क्वाइन, विलर्ड व्हॅन ओर्‌मन : (१९०८– ). प्रसिद्ध अमेरिकन तर्कशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ. अमेरिकेच्या ओहायओ संस्थानात ॲक्रन येथे जन्म. गणित हा प्रमुख विषय घेऊन ओबरलीन महाविद्यालयातून पदवी संपादली. हार्व्हर्ड येथे ए. एन्. व्हाइटहेड यांच्या मार्गदर्शनाखाली तर्कशास्त्रावर प्रबंध लिहिला. नंतर व्हिएन्ना, प्राग व वॉर्सा येथे अध्ययन. तर्कशास्त्राच्या प्रांतात त्यांनी संशोधनात्मक असे विपुल लेखन केले आहे. अ  सिस्टिम ऑफ लॉजिस्टिक  (१९३४), मॅथेमॅटिकल लॉजिक (१९४०), एलिमेंटरी लॉजिक  (१९४१), O  Sentido da Nova Logica (१९४४), मेथड्स ऑफ लॉजिक  (१९५०) आणि सेट थिअरी अँड इट्स लॉजिक  (१९६३) ही त्यांची तर्कशास्त्रावरील पुस्तके व नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले संशोधनात्मक लेख त्यांच्या या क्षेत्रातील सव्यसाचित्वाची साक्ष देतात. हार्व्हर्ड विद्यापीठात ते गेली पस्तीस वर्षे अध्यापन करीत आहेत.

तर्कशास्त्र व गणित या प्रांतांत त्यांनी रसेल-व्हाइटहेड यांचा तर्कशास्त्रीय सिद्धांत (लॉजिस्टिक थेसिस) मान्य करून गणिती तर्कशास्त्रात अनेक नवीन तंत्रांची भर घातली आहे. पण त्याबरोबरच त्यांनी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातही भरीव अशी कामगिरी केलेली आहे. ज्या काही विशिष्ट तात्त्विक समस्यांवर क्वाइन ह्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे, त्या समस्या त्यांच्या तर्कशास्त्रीय अध्ययनाशी निगडित अशाच आहेत. त्यांचे बरेचसे तात्त्विक चिंतन फ्रॉम अ लॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू (१९५२) आणि वर्ड अँड ऑब्जेक्ट (१९६०) या त्यांच्या दोन पुस्तकांतून व्यक्त झाले आहे. आपल्या ‘टू डॉग्माज ऑफ इंपिरिसिझम’ (१९५१) या लेखात तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या ‘विश्लेषक- संश्लेषक’ या काटेकोर विधानविभागणीवर त्यांनी टीका केली व ह्या भेदाचे स्वरूप स्पष्ट करण्यात कोणालाच यश आलेले नाही, असे मत मांडले. प्रत्यक्षार्थवाद्यांनी विधानांची विश्लेषक- संश्लेषक व्यवस्था लावण्यासाठी वापरलेले निकष केवळ असमाधानकारक आहेत एवढेच नव्हे, तर अशी व्यवस्था मुळातच अशक्य आहे, असा त्यांचा दावा आहे. त्याचप्रमाणे एक एक विधान वस्तुस्थितीशी ताडून ते सत्य आहे की असत्य आहे हे ठरविता येत नाही तर सर्व विधानांची व्यवस्था आपल्या एकंदर अनुभवाशी अनुरूप असल्यामुळे आपण ती स्वीकारतो. अनुभवात आणि विधानांच्या ह्या व्यवस्थेत विरोध आला, तर कोणत्या तरी विधानांना मुरड घालावी लागते किंवा त्यांचा त्याग करावा लागतो व काही विधानांना अशी मुरड घातली तर विधानांच्या व्यवस्थेची अंतर्गत सुसंगती राखण्यासाठी इतर काही विधानांना योग्य ती मुरड घालावी लागते. अशा फेरबदलांपासून कोणतेच विधान सुरक्षित नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.

तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे दुसरे प्रमेय असे आहे, की कोणत्या वस्तु अस्तित्वात आहेत, हे आपण जगाविषयी बोलताना वापरत असलेल्या भाषेवर अवलंबून असते. आपल्या भाषेत जर अशी काही विधाने असतील, की ज्यांचा तार्किक आकार अस्तित्वाची परिगणक (क्वांटिफायर) वापरूनच व्यक्त करावा लागतो, तर अशा विधानांत निर्देश केलेल्या वस्तूंचे अस्तित्व मान्य करणे भागच आहे. उदा., ज्या कोणास आपल्या भाषेत ‘काही कुत्रे प्रामाणिक आहेत’ असे म्हणावयाचे असेल, त्याने निदान एका कुत्र्याचे तरी अस्तित्व मान्य केलेच पाहिजे. कारण या विधानाचा तार्किक आकार ‘निदान असा एक तरी क्ष अस्तित्वात आहे, की तो क्ष कुत्रा आहे. आणि तो प्रामाणिक आहे’ — [(∃क्ष) म्हणजे (क्ष कुत्रा आहे आणि क्ष प्रामाणिक आहे)] – असा आहे. हे प्रमेय मांडून क्वाइन ह्यांनी सत्ताशास्त्रात उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांना नेमकेपणा दिला.

क्वाइन ह्यांची ही प्रमेये सर्वमान्य झाली आहेत असे नाही पण त्यांच्या या प्रमेयांची खूपच चर्चा झालेली आहे व त्यांनी ह्या प्रश्नांच्या केलेल्या ऊहापोहाचा खोल प्रभाव आजच्या तत्त्वज्ञानावर पडला आहे.

बोकील, श्री. व्यं.