क्रिस्तीआन फोन व्होल्फ

व्होल्फ, क्रिस्तीआन फोन : (२४ जानेवारी १६७९ – ९ एप्रिल १७५४). प्रबोधनकाळातील प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञ. जर्मनीमधील ब्रेसलौ शहरी जन्म. येना विद्यापीठात धर्मशास्त्राचे अध्ययन. मात्र विचारांचा ओढा गणितशास्त्राकडे, तर्कशास्त्राकडे, विवेकवादाकडे. हाल विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक (१७०७). पुढे बर्लिन अँकँडेमीमध्ये नियुक्ती (१७११). विरोधकांच्या कारवायांमुळे तेथून बाहेर पडावे लागले (१७२३). मारबर्गच्या कॅल्व्हिनिस्ट विद्यापीठात गणित व तत्त्वज्ञान विषयांचे प्राध्यापक (१७२३). हाल विद्यापीठात कायदा विषयाचे प्राध्यापक म्हणून पुनरागमन (१७२४). त्याच विद्यापीठात पुढे कुलगुरू.

त्यांची चिंतनसरणी संकलनात्मक होती. स्वयंसिद्ध अशा आद्य गृहीतकांपासून अन्य सारे सिद्धांत निष्कर्षित करता येतात अपरिहार्य (नेसेसरी) तत्त्वांपासून शक्यतेचे पर्याय निष्पन्न होतात ज्ञात झालेल्या सत्य विधानांपासून अन्य अज्ञात सत्य विधाने प्राप्त करता येतात, असे त्यांच्या चिंतनसरणीचे स्थूल स्वरूप सांगता येईल.

व्होल्क यांच्या मते सगळ्या शास्त्रांमधील विचारसरणी तर्कशास्त्रावर अवलंबून असते. ‘तदेवते’ चा (आयडेंटिटीचा) सिद्धांत आणि ‘पर्याप्त कारणा’ चा (सफिशंट रीझन) सिद्धांत या दोन तर्कशास्त्रीय सिद्धांतांवर इतर सगळ्या शास्त्रीय उपपत्ती आधारलेल्या आहेत. तदेवतेचा सिद्धांत हा सर्व मानवी ज्ञानाचा पाया आहे तर पर्याप्त कारणाचा सिद्धांत हा सगळ्या विज्ञानांचा व मानव्यविद्यांचा पाया आहे. तर्कप्रिय मानवी बुद्धी ही अनुभवविश्वात निरतिशय प्रभावशाली ठरते. बाह्य जगातील सगळी वस्तुस्थिती बुद्धीच्या व्यापारांशी मिळते घेत असते.

व्होल्फ यांच्या भूमिकेनुसार, तर्कशास्त्रनिष्ठ तत्त्वज्ञानाचा अथवा अध्यात्माचा आवाका विशाल आहे. अध्यात्माचे साह्य घेतल्याने सगळ्या ज्ञानशाखांना सत्याचे अधिष्ठान प्राप्त होते. सर्व मानवी व्यवहारांना प्रेरणादायी आधार प्राप्त होतो. मध्ययुगीन ख्रिश्चन विचारवंतांप्रमाणे व्होल्फ हे ईश्वरवादी होते. विश्व हे ईश्वरनिर्मित आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता.

हे विश्व जडवस्तू आणि चिततत्त्व या दोन परस्परभिन्न तत्त्वांचे बनले आहे, ही ⇨रने देकार्तची शिकवण त्यांना मान्य होती. देकार्ता यांनी जडवस्तूच्या ठायी नुसता व्यापकतेचा (एक्स्टेंन्शन) प्रधान गुणधर्म असतो, असे म्हटले होते. तथापि व्होल्फ यांच्या मते, जडवस्तूच्या ठायी व्यापकतेसोबत शक्तीही (फोर्स) वास करते.

तसेच, जडवस्तु-स्वरूप मानवी देह आणि चित्स्वरूप मानवी आत्मा यांच्यात जी आंतरक्रिया घडत असलेली आपणास भासमान होते, ती पूर्वप्रस्थापित सुसंवादामुळे होते, हे ⇨लायप्निट्सचे मत व्होल्फ यांना मान्य होते तथापि जडवस्तू आणि चिततत्त्व या दोहोंत केवल अंशात्मक भेद असतो, हे लायप्निट्सचे म्हणणे त्यांना मान्य नव्हते. म्हणजेच जी प्रतिबिंब क्षमता चिततत्त्वामध्ये प्रकर्षाने नांदते, ती जडवस्तूमध्येही प्रसृतरीत्या असते, हा लायप्निट्सचा दावा व्लोल्फ यांना मान्य नव्हता. जडवस्तू प्रतिबिंबन करू शकत नाही असे व्होल्फ यांचे सांगणे आहे.

व्होल्फ यांच्या मते, सर्वज्ञ ईश्वराने मुक्त संकल्पाद्वारे निवडलेले व सर्वशक्तीमानतेने निर्मिलेले हे जग सर्वोत्कृष्टच आहे. येथल्या सगळ्या घडामोडी ईश्वरी उद्दिष्टे साधण्याजोग्या असतात. सगळ्या सजीव-निर्जीवांच्या क्रिया-प्रक्रिया कल्याणकारी ईश्वरी योजनेनुसारच घडतात. दिककालामधला जगतपसारा आपोआप यांत्रिकरीत्या उदभवलेला नाही. हे सारे ईश्वराचे अद्वितीय कर्तृत्व आहे. त्यानेच येथल्या सुव्यवस्थेची आखणी केली. त्याच मार्गाने जगाचे रहाटगाडगे यांत्रिकरीत्या चालले आहे. येथे जे गतीचे नियम प्रत्ययास येतात, ते ईश्वराज्ञेनुसारच अमलात येतात.

मानवी नीतिनियम आणि कायदेकानून हे मानवनिर्मित आहेत, ईश्वरदत्त नाहीत. सगळेच नीतिनियम धर्मग्रंथांतून घेतलेले नसतात. ते मानवी विवेकबुद्धीने संशोधिलेले असतात. जेव्हा विषयासक्त इंद्रिये विवेकबुद्धीवर अंमल गाजवितात, तेव्हा ‘पाप’ उदयास येते. तथापि, मानवास संकल्पस्वातंत्र्य असल्याने माणसाची विवेकबुद्धी इंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकते. राज्यशास्त्र हे नीतिशास्त्रावरच आधारलेले असते, ते व्यक्तीच्या निसर्गदत्त हक्कांचा सामाजिक निर्बंधांशी सुयोग्य मेळ घालते.

व्होल्फ यांनी मानसशास्त्राची दोन रूपे कल्पिली होती : (१ ) बुद्धिनिष्ठ मानसशास्त्र आणि (२ ) अनुभवनिष्ठ मानसशास्त्र. बुद्धिनिष्ठ मानसशास्त्र हे अध्यात्माच्या अंगाने आत्म्याचे अध्ययन करते. तदनुसार, आत्मा हे जडेतर मूलद्रव्य असून ते निरवयव आणि अविनाशी आहे. विश्वाचे प्रतिबिंब आपल्या ठायी उमटविण्याची क्षमता आत्म्यात असते. आत्मा संकल्पस्वातंत्र्यशाली आहे. तसाच तो ज्ञानप्राप्ती तशीच ज्ञानवुद्धी करू शकतो. अनुभवनिष्ठ मानसशास्त्र हे अंतर्निरीक्षणाद्वारे आत्म्याच्या कार्यशक्तीचे अध्ययन करते. आत्म्याच्या कार्यशक्ती द्विविध आहेत : (१) आकलनात्मक (कॉग्निटिव्ह) शक्ती आणि (२) इच्छा-संकल्पात्मक (कोनेटिव्ह) शक्ती. आत्म्याच्या आकलनात्मक शक्तींमध्ये ज्ञानेंद्रिय-शक्तींचाही समावेश होतो. सगळे ज्ञान ज्ञानेंद्रियांच्या मर्गानेच निष्पन्न होते. इच्छा– संकल्पात्मक शक्तींमध्ये सुख-दुःखादी भावनांचा अंतर्भाव होतो.

अतिशय शिस्तप्रिय आणि पद्धतशीर विचारवंत म्हणून व्होल्फ यांची ख्याती होती. त्यांचे ग्रंथ जर्मनीमधल्या विद्यापीठांत पाठ्यपुस्तके म्हणून अभ्यासले जात. त्यांनी जर्मन भाषेत तत्त्वचिंतनास उपयोगी आणि वैज्ञानिक संशोधनास अनुरूप अशी नवी परिभाषा तयार केली. याशिवाय लायप्निट्स यांचे लॅटिन व फ्रेंच भाषांतील लेखन जर्मन भाषेत आणून त्याचे व्यवस्थितपणे संपादन केले.

विवेकवाद आणि ⇨ अनुभववाद या दोन तत्कालीन परस्परविरोधी चिंतनप्रवृत्तींमध्ये समन्वय कसा करता येईल, या दृष्टीने बौद्धिक प्रयास करावयास त्यांनी जर्मन अभ्यासकांस उत्तेजन दिले. परिणामतः त्यांच्या पश्चात इमॅन्युएल कांट यांचे चिकित्सक तत्त्वज्ञान उदयास आले. त्यांनी तत्कालीन शास्त्रांचे तात्त्विक (अध्यात्म, विश्वरचनाशास्त्र, मानसशास्त्र, धर्मशास्त्र इ.) असे वर्गीकरण केले. तर्कशास्त्राला ते शास्त्राध्ययनाचे प्रवेशद्वार मानत.

व्होल्फ यांच्या विचारसरणीची झेप अतिशय व्यापक होती. पण ती नवनिर्मितिक्षम नसून प्राधान्याने सर्वसंग्राहक होती. निसर्गसृष्टीच्या व्यापारांत कार्यकारणभावांचे अधिराज्य चालते, असे व्होल्फ यांचे प्रतिपादन होते. त्याचसोबत सृष्टीतल्या सजीव प्राण्यांच्या क्रियांत उद्दिष्टपूर्ती होत असते, असेही मत त्यांनी मांडले. परंतु कार्यकारणभाव आणि उद्दिष्टपूर्ती या दोहोंत मेळ कसा बसवायचा, याचा खुलासा त्यांच्या लिखाणात सापडत नाही. त्यांनी मध्ययुगीन ईश्वरवादास अवास्तव महत्त्व दिले. म्हणून त्यांची गणना (डॉग्मॅटिक) पंडितांत होते. त्यांनी लायप्निट्सच्या प्रणालीला सुसूत्रता मिळवून दिली. परंतु या प्रयत्नात तिचा आत्माच हरवला. मानसशास्त्रात त्यांनी व्यक्तिगत विभिन्नतेकडे खूपच दुर्लक्ष केले.

Philosophia Rationalis Sive Logica (१७२८), Philosophia Prime, Sive Ontologia (१७२९), Cosmologia Generalis (१७३१) व Theologia Naturalis (२ खंड, १७३६) हे व्होल्फ यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या समग्र लेखनाचा एक बृहत प्रकल्प जवळजवळ पूर्ण होत आलेला असून त्यामध्ये २९ जर्मन, ४१ लॅटिन आणि ३९ इतर असे एकूण १०९ स्वतंत्र खंड आहेत.

हाल, प्रशिया येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ : 1. Gerlach, H.M. schenk, G Thaler, B.Ed. Ghristion Wolf as Philosopher of the Enlighterment in Gernmany, Halle, 1980.

           2. Utilz, Email, Christian Wolf, Halle, 1929.

केळशीकर, शं. हि.