सुखवाद : (हीडॉनिझम). ⇨नीतिशास्त्रातील एक उपपत्ती. नीतिशास्त्र ज्यांची सोडवणूक करू  पाहते, अशा समस्या प्रामुख्याने चार आहेत : (१) मानवी जीवनाचे परमप्राप्तव्य कोणते? (२) स्वयंनिष्ठ मूल्य कशास आहे ? (३) युक्त अथवा प्रशस्त कर्म कोणते व त्याची युक्तता कशी ठरवायची ? (४) कर्तव्य कशास म्हणायचे आपले कर्तव्य कसे निश्चित करावयाचे?

ह्या प्रश्नांची उत्तरे देताना सुखवाद सांगतो : (१) सुख हेच माणसाचे परमप्राप्तव्य होय. माणसाने जगावयाचे ते सुखासाठीच. (२) स्वयंनिष्ठ मूल्य जर कशाला असेल, तर ते सुखालाच आहे. स्वयंनिष्ठ मूल्य म्हणजे ज्याचे प्रयोजन दुसऱ्या कशासाठी नाही, असे साध्यमूल्य. सुख का असावे, तर ते सुख आहे म्हणून. त्याच्यापासून आणखी काही निष्पन्न होते, अथवा व्हावे म्हणून नव्हे. याचाच अर्थ, सुखाचे मूल्य स्वयंनिष्ठ आहे आंतरिक आहे. (३) ज्यापासून जास्तीत जास्त सुख निर्माण होईल, तेच कर्म वा तीच कृती युक्त वा प्रशस्त होय. (४) आपले खरे कर्तव्य सुखाची जास्तीत जास्त निर्मिती करणे आणि दुःखाचे होईल तेवढे निर्दाळन करणे, हेच खरे.

सुखप्राप्तीचे महत्त्व सांगणारी विचारसरणी भारतात प्राचीन काळी चार्वाकांच्या ⇨लोकायतदर्शनाने मांडली होती. हे दर्शन इ. स. पू. सहाव्या शतकात सांगितले गेले. ॲरिस्टिपस (इ. स. पू. सु. ४३५– ३५६) ह्या ग्रीक तत्त्वज्ञाने सुख हे जीवनाचे अंतिम साध्य मानले. त्याचा सुखवादी पंथ ⇨सायरीनीइक्स पंथ  ह्या नावाने प्रसिध्द आहे. सुख हे शारीरिकच असते आणि ज्या क्षणी ते जाणवत असते, त्या क्षणीचे ते असते म्हणून चालू घटकेचे सुख हेच महत्त्वाचे होय फार दूरच्या सुखाचा माणसाने विचार करू  नये तसेच काव्यास्वादासारख्या सौम्य सुखापेक्षा इंद्रियोपभोगांचे तीव्र सुखच माणसाने पसंत करावे, असे ॲरिस्टिपसचे मत होते. त्यानंतरच्या काळात सुखवादी तत्त्वज्ञानाची शिकवण देणारा ग्रीक तत्त्वज्ञ म्हणजे ⇨एपिक्यूरस (३४१–२७०इ. स. पू.). ⇨एपिक्यूरस मता प्रमाणे सुखाची इच्छा ही निसर्गसिध्द असून सुख हेच जीवनाचे उद्दिष्ट होय. मात्र सौम्य, विदग्ध आणि दीर्घकाळ टिकणारी सुखे ही अधिक मोलाची असून त्यांच्यामुळेच मानवी जीवन कृतार्थ होते, असे ह्या पंथाचे प्रतिपादन होते. सतराव्या शतकात ⇨फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६) आणि ⇨टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) ह्यांच्याही लेखनात सुखवादी विचार आढळतात पण त्यांची व्यवस्थित मांडणी त्यांनी केलेली नाही. सुख हेच माणसाचे हित होय, हे ठरविण्याचा ⇨जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२), ⇨जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६–७३) आणि ⇨हेन्री सिज्विक (१८३८–१९००) ह्या इंग्रज तत्त्वज्ञांनी निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न केला. त्यांचे तत्त्वज्ञान ⇨उपयुक्ततावाद  ह्या नावाने ओळखले जाते. सुखाची प्राप्ती आणि दुःखाचा परिहार एवढयचसाठी माणसाची धडपड असावी असे निसर्गानेच ठरविले आहे असे बेंथॅमने मानले. सुखप्राप्ती आणि दुःखपरिहार ह्या दोन प्रवृत्तींच्या अधिराज्याखाली निसर्गतः माणसांचे व्यवहार चालत असल्यामुळे मानवी स्वभावातील ही बाब लक्षात घेऊनच शासनसंस्थेने कायदे करावे जनतेला जास्तीत जास्त सुख मिळावे, हेच कायदे करण्यामागील धोरण असावे, अशी त्याची धारणा होती. सुखाची मात्रा सारखीच असेल, तर काव्यानंद आणि एखाद्या पोरखेळातील आनंद ह्यांत फरक करू  नये, अशीही बेंथॅमची भूमिका होती. मिलने मात्र सुखासुखांमध्ये प्रकारभेद केला. मिठाई खाण्याचे सुख कितीही मोठे असले, तरी काव्यास्वादाचे सुख त्याहून वरच्या प्रतीचे आहे, असे मिलचे म्हणणे होते. हेन्री सिज्विक ह्याने निर्भेळ सुखवादाचा पुरस्कार केला.

सुखवादाचे दोन प्रकार सांगता येतील : (१) मानसशास्त्रीय सुखवाद, (२) नैतिक सुखवाद. मानसशास्त्रीय सुखवादानुसार मनुष्य नेहमीच आणि निसर्गतःच सुखाच्या मागे लागलेला असतो आणि दुःखाला टाळीत असतो. इच्छेला सुख (आणि दुःखाचा अभाव) ह्याशिवाय आणखी कोणताच विषय असू शकत नाही.

 

मानसशास्त्रीय सुखवादावर पहिला आक्षेप असा घेता येतो, की मनुष्य निसर्गतःच सुखाच्या मागे लागलेला असतो आणि प्रत्येक कृती सुखप्राप्तीसाठीच करतो असे म्हणता येत नाही. माणसाच्या फारच थोड्या कृती विचारपूर्वक केलेल्या असतात. अनेकदा विकाराधीन होऊन तो वागत असतो. एखादा माणूस संतापाच्या भरात कोणाला अपशब्द बोलतो, तेव्हा त्याचे परिणाम सुखकारक होतील, की दुःखकारक ह्याचा विचार तो करीत नाही.

सुखाखेरीज अन्य कोणत्याही विषयाकडे माणसाची इच्छा धावत नाही, असे प्रतिपादताना सुखाची एक चुकीची व्याख्या गृहीत धरली जाते. आपण ज्याची इच्छा करतो, तेच आपले सुख होय असा पवित्रा घेतला जातो. परंतु ‘क्ष ह्या वस्तूची मी इच्छा करतो’ आणि ‘क्ष ही वस्तू मिळाल्याने मला सुख होते’ही एकाच मानसिक घटनेची भिन्न वर्णने होत अशी भूमिका घेतली जाते तथापि विशिष्ट सुखाच्या परिमाणाचे मापन करताना त्याच्या कोणत्या परिमिती ध्यानात घ्याव्या लागतील ह्याचाही बेंथॅमने विचार केला. दोन सुखांपैकी एक निवडावयाचा प्रसंग आल्यास व्यक्तीने सौम्य सुखापेक्षा तीव्र सुख, कमी वेळ टिकणाऱ्या सुखापेक्षा अधिक वेळ टिकणारे सुख, अनिश्चिततेऐवजी निश्चित, दूरच्यापेक्षा जवळचे, ज्याच्यातून पुढे अधिक सुखे निर्माण होतील आणि ज्यात दुःखाची भेसळ कमी असेल असे सुख पसंत करावे, असे त्याचे म्हणणे आहे.

बेंथॅमचे आणखी म्हणणे असे, की दोन सुखांमध्ये गुणात्मक भेद नसतो परिमाणात्मक (म्हणजे लहानमोठेपणाचा) भेद असू शकतो. कविता वाचण्याचे सुख आणि पत्ते खेळण्याचे सुख ह्यांत गुणवत्तेच्या दृष्टीने फरक करता येत नाही.

सुखवादी उपयुक्ततावादाला मिलने अधिक प्रगल्भ व उन्नत स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. माणसाला केवळ सुखाची इच्छा असते त्यामुळे सुख हेच व्यक्तीचे इष्ट किंवा तिचे योग्य असे साध्य असते आणि ज्या कृत्यापासून एकंदरीत अनिष्ट परिणामांपेक्षा इष्ट परिणाम अधिक घडून येत असतील, तर ते कृत्य योग्य ही भूमिका मिलने स्वीकारलेली आहे. ह्या निकषात अभिप्रेत असलेले सुख संबंधित कृत्य करणाऱ्या व्यक्तीचे आहे परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन मिल असे सांगतो, की ज्याअर्थी प्रत्येक माणसाचे जास्तीत जास्त सुख हे त्याचे परमप्राप्तव्य होय, त्या अर्थी

सर्व माणसांचे जास्तीत जास्त सुख हे सर्वांचेच परमप्राप्तव्य होय.

प्रत्येक माणसाला केवळ सुखाचीच इच्छा असते, हा अपसिद्घान्त कसा, हे वर एके ठिकाणी स्पष्ट केले आहे. शिवाय एखाद्या गोष्टीची इच्छा केली जाते ह्यावरून एवढेच सिद्घ होते, की तिची इच्छा करता येणे शक्य आहे पण यावरून तिची इच्छा करणे योग्य आहे, असे सिद्घ होत नाही. तसेच एखादी गोष्ट, तिची इच्छा करावी अशी असणे ह्याचा अर्थ तिला काही मूल्य आहे, चांगलेपणा आहे असा होतो. ⇨जी. ई. मुर  ह्या तत्त्वज्ञाच्या मताप्रमाणे वस्तूचा चांगलेपणा हा तिचा एक अभौतिक गुणधर्म आहे. कोणत्याही भौतिक धर्मापासून तो निष्पन्न करता येत नाही. इच्छा केली जाणे ही भूतसृष्टीत घडणारी एक घटना आहे. तिच्यापासून इष्टता हा गुणधर्म निष्पन्न करू पाहण्यात प्राकृतिकधर्म-तर्काभास (नॅचरॅलिस्टिक फॅलसी) हा तर्कदोष आहे. ही भूमिका घेऊन ‘माणूस सदैव सुखाची इच्छा करतो’ असे सांगितल्याने आपण वस्तुतः काहीच सांगत नाही. ‘जे मी इच्छितो, त्याचीच मी इच्छा करतो’ असे म्हटल्यासारखे होते. असा प्रसंग येतो, ह्याचे कारण विचारातील आणखी एक घोटाळा आहे. इच्छित वस्तू प्राप्त झाली म्हणजे आपणास सुख प्राप्त होते, हे खरे असले, तरी ह्याचा अर्थ असा नव्हे, की आपण सुखाची इच्छा करतो. तहान लागल्यावर पाणी प्यायल्याने सुख होईल. पण इच्छा असते, ती पाण्याविषयी सुखाविषयी नव्हे.


नैतिक सुखवादाचे असे म्हणणे आहे, की माणसाने सुखाच्या मागे जावे, हे उचित आहे. पण ह्या संदर्भात माणसाचे वर्तन कसे असते हे सांगण्याऐवजी ते कसे असावे हे नैतिक सुखवाद सांगू पाहतो.

नैतिक सुखवादाचे दोन भाग होतील : (१) व्यक्तिसुखवाद, (२) समष्टिसुखवाद. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या सुखासाठी झटावे असे व्यक्तिसुखवाद मानतो. आत्यंतिक अर्थाने व्यक्तिसुखवादाचा स्वीकार क्वचितच केला जाईल. बेंथॅम आणि मिल ह्या उपयुक्ततावाद्यांनी ‘अधिकात अधिक लोकांचे अधिकात अधिक सुख’ हे सूत्र सांगितले. अधिकतम सुख आणि अधिकतम लोकांचे सुख ह्यांत विरोध आल्यास अधिकतम लोकांच्या सुखाची निवड करावी, असेही ह्यात सूचित आहे.

सुख हे मोजता येते सुखदुःखांची बेरीज-वजाबाकी करता येते असे गृहीत धरून बेंथॅमने कृत्यांची योग्यायोग्यता ठरविण्याचा विचार मांडला. एखाद्या कृत्याची योग्यायोग्यता ठरविण्यासाठी त्याचे सर्व संबंधितांवर जे सुखदुःखांचे परिणाम होतील त्यांतील सुखांची बेरीज करायची दुःखांचीही बेरीज करायची नंतर सुखांच्या बेरजेतून दुःखांची बेरीज वजा करायची आणि ह्यातून जे सुख वा दुःख शिल्लक उरेल त्याला ‘शिलकी सुख’ वा ‘शिलकी दुःख’ म्हणायचे. एखाद्या विशिष्ट प्रसंगी करावयाच्या कृतींचे जे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतात, त्यांतील ज्या कृत्याचा परिणाम म्हणून सर्वांत अधिक शिलकी सुख किंवा सर्वांत कमी शिलकी दुःख अस्तित्वात येते, ते कृत्य त्या प्रसंगातील योग्य कृत्य होय. एखादे कृत्य नैतिकदृष्ट्या योग्य आहे, की नाही हे त्या कृत्याच्या स्वरूपावरून ठरत नाही, तर ते त्याच्या सुखदुःखात्मक परिणामांवरून ठरते. हे परिणामही केवळ त्या कृत्याच्या कर्त्याला भोगावे लागणारे परिणाम नव्हेत ते परिणाम ज्यांना ज्यांना भोगावे लागतील त्यांच्या सुखदुःखांचा विचार सुखदुःखांची बेरीज-वजाबाकी करताना करावा लागेल. ज्या कृत्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधते ते कृत्य योग्य होय.

 

दोन सुखांमध्ये गुणात्मक भेद नसतो, ही बेंथॅमची भूमिका मिलने नाकारली. असा गुणात्मक भेद असतो आणि गुणवत्तेच्या दृष्टीने उच्च प्रतीचे असलेले लहान सुख कनिष्ठ गुणवत्तेच्या मोठ्या  सुखापेक्षा अधिक इष्ट असते, असे त्याने प्रतिपादिले. पण सुखाचे उच्चनीच असे प्रकार केल्याने सुखवादच सोडावा लागतो. एखादे सुख उच्च आहे, याचा अर्थ त्याचे मूल्य अधिक आहे. म्हणजेच सुखाचे मूल्य त्याच्या सुखत्वावर अवलंबून नसून अन्य कशाने तरी ते ठरते. अर्थात सुख= मूल्य हे सुखवादाचे प्रमेय लटके पडते. सर्व माणसांचे जास्तीत जास्त सुख सर्वांचेच परमप्राप्तव्य ह्या म्हणण्यातही दोष आहे. सुखे एकमेकांत मिसळता येत नाहीत. सर्वांच्या सुखाची कदाचित बेरीज करता आली, तरी ती बेरीज म्हणजे कोणत्याही एका व्यक्तीचे सुख असे म्हणता येणार नाही.

हेन्री सिज्विक ह्याने बुद्घिनिष्ठ सुखवाद सांगितला. मनुष्य सुखाखेरीज अनेक गोष्टींची इच्छा करीत असतो, हे त्याने मान्य केले पण तसे करणे हे बुद्घीला पटणारे नाही, असेही त्याचे प्रतिपादन आहे. माणसाने शांत चित्ताने, तटस्थतेने विचार केल्यास सुख ही एकच गोष्ट प्राप्तव्य आहे हे त्याला कळेल, असे त्याचे म्हणणे आहे. सुखाचे स्वयंनिष्ठ मूल्य कळते, ते इंद्रियांना नव्हे तर प्रज्ञेला, वा प्रातिभज्ञानाला (इंटयूइशन )  असे तो म्हणतो. समाजातही असे दिसते, की ज्या प्रकारच्या कृतीने मानवी सुखाची अभिवृद्घी होते, त्या प्रशस्त मानल्या जातात व ज्यांनी माणसांच्या दुःखात भर पडेल अशा कृती अयुक्त अथवा अप्रशस्त मानल्या जातात. अशा प्रकारे सुखाचे स्वयंनिष्ठ मूल्य मान्य केल्यावर बुद्घीकडून आणखी तीन तत्त्वे प्राप्त होतात : (१) बुद्घिनिष्ठ स्वहितप्रेम. व्यक्तीने स्वतःच्या जास्तीत जास्त सुखासाठी प्रयत्न करावा. असे करताना समान परिमाण असलेले, ताबडतोब मिळणारे सुख आणि कालांतराने मिळणारे सुख ह्यांचे मूल्य सारखेच समजले पाहिजे. (२) बुद्घिनिष्ठ परहितैषणा हे दुसरे तत्त्व. सुखाला जर स्वयंनिष्ठ मूल्य असेल, तर ते सुख कोणी उपभोगले हा मुद्दा गैरलागू होय. समान परिमाणाचे सुख माझे असो, माझ्या मित्राचे असो वा शत्रूचे असो. त्याचे मूल्य समानच मानले पाहिजे. (३) तिसरे तत्त्व न्याय. एखादे कृत्य मी करणे योग्य असेल, तर परिस्थितीत महत्त्वाचे फरक नसल्यास इतर कोणीही ते कृत्य करणे योग्यच ठरले पाहिजे. मी आणि अन्य एखादी व्यक्ती भिन्न माणसे आहोत, एवढ्या वरून मला जे योग्य ते तिला अयोग्य ठरणार नाही. ह्या तिन्ही तत्त्वांच्या आधारे एकंदर सिद्घांत तयार होतो तो असा : कोणत्याही वेळी ज्या अनेक कृती मी करू शकतो, त्यांपैकी ज्या कृतीमुळे मानवजातीच्या सुखात जास्तीत जास्त भर पडेल अशी कृती मी करावी. वरीलपैकी कोणत्याही रीतीने सुखवादाची मांडणी केली, तरी त्यावर पुढील आक्षेप घेता येतात : (१) ‘जास्तीत जास्त सुख’ ह्या शब्दप्रयोगाला अर्थ नाही. सुखे एकमेकांत मिसळत नाहीत. पहिले सुख भोगून झाल्यावर विरघळून जाते व तेथे दुसरे आले, की ते पहिलेच ठरते. उपभुक्त सुखांचा संग्रह होऊ शकत नाही अशी टीका चिद्‌वादी इंग्रज तत्त्वज्ञ ⇨टी. एच्. ग्रीन  (१८३६–८२) ह्याने केली आहे. (२) सुख हा एक अमूर्त भाव आहे. मूर्त अनुभवाचे ते नाव नव्हे. चहा पिण्यात सुख असेल, संगीत ऐकण्यात सुख असेल, पण त्या त्या प्रत्यक्ष घटना वगळून त्यांत अनुस्यूत असलेल्या नुसत्या सुखाची कल्पनाही करता येणार नाही, सुख नावाचा मूर्त पदार्थ नसल्याने त्याचा पाठलाग करता येणार नाही. असा आक्षेप ब्रिटीश तत्त्ववेता ⇨फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅली  ह्याने घेतला आहे. (३) सुखाची वाटणी कशी करावयाची हाही प्रश्न येतो. अशी एखादी परिस्थिती असेल, की सुख सर्वांना सारखे वाटावयाचे म्हटल्यास सुखाची एकंदर बेरीज कमी होईल पण विषम वाटणी केल्यास त्यात व्यक्तीवर अन्याय होईल. व्यक्तीस न्याय द्यावयाचा, असे नैतिक बंधन मानल्यास सुखवाद सोडून द्यावा लागतो. (४) सुखवाद प्रमाण मानून व्यवहारात त्याचे आचरण करावयाचे झाल्यास सुखाचे गणन अथवा मोजमाप करावे लागेल. निरनिराळ्या सुखांची बेरीज करून तिच्यातून दुःखांची बेरीज वजा करावी लागेल. हे करणे जवळ-जवळ अशक्य आहे कारण एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा किती कमी किंवा किती अधिक आहे, हे सांगता येणार नाही. तसेच सुख हा वैयक्तिक अनुभव असल्याने एकाच बाह्य पदार्थापासून निरनिराळ्या व्यक्तीस कमीजास्त सुखाचा लाभ होईल आणि त्यामुळे त्याचे मापन कोणालाच करता येणार नाही.

संदर्भ : 1. Bentham, J. An Introduction to the Principles of Morals and  Legislation, Oxford, 1789.

            2. Brandt, R. B. A Theory of Good and the Right, Oxford, 1979.

            3. Gosling, J. C. B. Pleasure and Desire, Oxford, 1969.

           4. Gosling J. C. B. Taylor, C. C. W. The Greeks on Pleasure, Oxford, 1982.

           5. Moore G. E. Principia Ethics, Cambridge, 1903.

           6. Sidgwick, H. The Methhods of Ethics, London, 1907. 

दीक्षित, श्री. ह.