ऑस्टिन, जॉन लँगशॉ : (२६ मार्च १९११–८ फेब्रुवारी १९६०). इंग्रज तत्त्ववेत्ते. जन्म लँकेस्टर येथे. शिक्षण बेलियल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १९५२ पासून अखेरपर्यंत ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक. दुसऱ्यामहायुद्धात ‘ब्रिटिश इंटेलिजन्स कोअर’ मध्ये बजाविलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे लेफ्टनंट-कर्नलच्या हुद्यापर्यंत ते चढले आणि ओ. बी. ई. व वॉर क्रॉस ही मानचिन्हे त्यांना लाभली.

दुसऱ्यामहायुद्धानंतरच्या कालखंडातील ऑक्सफर्ड येथील सर्वांत प्रभावी तत्त्ववेत्ते असे ऑस्टिन यांचे वर्णन करता येईल. ‘ऑक्सफर्डचा भाषिक विश्लेषणाचा पंथ’ ह्या नावाने अलीकडल्या तत्त्वज्ञानात प्रसिद्ध असलेली विचारसरणी व्हिट्गेनश्टाइनपेक्षाही ऑस्टिन ह्यांच्या तत्त्वज्ञानातील कामगिरीशी आणि त्यांनी घालून दिलेल्या उदाहरणाशी निगडित आहे. तत्त्वज्ञानाची उद्दिष्टे व त्याची रीत, ह्यांविषयीची ऑस्टिन ह्यांची भूमिकाथोडक्यात अशी मांडता येईल : आपल्या अनुभवाच्या किंवा व्यवहाराच्या एखाद्या क्षेत्राविषयी बोलताना, आपण आपल्या नेहमीच्या सामान्य भाषेत रूढ असलेल्या अनेक शब्दांचा, शब्दप्रयोगांचा, रूपांचा वापर करीत असतो. ह्या वेगवेगळ्या शब्दप्रयोगांनी अर्थाच्या अनेक, परस्परांशी सूक्ष्म भेद असलेल्या, छटा व्यक्त होतात. कोणत्या प्रकारच्या प्रसंगी किंवा कोणत्या संदर्भात कोणते शब्दप्रयोग वापरणे उचित ठरते व कोणते वापरणे अनुचित ठरते, ह्यांविषयी आपल्या व्यवहारातील भाषेत अनेक संकेत रूढ असतात. त्या क्षेत्रासंबंधी बोलताना, जे महत्त्वाचे भेद ध्यानी घेणे आवश्यक असते, ते ह्या भाषिक प्रयोगांमध्ये व त्यांच्या वापरासंबंधीच्या संकेतांमध्ये प्रतिबिंबित झालेले असतात. हे भेद महत्त्वाचे नसते, तर आपल्या भाषेत ते रूढ झाले नसते, टिकले नसते आणि महत्त्वाच्या भेदांकडे दुर्लक्ष करणारे भाषिक प्रयोगही व्यवहारात टिकले नसते म्हणून तात्त्विक प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या भाषिक प्रयोगांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यांच्यात अर्थाचे जे अनेक भेद प्रतिबिंबित झालेले असतात, त्यांचे स्वरूप ध्यानी घेणे आवश्यक आहे. पारंपरिक तत्त्वज्ञानामध्ये तत्त्ववेत्ते स्वतः बनविलेल्या पारिभाषिक शब्दांच्या साहाय्याने जेव्हा तात्त्विक प्रश्न उपस्थित करतात, तेव्हा आपल्या नेहमीच्या भाषेत अंतर्भूत असलेल्या ह्या भेदांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले असते. त्यामुळे ह्या प्रश्नांचा व त्यांना देण्यात येत असणाऱ्या पर्यायी उत्तरांचा अर्थही नीट लावता येत नाही. अशा तऱ्हेच्या, आपल्या नेहमीच्या भाषेत अंतर्भूत असलेल्या, अनेक सूक्ष्म भेदांकडे दुर्लक्ष करुन आणि कित्येक ठळक भेदांवर लक्ष केंद्रित करून उपस्थित करण्यात येत असलेल्या प्रश्नांची उदाहरणे म्हणून दोन पारंपरिक तात्त्विक प्रश्नांची विस्तृत चिकित्सा त्यांनी केली आहे. सेन्स अँड सेन्सिबिलिया (१९६२) ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या व्याख्यानात, ‘प्रत्यक्ष ज्ञानात आपल्याला भौतिक वस्तूची साक्षात प्रतीती होत नसून वेदनदत्तांची साक्षात प्रतीती होते’ हे मत सिद्ध करण्यासाठी अवलंबिण्यात येणाऱ्या पारंपरिक युक्तिवादांची ह्या भूमिकेवरून चिकित्सा करण्यात आली आहे तर ‘ए प्ली फॉर एक्स्क्यूझिस’ ह्या व्याख्यानात संकल्प स्वातंत्र्याच्या स‌मस्येचे ह्या भूमिकेच्या संदर्भात अवलोकन करण्यात आले आहे.

पारंपरिक तात्त्विक प्रश्न आपल्या सामान्य भाषेत अंतर्भूत असलेल्या तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करुन उपस्थित करण्यात येत अस‌ल्यामुळे फोल कसे ठरतात हे दाखविणे, एवढाच ऑस्टिन यांचा नकारी उद्देश नव्हता. सामान्य भाषेतील शब्दप्रयोगांच्या वापराचे सारे बारकावे आपण काळजीपूर्वक ध्यानी घेतले, तर एक नवीन स्वरुपाचे भाषाशास्त्र विकसित करता येईल, असा त्यांचा विश्वास होता. तर्कशास्त्र किंवा मानसशास्त्र सुरुवातीला तत्त्वज्ञानाचे भाग होते, पण आता त्यांची वेगळी शास्त्रे बनली आहेत त्याप्रमाणे हे नवीन भाषाशास्त्रही विकसित होऊन स्वतंत्रपणे नांदू लागेल, असा त्यांचा विश्वास होता. पण ह्या भाषाशास्त्राचा विकास करणे हे तत्त्वज्ञानाचे एकमेव उद्दिष्ट आहे, असे ऑस्टिन ह्यांनी कधीही म्हटले नाही. तत्त्वज्ञानाची इतरही उद्दिष्टे असू शकतात, हे त्यांनी मान्य केले आहे पण ती कोणती ह्याचा खुलासा मात्र केलेला नाही.

सामान्य भाषेच्या सूक्ष्म अभ्यासाचे एक फळ म्हणून ऑस्टिन यांनी घडविलेल्या ‘उक्तिकृती’ पर्‌फॉर्मेटिव्ह) ह्या संकल्पनेचा निर्देश करता येईल. एखादा माणूस योग्य प्रसंगी जेव्हा ‘मी वचन देतो’ असे उच्चारतो, तेव्हा हे वाक्य उच्चारून तो वचन देण्याची कृती करीत असतो. आपण काय करीत आहो किंवा काय करणार आहो, ह्याचे कथन तो करीत नसतो, तर हे वाक्य त्याने उच्चारणे म्हणजे वचन देण्याची कृती करणे. अशा तऱ्हेच्या शब्दप्रयोगांना ऑस्टिन ‘उक्तिकृती’ म्हणतात. उलट जी वाक्ये उच्चारून आपण काही कथन करीत असतो, त्यांना ते ‘संकथने’ (कॉन्स्टँटिव्ह) म्हणतात. उक्तिकृती व संकथने ह्यांतील भेदापासून सुरुवात करून आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या उक्तींनी आपण जी वेगवेगळ्या प्रकारची कार्ये साधतो, त्यांचे तपशीलवार विवेचन हाउ टू डू थिंग्ज विथ वर्ड्‌स (१९६२) ह्या त्यांच्या पुस्तकात आढळते.

ऑस्टिन यांनी तत्त्वज्ञानात ज्या नवीन रीतीचा पुरस्कार केला, तिचा त्यांनी स्वतः अत्यंत चमकदार असा वापर केला व तो फलदायीही ठरला. पण ही रीत रूढ होऊ शकेल की नाही हे काळाने ठरवायचे आहे. ऑस्टिन यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख फिलॉसॉफिकल पेपर्स (१९६१) ह्या संग्रहात स‌माविष्ट करण्यात आले आहेत. ऑक्सफर्ड येथे ते निवर्सले.

रेगे, मे. पुं.