तत्त्वज्ञान : तत्त्वज्ञानाचे एकंदर स्वरूप आणि व्याप्ती काय आहे, त्याच्यात कोणते प्रश्न मोडतात, ह्या ज्ञानशाखेचा इतर ज्ञानशाखांशी कोणता संबंध आहे (किंवा कोणकोणते संबंध आहेत), तत्त्वज्ञानात वापरल्या जाणाऱ्या रीतीचे ज्ञानाच्या इतर क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या रीतींशी कोणत्या बाबतीत साम्य आहे आणि कोणत्या बाबतीत त्यांच्यात भिन्नता आहे ह्या गोष्टींचे सामान्यपणे दिग्दर्शन करणे, हा ह्या लेखाचा उद्देश आहे.

सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. तत्त्वज्ञानाचे स्वरूप काय, त्याचा इतर मानवी ज्ञानाशी काय संबंध आहे इ. प्रश्न तत्त्वज्ञानातच उपस्थित केले जातात. इतर ज्ञानशाखांचे तसे नसते. गणिताचे नेमके स्वरूप काय आहे, त्याचा इतर ज्ञानशाखांशी कोणता संबंध आहे, हे प्रश्न गणित स्वतःसंबंधी उपस्थित करीत नाही, तर तत्त्वज्ञान हे प्रश्न गणिताविषयी आणि इतर सर्व ज्ञानशाखांविषयी उपस्थित करते आणि तत्त्वज्ञान इतर ज्ञानशाखांविषयी जसे हे प्रश्न उपस्थित करते तसेच स्वतःसंबंधीही ते उपस्थित करते. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तत्त्ववेत्त्याने एक विशिष्ट तात्त्विक भूमिका स्वीकारलेली असते. तत्त्वज्ञानाचा नेमका विषय, त्याची व्याप्ती, रीत ह्याविषयीच्या प्रश्नांना तत्त्ववेत्ते वेगवेगळ्या भूमिकांतून परस्परविरोधी उत्तरे देतात. म्हणजे प्रत्येक तात्त्विक दर्शनात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाविषयी एक विशिष्ट कल्पना स्वीकारलेली असते आणि तिचे प्रामाण्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ही कल्पना त्या तात्त्विक दर्शनाचा एक भाग असते आणि वेगवेगळ्या दर्शनात ती भिन्न असते. आपल्याला तटस्थ दृष्टिकोनातून तत्त्वज्ञानाचे स्वरूप आणि रीत यासंबंधी कोणत्या भिन्न कल्पना स्वीकारल्या गेल्या आहेत किंवा स्वीकारल्या जाण्यासारख्या आहेत, हे पहायचे आहे.

‘तत्त्वज्ञानाचे कार्य काय?’ ह्या प्रश्नाचे एक सरळ उत्तर आपण देऊ शकत नाही. तत्त्वज्ञानाची अनेक भिन्न कार्ये आहेत पण ती परस्परसंबंद्ध आहेत. त्यांची एकमेकांपासून आपण फारकत करू शकत नाही. मानव स्वतःच्या अनुभवांची, व्यवहारांची जाणीव असलेला असा प्राणी आहे. ह्या त्याच्या प्रकृतीचा होणारा बौद्धिक आविष्कार म्हणजे तत्त्वज्ञान. आपल्या अनुभवांची एका अत्यंत व्यापक चौकटीत बौद्धिक संगती लावण्याच्या आणि अशा चौकटीच्या संदर्भात स्वतःच्या जीवनाला वळण आणि दिशा देण्याच्या त्याच्या प्रेरणेतून तत्त्वज्ञान उदयाला येते आणि विकास पावते. जेव्हा एखादे विशिष्ट विज्ञान, मानवी व्यवहाराचे एखादे विशिष्ट क्षेत्र (उदा., गणित, भौतिकी, राजकारण, धर्म) स्वतःविषयी, स्वतःचे स्वरूप, उद्दिष्टे, रीत, ज्ञानाच्या व जीवनाच्या अन्य क्षेत्रांशी असलेले आपले संबंध ह्यांविषयी प्रश्न उपस्थित करते किंवा त्याच्या संबंधात असे प्रश्न उपस्थित केले जातात, तेव्हा त्या विषयाचे तत्त्वज्ञान निर्माण होते.

तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख कार्य म्हणजे विश्वाचे समग्र, साकल्याने प्रतीत होणारे स्वरूप काय आहे तसेच मानव हा काय आहे आणि मानवाचे विश्वातील स्थान कोणते हे निश्चित करणे आणि त्या आधारावर मानवाला योग्य असा जीवनमार्ग कोणता ह्याचा शोध घेणे. आज विश्वाच्या वेगवेगळ्या विभागांचा वा अंगांचा अभ्यास करणारी अनेक स्वतंत्र विज्ञाने आहेत. उदा., भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान इ. आणि त्यांनी विश्वाची सर्व अंगे वाटून घेतलेली आहेत. पण जगात भारत, ग्रीक, रोम. इ. प्राचीन संस्कृती प्रौढावस्थेत आल्या तेव्हा, म्हणजे विद्या किंवा ज्ञान हे स्वतंत्र मूल्य म्हणून आदरणीय झाले तेव्हा, मानवी ज्ञानाच्या सुरुवातीला अशी स्थिती नव्हती. तेव्हा विश्वाचा सबंध विस्तार माणसासमोर पसरलेला होता आणि ‘विश्वाचे एकंदर स्वरूप काय?’ अशा सामान्य स्वरूपाचा प्रश्नच जिज्ञासूंना विचारता येण्याजोगा होता. उदा.,  ‘हे विश्व कशाचे बनलेले आहे?’ हा प्रश्न ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी व भारतीयांनीही विचारला आणि त्याची वेगवेगळी उत्तरे दिली. उदा., ‘विश्व पाण्याचे बनलेले आहे’,  ‘परमाणूंचे बनलेले आहे’, ‘त्रिगुणात्मक आहे’. मानवी ज्ञानाचा विस्तार हळूहळू जसा वाढला, ज्ञान अधिकाधिक सूक्ष्म आणि विविध झाले तेव्हा विश्वाच्या वेगवेगळ्या विभागांचा, आपापल्या विषयाच्या स्वरूपाला अनुरूप अशा रीतींचा अवलंब करून अभ्यास करणारी स्वतंत्र, पृथक् विज्ञानेतत्त्वज्ञानापासून उदयाला आली. तत्त्वज्ञान सर्व विज्ञानांची जननी होय.


पण अजूनही ‘विश्वाचे समग्र स्वरूप काय आहे?’ हा तत्त्वज्ञानाने सुरुवातीला विचारलेला प्रश्न उरतोच आणि त्याचे उत्तर कोणत्याही विशिष्ट विज्ञानाला देता येत नाही. त्याचे उत्तर तत्त्वज्ञानाला द्यावे लागते किंवा हा प्रश्न विचारण्यात काही स्वारस्य आहे की नाही, ह्याचा विचार करावा लागतो. ह्या प्रश्नाचा एक अर्थ असा: ‘वेगवेगळी विज्ञाने वेगवेगळ्या वस्तुप्रकारांचा अभ्यास करतात, पण ह्यांतील मूलभूत वस्तुप्रकार कोणता?’ ह्याचे एक शक्य उत्तर असे, की जड किंवा भौतिक वस्तू हा वस्तूचा मूलभूत, स्वायत्त प्रकार आहे जीवन, चैतन्य किंवा मन म्हणजे स्वतंत्र स्वायत्त वस्तू नव्हेत, तर जड वस्तूंच्या ठिकाणी काही विशिष्ट परिस्थितीत आविर्भूत किंवा निष्पन्न होणारे धर्म आहेत. अस्तित्व हे केवळ जडस्वरूप आहे आणि सर्व वस्तुप्रकार हे जडवस्तूचे केवळ उपप्रकार आहेत. हे मत म्हणजे जडवाद. उलट चित्‌तत्त्व हेच मूलभूत, स्वतंत्र, स्वयंभू असे तत्त्व आहे किंवा जडवस्तू वा सजीव वस्तू ह्यांचे अस्तित्व दुय्यम असते, चित्‌तत्त्वावर अवलंबून असलेले असे असते. हे प्रकार म्हणजे चित्‌तत्त्वाचे आविष्कार आहेत. हे मत म्हणजे चिद्‌वाद. तिसरा पर्याय असा, की जडतत्त्व आणि चित्‌तत्त्व हे दोन भिन्न पण सारखेच, स्वतंत्र आणि स्वयंभू असे अस्तित्व प्रकार आहेत किंवा हे दोन्ही उपप्रकार असून मूलवस्तूचे आंतरिक स्वरूप ह्या दोहोंहून भिन्न असते व त्यापासून हे उपप्रकार निष्पन्न होतात. ह्या संदर्भात उपस्थित होणारा आणखी एक प्रश्न असा, की हे अस्तित्व म्हणजे एकाच तत्त्वाचा आविष्कार आहे, की अनेक भिन्न वस्तूंचा समुदाय आहे? [→ एकसत्तावाद].

‘विश्वाचे साकल्याने प्रतीत होणारे स्वरूप काय आहे ?’हा प्रश्न वेगळ्या अर्थाने विचारता येईल. विज्ञाने वेगवेगळ्या वस्तुप्रकारांचा अभ्यास करतात पण एका विशिष्ट प्रकारची वस्तू म्हणून नव्हे, तर केवळ वस्तू म्हणून वस्तूचे काही स्वरूप असते काय व असल्यास ते काय असते? म्हणजे सर्व वस्तूंच्या अंगी समान आणि आवश्यकतेने असलेले धर्म कोणते? उदा., कार्यकारणभाव हा असा धर्म असेल तसेच अस्तित्वात असलेली कोणतीही गोष्ट कोणते तरी गुण अंगी असलेले द्रव्य असते, हे तिचे अनिवार्य स्वरूप असेल. अशा सामान्य धर्मांनी निश्चित झालेले असे कोणत्याही वस्तूचे जे आवश्यक स्वरूप असते त्याचा शोध घेणे हे कोणत्याही विशिष्ट विज्ञानाचे कार्य असणार नाही ते तत्त्वाज्ञानाचे कार्य ठरेल. वस्तूच्या ह्या सामान्य स्वरूपाचे वेगवेगळ्या वस्तुप्रकारांच्या स्वरूपांशी जे संबंध असतात तेही निश्चित करावे लागतील. उदा., जडतत्त्व आणि चित्‌तत्त्व ह्यांचा परस्परांशी संबंध काय आहे? ह्याच प्रश्नाचे अधिक विशिष्ट स्वरूप असे : मानवी देह आणि मन ह्यांचा परस्परसंबंध काय आहे? विश्वाचे स्वरूप साकल्याने समजावून घेताना हे आणि इतर संबंद्ध प्रश्न उपस्थित होतात आणि त्यांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्या शाखेत होतो तिला सत्ताशास्त्र वा वस्तुमीमांसा म्हणतात.

‘विश्वाचे साकल्याने स्वरूप काय ?’हा प्रश्न आणखी एका भूमिकेतूनही विचारण्यात येतो. वेगवेगळी विज्ञाने विश्वाच्या ज्या विविध अंगांचा अभ्यास करतात त्यांच्या पलीकडे असणारे, त्यांच्याहून श्रेष्ठ असे एक अस्तित्व, सत्‌तत्त्व आहे आणि त्याचे स्वरूप समजावून घेणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, अशी ही भूमिका आहे. विज्ञाने निरीक्षण आणि अनुमान ह्यांच्या साहाय्याने आपापल्या विषयाचे ज्ञान प्राप्त करून घेतात. पण ह्या सत्‌तत्त्वाचे ज्ञान याहून वेगळ्या रीतीने, सत्‌तत्त्वाच्या एका गूढ अशा साक्षात अनुभवाने होते हा ह्या भूमिकेतील एक पर्याय आहे. [→ रहस्यवाद]. आता असा गूढ साक्षात अनुभव हा तत्त्वज्ञानाचा भाग होऊ शकत नाही. कारण तत्त्वज्ञान ही ज्ञानाची एक शाखा आहे आणि म्हणून तर्काच्या किंवा बुद्धीच्या निष्कर्षावर ज्यांना तपासून घेता येईल, युक्तिवादाने ज्यांना सिद्ध करता येईल, ज्यांचे खंडन करता येईल अशा मतांनाच तत्त्वज्ञानात स्थान असते गूढानुभवाचा आशय मात्र असा नसतो. पण गूढानुभवाचा तत्त्वज्ञानाशी दोन प्रकारे संबंध पोहोचू शकतो. गूढानुभवाचे प्रामाण्य जर स्वीकारले, तर त्याच्यातून सत्‌तत्त्वाचे जे स्वरूप प्रतीत होते त्याचा आणि आपल्या एऱ्हवीच्या अनुभवातून तर्काच्या साहाय्याने विश्वाचे जे ज्ञान आपल्याला प्राप्त होते त्याचा समन्वय साधणे, हे तत्त्वज्ञानाचे एक कार्य बनते आणि गूढानुभवाच्या आशयाचे प्रामाण्य जरी तर्काने सिद्ध करता येण्याजोगे नसले, तरी असा गूढानुभव असणे शक्य आहे व अंतिम सत्‌तत्त्वाचे ज्ञान गूढानुभवानेच होऊ शकते, हे युक्तिवादाने सिद्ध करण्याचा प्रयत्न तत्त्वज्ञानाला करता येतो. पण एऱ्हवीच्या अनुभवापलीकडील एका गूढ, साक्षात अनुभवाद्वारा अंतिम अस्तित्वाचे ज्ञान होते हे दाखवून द्यायचे, तर आपल्याला एऱ्हवीच्या अनुभवाने, प्रत्यक्ष अनुभव इ. प्रमाणांनी, विश्वाचे जे ज्ञान होते व वेगवेगळ्या विज्ञानांत ज्याचा आपण विस्तार करतो आणि ज्याला सुसंघटित स्वरूप देतो ते ज्ञान अप्रमाण आहे, हे युक्तिवादाने दाखवून द्यावे लागेल. ह्या म्हणण्याची दुसरी बाजू ही की आपल्या एऱ्हवीच्या अनुभवात, विज्ञानात ज्या विषयांचे आपल्याला ज्ञान होते ते विषय, विश्वाची ती अंगे संपूर्णपणे परमार्थाने सत् नसतात, ती आभासात्मक असतात, अंशतः सत् असतात, मायारूप असतात व हे दाखवून द्यायची एक रीत म्हणजे आपला एऱ्हवीचा अनुभव आणि विज्ञान ह्यांच्या विषयांसबंधी विधाने करताना ज्या मूलभूत संकल्पना आपण वापरतो–उदा., द्रव्य, गुण, कार्यकारणभाव, अवकाश, काल इ.–त्या कल्पनाच तार्किक दृष्ट्या सदोष आहेत, आत्मविसंगत आहेत हे दाखवून देणे. आपल्या एऱ्हवीच्या अनुभवाचे वर्णन करताना आणि वैज्ञानिक सिद्धांत मांडताना ज्या मूलभूत संकल्पनांचा आश्रय घ्यावा लागतो त्याच जर आत्मविसंगत असतील, तर ते सारे ज्ञान अप्रमाण, असत्य असणार हे उघड आहे आणि ह्याचाच अर्थ असा, की ह्या संकल्पनांचे विषय असलेल्या द्रव्य, गुण, कार्यकारणभाव, अवकाश, काल इ. धर्मांनी ज्यांचे स्वरूप बनलेले असते अशा वस्तूही आत्मविसंगत स्वरूपाच्या असल्यामुळे असत् आहेत. कारण जे आत्मविसंगत आहे त्याला अस्तित्व असू शकत नाही. आपला नेहमीचा अनुभव व्यक्त करण्यासाठी ज्या मूलभूत संकल्पना आपण वापरतो त्यांना अर्थविधा किंवा पदार्थप्रकार म्हणू. अर्थविधांतील विसंगती दाखवून त्यांचे खंडन करण्यासाठी केलेल्या तार्किक चिकित्सेला द्वंद्वीय म्हणतात [→ द्वंद्ववाद]. आपल्या एऱ्हवीच्या अनुभवाचा विषय असलेले दृश्य विश्व असत् आहे हे दाखवून देण्यासाठी द्वंद्वीयाचा उपयोग पाश्चिमात्य तत्त्वज्ञानात झीनो, प्लेटो, कांट, हेगेल इ. तत्त्ववेत्त्यांनी केला आहे. आपल्याकडे माध्यमिक व अद्वैत वेदान्त्यांनी केला आहे. अनुभव आणि तर्क ह्यांना प्रतीत होणारे दृश्य विश्व जर असत् असेल, तर त्याच्यापलीकडे असणाऱ्या सत्‌तत्त्वाचे ज्ञान आपल्याला कसे होते, हा प्रश्न उरतो. ह्याचे एक उत्तर असे, की अंतीद्रिय साक्षात अनुभवाच्या स्वरूपाचे हे ज्ञान असते. पण दुसरे असे एक उत्तर शक्य आहे. अप्रमाण अर्थविधांतील विसंगती दाखवून त्यांचे खंडन करणे हे जसे द्वंद्वीयाचे विधायक कार्य आहे, त्याप्रमाणे प्रमाण, सुसंगत अर्थविधांची स्थापना करून त्यांच्या द्वारे अंतिम सत्‌तत्त्वाचे स्वरूप निश्चित करणे हेही द्वंद्वीयाचे विधायक कार्य आहे, असे अनेक तत्त्ववेत्ते मानतात. उदा.,हेगेलचे द्वंद्वीय असे दुहेरी स्वरूपाचे आहे. प्रमाण, सुसंगत अर्थविधांच्या साहाय्याने म्हणजे बुद्धीच्या साहाय्याने अंतिम सत्‌तत्त्वाच्या स्वरूपाचे ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकते, ही भूमिका अनेक तत्त्ववेत्त्यांनी स्वीकारली आहे. आणखीही एक पर्याय शक्य आहे. तो हा की आपल्या एऱ्हवीच्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तू आभासात्मक असतात, त्यांच्या पलीकडचे असे सत्‌तत्त्व असते पण मानवी अनुभवाला आणि ज्ञानशक्तींना ते अगम्य असते. ते असते एवढे ज्ञान आपल्याला होते, पण ते काय आहे ह्याचे ज्ञान होऊ शकत नाही. 


तेव्हा विश्वाच्या वेगवेगळ्या अंगांचा किंवा विभागांचा अभ्यास करणारी विशिष्ट विज्ञाने उदयाला येऊन स्थिर झाल्यानंतरही विश्वाचे समग्र किंवा साकल्याने प्रतीत होणारे स्वरूप काय आहे, हा प्रश्न कोणत्या वेगवेगळ्या अर्थांनी विचारता येतो किंवा विचारण्यात आला आहे हे आपण पाहिले. ह्या प्रश्नाचे आणखीही एका दिशेने उत्तर शोधण्यात येते. भौतिकी, रसायनशास्त्र, जीवविज्ञान इ. नैसर्गिक विज्ञाने तसेच मानसशास्त्र, समाजशास्त्र इ. मानवी विज्ञाने ह्यांच्यापासून जे विश्वसनीय ज्ञान लाभते त्याचा समन्वय साधून, त्याची संगती लावून विश्वाच्या घडणीचे, विश्वव्यापाराचे नियमन करणारे काही व्यापक नियम निष्पन्न करून घेण्यात येतात. मानव हाही विश्वाचा एक भाग असल्यामुळे मानवी प्रकृतीची घडण आणि मानवी व्यवहार ह्यांचे नियमनही ह्याच व्यापक नियमांकडून होते आणि ह्या ज्ञानाच्या अधिष्ठानावर मानवाला योग्य असा, म्हणजे कल्याणप्रद असा जीवनमार्ग आधारण्यात येतो. ह्या स्वरूपाचा एक उल्लेखनीय प्रयत्न हर्बर्ट स्पेन्सर ह्याच्या तत्त्वज्ञानात आढळतो. अलीकडील तत्त्ववेत्त्यांत बर्ट्रंड रसेलने अशीच सर्व विज्ञानांकडून लाभणाऱ्या ज्ञानाची संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे.

ह्या संदर्भात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. विश्वाच्या मूल किंवा अंतिम स्वरूपाविषयीची एखादी उपपत्ती आपण स्वीकारली, की तिला अनुरूप अशी मानवी जीवनाची एक सरणी, मानवी कल्याणाविषयीची एक संकल्पना तिच्यात अभिप्रेत असते. उदा., आपण जडवाद स्वीकारला, तर ह्या दृश्य विश्वाच्या संदर्भात ज्या मानवी प्रेरणांना व शक्तींना स्थान असू शकते अशाच केवळ प्रेरणांच्या व शक्तींच्यामध्ये मानवी कल्याण सामावलेले असते, हे मतही आपल्याला ओघाने स्वीकारावे लागते. उलट चिद्वादामध्ये ह्या दृश्य विश्वापलीकडे असलेल्या पण त्यांच्यात अंशतः तरी व्यक्त झालेल्या चैतन्यतत्त्वाशी माणसाचा संबंध जोडणाऱ्या शक्ती व प्रेरणा असतात आणि त्यांचे साफल्य हा मानवी कल्याणाचा सर्वोच्च भाग असतो असे अभिप्रेत असते. प्लेटो, शंकराचार्च, स्पिनोझा, कांट, हेगेल इ. श्रेष्ठ तत्त्ववेत्ते घेतले, तर त्यांच्या तात्त्विक दर्शनांत विश्वाचे स्वरूप, मानवाचे विश्वातील स्थान आणि मानवाला अनुरूप अशी जीवनपद्धती ह्यांचे स्पष्टपणे आणि सुसंगतपणे दिग्दर्शन केलेले आढळते. पण असे दिग्दर्शन केलेले असो वा नसो, समग्र विश्वाविषयीच्या उपपत्तीमध्ये मानवाला योग्य अशा जीवनमार्गाविषयीची एक संकल्पना अध्याहृत असते. उलट मानवाला अनुरूप अशा जीवनपद्धतीविषयीची कोणतीही उपपत्ती घेतली, तर तिच्यात मानवी प्रकृतीविषयीची, माणसाच्या विश्वातील स्थानाविषयीची आणि म्हणून विश्वाच्या एकंदर स्वरूपाविषयीची एक उपपत्ती अध्याहृत असते.

विश्वाचे साकल्याने स्वरूप काय आहे, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधताना मानवी ज्ञानाच्या प्रामाण्याचा प्रश्न उपस्थित होतो हे आपण पाहिले. मानवी ज्ञानाचे स्वरूप काय आहे, त्याची व्याप्ती किती, त्याला मर्यादा असली तर ती कुठे असते, त्याच्या प्रामाण्याचे निकष कोणते [→ प्रमाणमीमांसा], ज्ञानाचा आणि अस्तित्वाचा संबंध काय आहे ह्या प्रश्नांचा विचार तत्त्वज्ञानाच्या ज्या शाखेत होतो त्याला ज्ञानमीमांसा म्हणतात. ज्ञानमीमांसेच्या स्वरूपाचे थोडक्यात दिग्दर्शन असे करता येईल : मानवी ज्ञानाचे वर्णन आणि मूल्यमापन करताना आपण अनेक मूलभूत संकल्पना, अर्थविधा वापरतो. उदा., ‘ज्ञान’, ‘भ्रम’, ‘प्रत्यक्षज्ञान’, ‘प्रतीती’, ‘विधान’, ‘सत्य’ इत्यादी. ह्या संकल्पनांचे विश्लेषण करून त्यांचे आशय स्पष्ट करणे, त्यांचा परस्परसंबंध निश्चित करणे हे ज्ञानमीमांसेचे एक प्रमुख कार्य आहे. विज्ञान म्हणजे सुव्यवस्थित ज्ञान. तेव्हा विज्ञानाचे किंवा विज्ञानांचे स्वरूप काय, वेगवेगळ्या विज्ञानांची ज्ञानविषयक उद्दिष्टे कोणती, आपापले उद्दिष्ट आणि विषय ह्यांना अनुसरून त्या त्या विज्ञानाची रीत कशी निश्चित होते, विज्ञानाची सामान्य रीत कोणती, तिचे प्रामाण्य कशावर आधारलेले आहे हे प्रश्नही ज्ञानमीमांसेत मोडतात. पण केवळ प्रस्थापित विज्ञानांनी स्वीकारलेल्या रीतीचे स्वरूप स्पष्ट करणे एवढेच ज्ञानमीमांसेचे कार्य नसते. अनेकदा एखाद्या प्रस्थापित विज्ञानाच्या रीतीवर, त्याच्या तात्त्विक उद्दिष्टावर टीकाही करण्यात येत असल्याचे आपल्याला आढळून येते. त्या विज्ञानाला एका वेगळ्या तात्त्विक उद्दिष्टाची, विषयाकडे पाहण्याच्या एका वेगळ्या तात्त्विक दृष्टिकोनाची, एका निराळ्या रीतीची जोड देऊन त्याचे स्वरूप आमूलाग्र पालटून टाकण्याचा प्रयत्न होतो. उदा., भौतिकीच्या उद्दिष्टाविषयी, रीतीविषयी अशा प्रकारचे वादविवाद पंधराव्या आणि सोळाच्या शतकांत यूरोपमध्ये होऊन ॲरिस्टॉटलप्रणीत भौतिकीऐवजी एका वेगळ्याच धाटणीच्या भौतिकीची स्थापना गॅलिलीओ, केप्लर, देकार्त, न्यूटन ह्यांनी केली. आणखी एक कार्य ज्ञानमीमांसेला करावे लागते. वेगवेगळ्या विज्ञानांची गृहीतकृत्ये, त्यांच्या रीती ज्यांच्यावर आधारलेल्या असतात त्या मूलभूत संकल्पना ह्यांचा परस्परसंबंध त्याला स्पष्ट करावा लागतो तसेच त्याचा समन्वय साधण्याचा प्रयत्नही करावा लागतो. म्हणजे विज्ञानांची एक सुसंगत व्यवस्था लावून द्यावी लागते. ज्ञानाचे एक प्रमुख साधन म्हणजे अनुमान. अनुमानाचे स्वरूप आणि प्रकार निश्चित करणे, विविध प्रकारच्या अनुमानांचे प्रामाण्य ज्या तत्त्वांवर आधारलेले असते ती स्पष्ट करणे, त्यांची व्यवस्था लावणे, हे कार्य करणारी ज्ञानशाखा म्हणजे तर्कशास्त्र. तर्कशास्त्र हे ज्ञानमीमांसेचा एक भाग मानता येईल किंवा ज्ञानमीमांसेला जवळचे असलेले ते संबंधित शास्त्र आहे असे मानता येईल. ज्ञानमीमांसेत उपस्थित होणाऱ्या ह्या विविध प्रश्नांचा विचार भिन्न दृष्टिकोनांतून करण्यात येतो. उदा., मानवी ज्ञान हे मुख्यतः इंद्रियानुभवावर आधारलेले आहे, ह्या अनुभववादी [→ अनुभववाद] दृष्टिकोनातून ह्या प्रश्नांचा विचार करता येईल किंवा मानवी ज्ञानाची उभारणी अनुभवावर झालेली नसून विवेकावर किंवा बुद्धीवर झाली आहे. ह्या विरोधी दृष्टिकोनातून [→ विवेकवाद] किंवा अन्य दृष्टिकोनांतून त्यांचा विचार करता येईल.


मूल वस्तूंचा किंवा अंतिम सत्‌तत्वाचा शोध घेऊन त्याच्या आधाराने सबंध अस्तित्वाचे स्वरूप निश्चित करू पाहणारी वस्तुमीमांसा आणि मानवी ज्ञानाचे स्वरूप, त्यांचा अस्तित्वाशी असलेला संबंध ह्यांविषयी सुव्यवस्थित विचार करणारी ज्ञानमीमांसा मिळून तत्त्वमीमांसा बनते.

‘विश्वाचे आणि मानवी ज्ञानाचे स्वरूप काय ?’हा जसा तत्त्वज्ञानातील एक मूलभूत प्रश्न आहे त्याप्रमाणे ‘माणसाने जगावे कसे?’ हाही एक मूलभूत प्रश्न आहे. ‘चांगल्या जीवनाचा आशय व आकार काय असतो ?’ किंवा ‘माणसाने साध्य करून घेण्यासारख्या गोष्टी कोणत्या आहेत?’ अशा स्वरूपातही हा प्रश्न विचारता येईल. माणसाने साध्य करून घेण्यासारख्या गोष्टी म्हणजे मूल्ये. मूल्यांचे स्वरूप, त्यांचे प्रकार, त्यांचे परस्परसंबंध, त्यांच्या प्रामाण्याचा आधार ह्यांचा विचार करणारे मूल्यशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक महत्त्वाची शाखा होय. काही मूल्ये नैतिक असतात. नीतिशास्त्रात नैतिक मूल्यांचा विचार होतो. माणसाच्या नैतिक वागणुकीचे वर्णन आणि मूल्यमापन करताना आपण ज्या संकल्पना वापरतो उदा., ‘कर्तव्ये’, ‘नीतिनियम’, ‘योग्य’, ‘सद्‌गुण’ इ. त्यांचे विश्लेषण व स्पष्टीकरण करणे, वेगवेगळ्या नैतिक आदर्शांचे वर्णन करणे, त्यांचे प्रामाण्य तपासणे, त्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणे ही कामे नीतिशास्त्राची होत. कलात्मक अनुभवात मूर्त होणाऱ्या सौंदर्य ह्या मूल्याच्या स्वरूपाचा शोध घेणे आणि त्याच्या आधारावर कलाकृतींच्या श्रेष्ठतेचे निकष निश्चित करणे हे काम सौंदर्यशास्त्र करते.

नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र ही शास्त्रे आहेत पण विज्ञाने आणि ही मूल्यशास्त्रे ह्यांच्यात भेद केला पाहिजे. आपापल्या विषयांचा पद्धतशीरपणे अभ्यास ती करतात म्हणून ती शास्त्रे आहेत. पण विज्ञानासारखे ‘काय आहे?’ हे समजून घेणे हे त्यांचे उद्दिष्ट नसते, तर मानवी व्यवहाराचे नियमन करणे, मार्गदर्शन करणे हे त्यांचे उद्दिष्ट असते. माणसे कशी वागतात ह्याचे स्पष्टीकरण ती करीत नाहीत, तर माणसाने काय साधावे, काय साधले असता ह्या व्यवहारांची सार्थकता होते हे ती निश्चित करतात. त्यांचा प्रश्न थोडक्यात असा मांडता येईल : ‘माणसाची समग्र परिस्थिती ध्यानात घेतली, तर आपल्या प्रकृतीचे परिपूर्ण साफल्य साधण्यासाठी माणसाने कसे वागले पाहिजे?’ पण ह्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे, तर माणसाची समग्र परिस्थिती काय आहे आणि मानवी प्रकृतीचे स्वरूप काय आहे, हे ठरविले पाहिजे म्हणजे विश्वाचे स्वरूप काय आहे आणि मानवी प्रकृतीचा विश्वाशी संबंध काय आहे हे निश्चित केले पाहिजे. म्हणजे मूल्यशास्त्रात विचार करताना एक तात्त्विक उपपत्ती स्पष्टपणे किंवा अंधुकपणे गृहीत धरलेली असते. म्हणून मूल्यशास्त्रे विज्ञानांहून वेगळी ठरतात व तत्त्वज्ञानाच्या व्यापक कुटुंबाचे घटक म्हणून मानली जातात.

माणसाची स्वतःची जाणीव आणि चिंतनशीलता ह्यांच्यातून म्हणजे स्वतःचे अनुभव आणि व्यवहार ह्यांची चिकित्सा करण्याची त्याची प्रवृत्ती व कुवत ह्यांच्यातून तत्त्वज्ञानाचा उदय होतो हे आपण पाहिले. ह्यामुळे सुसंघटित व्यवहाराच्या प्रत्येक क्षेत्राचे तसेच प्रत्येक सुसंघटित ज्ञानशाखेचे तत्त्वज्ञान निर्माण झालेले आढळते. ज्ञानाच्या व संस्कृतीच्या विकासाबरोबर गणिताचे तत्त्वज्ञान, विज्ञानाचे तत्त्वज्ञान, धर्माचे तत्त्वज्ञान, राजकीय तत्त्वज्ञान, कायद्याचे तत्त्वज्ञान, शिक्षणाचे तत्त्वज्ञान, इतिहासाचे तत्त्वज्ञान अशा तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखा विकसित होतात. असे जे ज्ञानाच्या किंवा मानवी व्यवहाराच्या एका विशिष्ट विभागाचे तत्त्वज्ञान असते त्याची भूमिका चिकित्सक व निर्मितिशील अशी दुहेरी असते. एकतर त्या विशिष्ट प्रकारच्या व्यवहाराची गृहीतकृत्ये स्पष्ट करणे, त्याच्यात अनुस्यूत असलेल्या आणि त्याचे नियमन करणाऱ्या संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचे परस्परसंबंध उलगडून दाखविणे ह्या स्वरूपाचे कार्य ते करते. म्हणजे त्या प्रकारच्या व्यवहाराची आंतरिक घडण, त्याचे इतर प्रकारच्या व्यवहारांशी असलेले संबंध आणि एकंदर मानवी जीवनातील त्याचे स्थान ह्या गृहीतकृत्यांचे व संकल्पनांचे प्रामाण्य तपासून पाहणे, त्यांना मुरड घालणे, त्यांचा अव्हेर करून त्यांच्या जागी दुसऱ्या संकल्पनांची स्थापना करणे, ही कार्येही हे तत्त्वज्ञान करते. पण व्यवहाराचे असे परीक्षण करताना तत्त्ववेत्त्याने स्वतःचा एक तात्त्विक दृष्टिकोन स्वीकारलेला असतो. उदा., शिक्षणाचा व्यवहार, जीवनाची उद्दिष्टे, व्यक्तीचे समाजात इतर व्यक्तींशी असलेले संबंध, व्यक्तीची सामाजिक जबाबदारी, सामाजिक जीवनाची उद्दिष्टे, मानवी ज्ञानाचे स्वरूप, मानवी प्रकृती ह्यांच्याविषयीच्या काही संकल्पनांवर व समजुतीवर हा दृष्टिकोन आधारलेला असतो. ह्या संकल्पना आणि समजुती बदलल्या म्हणजे शिक्षणाचे तत्त्वज्ञान बदलले तर शिक्षणाच्या व्यवहाराची उद्दिष्ट्ये, त्यांचा अंगीकार करण्यात येणारी रीत ह्या गोष्टीही बदलतील. तसेच गणितात सर्व गोष्टी सिद्ध करण्यात येतात असे अनेकदा म्हटले जाते पण ‘सिद्ध करणे म्हणजे काय?’ ‘विधान सिद्ध कधी होते?’ हे प्रश्न आपण उपस्थित केले व त्यांची उत्तरे शोधू लागलो, की सिद्धीचे स्वरूप, विधाने सिद्ध करण्याची रीत ह्यांविषयीच्या आपल्या कल्पना बदलू शकतील आणि त्यामुळे गणिताचे स्वरूप बदलेल. गणिताच्या इतिहासात असे वारंवार घडले आहे.


सारांश, तत्त्वज्ञान हा माणसाची चिकित्सक वृत्ती व निर्मितिशीलता ह्यांचा आविष्कार होय. ह्याबरोबरच मानवी जीवनाच्या अंतिम चौकटीशी सतत भिडत राहण्याचा प्रयत्न करणे हे तत्त्वज्ञानाचे वैशिष्ट्य असते. विश्वाचे एकंदर स्वरूप काय आहे, माणसाचे विश्वात स्थान काय आहे, कोणत्या मूलभूत प्रेरणा आणि शक्ती ह्यांच्या संयोगाने मानवी प्रकृती सिद्ध झाली आहे, व्यक्तीचे समाजाशी नाते काय असते, मानवी जीवनाचे साफल्य कशात असते, मानवी ज्ञान व ज्ञेयवस्तू ह्यांचा संबंध काय असतो, ह्या प्रश्नांची उत्तरे शोधीत राहणे व सापडलेल्या उत्तरांच्या संदर्भात मानवी व्यवहाराचे परीक्षण करणे, त्याच्या उन्नयनाच्या व विकासाच्या दिशा दाखवणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे.

रेगे, मे. पुं.

तत्त्वज्ञानाची भारतीय व्याख्या : न्यायदर्शनाच्या वात्स्यायनप्रणीत भाष्यात (१.१.१) तत्त्वज्ञान पदाची व्याख्या केली आहे : ‘तत्’ म्हणजे ‘सत्’ व ‘असत्’ होय. तत्त्व हे भाववाचक नाम आहे. ‘तत्’पदापुढे भाव प्रत्यय लागला आहे. ‘सत्’ चे यथाभूत व अविपरीत स्वरूपातील ज्ञान होते, तेव्हा त्यास ‘तत्त्व’ म्हणतात आणि तसेच असताचे यथाभूत व अविपरीत अशा स्वरूपातील ज्ञान होते, तेव्हा त्यास तत्त्व म्हणतात. असे ज्ञान प्रमाणाने होते. प्रमाणाने होणारा सत् किंवा असत् याबद्दलचा निर्णय, म्हणजे निश्चयात्मक ज्ञान तत्त्वज्ञान होय. कोणत्याही वस्तुस्थितीचे अथवा पदार्थाचे यथार्थ ज्ञान म्हणजे तत्त्वज्ञान होय. वस्तुस्थिती म्हणजे असणे वा नसणे.

तत्त्वज्ञानाने निःश्रेयसाची प्राप्ती होते, असे गौतमप्रणीत न्यायसूत्रातील पहिल्या सूत्रात म्हटले आहे. या सूत्राच्या संदर्भातच वात्स्यायनाच्या न्यायभाष्यात वरील विवेचन आले आहे. येथे निःश्रेयस शब्दाच्या अर्थात मोक्ष हा जसा अर्थ येतो, त्याचप्रमाणे निरनिराळ्या विद्यांची म्हणजे ज्ञानशाखांची प्रयोजनेही निःश्रेयस शब्दाच्या अर्थात येतात. न्यायभाष्यावरील न्यायवार्तिक या टीकेत यासंबंधी असे विवरण केले आहे : प्रत्येक विद्येत तत्त्वज्ञान असते आणि त्याचे प्रयोजन अथवा निःश्रेयसही असते. ही गोष्ट सर्व विद्यांना लागू आहे. उदा., त्रयी, वार्ता, दंडनीती व आन्वीक्षिकी या चार विद्या. ‘त्रयी’ म्हणजे तीन वेद होत. त्यांत अग्निहोत्रादी यज्ञ आणि त्यांची साधने सांगितली आहेत. ही यज्ञविद्या म्हणजे तत्त्वज्ञान होय. या तत्त्वज्ञानाचे स्वर्गप्राप्ती हे फल होय आणि तेच निःश्रेयस होय. ‘वार्ता’ ही अर्थोत्पादक साधनांची विद्या होय कृषिविद्या ही अर्थोत्पादक विद्या असून तिलाही तत्त्वज्ञान म्हणता येते. धान्यफलादिक संपत्ती हे त्यातील निःश्रेयस होय. ‘दंडनीती’ म्हणजे राजनीती.’ह्यातसुद्धा तत्त्वज्ञान आहे. देश, काल, शक्तींचा योग्य विचार करून साम, दान, दंड, भेद यांचा उपयोग करण्याची ही विद्या आहे. पृथ्वीवर विजय हे दंडनीतीचे निःश्रेयस होय. ‘आन्वीक्षिकी’ त म्हणजे अध्यात्मविद्येमध्ये आत्मज्ञान हे तत्त्वज्ञान होय आणि मोक्ष हे निःश्रेयस होय.

मोक्ष हे अध्यात्मविद्येचे फल सांगितले आहे. सर्व भारतीय दर्शने म्हणजे भारतीय तत्त्वज्ञाने अध्यात्मविद्याच होय. सर्व विश्वाच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान ती सांगतात हे जरी खरे असले, तरी त्यांची मुख्य प्रमेये म्हणजे विषय कोणते, याचे स्पष्टीकरण न्यायदर्शनात केले आहे. आत्मा, शरीरी, इंद्रिये, इंद्रियांचे विषय, बुद्धी, मन, प्रवृत्ती, दोष, पुनर्जन्म, फल, दुःख आणि मोक्ष अशी ती बारा प्रमेये होत. ⇨ लोकायतदर्शन ही देहाहून भिन्न आत्मा मानत नसले, तरी तसा भिन्न आत्मा आहे की नाही, याचे चिंतन करतेच. बौद्ध दर्शन शाश्वत किंवा नित्य आत्मतत्त्व मानीत नाही परंतु माध्यमिक शून्यवाद सोडल्यास इतर बौद्ध दर्शनातील तीन वादांमध्ये आत्मा म्हणजे विज्ञानप्रवाह अथवा चैतन्याचा प्रवाह अनाद्यनंत मानला आहे आणि याच विज्ञानप्रवाहाला अर्थात आत्म्याला संसार म्हणजे जन्मपरंपरा प्राप्त होते आणि तत्त्वज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो, असे मानतात. इतर सर्व आत्मवादी व ईश्वरवादी दर्शने दृश्य विश्व सत्य की असत्य, असा विचार आत्मज्ञानाचे अंग म्हणून करतात. ⇨  सांख्य दर्शन दृश्य विश्व व व्यक्त विश्व अव्यक्त जड प्रकृतीची विकृती मानते परंतु आत्मतत्त्वाच्या विचाराला जड त्रिगुणात्मक प्रकृतीचा विचार हा आवश्यक आहे, म्हणून करते. द्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत व शुद्धाद्वैत ही तत्त्वज्ञाने व्यक्त विश्वाचे सत्यत्व मानतात मग ती शैव असोत अथवा वैष्णव असोत [→ द्वैतवाद द्वैताद्वैतवाद विशिष्टाद्वैतवाद शुद्धाद्वैतवाद]. शांकर अद्वैतामध्ये विश्व मिथ्या व आत्माच सत्य, असा सिद्धांत प्रतिपादिला आहे [→ केवलाद्वैतवाद]. तात्पर्य, आत्म्याचा विश्वाशी संबंध काय व कसा आहे, यासंबंधी केलेला निर्णय आत्मज्ञानाचे अंग आहे म्हणून विश्वाचा विचार केलेला असतो. म्हणून सर्व भारतीय दर्शने अध्यात्मदर्शनेच होत, असे म्हणता येते. न्यायदर्शनानुसार अध्यात्मदर्शने ही तत्त्वज्ञानाचेच प्रकार होत परंतु ‘तत्त्वज्ञान’ या पदाने अध्यात्मविद्यांच्या शिवाय बाकीच्या विद्यांचाही निर्देश होतो. कोणतीही विद्या हे तत्त्वज्ञानच होय.

पहा : काश्मीर शैव संप्रदाय जैन दर्शन पूर्वमीमांसा योग दर्शन वैशेषिक दर्शन वैष्णव संप्रदाय शैव संप्रदाय.

जोशी, लक्ष्मणशास्त्री