आशावाद : जीवनाकडे आणि जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन. ⇨निराशावादाच्या अगदी उलट असा हा दृष्टिकोन आहे. जग हे आहे त्या स्वरूपात आणि जीवन हे आहे त्या स्थितीत, वाईट नसून चांगले आहे किंवा या जगापेक्षा अधिक चांगले जग असू शकत नाही शक्य असलेल्या जगांमध्ये हेच जग अधिक चांगले आहे तसेच मानवाचे भवितव्यही उज्ज्वल आहे, असे स्थूलमानाने ह्या दृष्टिकोनाचे स्वरूप सांगता येईल. बहुतांश मोक्षवादी भारतीय तत्त्वज्ञाने व्यावहारिक पातळीवर निराशावादी दृष्टिकोन आणि पारमार्थिक पातळीवर आशावादी दृष्टिकोन स्वीकारताना दिसतात. कारण त्यांच्या मते हे जग वा स्वर्ग कितीही चांगला असला, तरी तो नाशवंत आहे, मोक्षच तेवढा शाश्वत आहे.

पाश्चात्य तत्त्वज्ञानात ⇨ लायप्निट्त्सप्रणीत आशावादी दृष्टिकोन विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या मते ईश्वराने निर्माण केलेले विद्यमान जग, हे आपण कल्पना करू अशा जगांमध्ये त्यातल्या त्यात सर्वोत्तम आहे. प्लेटो आणि इतर चिद्वादी विचारवंत जगातील दु:ख आणि पाप हे क्षणिक किंवा आभासमय मानून, परमकल्याणाची कल्पना उचलून धरतात. हेर्डर, काँत इ प्रगतिवादी विचारवंतांचाही दृष्टिकोन असाच आहे. ज्या धार्मिक विचारसरणीत विश्व हे ईश्वराची योजनाबद्ध निर्मिती मानले जाते आणि ज्यात मोक्ष अथवा परमकल्याणाची कल्पना प्रतिपादिली जाते. त्या विचारसरणी आशावादी मानावयास हरकत नाही. देकार्त, मालब्रांश, स्पिनोझा ह्या तत्त्ववेत्त्यांनीही आशावादाचा पुरस्कार केलेला आहे. जीवन हे चांगुलपणाने आणि मांगल्याने ओतप्रोत आहे, त्यात वाईटास स्थान नाही, अशी अनेक आशावादी लोकांची श्रद्धा असते. एमर्सनने सुधारणाक्षमतावाद प्रतिपादिला आहे. जग हे संपूर्णपणे चांगले किंवा वाईट नाही तथापि ते सुधारणाक्षम आहे, म्हणजे ते सुधारता येणे शक्य आहे, असा या दृष्टिकोनाचा अर्थ आहे.

सुर्वे, भा. ग.