विकासवादी नीतिमीमांसा : वैचारिक विश्वात ‘विकास’ ही संकल्पना डार्विनच्या पूर्वीच्या प्रभावी होती. बीजाचा विकास होऊन त्यातून वृक्ष वाढतो, हे ॲरिस्टॉटलने (इ. स. पू. ३८४−३२२) म्हटलेच होते. विश्वाचा इतिहास म्हणजे विश्वात्मक चिच्छत्कीचा आत्ममानाच्या दिशेने होणारा विकास होय, असा हेगेलचा (१७७०−१८३१) सिद्धांत आहे. पण विविध प्राणिजातींच्या उत्पत्तीविषयीचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज… हा आपला ग्रंथ १८५९ मध्ये प्रसिद्ध करून डार्विनने विकासवादास स्थिर वैज्ञानिक बैठक आणि खूप लोकप्रियता मिळवून दिली. परिणामतः भाषा, साहित्य, कायदा, शासनसंस्था समाजरचना वगैरे गोष्टींचा अभ्यास विकासवादी दृष्टीकोनातून होऊ लागला. ⇨हर्बर्ट स्पेन्सर (१८२०−१९०३) या ब्रिटिश तत्त्वचिंतकाने नीतिशास्त्राची उभारणी विकासवादांच्या आधाराने करण्याचा प्रयत्न द प्रिन्सिपल्स ऑफ एथिक्स (दोन खंड, १८९२, १८९३) या पुस्तकात केला. आधीचा डेटा ऑफ एथिक्स (१८७९) हे पुस्तक यात अंतर्भूत आहे.

नीतीमध्ये बधकत्व असते, कर्तव्यभावनेत ‘तव्यता’ (ऑटनेस) असते. समाजाच्या विकासक्रमाला अनुसरून स्पेन्सरने त्या भावनेची उपपत्ती दिली. पूर्वी माणसे टोळ्या करून राहत असत. टोळीला नायक असे व त्याची आज्ञा टोळीतील प्रत्येक व्यक्तीवर बंधनकारक होती. आज्ञाभंगास कठोर शासन असावयाचे. त्यामुळे नायकाची जरब असावयाची. ज्या टोळ्यांमध्ये हा कठोर व्यवहार नसेल, त्यांच्या जीवनकलहात निभाव न लागल्याने त्या लवकर लवकर नष्ट होत गेल्या असणार. जीवन-कलहात समर्थ ठरलेल्या इतर टोळ्यांमधूनही कालांतराने नायक ही संस्था निरुपयोगी ठरल्याने ठरल्याने नाहीशी झाली. टोळीचे नायक गेले पण त्यांच्याविषयी वाटणारी भीती आणि दरारा ही मानवी मनात अवशेषारूपाने राहिली. नैतिकतेचे सार म्हणून माणसामध्ये जी कर्तव्यभावना आढळते ती म्हणजे, जिचा आधार निसटून गेला आहे अशी अदिमानवाच्या मनातील टोळीच्या नायकाविषयी वाटणारी भीती आणि त्यातून निर्माण होणारी आज्ञाधारकता होय.

समाज टिकून राहण्याच्या जीवशास्त्रीय गरजेतून ज्याप्रमाणे सामान्य स्वरूपाच्या नैतिक जाणिवेच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण नैतिक जाणिवेच्या उत्पत्तीच्या स्पष्टीकरण देता येते, त्याचप्रमाणे ज्या विशिष्ट गुणांना सद्‌गुण मानले जाते, त्यांचेही उपपादन विकासाच्या उपपत्तीने करता येते. धैर्य, दूरदर्शित्त्व इत्यादींना नैतिक सद्‌गुण मानले जाते. कारण ज्या मानवसमूहांत यांचा अभाव होता, ते विकासप्रक्रियेत नष्टच झाले. उलट, गुणांच्या जेथे उत्तेजन देण्यात आले ते समाज उत्कर्ष पावले.

डार्विनच्या उपपत्तीत असे म्हटलेले नाही किंवा तीमध्ये असे अनुस्थूतही नाही, की विकासक्रमात जे मागहून येते, त्याचे मूल्य अधिक असते किंवा नैतिक दृष्ट्या ते वरच्या दर्जाचे असते. जीव-जातींच्या विकासक्रमात माणूस हा आतापर्यंतचा शेवटचा टप्पा होय. पण यामुळे तो इतर प्राण्यांहून श्रेष्ठ आहे, असे नाही, अधिक विकसित ते अधिक चांगले असण्याचे समर्थक कारण नव्हे. पण स्पेन्सरचा युक्तिवाद काही अंशी तरी, जे अधिक विकसित ते अधिक चांगले अशा तत्त्वांवर आधारलेला आहे.

जीवाच्या अंतर्गत संबंधांची जीवबाह्य संबंधांशी जुळवून घेण्याची सतत चाललेली क्रिया म्हणजे जीवन होय, असा एक अर्थ स्पेन्सरने सांगितलेला आहे. हिवाळ्यात बाहेरचे तापमान कमी होते, तेव्हा अधिक अन्न खाऊन शरीर अधिक उष्णता निर्माण करते, हे याचे उदाहरण होईल. जीवनाच्या या धडपडीच्या विकासाचे स्वरूप त्याने असे सांगितले आहे : तुलनेने अनिश्चित स्वरूपाच्या असंघटित, समरूप अवस्थेकडून तुलनेने निश्चित स्वरूपाच्या सुसंघटित विविधरूप अवस्थेकडे जाणे म्हणजे जावनाचा विकास होय. मानवी जीवनाच्या विकासाच्या अंतिम टप्प्याची कल्पना आपण केली, तर त्या अवस्थेत प्रत्येक मानवी व्यक्ती वेगळी असूनही इतर व्यक्तीशी तिचा संघर्ष राहणार नाही, अशा निश्चित स्वरूप असलेल्या सामाजिक संस्थांचा घटक राहील. विकासक्रमाच्या अभ्यासातून समजून येणाऱ्या आदर्श मानवी समाजातील व्यक्तीचे परस्परांशी जे वर्तन असेल, त्याचप्रमाणे आज आपण एकमेकांशी वागणे म्हणजे सदाचार होय, असे नैतिक मार्गदर्शन स्पेन्सरचे विकासवादी नीतिशास्त्र देते.

पण स्पेन्सर असे म्हणत नाही, की या तऱ्हेचे वर्तन जीवशास्त्रदृष्ट्या विकसित आहे. म्हणून ते चांगले होय. क्वचित तो असे म्हणतो, की या प्रकारच्या वर्तनाने जीवन विपुल होईल म्हणून ते चांगले. पण अशीही ठाम भूमिका तो घेत नाही. जीवनात दुःखापेक्षा सुखाचे आधिक्य असते, म्हणून विपूल जीवनाच्या दिशेने जावे, असे तो सांगतो. सुख याच एका गोष्टीला स्वयंमूल्य आहे, सुख एवढी एकच गोष्ट स्वतः होऊन चांगली आहे, असे त्याचे म्हणणे दिसते. म्हणजे मूलतः त्याची नीतिशास्त्रीय बैठक सुखावादाचीच आहे. पण ज्या कृती जीवनाला अनुकूल, त्याच सुखाच्या असतात व जीवनानुकूल कृती कोणत्या ते जीवशास्त्रीय विकासाच्या उपपत्तीने समजते तसेच जीवशास्त्रीय विकासाच्या तत्त्वामुळे नीतीचे उपपादनही करता येते, असे त्याचे म्हणणे असल्याने त्याच्या नैतिक विवेचनास विकासवादी नीतिमीमांसा असे म्हटले जाते.

जीवनव्यापाराला अनुकूल असलेल्या कृती सुखकारक का असतात याविषयी त्याचा युक्तिवाद असा : जी कृती जीवनवर्धक आहे, तिच्याशी दुःखाची भावना निगडित झाली असेल, तर जीवन नष्टच होईल. म्हणून जीवनपोषक कृती सुखाचीच असली पाहिजे. या युक्तिवादातील तर्कदोष स्पष्ट आहे. शिवाय प्रत्यक्षात असे दिसते, की ज्या समाजात काही व्यक्ती इतरांसाठी हालअपेष्टा सोसतात, ते समाज भरभराटीस येतात. दुःख आणि जीवनाचा उत्कर्ष यांचे साहचर्यही यांचे प्रसंगी दाखविता येते.

स्पेन्सरच्या नीतिमीमांसेवर असाही एक आक्षेप घेता येईल, की पूर्ण विकसित समाजात ज्या जीवनरीती नैसर्गिक असतील, त्या आजच्या अपूर्ण समाजात मी अंगीकारणे म्हणजे विकासक्रमाशी द्रोह केल्यासारखे होणार नाही काय ?

सर लेस्ली स्टीव्हन (१८३२−१९०४) या इंग्रजी तत्वचिंतकाची नीतिमीमांसा मात्र खऱ्या अर्थाने विकासवादी आहे. व्यक्तीचे सुख नव्हे, तर जीवशास्त्रीय परिभाषेत मोजमाप करता येईल असे समाजाचे आरोग्य हे नीतीचे परम उद्दिष्ट होय, असे त्याचे म्हणणे होते. सामाजिक आरोग्याला पूरक होणाऱ्या आचरणाने समाजातील व्यक्तींना सुखही लाभेल. पण ती आनुषंगिक गोष्ट आहे.

डार्विनप्रणीत विकासाची कल्पना यांत्रिक आहे. ठराविक कारण घटक एकत्र आले, तर त्यातून ठराविक कार्याचीच निष्पत्ती होईल आणि त्यामुळे विकासाची पुढची दिशाही ठरल्यासारखीच आहे, अशी ही विचारसरणी आहे.

बेर्गसाँ (१८५९−१९४१) या फ्रेंच तत्त्वचिंतकाने विकासाचे हे स्वरूप नाकारले. पूर्वी मराठीत रूढ असलेला उत्क्रांती हा शब्द (त्याचा संस्कृत अर्थ विसरल्यास) बेर्गसाँच्या विचाराला अधिक अनुरूप आहे. त्याच्या मते अस्सल जीवन हे सर्जनशील असते. जड द्रव्य हे जीवनाला मागे खेचत असले, तरी त्याला विरोध करून जीवन एकसारखे काही तरी नवीन निर्माण करीत असते. त्याच्या प्रवासाची दिशा यांत्रिक रीत्या आधीच ठरलेली नसते, किंवा पूर्वनियोजित उद्दिष्टे जीवनाला हाकरीत असतात असेही नाही. प्रतिभावंत जीवनवीरला नवीन नवीन मूल्यांचा साक्षात्कार होत असतो व इतर लोक त्याला अनुसरतात. ही सर्जनशील नीती होय. या नीतीत बंधकत्व नसते. पण दुसरीही एक नीती आहे. ती समाजाला आहे त्या अवस्थेत सुरक्षित कोंदणात ठेवू पाहते. व्यक्तिव्यक्तींच्या कलहात समाज विकीर्ण होऊ नये. म्हणून याही नीतीची गरज आहे. ही रूढ नीती होय. जीवनाला स्थैर्य आणण्यासाठी बुद्धीच तिची निर्मिती करते. व्यक्तिमानसावर तिचा दाब पडतो. म्हणून या नीतीचे बंधकत्व जाणवते. प्रतिभानिर्मित सर्जनशिल नीतीत जीवनाचे स्वातंत्र्य अनुभवास येते.

संदर्भ : 1. Bergson, Henri, Trans. Audra R. A. Brereton. C. The Two Sources of Morality and Religion, London, 1935.

          2. Spenser, Herbert, Principles of Ethics, 2 Vols., London, 1892-1893.

          3. Stephen, Leslie. The Science of Ethics, London, 1882.

दीक्षित, श्री. ह.