वैशेषिक दर्शन : ‘ दर्शन’ या शब्दाचा या संदर्भात तत्वज्ञान असा अर्थ आहे. सहा आस्तिक दर्शनांपैकी हे एक दर्शन आहे. याचे मूळ प्रणेते ⇨कणाद महर्षी होत. विश्व अणूंचे बनलेले आहे, हा या दर्शनाचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. एक घट दुसऱ्या घटाहून भिन्न असतो, याचे कारण त्यांचे अणू निराळे असतात. पण एक अणू दुसऱ्या अणूहून भिन्न कसा?–याचे उत्तर त्या प्रत्येकाच्या ठिकाणी एक विशेष असतो हे आहे. ‘विशेष’ हा स्वतंत्र पदार्थ मानला म्हणून या दर्शनाला ‘वैशेषिक’ दर्शन असे नाव आहे.

विश्वात एकूण किती पदार्थ आहेत, असा प्रश्न त्यांनी तत्त्वचिंतक या नात्याने विचारला. पदार्थ म्हणजे ‘जे जे शब्दाने वाच्य आहे ते ते म्हणजेच जे काही आहे ते’ एकूण सर्व. कणादांच्या सूत्रात सहा पदार्थ सांगितले आहेत. पण पुढे ‘अभाव’ या सातव्या पदार्थाची भर घातली. कारण ‘नसणे’ यालाही अर्थ आहेच. ते सात पदार्थ म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामन्य, विशेष, समवाय आणि अभाव हे होत. कणाद महर्षींनी आपले तत्त्वज्ञान सूत्ररूपांनी सांगितले. त्या कणादसूत्रांवर प्रशस्तपाद या आचार्यांनी भाष्य लिहिले. त्या भाष्यावर ⇨उदयनाचार्यांची किरणावली आणि श्रीधराचार्यांनी न्यायकंदली अशा टीका आहेत. न्यायसूत्र हा दर्शनग्रंथ वैशेषिक दर्शनाशी विसंगत नाही. वैशेषिक दर्शन आणि न्यायदर्शन ही परस्परसुसंगत अशी दर्शने आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांचे बरेचसे सिद्धांत समान आहेत. त्या दोहोंचा उल्लेख पुष्कळदा ‘द्वे तर्के’ असा होतो.

वर निर्दिष्ट केलेल्या सप्त-पदार्थांचे स्पष्टीकरण असे : द्रव्य म्हणजे कार्याचे उपादानकारण होय. ज्याचे कार्य बनते, ते उपादान होय. उदा., मातीचा घट बनतो म्हणून मातीचे घट हे उपादानकारण होय. कुलाल’ म्हणजे कुंभार हा निमित्तकारण होय आणि मातीची जुळणी हे असमवायी कारण होय आणि माती हे उपादानकारण म्हणजे समवायी कारण होय. गुणांचा अथवा/आणि कर्माचा आश्रय म्हणजे द्रव्य असेही म्हणया येते. श्वेत या गुणाचा आश्रय दुग्ध हे द्रव्य होय. वायू हे द्रव्य गमन या कर्माचा आश्रय होय.

हे द्रव्य नऊ प्रकारचे आहे. पृथीवी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक, आत्मा, आणि मन अशी नऊ द्रव्ये आहेत. या द्रव्यांचे निरनिराळे गुण आहेत.

द्रव्यांचे हे गुण चोवीस प्रकारचे आहेत. रूप, रस, गंध, स्पर्श, संख्या परिणाम, पृथकत्व, संयोग, विभाग, परत्व, अपरत्व, सुरूत्व, द्रवत्व, स्नेह, शब्द, बुद्धी, सुख, दु:ख, इच्छा, द्वेष, प्रयत्न, धर्म, अधर्म, संस्कार असे हे चोवीस गुण होत.

द्रव्य व गुण यानंतरचा तिसरा पदार्थ म्हणजे कर्म होय. उत्क्षेपण (वर फेकणे), अपक्षेपण (खाली फेकणे), आकुंचन (संकुचित करणे), प्रसारण (पसरणे) व गमन ही पाच कर्मे होत.

सामान्य हा चौथा पदार्थ, जे अनेक ठिकाणी राहते पण एक असते आणि नित्य असते ते सामान्य होय. गोत्व हे सामान्य अनेक गायीत असते, ते तेच असते आणि गायी जन्मल्या अथवा मेल्या तरी त्यांच्याबरोबरच ते जन्मत व मरत नाही. सगळ्या अश्वांवर अश्वत्व हा धर्म राहतो म्हणून ते सामान्य.

पाचवा पदार्थ विशेष होय. सगळी अविनाशी म्हणजे नित्य द्रव्ये ही विशेषयुक्त असतात. म्हणजे त्यांचा वेगळेपणा कायम राहतो. म्हणून हा वेगळेपणा वैशेषिक दर्शनातील महत्त्वाचा पदार्थ आहे. म्हणून वैशेषिक दर्शन हे नाव या तत्त्वज्ञानाला प्राप्त झाले.

समवाय हा सहावा पदार्थ. चार पाय व वरची फळी हे टेबलाचे अवयव होत पण हे अवयव काढून घेतले तर टेबल म्हणून निराळे काही दाखवता येणार नाही. मोगरीचे फूल या द्रव्याचा पांढरा रंग हा गुण आहे पण तो गुण त्या द्रव्याहून वेगळा असा दाखविता येणार नाही. धावणाऱ्या माणसाची गती (कर्म) त्याच्याहून निराळी अस्तित्त्वात असत नाही, गायीपासून गोत्व वेगळे करता येत नाही आणि समोरचा घट ज्या पृथ्वी-अणूपासून बनलेला आहे, त्या प्रत्येक अणूवर राहणारा विशेष त्यापासून वेगळा करता येणार नाही. या जोड्या अयुतसिद्ध आहेत. त्यांपैकी किमान एक गोष्ट अशी आहे की ती दुसऱ्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्यात समवाय हा संबंध राहतो. तर्कतः ज्या गोष्टी भिन्न आहेत त्यांना व्यवहारात: भिन्नपणे दाखविता येत नाही, याची उपपत्ती देण्यासाठी समवाय हा पदार्थ मानला आहे.

सातवा पदार्थ अभाव होय. तो चार प्रकारचा आहे. प्रागभाव, प्रध्वंसाभव, अत्यंताभव आणि अन्योन्यभाव. प्रागभाव म्हणजे पदार्थ उत्पन्न होण्याच्या आगोदर नसणे. आंब्याच्या वृक्षाला फळ लागायच्या आगोदर आंब्याचा प्रागभाव असतो. आंबा खाल्यानंतर त्याचा ध्वंस झाला, असे म्हणता येते. हा अभाव म्हणजे नाश. भूतलावर घट नाही. अशा वेळी ‘भूतले घटोनास्ति’ असा निर्देश होतो. हा घटभाव घटात्यंताभाव होय. वायूला रंग नसतो. म्हणून वायूवर रूपाभाव आहे, असे आपण म्हणतो. हा रूपाभाव अत्यंताभाव होय. घट हा पट नव्हे आणि पट हा घट नव्हे, गोविंद हा राम नव्हे आणि राम हा गोविंद नव्हे. यास अन्योन्याभाव म्हणतात. अन्योन्याभावाला संस्कृत-मराठीत भेद हा शब्द आहे. अशी ही वैशेषिक दर्शनाची सप्त-पदार्थी होय. पृथ्वी, जल, तेज व वायू ही स्थूल द्रव्ये व त्यांची विविध मिश्रणे आणि संघात हे अंतिमत: त्या त्या द्रव्यांच्या अणूपासून बनलेले आहेत. अणू अर्थात अविभाज्य आहेत. ते आणखी कशाचे बनलेले नसतात. कोणताही एक अणू अतींद्रिय असतो. दोन अणूंचे द्वयणुक बनते, तीन द्वतणुकांचे त्र्यणुक होते. छपरातून पडणाऱ्यास कवडशात जो धूलिकण दिसतो तो अशा प्रकारचा त्रणुक असतो. निरनिराळी त्र्यणुके कर्माच्या नियमांनी एकत्र येऊन सृष्टिप्रपंच झाला आहे. या अणुवादाबद्दल वैशेषिकांची विशेष प्रसिद्धी आहे. ग्रीकांच्या परमाणुवादाशी त्याची तुलना करता येईल. [→ परमाणुवादम, ग्रीक].                           

जोशी, लक्ष्मणशास्त्री

न्याय-वैशेषिक-समन्वय व नव्या-न्याय: न्यायदर्शनाच्या विकासाबरोबर न्याय व वैशेषिक दर्शनांचे समन्वित रूप मांडणारे ग्रंथ निर्माण होऊ लागले. काहींनी न्यायाच्या सोळा पदार्थांचा आराखडा स्वीकारून त्यातील ‘प्रमेय’ पदार्थात वैशेषिकांच्या सात पदार्थांचा अंतर्भाव केला तर कित्येकांनी वैशेषिकांच्या सात पदार्थांचा आराखडा स्वीकारून त्यात ‘ज्ञान’ या आत्मगुणाची चर्चा करताना नैयायिकांची⇨प्रमाणमीमांसा अंतर्भूत केली. न्यायदर्शन जेंव्हा ‘नव्या-न्याय’ दर्शनात विकसित झाले, तेंव्हा न्यायदर्शनाबरोबरच वैशेषिक दर्शनालाही नवे परिणाम लाभले. नव्या-नैयायिकांनी वैशेषिकांचे सात पदार्थ स्वीकारत असतानाच त्यांच्या विचारात पुढील बाबतीत मोलाची भर घातली : (१) लक्षण, लाघव यांसारख्या तंत्रांच्या साहाय्याने पदार्थांच्या स्वरूपाची पुनर्निश्चिती व नव्या परिभाषेत पुनर्मांडणी केली. (२) वैशेषिकांचा मूळ संबंध-विचार संयोग, समवाय, स्वरूप (विशेषणता) अशा मोजक्या संबंधांपुरता मर्यादित होता. त्यात पर्याप्ती, कारणता, विषयता, विषयिता, अवच्छेदकता, निरूपकता अशा विविध संबंधांची भर घालून तो नव्या-नैयायिकांनी व्यापक व व्यामिश्र केला.

पहा : न्यायदर्शन.                               

गोखले, प्रदीप

संदर्भ : 1. Bhat, V. P. Navya-Nyaya : Theory of Verbal Cognition-Critical Study of Gadadharas   Vyutpattivasa,

           2. Vols., New Delhi, 2001. 2. Keith, A. B. Indian Logic and Atomism, Oxford, 1921.

           3. Sarma, E. R. Sreekrishna : Manikana, A Navya-Nyaya Manual, Adyar, 1960.

           4. Vidyabhushusana, S. Chandra, A History of Indian Logic, Delhi, 1970.