कार्ल यास्पर्सयास्पर्स, कार्ल : (२३ फेब्रुवारी १८८३–२६ फेब्रुवारी १९६९). प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ते आणि अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख प्रवर्तक. जन्म ओल्डेनबर्ग येथे. यास्पर्स ह्यांनी हायडल्‌बर्ग व म्यूनिक या विद्यापीठांत प्रथम कायद्याचे शिक्षण घेतले व नंतर बर्लिन, गटिंगेन व हायडल्‌बर्ग विद्यापीठांत वैद्यकीय शिक्षण घेतले. वैद्यक व मानसचिकित्सा ह्या ज्ञानशाखांकडून ते तत्त्वज्ञानाकडे आले. १९२१ मध्ये हायडल्‌बर्ग विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. १९३२ मध्ये फिलॉसॉफी हा त्यांचा प्रमुख ग्रंथ तीन खंडांत प्रसिद्ध झाला. यास्पर्स यांची पत्नी ज्यू होती. नाझी अमदानीत ज्यू जमातीच्या झालेल्या अघोरी छळाच्या यातना त्यांनी वैयक्तिक जीवनात अनुभविल्या. ज्यू जमातीला देण्यात आलेल्या अमानुष वागणुकीच्या संबंधात सबंध जर्मन समाजाचा काय अपराध होता ह्या प्रश्नावरील आपले विचार १९४६ मध्ये एका ग्रंथाद्वारे त्यांनी मांडले. १९५८ मध्ये त्यांना जर्मन शांतता पारितोषिक देण्यात आले. बाझेल (स्वित्झर्लंड) येथे त्यांचे निधन झाले.

यास्पर्स यांचे तत्त्वज्ञान सारांशाने असे मांडता येईल : माणसाला येणारा वैयक्तिक, साक्षात्‌ अनुभव हा त्याच्या सर्व ज्ञानाचा पाया असतो. वैज्ञानिक ज्ञान हे अंतिम ज्ञान नव्हे. कारण एकतर ते अनेक गृहीतकृत्यांवर आधारलेले असते आणि शिवाय जो ज्ञाता असतो तो वैज्ञानिक ज्ञानातून वगळलेला असतो. म्हणून विज्ञान सबंध अस्तित्वात ज्ञान देऊ शकत नाही. अस्तित्वाचा सम्यक्‌ प्रत्यय आपल्याला आपल्या प्रत्यगात्म्यात म्हणजे आपल्या खऱ्याखुऱ्या ‘स्व’-मध्ये येतो. ह्या स्व-चे वर्णन करता येत नाही पण आपल्या जगण्यातून त्याचा अनुभव येऊ शकतो. हा संपूर्ण स्वातंत्र्याचा, एकाकीपणाचा अनुभव असतो. ह्या आंतरिक जीवनाशिवाय माणूस जी कृत्ये करतो त्यांचे मिळून बनलेले, कालात घडणारे बाह्य जीवनही असते. आंतरिक जीवन आणि बाह्य जीवन यांच्यात ताण असतो आणि माणसाला हा ताण राखावा लागतो व सहन करावा लागतो. माणसाच्या अंतर्यामात अनेक विरोध सामावलेले असतात. स्वातंत्र्य आणि परावलंबित्व, संवाद आणि एकाकीपण, सत्य आणि असत्य हे विरोध असतात आणि ह्या विरोधांतून माणसाचे आंतरिक जीवन संपन्न होत असते.

माणसाच्या आंतरिक जीवनात व्यक्त होणारा हा तो प्रत्यगात्मा असतो तो अनुल्लंघ्य मर्यादांनी सीमित झालेला असतो. त्याचा जो स्वानुभव असतो तो असा सीमित असण्याचा अनुभव असतो. मृत्यू ही अशी एक अनुल्लंघ्य सीमा असते. मृत्यूची मर्यादा माणसाला स्वीकारावी लागते. त्यातून माणसाला परिवेदनेचा (अँग्विश) असह्य अनुभव तर येतोच पण लाभलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण अस्सलपणे वा यथार्थपणे (ऑथेंटिकली) जगण्याचा निर्धार जर त्याने केला, तर त्याच्या जीवनाचे उन्नयन होते. माणूस स्वतंत्रपणे निवड करू शकतो. म्हणून आपण वेगळी निवड करू शकलो असतो ह्या विचाराने अपराधीपणाची जाणीव त्याच्या अंतरात्म्यात भिनते. ही माणसाच्या अस्तित्वाची दुसरी सीमा. मानवी अस्तित्वाला अनिवार्यपणे असलेल्या ह्या सीमा स्वीकारून पण त्याबरोबरच आपल्या स्वातंत्र्याचे क्षेत्र जास्तीत जास्त विस्तृत करण्याचा प्रयत्न अप्रतिहतपणे करीत माणूस अस्सलपणे जगू शकतो.

निर्णयस्वातंत्र्यात माणसाचे अस्तित्व असते आणि म्हणून माणसाने तटस्थ, निवृत्त असता कामा नये. त्याने कृती केली पाहिजे. अशा कृतीत त्याने ज्या मूल्यांना बांधून घेतलेले असते ही अंतर्भूत असतात आणि ही मूल्येही त्याने स्वतंत्रपणे निवडलेली असतात. माणसाला मुख्य निवड करावी लागते ती ही, की मी माझ्या अस्तित्वाच्या विकासाच्या ज्या शक्यता असतात त्यांच्याशी निष्ठा राखून अस्सलपणे जगू की काही बाह्य साध्यासाठी तडजोडी करू?

प्रत्येक प्रत्यगात्मा आपल्या अंतर्यामात जगत असतो, हे जसे सत्य आहे त्याप्रमाणे इतर प्रत्यगात्म्यांशी तो अनिवार्यपणे संवाद साधत असतो हेही सत्य आहे. अशा संवादातून प्रत्येक प्रत्यगात्मा स्वतःला सिद्ध करीत असतो. ज्याप्रमाणे प्रत्यगात्म्याचे वर्णन करता येत नाही पण त्याचा अनुभव येऊ शकतो, त्याप्रमाणे प्रत्यगात्म्यांमधील खराखुरा संवादही वर्णनपर भाषेतून चालत नाही तो गूढ असतो. प्रतीकांच्या भाषेतून तो चालतो आणि त्यातून एका प्रत्यगात्म्याची दुसऱ्या प्रत्यगात्म्याला ओळख पटते.

प्रत्यगात्म्याच्या जीवनात अंतर्भूत असलेल्या अनंत शक्यता व त्याचे सीमित अस्तित्व ह्यांतील जीवघेण्या विरोधामुळे माणूस परतत्त्वाकडे, म्हणजे ईश्वराकडे वळतो. आपले स्वातंत्र्य हे आपल्याला लाभलेले दान आहे ही जाणीव माणसाला असते. ह्यातून ज्या शक्तीमध्ये आपल्या अस्तित्वाचा उगम असतो तिची जाणीव माणसाला होते. ही शक्ती, ईश्वर, म्हणजे एक विशिष्ट अस्तित्व नसते ते शुद्ध, सर्वव्यापी अस्तित्व असते. त्याच्यात ज्ञाता आणि ज्ञेय हा भेद मावळतो. विज्ञान, नैतिक जीवन किंवा ईश्वराचा शोध घेण्यासाठी केलेली साधना इ. मार्गांनी आपण परतत्त्वाशी नाते जुळवीत असतो. परतत्त्व आहे हे अनुमानाने सिद्ध करता येत नाही. ते श्रद्धेनेच स्वीकारावे लागते. पण त्याच्या गूढ खुणा जगात विखुरलेल्या असतात. त्यांचा अर्थ लावणे हे तत्त्वज्ञानाचे एक कार्य आहे.

त्यांनी जर्मनमध्ये विपुल लेखन केले असून त्यांच्या काही महत्त्वपूर्ण मूळ जर्मन ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ असे : जनरल सायकोपॅथॉलॉजी (जर्मन १९१३, इं. भा. १९६३), मॅक्स वेबर (१९३२), फिलॉसॉफी (३ खंड, १९३२), रीझन अँड एक्झीस्टन्स (१९३५, १९५५), निट्शे (१९१६, १९६५), द फिलॉसाफी ऑफ एक्झीस्टन्स (१९३८, १९७१), द आयडिया ऑफ द युनिव्हर्सिटी (१९४६, १९५९), द क्वेश्चन ऑफ जर्मन गिल्ट (१९४६, १९४७), ट्रूथ अँड सिंबल (१९४७, १९५९), द ओरिजिन अँड गोल ऑफ हिस्टरी (१९४९, १९५३), मिथ अँड क्रिश्चॅनिटी (१९५४, १९५८), द फ्यूचर ऑफ मॅनकाइंड (१९५७, १९६१) इत्यादी.

पहा : अस्तित्ववाद.

संदर्भ : Schilpp, P. A. Ed. The Philosophy of Karl Jaspers, New York, 1957.

रेगे, मे. पुं.