इ. स. पू.) यांच्या लेखनात ज्यूचे वर्णन आढळते. थिओफ्रॅस्टसने या जमातीला ‘तत्त्वज्ञांचे राष्ट्र’ असे म्हटले आहे. ते आपला सारा वेळ अध्यात्मिक चर्चेत घालवितात व रात्री ते ताऱ्यांचे निरीक्षण करतात, असे थिओफ्रॅस्टसने लिहून ठेवले आहे. ज्यू जमातीची सारी थोरवी तिच्यात निर्माण झालेल्या द्रष्ट्या प्रेषितांवर अवलंबून होती, हे बायबलच्या ‘जुन्या करारा’वरून स्पष्ट आहे. रात्री ताऱ्यांचे निरीक्षण करणाऱ्या या लोकांतील श्रेष्ठ पुरुषांना ईश्वराविषयी भीती वाटण्याऐवजी आत्मियता वाटत होती व यामुळेच त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाले. हे साक्षात्कार बहुतांशी या जमातीने कुठल्या नीतीमार्गाने जीवन जगावे, यांसंबंधी होते आणि म्हणूनच हे ईश्वराचे हे नियम या जमातीचे आद्य धर्मग्रंथ बनले. जात्याच ही जमात संकोची, स्वतःच्या आस्मितेला जपणारी असल्याने, तिच्यातील या प्रेषित द्रष्ट्यांना आपल्या मायभूमीतील पर्वतांच्या शिखरावर आढळणारा एकान्त जसा प्रिय वाटला तसीच त्यांच्या दऱ्यात आढळणारी शांतताही त्यांना आवडली. तिथेच त्यांना साक्षात्कार झाले तिथेच त्यांना ईश्वराचा गंभीर आवाज ऐकायला मिळाला त्यांची हिब्रू भाषा तिथेच घडविली गेली. तिला गद्यात काव्य गवसले, तिला भाववाचक शब्दांची कधीही जरूर वाटली नाही. मध्यपूर्वेत रचल्या गेलेल्या बायबलने आपल्या भाषेने पाश्चिमात्य साहित्याला मागे टाकले ते या गुणांमुळेच.

पॅलेस्टाइनच्या दऱ्याखोऱ्यात जोपासली गेलेली हिब्रू भाषा ही जशी सामान्य मानवी इंद्रियाची भाषा बनली तसेच या भाषेत निर्माण झालेले तत्त्वज्ञान ईश्वराशी बोलून मगच या विश्वाचा विचार करू लागले. साधारणतः इतर तत्त्वज्ञानांत याउलट परंपरा आढळते. विश्वाचा विचार करता करता ज्यू तत्त्वज्ञान ईश्वराप्रत जाते. ज्यू ईश्वराशी बोलत, ईश्वर त्यांच्याशी बोले. ईश्वर त्यांना आज्ञा करी : ‘अमुक करा’ किंवा ‘अमुक करू नका’. सारे सरळ, सुस्पष्ट, सीध्यासाध्या आज्ञार्थाच्या गद्यात. 

बायबलमध्ये ईश्वर म्हणतो, की मी या लोकांमध्येच राहतो ते ईजिप्तमध्ये दास्यात राहिले, त्यांच्याबरोबर मीही दास्यात राहीलो ते भटकत राहिले, त्यांच्याबरोबर मीही भटकत राहिलो त्यांना मी धरून राहतो. बायबलमध्ये असेही म्हटले आहे, की त्या ईश्वराच्याच सामर्थ्यशाली हाताने या लोकांची दास्यातून सुटका झाली. बायबलच्या आधारे इझ्राएल वा ज्यू लोकांमध्ये अशी कायमची श्रद्धा दृढपणे रुजली आहे, की इझ्राएल किंवा ज्यूंचे राष्ट्र वा जमात देवाचे प्रथम निवडलेले पवित्र राष्ट्र वा जमात आहे त्यांचा मूळ प्रदेशही पवित्र म्हणून देवाने निवडलेला आहे ही निवड ते राष्ट्र वा जमात छोटी असूनही केलेली आहे. त्या राष्ट्राला दिलेले आदेश हे त्यांना (ज्यूंना) तर तारक आहेतच परंतु सर्व मानवांनाही तारक आहेत. ते आदेश त्या राष्ट्रात ऐक्य निर्माण करतील तसे सर्व मानवांतही ऐक्य निर्माण करतील.

ज्यूंच्या धर्माची ओळख बायबलच्या ‘जुन्या करारा’त होते ईश्वरी आज्ञांचे, त्याप्रमाणे जगण्यासाठी प्राणपणाने धडपडणाऱ्या या जमातीचे दर्शन त्यात घडते. त्यात धर्म आहे, राष्ट्रीयतेची जाणीव आहे, नीतिनियमांची पक्की बांधणी आहे पण बौद्धिक तत्त्वज्ञान कुठेही नाही. ईश्वरनियंत्रित राष्ट्रापलीकडील राष्ट्राची कल्पना ज्यू लोक करू शकले नाहीत, अशी त्यांच्यावर नंतरच्या काळात टीका झाली. ही टीका नंतरच्या काळाच्या दृष्टीने रास्तही होती परंतु बायबलच्या काळात आपण ईश्वराच्या आज्ञेने जगत आहोत, तो आपला नियंता आहे, आपणाला जरूर तेंव्हा तो दर्शन देतो, या कल्पना ज्यू जमातीने सतत उराशी बाळगल्याने सामान्य सदाचाराचे जीवन जगण्यापलीकडे, इतर कुठल्याही तत्त्वचिंतनाची जरूरी त्यांना वाटली नाही. ग्रीक लोकांच्या सहवासाने त्यांना ही जाणीव प्रथम झाली आणि तेथूनच त्यांच्या तत्त्वज्ञानाची सुरुवात झाली.

अलेक्झांड्रिया येथे इ. स.च्या पहिल्या शतकात फायलो ज्यूडीअस (इ.स.पू. २० –इ. स. ४०) याने ही सुरुवात केलेली आढळते. फायलोने तक्तालीन ग्रीक तत्त्वज्ञानाचा चांगला अभ्यास केला होता. त्या तत्त्वज्ञानातील शब्दप्रयोग व विचारपद्धती यांचा आधार घेऊन फायलोने असे सिद्ध केले, की ज्यूंच्या मिशनाहटॅलमुडमध्ये ज्या काही ईश्वरी आज्ञा आहेत त्या धर्माचा विषय आहेत, तत्त्वज्ञानाचा नव्हे. ईश्वराने जगताशी संबंध ठेवण्यासाठी ‘शब्द’ (लोगोस) निर्मिला आहे व जेव्हा दुपारी ईश्वराचा प्रकाश आपल्या आत्म्याभोवती पडतो आणि मनाच्या साऱ्या दालनांचा कोपरान् कोपरा उजळून निघतो, तेव्हा या शब्दाची महती कळते. परमेश्वर आणि मानव यांना एकमेकांशी संवादित ठेवणाऱ्या शब्दाचे रहस्य कळल्यावर तत्त्वज्ञानाची गरज ती काय ?

ज्यू धर्माला तत्त्वज्ञानाची लक्तरे उगीच लटकावण्याची जरूर नाही, हे तत्त्वज्ञानाच्या भाषेत पटवून देण्यासाठी फायलोने ज्यू मनाची तत्त्वज्ञानाविषयीची आजपर्यंतची भूमिका विशद केली. विशेषतः मध्ययुगीन काळात ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाची कास धरून फोफावणाऱ्या ख्रिस्ती धर्मासारखी ज्यू धर्माची स्थिती नाही, हे भविष्यकथन फायलोला करायचे होते की काय कोण जाणे पण इत:पर ज्यू धर्माला जे तत्त्वज्ञान रचावे लागले, ते स्वतःच्या समर्थनापेक्षा अल्पावधीतच पुष्ट होणाऱ्या ख्रिस्ती धर्माविरुद्ध स्वतःची अस्मिता टिकविण्यासाठी रचावे लागले. मध्ययुगीन काळाच्या उंबरठ्यावर उभे असताना ज्यू धर्माचे तत्त्वज्ञानाशी अशा प्रकारचे जे नाते जोडले गेले, त्यामागे दोन-तीन इतर कारणेही होती. ग्रीक तत्त्वज्ञानात नव्याने सुरू झालेला स्टोइक पंथ व त्याची नैतिक तत्त्वमीमांसा ज्यू धर्माला अत्यंत जवळची होती व त्यामुळे ज्यू पुढारी या पंथाच्या अभ्यासात लक्ष घालू लागले असावेत. दुसरे कारण याच सुमारास अरब लोकांचे राज्य पॅलेस्टाइनवर चालू झाले व अरब तत्त्वज्ञ ज्यू  धर्माची तत्त्वे जाणून घेण्यास उत्सुक होते. पॅलेस्टाइनपेक्षा इराक हे इ. स.च्या नवव्या व दहाव्या शतकांत ज्यू विचारवंतांचे केंद्र बनले आणि त्यांनी आपल्या लेखनासाठी अरबी भाषेचा वापर केला. सादिआ (८८२–९४२) या ज्यू बायबलचे अरबी भाषेत भाषांतर केले. सादिआने द  बुक  ऑफ बिलीफ्‌स  नावाचे पुस्तकही लिहिले. या पुस्तकावरून ज्यूंचे तत्त्वज्ञान निर्माण होण्याला भारतीय तत्त्वज्ञान कसे कारणीभूत झाले, ते स्पष्ट होते. अरबी विचारवंतांना भारतीय तत्त्वज्ञानाची ओळख असावी व त्यांच्या द्वारा सादिआला भारतीय तत्त्वज्ञान कळले असावे, असा अंदाज आहे. सादिआने आपल्या ग्रंथाची सुरुवात तत्कालीन प्रथेप्रमाणे ग्रीक पद्धतीने न करता भारतीय प्रथेप्रमाणे केली आहे. भारतीय तत्त्वज्ञांप्रमाणे सादिआ चार ज्ञानप्रमाणे मानतो : (१) इंद्रियसंवेदना, (२) बुद्धी, (३) अनुमान व (४) शब्द. ही प्रमाणे तसेच त्यांचे विवेचन व त्यासाठी दिलेली उदाहरणे सादिआने भारतीय तत्त्वज्ञानातून उचलली आहेत, हे स्पष्ट आहे. विशेषतः ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानात नैतिक नियम हे कधीही स्वयंसिद्ध मानले गेले नव्हते परंतु भारतीय तत्त्वज्ञानात ते तसे मानण्याची पूर्वीपासून रूढी होती. सादिआने त्यांना तसे मानले आहे. यावरून सादिआने भारतीय तत्त्वज्ञानाचा आधार घेतला होता, यात शंका नाही. ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राचा सादिआच्या ग्रंथात कुठेही उल्लेख नाही. उलट जी तर्कपद्धती त्याने वापरली आहे, ती भारतीय आहे.

दुर्दैवाने सादिआने नव्याने ओळख करून दिलेली ही भारतीय तत्त्वज्ञानपरंपरा ज्यू तत्त्वज्ञानात फार काळ टिकली नाही. ज्यू जमातीत त्या सुमारास कराइम नावाचा नवा पंथ सुरू झाला. या पंथाचा संस्थापक अनान बेग दाविद (आठवे शतक) हा होता. या पंथाला ईश्वरी नियम हे स्वयंसिद्ध असल्याचे मान्य नव्हते. सादिआने नीतीनियम हे बुद्धिसिद्ध असतात असे जे सिद्ध केले होते, ते या पंथाला पटले नाही. बायबल  हा त्यांचा प्रमाणभूत ग्रंथ होता पण ज्यूंमधील राब्बींचा अधिकार त्यांना मान्य नव्हता ग्रीक तत्त्वज्ञ डीमॉक्रिटस (इ. स. पू. पाचवे-चौथे शतक) व एपिक्यूरस (इ. स. पू. ३४२–२७०) यांचा आणि भारतातील न्यायवैशेषिकांचा अनुवाद त्यांना मान्य होता. जे जे काही आहे, ते ते कणांचे बनले आहे. संतत प्रक्रिया म्हणून वाटणाऱ्या साऱ्या गोष्टी मुळात असंतत असतात. यामुळे कार्यकारणभाव सिद्ध होऊ शकत नाही. सृष्टिरचना व सृष्टीत घडवणाऱ्या गोष्टींत कार्यकारणभाव शोधणे चुकीचे आहे. जे काही घडते ते सारे ईश्वराच्या इच्छेने घडते.


कराइम पंथाचा हा दैववाद रूढ ज्यू तत्त्वज्ञानाच्या अनुयायांना मान्य होणे शक्य नव्हते. ज्यू तत्त्वज्ञानाने सृष्टिरचनेचा सिद्धांत पद्धतशीर मांडला नाही तर त्याविरुद्ध आक्षेप येत राहणार, हे ओळखून नवव्या व दहाव्या शतकांतील ईजिप्तमधील ज्यू तत्त्वज्ञ या कार्यास लागले. यांत आयझाक इझ्राएली (दहावे शतक, उत्तरार्ध) याचे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. बुक ऑफ फाइव्ह सब्स्टंसेस  या पुस्तकात तो लिहितो : ईश्वर आपल्या इच्छेने व शक्तीने दोन गोष्टी प्रथम निर्मितो : पदार्थ व आकार. या दोन गोष्टींच्या युतीने प्रज्ञा निर्माण होते. प्रज्ञेतून मानवी बुद्धी, पशूंची बुद्धी व वनस्पतिबुद्धी निर्माण होतात. इझ्राएलीने ज्या सुमारास हा सिद्धांत मांडला, त्या सुमारास बरेचसे ज्यू विद्वान स्पेनमध्ये जाऊन राहिले होते. इब्‍न गॅब्रीएल (१०२१ ? – १०६०) याने यानबू अल्-हयाह, (इं. शी. द सोअर्स ऑफ लाइफ) नावाचे पुस्तक अरबी भाषेत लिहिले. शिक्षक आणि शिष्य यांच्यात संवादरूपाने लिहिलेल्या या पुस्तकात गॅब्रीएलने असा सिद्धांत मांडला, की ईश्वरी इच्छाशक्ती कृतीत मर्यादित, परंतु सत्त्वात अमर्यादित आहे. पदार्थमात्र हे या अमर्यादित ईश्वरी सत्त्वातून निर्माण होतात. हा सिद्धांत मांडण्यात ॲरिस्टॉटलने पदार्थापेक्षा आकाराला जे महत्त्व दिले होते, त्याविरुद्ध गॅब्रीएल टीका करीत होता हे उघड आहे. ⇨नव-प्‍लेटो  मतात पदार्थाला महत्त्व दिलेले आढळते व गॅब्रीएलने नव-प्‍लेटो मताच्या अभ्यासानंतर आपला सिद्धांत मांडला असावा, असे मत आहे, गॅब्रीएलला इब्‍न झाद्दिक (मृ. ११४९), अब्राहम एबेन एझ्रा (१०९२–११६७) इ. अनेक अनुयायी लाभले.

स्पेनमधील तत्कालीन ज्यू तत्त्वज्ञांत ज्यूडा हाल्लेवी (सु. १०७५–११४१) हा फार प्रसिद्ध होता. द बुक ऑफ प्रूफ अँड डेमॉन्स्ट्रेशन इन एड ऑफ द डिस्पाइज्ड रिलिजन  नावाचे पुस्तक त्याने अरबी भाषेत लिहिले. या पुस्तकाचे तत्कालीन मूळ अरबी संक्षित नाव हकझारी  असे होते. हाल्लेवीच्या या पुस्तकामुळे त्या काळातील अनेक लोक ज्यू धर्माकडे वळले. कझार नावाच्या एका जमातीने ज्यू धर्मात पदार्पण केले. या जमातीच्या राजाला देवदूताचे स्वप्न पडले. त्याचा अर्थ काय, ते समजण्यासाठी त्याने एका ज्यू पंडिताची मदत घेतली. या पंडिताने राजाला सारा अर्थ विशद केला व राजाने आपल्या जमातीला ज्यू धर्म स्वीकारण्यास सांगितले. हाल्लेवीने आपल्या पुस्तकात या सत्य घटनेचा दाखला देऊन खऱ्या धर्मातील ‘साक्षात्कार देणारा ईश्वर’ वेगळा आणि ॲरिस्टॉटलसारख्या तत्त्वज्ञाच्या विवेचनातील ‘कोरडा ईश्वर’ वेगळा असे म्हटले आहे. धर्मातील ईश्वर मानवाशी प्रेमाचे संबंध ठेवतो. अशा ईश्वराचे स्वरूप तत्त्वज्ञांना शाब्दिक विवेचनाने कळण्यासारखे नाही. हाल्लेवीचे हे मत त्याच्या समकालीन आणि नंतरच्या बाह्या (अकरावे शतक), इब्न मल्का (मृ. ११६४), एबेन एझ्रा (मृ. ११६७), इब्‍न दाविद (बारावे शतक) व इब्‍न काम्मूना या तत्त्वज्ञांनी उचलून धरले. या सर्व तत्त्वज्ञांत मोशे बेन मैमान हा सर्व मध्ययुगीन ज्यू तत्त्वज्ञांत फार प्रसिद्धी पावला. त्याने लिहिलेले गाइड ऑफ पर्प्‍लेक्स्‌ड हे पुस्तक त्यांच्या नंतरच्या तत्त्वज्ञानावर चार-पाच शतकांपर्यंत परिणाम करीत राहिले. मैमानने असे मत मांडले, की ईश्वराची अमर इच्छाशक्ती ही कुठल्याही नैसर्गिक नियमाने बांधलेली नाही. त्यामुळेच मानवाला कुठल्याही  नैसर्गिक नियमांच्या द्वारे ईश्वराचे ज्ञान होणार नाही. कोणीही माणूस ईश्वराचे गुणवर्णन करू शकणार नाही. त्याचे गुण आपण वर्णन करायला बसलो, तर ते ‘नेति नेति’ स्वरूपाचे ठरतात. ईश्वराचे जे काही ज्ञान आपल्याला मिळते ते त्याच्या कृततीवरून. ॲरिस्टॉटलच्या मते सत्य हे बुद्धीद्वारा प्रकाशित होते परंतु बुद्धीपलीकडील साक्षात्काराने सत्य प्रतीत होऊ शकते. अशाच साक्षात्काराच्या आधाराने मोझेससारख्या प्रेषितांनी ज्यू धर्माचे नियम रचले आहेत आणि या नियमांद्वारे ज्यूंना क्रियाशील जीवनाबरोबर चिंतनशील जीवन साधता येते.

मैमानचे हे पुस्तक तेराव्या शतकात ज्यू तत्त्वज्ञानाचा आधारभूत ग्रंथ म्हणून प्रसिद्ध पावले. मूळात हे पुस्तक जरी अरबी भाषेत लिहिलेले होते, तरी लवकरच त्याचे हिब्रूत भाषांतर करण्यात आले. यूरोपभर जरी त्या काळी लॅटिन ही भाषा प्रतिष्ठा पावली होती, तरी ज्यूंनी ती न स्वीकारता स्वतःच्या हिब्रूला उचलून धरले. हा त्यांच्या राष्ट्रवादाचाच भाग होता. ज्यू तत्त्वज्ञ ग्रीक व अरबी तत्त्वज्ञांचा उल्लेख करतात पण त्यांच्या मध्ययुगीन लेखनात ख्रिस्ती तत्त्वज्ञांचा उल्लेख मात्र कटाक्षाने टाळलेला आढळतो. हेही ज्यू राष्ट्रवादाचेच निदर्शक होय.

मध्ययुगाच्या सुरुवातीस रूढ ज्यू तत्त्वज्ञानाला ज्याप्रमाणे कराइम पंथाशी झगडावे लागले तसे मध्ययुगाच्या अखेरीस ज्यू तत्त्वज्ञानाला कब्बाला नावाच्या नव्या तत्त्वप्रणालीशी लढावे लागले. कब्बाला या गूढवादी पंथाने बौद्धिक तत्त्वज्ञान हे दुय्यम दर्जाचे शास्त्र आहे, असा दावा मांडून रहस्यमय तत्त्वांचे एक नवे शास्त्र उभारले. यात तंत्रमंत्र, जादू व रहस्यमय आकृत्या यांना फार महत्त्व होते. बुद्धीपलीकडील साक्षात्काराला हस्तगत करण्याचे हे नवे शास्त्र मोझेसप्रणीत आहे, असे कब्बालिस्ट सांगू लागले. कब्बालिस्टांच्या या शास्त्राचा रूढ ज्यू तत्त्वज्ञानाशी मेळ घालण्याचा प्रयत्न इब्‍न वाकरसारख्यांनी केला पण रुढ ज्यू तत्त्वज्ञांनी या कब्बालिस्टांना लवकरच नामोहरम केले.

याच सुमारास ज्यूंचे कार्यक्षेत्र पुन्हा एकदा बदलले. कब्बालिस्टांच्या गूढ कारवायांमुळे साऱ्या ज्यू जमातीला स्पेनमधून हाकलण्यात आले व मध्ययुगाच्या अखेरीस ही जनता फ्रान्सच्या दक्षिणा भागात शिरली. तिथे प्रसिद्ध असलेल्या ज्यू तत्त्वज्ञांत नारबोनी (चौदावे शतक) हा मुख्य होता. ईश्वर हा सृष्ट वस्तूत आहे व सृष्ट वस्तू ईश्वरात आहेत यावरून या विश्वाचा आकार म्हणजे ईश्वर, असा सिद्धांत त्याने मांडला. ईश्वर हा असा आकार आहे, की जो कुठलाही पदार्थात नाही तरी तो पदार्थासह आहे, हा नारबोनीचा सिद्धांत नंतरच्या तत्त्वज्ञांनी उचलून धरला. गेरसानिडीझने (मृ. १३४४) यापुढे जाऊन असे सांगितले, की  ईश्वर हा विश्वाचे नियंत्रण करतो म्हणजे विश्वातील महान घटना त्याच्या इच्छेने घडून येतात परंतु सामान्य माणसाच्या दैनंदिन क्रियांचे नियंत्रण माणसाच्या स्वतःच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असते. ते त्याने ईश्वराच्या व्यापक नियमांच्या ज्ञानाने व आचरणाने सुनियंत्रित ठेवायचे असते. यानंतरचा तत्त्वज्ञ चासडाई इब्‍न क्रेस्कॉस (१३४०–१४१०) याने कब्बाला पंथाला जितका विरोध केला, तितकाच ॲरिस्टॉटललाही केला. त्याच्या काळात प्रसिद्ध ख्रिस्ती तत्त्वज्ञ डन्स, स्कॉट्‌स, ऑकहॅम वगैरेंनीही ॲरिस्टॉटलविरोधी जोराची मोहीम सुरू केली होती. विशेषतः नवीन गणिती विवेचनाने ॲरिस्टॉटलच्या ‘काला’च्या सिद्धांताला क्रेस्कॉसने चांगलेच चीत केले. ॲरिस्टॉटलने मानलेली वास्तविक अनंतता अशक्य आहे, हे सिद्ध करून स्थल (दिक्) हे अमर्याद आहे, निर्वाततेचे अस्तित्व शक्य आहे व या विश्वाखेरीज इतर विश्वांचे अस्तित्व असणेही शक्य आहे, हे क्रेस्कॉसने सिद्ध केले. क्रेस्कॉसला सर्वच ईश्वरी नियंत्रण दिसते. मानवी कृत्येदेखील त्याच्या मते पूर्वनियंत्रीत आहेत. क्रेस्कॉसचा अनुयायी जोसेफ अल्बो (१३८०–१४४४) याने आपल्या बुक ऑफ प्रिन्सिपल्समध्ये ज्यू धर्माचा आधार तीन गोष्टींवर आहे हे सांगितले. या तीन गोष्टी : (१) ईश्वराचे अस्तित्व, (२) तोराचे ईश्वरी कर्तृत्व आणि (३) पापपुण्याबाबत शिक्षा व बक्षिस यांसंबंधी श्रद्धा. अल्बोच्या मते निरनिराळ्या समाजांत निरनिराळे निसर्गजात नियम वा कायदे आढळतात. या कायद्यांखेरीज विद्वान लोकांनी रचलेले विशिष्ट कायदे असू शकतात परंतु प्रेषितांना साक्षात्कारात प्रगट होणारे ईश्वरी नियम हेच खरे अबाधित राहणारे नियम होत.


मध्ययुगीन काळात ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाला ज्यू तत्त्वज्ञांनी प्रखर विरोध केला. हे करण्यात ख्रिस्ती धर्माचे वैगुण्य उघड केल्यासारखे होत होते. यातून प्रबोधनकाळात यूरोपातील वैज्ञानिक विचारवंतांना ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान व ख्रिस्ती धर्मातील शब्दप्रामाण्यवाद झूगारून देण्याची स्फूर्ती मिळाली. एब्रेओ (१४६०–१५२१) यांच्यासारखे काही ज्यू तत्त्वज्ञ उघड प्‍लेटोवादी बनले. या काळात बायबलमधील लेखनात रूपकात्मक अर्थ शोधण्याचा प्रयत्न ख्रिस्ती धर्मीयांनी चालविला. त्याला ज्यूंनी कसून विरोध केला. या विरोधकांत मेडिगो (१४६०–९३) याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

या काळाच्या अखेरीस ज्यूंवर एकदा स्थलांतर करण्याचा प्रसंग ओढवला. दक्षिण फ्रान्सनंतर हॉलंड हे त्यांचे कार्यक्षेत्र बनले. आधुनिक युगाची आता सुरुवात झाली होती. या युगाचा शास्त्रीय दृष्टिकोन प्रथम द कोस्ता (१५८५–१६४०) याने मांडला. ज्यूंच्या रूढ समजुतींविरुद्ध जाऊन त्याने शरीराबरोबर आत्माही नष्ट होतो, असे मत मांडले. प्राण्यांचा आत्मा व मानवी आत्मा यांच्यात काही फरक नाही, असे द कोस्ताला वाटले. आत्मा अमर आहे, असे मानण्याने माणूस संन्यासमार्गाकडे जाऊन जीवनाला अप्रामाणिक करतो. हे जीवन स्वाभाविक नीतिमार्गाने जगणे हाच खरा धर्म आहे, असे त्याने शिकविले. द कोस्तानंतरचा महान ज्यू तत्त्वज्ञ म्हणजे ⇨ बारुक स्पिनोझा (१६३२-७३). स्पिनोझाचे नाव यूरोपीय तत्त्वज्ञानाच्या इतिहासात अमर आहे. येथे फक्त त्याने ज्यू धर्मासाठी जे काही तत्त्वज्ञानपर लेखन केले आहे, त्याचा विचार प्रस्तुत आहे. जन्माने ज्यू असून ज्यांनी एकूण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे, असे दुसरे कित्येक तत्त्वज्ञ आधुनिक काळात होऊन गेले आहेत (उदा., आंरी बेर्गसाँ ) परंतु त्यांनी ज्यू धर्म अथवा ज्यू तत्त्वज्ञान या क्षेत्रात विशिष्टपणे काहीही भर घातली नाही तसेच ज्यूंच्या धर्मपरंपरेचा त्यांच्या लेखनावर काही परिणामही झालेला नाही. स्पिनोझा वेगळा आहे. आपल्या तात्त्विक लेखनाची स्फूर्ती त्याला ज्यूंच्या धर्मग्रंथांतून मिळाली. त्याच्या लेखनावर मैमान व क्रेस्कॉस यांची छाप पडलेली आढळते. आपल्या ट्रॅक्टॅटस थिऑलॉजिको-पोलिटिकसमध्ये ज्यू धर्माचे विवेचन त्याने केले आहे. स्पिनोझाच्या दृष्टीने साक्षात्कार आणि आकाशवाणीचा सिद्धांत हा ज्यू धर्माचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे जितका मोझेसला मान देता येतो, तितका येशू ख्रिस्ताला देता येत नाही. येशू हा प्रेषित वा द्रष्टा नव्हता त्याच्यापुढे ईश्वराने साक्षात्काराने कुठलेही नियम उघड केले नाहीत. असल्या नियमांशिवाय राष्ट्राची उभारणी होणे शक्य नाही. राष्ट्राचा खरा आधार त्यातील धार्मिक नियंमावर असतो.  धर्म हा राष्ट्रासाठी आवश्यक आहे. स्पिनोझाने येशू ख्रिस्ताला योग्य ते स्थान दिले नाही, म्हणून ख्रिस्ती धर्मीयांनी त्याला मान्यता दिली नाही. ज्यू धर्मीयांनीही, त्याने ज्यू धर्माला योग्य ते दर्शन अथवा तत्त्वज्ञान दिले नाही म्हणून, त्याला मान्यता दिली नाही. असे जरी असले, तरी यूरोपीय तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात स्पिनोझाइतका श्रेष्ठ नीतितत्त्ववेत्ता झाला नाही.

स्पिनोझानंतर मेंडेलस्‌झोन (१७२९–८६) या तत्त्वज्ञाने ज्यू तत्त्वज्ञानाची जर्मनीत सुरुवात केली. त्याचा मुख्य उद्देश ज्यू धर्माची शास्त्रसंमत व्याख्या करून या धर्माच्या श्रेष्ठतेची खरी कल्पना विशद करण्याचा 

होता. हे करण्यात ख्रिस्ती धर्मीयांना दुखविण्याचा प्रसंग नेहमीच येत असे पण मेंडेलस्‌झोनने तसे होऊ दिले नाही. ज्यू धर्माचा उद्देश काही विशिष्ट नीतितत्त्वे शिकविण्याचा नाही. काही ऐतिहासिक घटनांमध्ये श्रद्धा निर्माण करणे, हा त्याच्या उद्देश आहे. नीतितत्त्वे सर्व धर्मात सारखीच असतात. जेव्हा सारी मानवजात एक होईल तेव्हा विशिष्ट धर्माच्या श्रद्धा नाहीशा होतील आणि बाकी राहील ते केवळ सदाचाराचे आचरण. अशी वेळ येईल तेव्हा ज्यू धर्म आपली अस्मिता सोडण्यास तयार होईल.

जर्मन तत्त्वज्ञ शेलिंगच्या तत्त्वज्ञानाने भारून जाऊन फार्मस्टेकर (१८०८–८९) या ज्यू तत्त्वज्ञाने, ख्रिस्ती धर्माने ज्यू धर्माची नीतितत्त्वेच शिकविली आहेत, असे दाखवून ख्रिस्ती धर्माचे शुद्ध स्वरूप कॅथलिक पंथापेक्षा प्रॉटेस्टंट पंथाने टिकविले आहे, असे मत मांडले. हिर्श (१८१५–८९) ह्या ज्यू तत्त्वज्ञावर हेगेलचा विशेष परिणाम झाला. हेगेलच्या पद्धतीने विचार मांडून हिर्शने असे स्पष्ट केले, की ख्रिस्ती धर्म हा ज्यू धर्म व अनेकेश्वरवादी धर्म यांच्या मधला धर्म आहे. ज्यू धर्मापासून त्याला वेगळे करण्याचे काम सेंट पॉलने केले. ख्रिस्ती धर्मातून जर सेंट पॉलप्रणीत तत्त्वे काढून टाकली, तर उरतो तो ज्यू धर्म.

यानंतरचे तत्त्वज्ञ कोहेन (१८४२–१९१८) व रोझेन् झ्वाइग (१८८६–१९२९) हे होत. यांच्यावरही जर्मन तत्त्वज्ञ हेगेल याचा बराच प्रभाव पडला होता. ईश्वर आणि मानव यांच्यातील संबंध भीतीवर आधारलेला असणे शक्य नाही, तो केवळ प्रेमावरच आधारणे शक्य आहे, असे कोहेनचे मत होते. संबंध प्रेमावर आधारलेला असला, तर ईश्वरी साक्षात्कार ही फार स्वाभाविक गोष्ट आहे, असे रोझेन् झ्वाइगचे मत होते. ईश्वराचा अनुभव केवळ या प्रकारे होणे शक्य आहे, असे दोघांनाही वाटले.

अलीकडच्या काळातील श्रेष्ठ ज्यू तत्त्वज्ञ ⇨मार्टिन बूबर (१८७८–१९६५). बूबरने ‘झायनिझम’ म्हणजे  ⇨ज्यू राष्ट्रीय  आंदोलनात भाग घेतला होता व आपल्या काळातील महत्त्वाच्या यूरोपीय तत्त्वप्रणालींचा त्याने जवळून अभ्यास केला होता. त्याची तात्त्विक बैठक ⇨ अस्तित्ववादाची होती. व्यक्ती आणि वस्तू यांच्या व व्यक्ती आणि व्यक्ती यांच्या संबंधांचे प्रकार वेगळे आहेत, हे मत प्रथम बूबरने मांडले. वस्तू ही केवळ पाहिली जाते, अनुभवली जाते. हा तिचा एकांगी संबंध असतो. उलट व्यक्तिव्यक्तींमध्ये परस्परसंवादित्वाचे नाते जोडले जाते. आजतागायतच्या तत्त्वज्ञानात हे दोन संबंध वेगवेगळ्या प्रकारचे न मानण्यामुळे गोंधळ झाला आहे. व्यक्तिव्यक्तींच्या संबंधात आपले सारे व्यक्तिमत्त्व ओतले जाते उलट वस्तूकडे बघण्यात किंवा तिचा स्पर्श अनुभवण्यात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एखादा भागच कामास येतो. व्यक्तिव्यक्तींच्या संबंधाचा हा सिद्धांत आपणाला कळला तरच बायबलमधील परमेश्वर जेव्हा आपण साऱ्या व्यक्तिमत्त्वाने अनुभवतो तेव्हा साक्षात्कार घडतो तेव्हाच आपण ईश्वराशी संवाद करू शकतो. अशा संबंधातच एकमेक एकमेकांना ‘तू’ म्हणू लागतात. ज्यू प्रेषितांनी ईश्वराशी केलेल्या संभाषणाची बायबल  ही नोंद आहे.

बूबर याला ज्यूंचे राष्ट्र अस्तित्वात आलेले पाहायला मिळाले. त्यांच्या लेखनाचा ज्यू जनतेच्या मनावर सखोल परिणाम झाला आहे. केवळ स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी ज्यू तत्त्वज्ञानाला आजतागायत अनेक समस्यांशी झगडावे लागले. बूबरच्या लेखनात ज्यूंच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतून निर्माण झालेले स्वतंत्र विचार प्रथम दृष्टोत्पतीस येतात. मानवी व्यक्तिमत्त्वाचे शास्त्रीय व सुंदर विवेचन बूबरच्या लेखनात जितके आढळते तितके इतरत्र कोठेही आढळत नाही. मानवी व्यक्तिमत्त्वावरील या श्रद्धेने शिक्षणाचे खेर ध्येय पार पाडता येईल, अशी बूबरला खात्री होती. या दृष्टीने त्याने १९३९ साली पॅलेस्टाइनमधील शिक्षकांपुढे केलेल्या भाषणातील शेवटचे वाक्य मोठे मार्मिक होते : ‘माणसाला आपल्या व्यक्तिमत्त्वातील एकत्वाकडे परत जाण्यास जो शिक्षक मदत करतो, तो त्याला ईश्वरोन्मुख उभे राहण्यास मदत करतो’.

संदर्भ : 1. Friedman, M. Martin Buber, London, 1955.

           2. Guttman, Julius, Philosophies of Judaism, New York, 1964.

           3. Husik, Isaac, A History of Medieval Jewish Philosophy, Philadelphia, 1916.

           4. Kadushin, Max, The Rabbinic Mind, London, 1965.

           5. Lazarus, M. Trans. Szold, Henrietta, Ethics of Judaism, Philadelphia, 1901.

           6. Muller, E. History of Jewish Mysticism, London, 1946.

           7. Schechter, Solomon, Studies in Judaism, New York, 1958.

माहुलकर, दि. द.