ॲरिस्टॉटल : (३८४–३२२ इ.स.पू.). एक थोर ग्रीक तत्त्ववेत्ता. मॅसिडॉनचा राजवैद्य निकॉमाकस ह्याचा हा मुलगा. स्टाजिरा ह्या शहरात जन्मला म्हणून ‘स्टाजिराइट’ असेही ह्याला संबोधण्यात येते. इ.स.पू. सु. ३६७ मध्ये शिक्षणासाठी अथेन्स येथील प्लेटोच्या अकादमीत तो दाखल झाला आणि इ.स.पू. ३४७ मध्ये प्लेटोचा मृत्यू होईपर्यंत तेथेच राहिला. प्लेटोनंतर त्याचा पुतण्या व वारस स्प्यूसिपस हा अकादमीचा प्रमुख झाला, तेव्हा व बहुधा त्यामुळेच ॲरिस्टॉटलने प्लेटोच्या इतर काही शिष्यांबरोबर अकादमी सोडली. इ.स.पू. ३४२ मध्ये मॅसिडॉनचा राजा दुसरा फिलिप ह्याचा मुलगा अलेक्झांडर याच्या शिक्षणावर देखरेख करण्याचे काम त्याने स्वीकारले व ते तीन वर्षे केले. इ.स.पू. ३३५ मध्ये अथेन्स येथे याने एक पाठशाळा सुरू केली. ती पुढे ‘लायसिअम’ ह्या नावाने प्रसिद्धीस आली. इ.स.पू. ३२३ मध्ये अलेक्झांडरचा मृत्यू झाला, तेव्हा अथेन्समधील मॅसिडॉनविरोधी पक्षाच्या धोरणामुळे तेथे राहणे धोक्याचे वाटल्यामुळे ॲरिस्टॉटलने अथेन्स सोडले. वयाच्या बासष्टाव्या वर्षी यूबीआ बेटावरील कॅल्सिस येथे तो मरण पावला.

ॲरिस्टॉटलॲरिस्टॉटलचे ग्रंथ : ॲरिस्टॉटलच्या एकंदर लिखाणाचे तीन भाग पाडता येतील : (१) सर्वसाधारण लोकांसाठी त्याने केलेले लिखाण. ह्यात मुख्यत्वे प्लेटोच्या धर्तीवर लिहिलेले संवाद, काही कविता व पत्रे यांचा अंतर्भाव होतो. हे लिखाण उपलब्ध नाही पण त्यांतील इतरांनी उद्‌धृत केलेले अनेक उतारे मात्र उपलब्ध आहेत. (२) आपल्या वैज्ञानिक, राज्यशास्त्रीय इ. लिखाणासाठी त्याने स्वतः व शिष्यांमार्फत जमविलेली सामग्री, त्यावर केलेल्या नोंदी इत्यादी. उदा., ग्रीक राज्यांच्या भिन्नभिन्न १५८ राज्यघटनांचा त्याने संग्रह केला होता त्यांपैकी केवळ अथेन्सची राज्यघटना उपलब्ध आहे. हे लिखाण बहुतांशी लुप्त आहे. (३) वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ : ह्या सदरात ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्र, भौतिकी, जीवशास्त्र, मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांवर लिहिलेले ग्रंथ मोडतात. तत्त्वज्ञानामध्ये त्याने तत्त्वमीमांसा, नीतिशास्त्र, राज्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र (साहित्यशास्त्र) ह्या शाखांवर ग्रंथ लिहिले आहेत. अनेकदा ह्या ग्रंथांचे स्वरूप, वर्गात व्याख्याने देताना उपयोग व्हावा म्हणून लिहिलेल्या टीपा, त्यांत नंतर अनेकदा घातलेली भर, त्यांना दिलेली मुरड ह्या प्रकारचे आहे. ह्या लेखात प्रामुख्याने ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानाचा परामर्श घेतलेला आहे.

तर्कशास्त्र : तर्कशास्त्र ज्ञानाचा विभाग नसून ज्ञानप्राप्तीचे साधन आहे, असे ॲरिस्टॉटल मानीत असे. कोणत्याही शास्त्राच्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून तर्कशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे, असे त्याचे मत होते. म्हणून ॲरिस्टॉटलने तर्कशास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथांच्या संग्रहाला ऑर्गनन (करणग्रंथ) असे नाव पडले. ॲरिस्टॉटल तर्कशास्त्राला ‘लॉजिक’ न म्हणता ‘ॲनॅलिटिक्स’ म्हणजे विश्लेषणशास्त्र, अर्थात विधानांच्या व अनुमानांच्या विश्लेषणाचे शास्त्र, म्हणत असे. संवाक्य हा अनुमानप्रकार म्हणजे ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्राचा गाभा होता. पारंपरिक तर्कशास्त्रांमध्ये ॲरिस्टॉटलच्या कित्येक सिद्धांतांविषयी गैरसमज आढळून येतो आणि त्याच्या कित्येक मूलभूत विचारांचे आकलन पारंपरिक तर्कशास्त्रज्ञांना झालेले दिसत नाही. ही गोष्ट खरी असली, तरी साधारणपणे असे म्हणता येईल, की ॲरिस्टॉटलने संवाक्यासंबंधी लावलेल्या शोधांचा विकास आणि विस्तार पारंपरिक तर्कशास्त्रामध्ये करण्यात आला आहे. संवाक्याचे स्वरूप आणि प्रकार ह्यांचा विचार प्रायर ॲनॅलिटिक्स ह्या आपल्या ग्रंथात ॲरिस्टॉटलने केला आहे. उलट पोस्टीरियर ॲनॅलिटिक्स ह्या ग्रंथात अनुमानांच्या केवळ आकारिका प्रमाण्याचा विचार न करता, वस्तूंच्या स्वरूपाविषयीचे प्रमाणज्ञान प्राप्त करू घ्यायचे असेल, तर कोणती रीत अनुसरावी लागेल, कोणत्या अटी पाळाव्या लागतील, ह्यांचा विचार आहे. आकारिक दृष्ट्या प्रमाण असूनसुद्धा, ज्या दोषांमुळे व उणिवांमुळे अनुमाने वस्तूंच्या स्वरूपाविषयी प्रमाणज्ञान प्राप्त करून देण्यास असमर्थ ठरतात, त्यांचे विवेचन टॉपिक्स ह्या ग्रंथात आढळते. सोफिस्टिक एलेंकाय (हेत्वाभासात्मक खंडने) हा ग्रंथ म्हणजेटॉपिक्स ह्या ग्रंथाचे परिशिष्ट. अनुमानांच्या प्रामाण्याविषीच्या किंवा मान्यतेविषयीच्या अटींसंबंधी हे सर्व ग्रंथ आहेत. पण तार्किक क्रमानुसार पाहता त्यांच्या पूर्वी अनुमानाचे घटक असलेल्या विधानांच्या स्वरूपाचे विवेचन करणारा डी इंटरप्रिटेशिओने हा ग्रंथ येतो आणि त्याच्याही पूर्वी विधानाचे घटक असलेल्या पदांच्या स्वरूपाचे विवेचन करणारा कॅटेगरीज हा ग्रंथ येतो. ह्या ग्रंथात पदांनी ज्या गोष्टींचा निर्देश होतो, त्यांचे द्रव्य, परिमाण, गुण, संबंध, स्थल, काल, स्थिती, अवस्था, कृती आणि विक्रिया असे प्रकारभेद असतात आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा निर्देश करणारी पदे वेगवेगळ्या प्रकारची असतात, असे मत ॲरिस्टॉटलने मांडले आहे.

भौतिकीय बदल : बदलाचे स्वरूप काय? आणि बदल कसा घडून येऊ शकतो? म्हणजे बदल घडून येण्यास समर्थ आणि पुरेशी कारणे कोणती? हे प्रश्न ॲरिस्टॉटलच्या भौतिकीत मध्यवर्ती आहेत. पार्मेनिडीझने असे मत मांडले होते, की बदल अशक्य आहे. कारण बदल घडणे म्हणजे जे होते ते नाहीसे होणे व जे नव्हते ते होणे. पण जे असत् म्हणजे नाही, ते सत् होऊ शकत नाही आणि जे सत् म्हणजे आहे, ते असत् होऊ शकत नाही. नंतरच्या ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी बदलाचा अलगडा करण्यासाठी अनेक स्थिरप्रकृती, अपरिवर्तनीय मूलद्रव्ये कल्पिली व बदल घडणे म्हणजे अशी भिन्न मूलद्रव्ये एकत्रित होणे किंवा एकमेकांपासून वेगळी होणे, अशी व्याख्या केली. यावर प्लेटोने जो मूलगामी आक्षेप घेतला तो हा, की वस्तूचे तिच्या विरुद्ध प्रकारच्या वस्तूमध्ये रूपांतर होऊ शकत नाही कारण असे होणे म्हणजे, ती वस्तूच नाश पावणे. तेव्हा बदल अशक्य आहे.

ह्या वैचारिक पार्श्वभूमीवर ॲरिस्टॉटल बदलाचा उलगडा करू पाहतो. बदलाचे किंवा बदल पावणाऱ्या वस्तूचे तो तीन घटकांत विश्लेषण करतो : (१) वस्तूचे, ज्याच्या ठिकाणी गुण वसतात असे, आशयात्मक अधिष्ठान (२) एखाद्या विवक्षित धर्माचा किंवा रूपाचा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी असलेला अभाव व (३) त्या धर्माचा किंवा रूपाचा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी होणारा आविर्भाव. अशा रीतीने जिच्या ठिकाणी तांबडेपणा नाही, अशी वस्तू बदलून तिच्या ठिकाणी तांबडेपणाचा आविर्भाव होऊ शकतो तांबडी नसलेली वस्तू तांबडी होऊ शकते. अभावातून किंवाअसत्‌मधून सत् कसे निष्पन्न होऊ शकते, ह्याचाही उलगडा होतो. कारण एखाद्या विवक्षित धर्माचा विवक्षित अधिष्ठानामध्ये अभाव असला, तरी तो धर्म व ते अधिष्ठान असत् नसतात, सत् असतात. ह्याचा अर्थ असा, की जे अधिष्ठान आहे, ज्याच्या ठिकाणी बदल घडून येतो, ते अभावातून निष्पन्न होऊन अस्तित्वात येत नाही, तर ते असतेच. त्याचप्रमाणे ज्या धर्माचा अधिष्ठानाच्या ठिकाणी अभाव असतो, तो अभावातून निष्पन्न होऊन अस्तित्वात उतरत नाही, तर तोही असतोच. बदलातून जे निष्पन्न होते, ते म्हणजे विवक्षित धर्माने नटलेले असे अधिष्ठान. आता हा बदल घडण्यापूर्वी हा धर्म त्या वस्तूच्या ठिकाणी नसला, तरीही तो धारण करण्याची शक्ती त्या वस्तूच्या ठिकाणी असलीच पाहिजे. कारण ही शक्ती तिच्या ठिकाणी नसती, तर ती तो धर्म धारण करू शकली नसती.


  तेव्हा एखाद्या विवक्षित धर्माचा अभाव अंगी असलेली वस्तू बदल पावून जेव्हा तो धर्म धारण करते, तेव्हा ह्या घडून आलेल्या बदलाचे आणखीही एका प्रकारे वर्णन करता येईल. ते असे, की त्या वस्तूच्या अंगी तो धर्म धारण करण्याची जी क्षमता होती, तिचे रूपांतर त्या वस्तूने तो धर्म प्रत्यक्ष धारण करण्यात, तो धर्म त्या वस्तूच्या ठिकाणी विद्यमान असण्यात झाले.

कारणमीमांसा : ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे कशाचेही ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणांचे ज्ञान होणे. उदा., एखादा पुतळा घडविणे किंवा बीजापासून वृक्ष बनणे, ह्या प्रक्रियांची कारणे जर समजली, तर त्यांचे स्वरूप समजले असे होईल. बदलाच्या किंवा प्रक्रियेच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठी ॲरिस्टॉटल चार प्रकारची कारणे मानतो : (१) उपादानकारण किंवा आशयकारण : घडविण्यात आलेल्या किंवा उत्पन्न झालेल्या वस्तूचे रूप ज्या आशयरूप अधिष्ठानात वसते, ते अधिष्ठान म्हणजे उपादानकारण. उदा., पुतळा ज्या धातूचा घडविलेला असेल, तो धातू त्या पुतळ्याचे उपादानकारण. (२) आकारिक कारण : जे स्वरूप अंगी असल्यामुळे वस्तू एका विवक्षित प्रकारची वस्तू ठरते, ते स्वरूप म्हणजे त्या प्रकारच्या वस्तूचे आकारिक कारण. उदा., जे रूप अंगी असल्यामुळे एखादी वस्तू घोडेस्वाराचा पुतळा ठरते, ते स्वरूप अथवा तो आकार म्हणजे घोडेस्वाराच्या पुतळ्याचे आकारिक कारण. (३) हेतुकारण : ज्या हेतूच्या परिपूर्तीसाठी एखादी प्रक्रिया घडत असते आणि जो पूर्णपणे साध्य झाला, की त्या प्रक्रियेचा, ती सफल झाल्यामुळे, शेवट होतो, तो हेतू म्हणजे त्या प्रक्रियेचे हेतुकारण. उदा., एका विवक्षित आकाराचा पुतळा अस्तित्वात आणणे, हा पुतळा घडविण्याच्या प्रक्रियेचा हेतू असतो आणि नेमका त्या आकाराचा पुतळा अस्तित्वात आला, की ही प्रक्रिया थांबते. (४) कर्तृकारण : प्रक्रियेला सुरुवात करून देणारे कारण म्हणजे कर्तृकारण. उदा., शिल्पकार हा पुतळ्याचे कर्तृकारण आहे, असे स्थूलमानाने म्हणता येईल. ‘स्थूलमानाने’  म्हणण्याचे कारण असे, की शिल्पकाराच्या मनात त्या पुतळ्याचा जो आकार असतो (जो आकार त्या धातुरूप आशयाला देणे हे पुतळा घडविण्याच्या प्रक्रियेचे उद्दिष्ट असते) तो अभिप्रेत आकारच शिल्पकाराच्या अवयवांचे चलनवलन घडवून आणतो आणि पुतळा घडविण्याची प्रक्रिया सुरू करतो म्हणून ह्या प्रक्रियेचे कर्तृकारण शिल्पकार नसून शिल्पकाराच्या मनातील पुतळ्याचा तो आकार आहे, असे म्हणता येईल. ह्या दृष्टीने पाहता अनेकदा आकारिक कारण, हेतुकारण आणि कर्तृकारण एकच असतात. धातू हे पुतळ्याचे उपादानकारण परंतु शिल्पकाराला अभिप्रेत असलेला त्याच्या मनातील पुतळ्याचा आकार हे पुतळा घडविण्याच्या प्रक्रियेचे कर्तृकारण (प्रक्रिया सुरू करणारे कारण), आकारिक कारण (प्रक्रियेचे स्वरूप निश्चित करणारे कारण—प्रक्रियेचे स्वरूप काय, तर अमुक आकाराचा पुतळा घडविण्याची प्रक्रिया) आणि हेतुकारणही (ज्या हेतूच्या पूर्तीसाठी प्रक्रिया घडत असते तो हेतू) असते. बीजापासून झाड होण्याच्या प्रक्रियेचे उपादानकारण म्हणजे ते बी झाड परिपूर्ण वाढले असता त्याचे जे स्वरूप असते ते ह्या प्रक्रियेचे आकारिक कारण, शिवाय तेच हेतुकारणही असते. त्याचप्रमाणे ज्या झाडाचे ते बी असते, त्या झाडाचेही हेच स्वरूप असते आणि ते ह्या प्रक्रियेचे कर्तृकारण असते.

निसर्गातील पदार्थ गतिमान असतात. ह्या गतीचे अंतिम कारण काय, हा ग्रीक तत्त्वज्ञानातील एक कूटप्रश्न होता. ॲरिस्टॉटलच्या लिखाणात ह्यासंबंधी दोन मते आढळतात. एक, गतीचे तत्त्व पदार्थाच्या प्रकृतीतच, त्याच्या नैसर्गिक स्वरूपातच अंतर्भूत असते आणि म्हणून पदार्थ स्वतःला व इतर पदार्थांनाही गती देऊ शकतो. उदा., वायू किंवा अग्नी ह्या दोन मूलतत्त्वांची नैसर्गिक प्रवृत्ती वरच्या दिशेला जाण्याची असते, उलट पृथ्वी आणि जल ह्या मूलतत्त्वांची प्रवृत्ती खाली सरकण्याची असते. परंतु स्वत:ला गतिमान करणारा पदार्थ स्वत:ला कशी काय गती देऊ शकतो, हा प्रश्न उरतोच. ह्या प्रश्नाचे ॲरिस्टॉटलने दिलेले उत्तर असे, की पदार्थ स्वतःला गतिमान करू शकणारा असला, तरीसुद्धा त्याला स्वत:ला गतिमान करायला उद्युक्त करण्यासाठी बाह्य कारण आवश्यक असते. हे बाह्य कारण म्हणजे स्वत: निश्चल असलेला, पण इतर पदार्थांच्या इच्छेचा विषय असल्यामुळे त्यांना गतिमान व्हायला उद्युक्त करणारा पदार्थ, अशा स्वरूपाचे असले पाहिजे. तेव्हा अखेरीस ॲरिस्टॉटल दोन तत्त्वांच्या साहाय्याने निसर्गातील गतीचा उलगडा करतो, असे म्हणता येईल : (१) स्वत: निश्चल व चिरंतन असलेला, इतरांच्या इच्छेचा विषय असलेला चालक व (२) ह्या निश्चल चालकाला आपल्या इच्छेचा विषय करण्याची व म्हणून त्याच्यासारखे बनण्याची निसर्गातील पदार्थात असलेली स्वाभाविक प्रवृत्ती.

ह्या विवेचनावरून ॲरिस्टॉटल भौतिक घटनांना व प्रक्रियांना सहेतुक मानतो, असे दिसते आणि म्हणून ॲरिस्टॉटलचा दृष्टिकोण आधुनिक भौतिकीतील प्रस्थापित दृष्टिकोणाहून भिन्न आहे, हे उघड आहे.

मानसशास्त्र : ॲरिस्टॉटलच्या दृष्टिकोणाप्रमाणे सजीव प्राणी व त्यांचे मनोव्यापार ह्यांचा अभ्यास हा निसर्गाच्या अभ्यासाचाच एक भाग आहे. सुरुवातीला ‘आत्मा हा देहाहून भिन्न असा एक पदार्थ आहे’, असे ॲरिस्टॉटल मानीत असे. हे अर्थात प्लेटोपासून स्वीकारलेले मत होते. परंतु डी ॲनिमा (आत्म्याविषयी) ह्या ग्रंथात ॲरिस्टॉटल आत्मा आणि देह हे दोन भिन्न पदार्थ नसून, देह आणि आत्मा ह्यांच्यातील संबंध म्हणजे अधिष्ठान आणि आकार ह्यांच्यातील संबंधाचाच एक प्रकार आहे, असे मानतो. म्हणजे आत्मा हा देह ह्या अधिष्ठानाचा आकार आहे आणि हेच ॲरिस्टॉटलचे परिपक्व मत आहे. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या वस्तूचा आकार, म्हणजे जे स्वरूप अंगी असल्यामुळे ती वस्तू त्या प्रकारची वस्तू असते ते स्वरूप आणि हे स्वरूप, त्या प्रकारच्या वस्तूकडून स्वाभाविकपणे घडणाऱ्या किंवा अभिप्रेत असलेल्या व्यापारातून व्यक्त होते किंवा मूर्त होते. उदा., एखाद्या प्रकारच्या झाडाचा आकार, त्या प्रकारचे झाड वाढण्यात आणि टिकून राहण्यात जे जे व्यापार अनुस्यूत असतात, त्या व्यापारांत मूर्त होतो. ह्या अर्थाने आत्मा हा देहाचा आकार आहे आणि आत्मा ज्या व्यापारांत मूर्त होतो, त्यांची एक उतरंड आहे : सर्वांत तळचा व्यापार म्हणजे देहाचे पोषण करणे, त्यावरचा व्यापार इंद्रियवेदन, वेदनाच्या व्यापारावर चलनवलनाचा व्यापार आधारलेला आहे आणि ह्या सर्वांवर बौद्धिक व्यापार आधारलेला आहे. बुद्धी ही मानवप्राण्याची विशेष अशी शक्ती आहे. बुद्धीचे स्वरूप वेदनशक्तीच्या स्वरूपासारखेच आहे. वेदनशक्ती ज्याप्रमाणे विवक्षित, इंद्रियग्राह्य वस्तूंच्या आकारांचे ठसे स्वत:वर उमटवून घेण्याची शक्ती आहे, त्याप्रमाणे बुद्धी म्हणजे सामान्य आकारांचे, सामान्य रूपांचे ठसे धारण करू शकणारी शक्ती आहे. बुद्धीचे कार्य दुहेरी आहे : एक म्हणजे सामान्य, सार्वत्रिक अशा सत्यांचे ज्ञान प्राप्त करून घेणे व दुसरे कार्याकार्यविवेक म्हणजे योग्य कृत्य कोणते आणि अयोग्य कृत्य कोणते, हे ठरविणे.

क्रियाशील (ॲक्टिव्ह) बुद्धी आणि क्षमतास्वरूप (पॅसिव्ह) बुद्धी असा भेद ॲरिस्टॉटल करतो. ह्या भेदाचा नेमका अर्थ काय, हा ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानातील एक कूटप्रश्न आहे. आत्मा हा देहाचा आकार असल्यामुळे देह नष्ट होताच आत्माही नष्ट होतोच. परंतु ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे बुद्धीला (ग्रीक संज्ञा ‘नाउस’) देहाहून पृथक असे अस्तित्व असते. अशा पृथक स्थितीतच बुद्धी आपल्या खऱ्याखुऱ्या स्वरूपात नांदत असते. ह्या स्वरूपात ती शुद्ध असते म्हणजे इतर कोणत्याही तत्त्वाचे तिच्यात मिश्रण झालेले नसते ती कूटस्थ, अमर व चिरंतन असते. ही बुद्धी म्हणजे क्रियाशील बुद्धी. ह्या बुद्धीचा जर देहाशी संयोग व्हायचा असेल, तर तिला धारण करण्याची क्षमता देहाच्या ठिकाणी म्हणजे त्या देहाच्या आत्म्याच्या ठिकाणी असली पाहिजे. उच्चतर शक्ती कनिष्ठ शक्तीवर आधारलेली असते. उदा., वेदनशक्ती पोषणशक्तीवर आधारलेली असते.


 क्रियाशील बुद्धीचे कार्य म्हणजे विवक्षित वस्तूंच्या प्रत्यक्ष ज्ञानात, त्यावर आधारलेल्या स्मृतिप्रतिमांत अनुस्यूत असलेल्या सामान्य रूपाचे त्याच्या शुद्ध स्वरूपात म्हणजे सामान्य रूप म्हणून आकलन करणे. क्रियाशील बुद्धीने ग्रहण केलेले असे सामान्य रूप धारण करण्याची क्षमता मानवी आत्म्याच्या ठिकाणी असली पाहिजे. ही क्षमता म्हणजे क्षमतास्वरूप बुद्धी. क्रियाशील बुद्धीच्या स्वरूपाविषयी दोन मते आहेत : एक मत असे, की क्रियाशील बुद्धी हे मानवी आत्म्यांच्या अतीत असे शुद्ध व चिरंतन तत्त्व असल्यामुळे, ही बुद्धी म्हणजे ईश्वर असे मानावे लागेल. दुसरे मत असे, की क्रियाशील बुद्धी आणि क्षमतास्वरूप बुद्धी हा भेद मानवी आत्म्याच्या स्वरूपात करावा लागतो, असे ॲरिस्टॉटलचे म्हणणे असल्यामुळे क्रियाशील बुद्धी हे विवक्षित मानवी आत्म्यांच्या अतीत असलेले सामान्य तत्त्व आहे, असे मानता येणार नाही. प्रत्येक मानवी आत्म्याची क्रियाशील बुद्धी वेगळी आहे असे मानावे लागेल. क्रियाशील बुद्धीची ॲरिस्टॉटलची संकल्पना हा त्याच्यावर असलेल्या प्लेटोच्या प्रभावाचा अवशेष आहे, असे म्हणता येईल.

तत्त्वमीमांसा : ॲरिस्टॉटलने तत्त्वमीमांसेचे विवेचन ज्या ग्रंथात केले आहे, हे मेटॅफिजिक्स  ह्या नावाने ओळखला जातो. ॲरिस्टॉटलच्या पश्चात जेव्हा त्याचे लिखाण व्यवस्थित स्वरूपात प्रकाशित करण्यात आले, तेव्हा भौतिकीवरील ग्रंथाच्या ‘पुढचा’ क्रम ह्या ग्रंथाला देण्यात आला. म्हणून ह्या ग्रंथाचे नाव ‘मेटॅफिजिक्स’

(मेटॅ= पुढचा, नंतरचा मेटॅफिजिक्स = भौतिकीपुढचा) पडले, असे मानण्यात येते. असे असले तरी ॲरिस्टॉटलच्या भाष्यकारांनी ‘मेटॅफिजिक्स’ हा शब्द लाक्षणिक अर्थानेही घेतला आहे. ज्या प्रकारच्या अस्तित्वाचा अभ्यास भौतिकीमध्ये होतो, त्याहून उच्चतर, त्याच्यापलीकडील अस्तित्वाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मेटॅफिजिक्स किंवा ज्ञानशाखांचा तार्किक क्रम लावला तर भौतिकीनंतर येणारी, भौतिकीहून श्रेष्ठ अशी ज्ञानशाखा म्हणजे मेटॅफिजिक्स. ॲरिस्टॉटल स्वतः तत्त्वमीमांसेचा ‘आदि-तत्त्वज्ञान’ असा उल्लेख करतो. त्याच्या संकल्पनेप्रमाणे ज्या वस्तूंना पृथक अस्तित्व असते, पण ज्यांच्यात बदल होत नाही, अशा अचल, अपरिवर्तनीय वस्तूंचा अभ्यास आदि-तत्त्वज्ञानात होतो. अस्तित्वाचा केवळ अस्तित्व म्हणून (ह्या किंवा त्या प्रकारचे अस्तित्व म्हणून नव्हे, तर केवळ अस्तित्व म्हणून) अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे आदि-तत्त्वज्ञान अशीही ॲरिस्टॉटलने तत्त्वमीमांसेची व्याख्या केली आहे.

ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेतील ⇨ द्रव्य ही मध्यवर्ती संकल्पना. ज्याला खरेखुरे अस्तित्व असू शकते, अन्य अस्तित्वाचा केवळ एक घटक असे दुय्यम, पराधीन असे ज्याचे अस्तित्व नसते, तर जे स्वतःच अस्तित्वात असते, ते म्हणजे द्रव्य. विवक्षित वस्तूंहून भिन्न आणि त्यांच्या पलीकडच्या अशा सामान्य म्हणजे प्लेटोप्रणीत ‘आयडियांना’ च (सत्-सामान्यांनाच) खरेखुरे व परिपूर्ण असे अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटल खंडन करतो. विवक्षित, मूर्त वस्तू (उदा., सॉक्रेटीस, हा घोडा, ताजमहाल इ.) म्हणजेच द्रव्य ही ॲरिस्टॉटलची ठाम भूमिका आहे. परंतु अशी स्वतः अस्तित्वात असलेली द्रव्यरूप मूर्त वस्तू नेहमी अमुक एका प्रकारची वस्तू असते. उदा., सॉक्रेटीस एक माणूस आहे आणि माणूस या नात्याने (एक प्रकारची वस्तू या नात्याने) जी विधाने आपण सॉक्रेटीससंबंधी (त्या वस्तूसंबंधी) करू (उदा., सॉक्रेटीस बुद्धिशाली आहे, सॉक्रेटीसला दोन पाय आहेत, इ.) ती विधाने माणसासंबंधीसुद्धा (त्या वस्तुप्रकारासंबंधीसुद्धा) आपण करू शकू. उदा., माणूस बुद्धिशाली असतो, माणसाला दोन पाय असतात, इत्यादी. ह्याचा अर्थ असा, की वस्तुप्रकारांचा, जाती-उपजांतींचाही, द्रव्य ह्या पदावर काहीसा अधिकार पोचतो. म्हणून विवक्षित, मूर्त वस्तूंना ॲरिस्टॉटल प्राथमिक द्रव्ये म्हणतो आणि वस्तुप्रकारांना, जाती-उपजातींना, तो दुय्यम द्रव्ये म्हणतो. वस्तुप्रकार किंवा वस्तुरूपे ही दुय्यम द्रव्ये असली, तरी प्लेटो मानतो त्याप्रमाणे त्यांना विवक्षित वस्तूंहून पृथक, स्वतंत्र असे अस्तित्व नसते. विवक्षित वस्तूच्या अंगी जे गुण असतात किंवा जे रूप असते, ते ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे, एका आशयरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी बसत असते. पण हे अधिष्ठान द्रव्य होऊ शकत नाही. कारण ते निर्विशेष, निर्गुण असल्यामुळे त्याच्या अंगी विवक्षितता नसते जे द्रव्य आहे त्याचा हे, ही विवक्षित वस्तू (म्हणजे इतर सर्व विवक्षित वस्तूंहून वेगळी अशी ही विवक्षित वस्तू), असा उल्लेख करता आला पाहिजे आणि अधिष्ठानाचा असा उल्लेख करता येत नाही. निर्विशेष असल्यामुळे सॉक्रेटीसचे अधिष्ठान आणि ह्या टेबलाचे अधिष्ठान यांच्यात भेद करता येत नाही.

ह्या सर्व विवेचनाचे फलित म्हणून अखेरीस द्रव्याचे स्वरूप काय ठरते? तर विशिष्ट स्वरूपाची विवक्षित वस्तू म्हणजे द्रव्य. ज्या गुणधर्मांमुळे वस्तू एका विशिष्ट स्वरूपाची वस्तू ठरते, त्यांना ॲरिस्टॉटल ‘सत्त्व’ म्हणतो. वस्तूच्या सत्त्वामुळे तिचे स्वतःचे स्वरूप, तिचे स्वत्व, तादात्म्य, ती वस्तू स्वतः काय आहे, हे निश्चित होते. अशा सत्त्वाने अवच्छिन्न वस्तू म्हणजे द्रव्य. वस्तूचे हे सत्त्व म्हणजेच वस्तूचा आकार. वस्तूचा आकार हे वस्तूचे आकारिक कारण (ज्याच्यामुळे ती वस्तू काय आहे हे निश्चित होते, असे कारण) आणि हेतुकारण असते, हे आपण पाहिलेच आहे. हेतुकारण ह्याचा अर्थ असा, की जो आकार धारण करण्याची क्षमता वस्तूच्या ठिकाणी असते, तो आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेण्याची त्या वस्तूची प्रवृत्ती असते त्या दिशेने ती विकसित होत असते आणि जेव्हा ती हा आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेते, तेव्हा ह्या विकासाचा अंत होतो. स्वतःचा आकार परिपूर्णतेने साध्य केलेल्या वस्तूची जी अवस्था असते, तिला ॲरिस्टॉटल तिची ‘विद्यमानता’ व ‘परिपूर्णावस्था’ म्हणतो.

आता एखादा आकार धारण करण्याची क्षमता असलेल्या वस्तूमध्ये तो आकार परिपूर्ण रीतीने विद्यमान होण्यासाठी तिचा जो विकास व्हावा लागतो, तो जिच्यामध्ये तो आकार परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे, अशी (दुसरी) वस्तू घडवून आणीत असते. थोडक्यात, विद्यमानता हेच क्षमतेचे विद्यमानतेत रूपांतर होण्याचे कारण असते. ह्या तत्त्वाच्या आधाराने ॲरिस्टॉटल ईश्वराचे अस्तित्व आणि स्वरूप सिद्ध करतो. काल चिरंतन आहे आणि बदलाशिवाय काल असू शकत नाही तेव्हा बदलही चिरंतन आहे. आता विश्वातील सर्व बदलांचे, स्थित्यंतरांचे, क्षमतेचे विद्यमानतेत होणार्‍या रूपांतराचे कारण, जिच्या ठिकाणी आकार परिपूर्ण स्वरूपात विद्यमान आहे, अशी वस्तू असली पाहिजे आणि बदल चिरंतन असल्यामुळे त्याचे कारणही चिरंतन असले पाहिजे. बदलाच्या ह्या अंतिम कारणाला ॲरिस्टॉटल ‘आदिचालक’ म्हणतो. इतर सर्व वस्तू आशयात्मक अधिष्ठान अधिक आकार ह्या स्वरूपाच्या असतात. पण आदिचालक केवल किंवा शुद्ध आकार असला पाहिजे कारण अधिष्ठान म्हणजे आकार धारण करण्याची क्षमता. आदिचालकाला जर अधिष्ठान असेल, तर त्याच्या विद्यमान आकाराहून वेगळा आकार प्राप्त करून घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असेल. पण क्षमता असली म्हणजे तिचे विद्यमानतेत रूपांतर होणे शक्य असते. तेव्हा आदिचालकाच्या ठिकाणी जर आशय असेल, तर आदिचालक बदलू शकेल आणि ह्या बदलाचे कारण ह्या बदलामुळे जो आकार साध्य व्हायचा असेल, तो ज्याच्या ठिकाणी विद्यमान आहे, असा दुसरा चालक असावा लागेल. ही अनवस्था टाळण्यासाठी आदिचालक स्वतः अचल असतो व म्हणून शुद्ध आकार असतो, असे मानावे लागते. आता ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे शुद्ध, आशयहीन आकार म्हणजे विचार. तेव्हा विश्वाचा आदिचालक म्हणजे चिरंतन असा विचार किंवा बुद्धी. हिलाच ॲरिस्टॉटल ईश्वर म्हणतो. ह्या विचाराचा आशय काय? तर ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे ह्या विचाराचा विषय तो विचारच असतो हा विचार स्वतःचाच विचार करीत असतो. स्वतःचा आकार परिपूर्ण स्वरूपात प्राप्त करून घेण्यात वस्तूचे कल्याण असते व म्हणून त्या आकाराची ओढ प्रत्येक वस्तूला असते. ईश्वर परिपूर्ण आकार असल्यामुळे तो कल्याणस्वरूप आहे, विश्वातील सर्व वस्तूंना ईश्वराची स्वाभाविक ओढ आहे व ह्या ओढीतून विश्वातील सर्व चलनवलन घडून येते.


 सत्-सामान्ये किंवा आकार ह्यांना पृथक अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटलने खंडन केले असले, तरी ईश्वर शुद्ध आकार आहे, ह्या निष्कर्षाशी जेव्हा तो पोचला, तेव्हा तो प्लेटोच्या शिकवणीच्या बराच जवळ आला ह्यात शंका नाही.

नीतिशास्त्र आणि राज्यशास्त्र : माणसाने आपले कल्याण कसे साधावे ह्या प्रश्नाचा विचार नीतिशास्त्र व राज्यशास्त्र करतात. ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे माणूस हा सामाजिक प्राणी असल्यामुळे तो आपले कल्याण स्वतंत्रपणे साधू शकत नाही. समाजाचा एक घटक म्हणून सामाजिक कल्याणात भागीदार होऊन तो आपले कल्याण साधू शकतो. ज्या समाजाचा घटक म्हणून माणूस जगतो, ज्या समाजाच्या कल्याणात तो भागीदार असतो, त्याचे ॲरिस्टॉटलपुढे असलेले रूप म्हणजे ग्रीक नगरराज्य होय. नगरराज्याला आपले कल्याण कसे साधता येते, ह्याचा विचार राज्यशास्त्रात होतो. व्यक्तीचे कल्याण कशात आहे आणि ते तिने कसे साधावे, ह्याचा विचार नीतिशास्त्रात होतो. व्यक्तीचे कल्याण सामाजिक कल्याणाचा घटक असल्यामुळे, नीतिशास्त्र राज्यशास्त्राची एक शाखा आहे. व्यक्तीला राज्यात राहूनच आपले कल्याण साधणे भाग असल्यामुळे राज्याची घडण, त्याची व्यवस्था विशिष्ट स्वरूपाची असल्याशिवाय व्यक्ती स्वतःचे कल्याण साधू शकत नाही. तेव्हा राज्य हे व्यक्तीच्या कल्याणाचे एक साधनही आहे.

ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येकजण स्वभावत:च आपले कल्याण साधायचा प्रयत्‍न करीत असतो. तेव्हा माणूस स्वाभाविकपणे ज्याची इच्छा धरतो, जे साधायचा प्रयत्‍न करतो, त्यात त्याचे कल्याण असते. माणसाच्या इच्छेचा स्वाभाविक विषय असलेल्या ह्या कल्याणाला ॲरिस्टॉटल ‘यूडिआमोनिया’ (श्रेयस) हे नाव देतो. पण श्रेयस कशात असते? ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे मानवी प्रकृतीच्या परिपूर्तीत किंवा साफल्यात असते. ज्या जीवनक्रमात मानवी प्रकृतीचे साफल्य असते, तो जीवनक्रम म्हणजे श्रेयस जीवनक्रम. मानवी आत्मा हा मानवी शरीराचा आकार आहे आणि काही विवक्षित व्यापारांत हा आत्मा मूर्त होतो हे आपण पाहिलेच आहे. नैतिक दृष्टिकोणातून पाहता, मानवी आत्म्याचे बुद्धी आणि वासना हे दोन घटक आहेत, असे म्हणता येईल. बुद्धी ही मानवी आत्म्याची व्यवच्छेदक शक्ती आहे आणि वासनांचे नियमन करणे हे बुद्धीचे एक कार्य आहे. तेव्हा बौद्धिक व्यापारात आणि बुद्धीला अनुसरून वासनांचे समाधान करणाऱ्या कृतीत मानवी प्रकृतीचे साफल्य असते व म्हणून माणसाचे श्रेयसही असते. हीच गोष्ट दुसऱ्या रीतीने मांडता येईल : सद्‌गुणी कृती म्हणजे बुद्धीला अनुसरून झालेली कृती. जेव्हा सद्‌गुणी कृतीत किंवा सद्‌गुणांना अनुसरणाऱ्या जीवनक्रमात माणसाचे श्रेयस म्हणजेच कल्याण असते, असे म्हणता येईल. ⇨सद्‌गुण दोन प्रकारचे असतात : नैतिक सद्‌गुण व बौद्धिक सद्‌गुण. बुद्धीला अनुसरून वासनांचे नियमन करणे, हे नैतिक सद्‌गुणांचे कार्य. बुद्धीला अनुसरून वासनांचे समाधान करणाऱ्या कृत्याचे सामान्य स्वरूप कसे असते? तर एखाद्या प्रवृत्तीचे किंवा वासनेचे अतिरेकी समाधान करणे किंवा अत्यल्प समाधान करणे, ह्या दोन टोकांमध्ये असलेला मध्य शोधून त्या प्रमाणात तिचे समाधान करणे म्हणजे सद्‌गुणाला किंवा बुद्धीला अनुसरून तिचे समाधान करणे. अशा रीतीने एखाद्या प्रवृत्तीच्या बाबतीत आत्यंतिक टोके टाळून मध्याची निवड करण्याची सवय असणे, म्हणजे विवक्षित नैतिक सद्‌गुण आपल्या ठिकाणी असणे. उदा., संकटांची मुळीच दिक्कत न बाळगणे म्हणजे बेछूटपणा आणि संकटांनी पूर्णपणे डगमगून जाणे व ती केवळ टाळण्याचाच प्रयत्‍न करणे म्हणजे भित्रेपणा. या दोन दुर्गुणांच्या, आत्यंतिक टोकांच्या, मधील मार्ग निवडण्यात धैर्य हा सद्‌गुण व्यक्त होतो. अशी योग्य निवड करीत राहिल्याने ती सवय आपल्याला जडते तो विवक्षित सद्‌गुण आपल्या अंगी बाणतो. ज्याप्रमाणे वासनांचे बुद्धीला अनुसरून नियमन करण्यात नैतिक सद्‌गुण व्यक्त होतात, त्याप्रमाणे बुद्धीच्या स्वत:च्या व्यापारात, शुद्ध बौद्धिक व्यापारात बौद्धिक सद्‌गुण व्यक्त होतात. वस्तूंच्या स्वरूपाचे, विशेषत: चिरंतन, अपरिवर्तनीय वस्तूंच्या स्वरूपाचे, ज्ञान करून घेणे, चिरंतन सत्यांचे चिंतन करणे, हा एक बौद्धिक सद्‌गुण आहे. ह्याला ॲरिस्टॉटल ‘सोफिया’ (ज्ञान) म्हणतो. उलट व्यवहारात योग्य काय आहे, हे ज्या बौद्धिक सद्‌गुणामुळे आपण निश्चित करू शकतो, त्याला ॲरिस्टॉटल ‘फ्रोनेसिस’ (शहाणपणा) म्हणतो. मानवी जीवनाचे साध्य काय, ह्या प्रश्नाचे उत्तर शहाणपण देत नाही कारण मानवी प्रकृतीपासून हे उत्तर स्वाभाविकपणे निष्पन्न होते. पण हे साध्य गाठण्यासाठी योग्य मार्गाची निवड करताना जो कार्याकार्यविवेक करावा लागतो, तो करण्यात शहाणपण व्यक्त होते. सोफिया किंवा ज्ञान हा सर्वश्रेष्ठ सद्‌गुण आहे कारण चिरंतन सत्यांचे चिंतन करण्यात माणूस ईश्वराच्या सर्वांत जवळ येतो.

राज्यात राहून आणि राज्याच्या कल्याणात भागीदार होऊनच व्यक्ती आपले कल्याण साधू शकते, हे आपण पाहिले. जीवनाच्या प्राथमिक गरजा भागविण्यासाठी व्यक्ती एकत्र येऊन कुटुंब बनते, कुटुंबे एकत्र येऊन जनपद बनते व जनपदे एकत्र येऊन राज्य (नगरराज्य) बनते. पण राज्य हा असा समूह आहे, की त्याच्यामध्ये जीवनाच्या गरजा तर भागविता येतातच पण चांगले जीवन, व्यक्तींच्या नैतिक व बौद्धिक सद्‌गुणांचा ज्यात उत्कर्ष होतो, असे जीवन जगणेही शक्य होते. चांगले जीवन जगावे, ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा असल्यामुळे, ती जिच्यात होते, ती राज्य ही संस्था एक नैसर्गिक संस्था आहे, असे मानले पाहिजे. ‘सोफिस्ट’ म्हणतात त्याप्रमाणे ती एक कुत्रिम, मानवी संकेतांवर आधारलेली संस्था नव्हे. त्याचप्रमाणे शहाणा माणूस स्वतंत्र, स्वयंपूर्ण असे जीवन जगू शकतो, एका राज्याचा नागरिक म्हणून त्याला जगण्याचे कारण नसते, हे ‘सिनिक’ मतसुद्धा चूक आहे. कुटुंबसंस्था नष्ट करून तिची कार्ये राज्याने स्वत: पार पाडावीत, राज्यकर्त्या वर्गातील व्यक्तींची खाजगी मालमत्ता असू नये, ह्या प्लेटोच्या मतांचे ॲरिस्टॉटलने खंडन केले आहे. कित्येक माणसे स्वाभाविकपणेच गुलाम असतात, कारण त्यांची मानसिक कुवत कनिष्ठ दर्जाची असते, ह्या भूमिकेवरून ॲरिस्टॉटलने गुलामगिरीच्या पद्धतीचे समर्थन केले आहे. सबंध राज्याचे साधारण हित साधू पाहणारे सरकार चांगले स्वत:चे व्यक्तिगत किंवा आपल्या वर्गाचे हित साधू पाहणार्‍या व्यक्तींनी चालविलेले सरकार विकृत किंवा वाईट. राज्यात कितीजण सत्ताधीश आहेत, या कसोटीवरून ॲरिस्टॉटल राज्यघटनांचे प्रकार पाडतो. एकच सत्ताधीश असेल व सत्तेचा वापर राज्याचे हित साधण्यासाठी तो करीत असेल, तर ती राजेशाही (मॉनर्की). राजेशाहीची विकृती म्हणजे निरंकुश शासन (टिरनी). कित्येक निवडक व्यक्तींच्या हाती सत्ता असणे म्हणजे उमरावशाही (ॲरिस्टॉक्रसी). तिची विकृती स्वल्पतंत्र शासन (ऑलिगार्की). अनेकांच्या हातात सत्ता असेल, पण ती राज्याच्या सामान्य हितासाठी वापरण्यात येत असेल, तर ते राज्य गणराज्य (पॉलिटी). त्याची विकृती लोकशाही (डेमॉक्रसी). राज्यपद्धतीच्या ह्या वेगवेगळ्या प्रकारांचे व त्यांच्या गुणदोषांचे वर्णन करताना ॲरिस्टॉटलची सूक्ष्म व भेदक दृष्टी प्रत्ययाला येते. आपल्या राज्यशास्त्रात नागरिकांच्या शिक्षणाचाही विचार ॲरिस्टॉटलने केला आहे.

काव्यशास्त्र : ज्याला आपण ‘सौंदर्यशास्त्र’ म्हणतो त्याचा विचार ॲरिस्टॉटलने केलेला नाही. त्याने काव्यशास्त्राचा आणि विशेषत: शोकात्मिकेचा विचार केला आहे. परंतु त्याच्या पोएटिक्स (काव्यशास्त्र) या ग्रंथामध्ये सौंदर्य आणि मानवी जीवनातील त्याचे स्थान, ह्याविषयीच्या त्याच्या भूमिकेसंबंधी काही सूचना मिळतात.

ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे अनुकृती करणे हे ललित कलांचे उद्दिष्ट असते आणि काव्यामध्ये ही अनुकृती शब्द, नाद आणि ताल ह्या साधनांच्या साहाय्याने करण्यात येते. (चित्रांमध्ये ती रंग, आकार, रेषा यांच्या साहाय्याने करण्यात येते). काव्यामध्ये कशाची अनुकृती करण्यात येते? तर मानवी कृतींची.  ही मानवी कृतींची अनुकृती जर केवळ कथनाने, शाब्दिक वर्णनाने करण्यात आली असेल, तर ते काव्य ‘एपिक’ (महाकाव्य) असते. उलट, कृतींच्या द्वारा ही अनुकृती करण्यात आली असेल, तर ते काव्य नाट्य असते. धीरगंभीर कृतींची अनुकृती करणारे कथनात्मक काव्य म्हणजे ‘एपिक’ आणि नाट्यात्म काव्य म्हणजे ‘ट्रॅजेडी’ (शोकात्मिका). क्षुद्र किंवा हीन कृत्यांची अनुकृती करणाऱ्या काव्याचे विकसित नाट्यरूप म्हणजे ‘कॉमेडी’ (सुखात्मिका).

काव्याच्या निर्मितीत आणि काव्याच्या आस्वादात आपल्याला जो आनंद लाभतो त्याचे स्वरूप काय? एक तर अनुकृती करण्यात आणि अनुकृती ओळखण्यात (उदा., हे चित्र कुत्र्याचे आहे, असे ओळखण्यात) आपल्याला आनंदाचा अनुभव येतो. हा ज्ञानानंद आहे पण ह्याशिवाय रंग, नाद, ताल ह्यांच्यात रमून जाण्याचीही आपली स्वाभाविक प्रवृत्ती असते. रंग, नाद, ताल इत्यादिकांत आनंद घेण्याची ही प्रवृत्ती म्हणजे सौंदर्यात आनंद घेण्याची प्रवृत्ती आहे, असे म्हणता येईल. प्रेक्षकांना उचित असा आनंद प्राप्त करून देणे हे नाटकाचे प्रयोजन आहे, असे ॲरिस्टॉटल म्हणतो. सजीव प्राण्याच्या घडणीमध्ये जशी सुव्यवस्थित रचना, एकता आढळते तशीच रचना, एकता नाटकाच्या किंवा सामान्यपणे काव्याच्या घडणीत असली पाहिजे मग ही घडण सुंदर असते व काव्यापासून लाभणारा उचित असा आनंद ह्या घडणीवर अवलंबून असतो, असे ॲरिस्टॉटलचे म्हणणे आहे. म्हणजे काव्यानंदात ज्ञनानंद व सौंदर्यानंद दोन्ही असतात. पण आणखी एक मुद्दा आहे : काव्यात किंवा नाटकात मानवी कृतींची अनुकृती केलेली असते ज्या कृतीची अनुकृती केलेली असते, तिचा काव्यात दाखविलेला विकास व परिपोष मानवी स्वभावावर आधारलेल्या नियमांना अनुसरून अपरिहार्यपणे झाला आहे, असे जर दाखविण्यात आले असेल आणि ती कृती एकात्म असेल, तर त्या काव्याची घडण सुव्यवस्थित व म्हणून सुंदर असते. इतिहासामुळे विवक्षित माणसे कोणत्या प्रसंगी कशी वागली हे कळते, तर काव्यात आपल्याला मानवी स्वभावाचे सार व त्याला अनुसरून अपरिहार्यपणे घडणाऱ्या मानवी कृती आढळतात. म्हणजे काव्यानंदाचे स्वरूप ज्ञानानंदाकडे परत झुकते.


काव्यानंदाच्या स्वरूपाचा विचार करताना ॲरिस्टॉटलने ट्रॅजेडीच्या अनुभवामुळे घडून येणाऱ्या मानसिक परिणामांचे जे स्वरूप दिग्दर्शित केले आहे, त्याचाही विचार केला पाहिजे. ट्रॅजेडीच्या दर्शनामुळे प्रेक्षकाच्या मनात करुणा आणि भीती हे भाव उत्तेजित होतात व त्यांच्यामुळे ह्या भावांचे विरेचन किंवा संशुद्धी (कॅथार्सिस) होते, असे ॲरिस्टॉटलने म्हटले आहे. ह्या प्रसिद्ध वचनाचा अर्थ दोन प्रकारे लावण्यात आला आहे. काही भाष्यकारांनी ‘कॅथार्सिस’ ह्या उपमेचा अर्थ धार्मिक विधी, संस्कार ह्यांच्या संदर्भात लावला आहे व ट्रॅजेडीच्या अनुवभवाने प्रेक्षकांच्या करुणा व भीती ह्या भावांची संशुद्धी होते, त्यांतील हीन अंश नष्ट होतो, असा लावला आहे. उलट कित्येकांनी ह्या उपमेचा अर्थ वैद्यकशास्त्राच्या संदर्भात लावला आहे व ट्रॅजेडीमुळे करुणा व भीती ह्या भावांचे विरेचन होते, म्हणजे हे भाव समूळ धुवून जातात असे नाही, तर प्रेक्षकांच्या अंतकरणातील ह्या भावांचा अतिरेक नाहीसा होतो व चित्ताला समधातता प्राप्त होते, असा केला आहे.

शास्त्रीय ज्ञान हे नेहमी वस्तूंच्या सामान्य स्वरूपाचे आणि हे सामान्य स्वरूप व्यक्त करणाऱ्या सामान्य नियमांचे असते विवक्षित वस्तूंच्या ठिकाणी विवक्षित गुण आहेत, एवढेच सांगणारे विधान शास्त्रीय ज्ञानात मोडत नाही. तेव्हा विवक्षित व्यक्ती विवक्षित प्रसंगी कशा वागल्या, हे सांगणाऱ्या इतिहासापेक्षा मानवी स्वभावाचे सामान्य स्वरूप  आणि त्यापासून निष्पन्न होणाऱ्या नियमांना अनुसरून अपरिहार्यपणे घडणाऱ्या कृतींचे दर्शन घडविणारी ट्रॅजेडी अधिक श्रेष्ठ आहे. प्लेटोच्या म्हणण्याप्रमाणे साहित्य किंवा एकंदरीत कलाकृती, म्हणजे ‘प्रतिकृतीची प्रतिकृती’ असते. तेव्हा कलाकृती मूळ वस्तूपासून दोन पावले दूर असते व म्हणून तिच्या अस्तित्वाचे स्वरूप हीन असते, असा प्लेटोचा कलेवर आक्षेप होता. परिपूर्ण आणि आदर्श असे माणसाचे स्वरूप, प्लेटोच्या परिभाषेत माणसाची ‘आयडिया’  हे संपूर्णपणे वास्तव असलेले मूळ अस्तित्व, इतिहासात होऊन गेलेला ॲल्सिबायाडीझ हा माणूस म्हणजे ह्या मूळ अस्तित्वाची अपूर्ण अशी प्रतिकृती आणि ॲल्सिबायाडीझवर रचलेल्या ट्रॅजेडीतील पात्र हे ह्या प्रतिकृतीची प्रतिकृती, ह्या आक्षेपाला ॲरिस्टॉटलच्या भूमिकेत उत्तर सापडते. ट्रॅजेडीतील पात्रामध्ये मानवी स्वभावाची सामान्य तत्त्वे अधिक परिपूर्णपणे प्रतिबिंबित झालेली असल्यामुळे, विवक्षित व्यक्तीच्या अस्तित्वापेक्षा ते त्याचे पात्ररूप अस्तित्व अधिक श्रेष्ठ दर्जाचे असते.

संदर्भ : 1. Allan, D. J. The Philosophy of Aristotle, London, 1952.

           2. Randall, J. R. Aristotle, New York, 1960.

           3. Ross, W. D. Aristotle, London, 1955.

           4. Ross, W. D. Ed. The Works of Aristotle, Translated into English, 12 Vols., Oxford, 1910–1952.

           ५. कंरदीकर, गो. वि. ॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र, मुंबई, १९५७.

रेगे, मे. पुं.