वलीउल्ला, शाह : (१७०३-६३). इस्लामी धर्मशास्त्रवेत्ता. संपूर्ण नाव शाह वलीउल्ला, कुत्‌बुद्दीन अहमद बिन् अब्द अल् रहीम देहलवी. तो दिल्ली येथे जन्मला. इस्लामचा दुसरा खलिफा ⇨उमर ह्याचा वलीउल्ला शाह हा वंशज होय. त्याचे वडील अब्दुर रहीम हे सूफी असून धर्मशास्त्रवेत्ते होते. तसेच फतावा आलमगिरी ह्या ग्रंथाचे ते एक संकलकही होते. त्यांनी ‘मद्रसा-ए-रहिमिया’ (‘रहिमिया मद्रसा’ ह्या नावानेही प्रसिद्ध) या संस्थेची  दिल्ली येथे स्थापना केली. उत्तर भारतातील धर्मशास्त्रशिक्षणाची ही एक प्रसिद्ध पाठशाळा होती. शाहने वयाच्या सातव्या वर्षी कुराण मुखोद्‍गत केले. वयाच्या पंधराव्या वर्षीच आपले शिक्षण पूर्ण करून सतराव्या वर्षी त्याने मद्रसाचे काम हाती घेतले. १७३०-३२ मध्ये त्याने मक्केची यात्रा केली. या काळात त्याने अनेक देशांतील मुस्लिम विद्वानांबरोबर धर्मशास्त्राचा सखोल अभ्यास केला.

शाहने शंभरांहून अधिक पुस्तिका, व्याप्तिलेख व ग्रंथ लिहिले. अरबी आणि फार्सीमधून तो सारख्याच सहजतेने लिखाण करीत असे. हुज्जत अल्लाह अल्-बालिघा हा त्याचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ. तो एक अभिजात ग्रंथ म्हणून मान्यता पावला असून कैरो येथील अल्-बझार (मशीद व विद्यापीठ) येथे अजूनही त्याचे वाचन-पठण होत असते. १९३२ मध्ये कैरो येथील मुनिरिया मुद्रणालयामध्ये या ग्रंथाची छपाई झाली. धर्माचे बाह्य स्वरूप व त्याचा आंतरिक गूढार्थ यांचे व्यापक स्पष्टीकरण या ग्रंथामध्ये आढळते. ह्या ग्रंथाची तुलना ⇨अल्-गझालीच्या एह्‌या अल् उलूम अल्-दीन (म. शी. धर्मशास्त्राचे पुनरुज्जीवन) ह्या जगप्रसिद्ध ग्रंथाबरोबर नेहमी करण्यात येते. याशिवाय फतह अल्-रहमान (कुराणाचे फार्सी भाषांतर), अल्-फौज अल्-कबीरहदीसच्या फार्सीतील अभ्यासाची प्रारंभिक तत्त्वे), अल्-तफहिमात अल्-इलाहिया (सूफी तत्त्वज्ञानावरील अंशतःफार्सी व अंशतःअरबीमध्ये लिहिलेला प्रबंध) हे त्याचे विशेष उल्लेखनीय ग्रंथ होत.

शाह वलीउल्ला हा सूफी विचारवंतांच्या मालिकेतील थोर व मौलिक विचारवंत होता. त्याने धर्मशास्त्र आणि गूढवाद ह्यांचा संयोग घडवून आणला व धर्माचे स्वतंत्रपणे अर्थबोधन करण्याचा हक्कही प्रतिपादिला. भारतातील अरबीच्या अभ्यासकांकडून त्यांच्या कर्तृत्वाचा नेहमीच आदर केला जातो आणि पहिल्या प्रतीचा धर्मशास्त्रवेत्ता म्हणून जगात सर्वत्र त्याचा आदरपूर्वक अभ्यास करण्यात येतो. दिल्ली येथे त्याचे निधन झाले.

फैजी, ए. ए. ए. (इं.) पोळ, मनीषा (म.)