विशदीकरण : एखादी घटना का घडली किंवा परिस्थिती जशी आहे तशी का आहे ह्याचे स्पष्टीकरण देणे म्हणजे विशदीकरण होय. घटना किंवा आढळून आलेली परिस्थिती जर अनपेक्षित असली, तर व्यवहारात आपण तिचे स्पष्टीकरण मागतो. जर एखादा परदेशी पाहुणा जुलै महिन्यात मुंबईला आला आणि पाऊस कोसळत राहिला आहे असे त्याला आढळून आले, तर ‘आता इतका पाऊस का पडतो आहे ?’ असे तो साहजिकपणे विचारीलही. ‘साधारणपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यांत मुंबईत (आणि भारताच्या मोठ्या भागात) पाऊस दरवर्षी पडत असतो’ असे ह्या परिस्थितीचे आपण स्पष्टीकरण देऊ. ही आगंतुकपणे, अचानक घडलेली घटना नाही ती एका सामान्य नियमाला अनुसरून घडत आहे, असे ह्या स्पष्टीकरणाचे स्वरूप आहे. असे अनेक नियम आपल्याला व्यवहारात अनुभवाने माहीत झालेले असतात. विस्तवाजवळ गेले की धग लागते, विस्तवावर भांड्यात पाणी ठेवले तर ते काही वेळाने उकळू लागते, वसंत ऋतूत कोकिळ कूजन करतो, भाताचे बी शेतात पेरले आणि त्याला पाणी दिले तर काही दिवसांनी भाताचे रोप उगवते, ते वाढते आणि योग्य काळनंतर त्याला भाताच्या लोंब्या फुटतात इत्यादी. एखाद्या चौकस लहान मुलाने, ‘भांड्यातले पाणी का उकळते आहे, पाणी खळबळते आहे आणि त्यातून वाफ बाहेर पडते आहे, असे का होत आहे?’ असा प्रश्न विचारला, तर ‘ज्यात पाणी आहे असे भांडे पुरेसा वेळ विस्तवावर ठेवले किंवा इतर मार्गाने त्याला पुरेशी उष्णता दिली–उदा., विजेच्या शेगडीवर ठेवून–तर ते पाणी उकळू लागते, त्याची अशी अवस्था होते’ असे त्याचे उत्तर आपण देऊ आणि त्या मुलाचे बहुधा समाधान होईल.

पण तो मुलगा अधिक चौकस निघाला आणि त्याने जर विचारले, की ‘पाण्याला पुरेशी उष्णता दिली तर ते का उकळते?’ तर मग आपल्याला पुढे जावे लागेल. ‘ब ह्या प्रकारची घटना (पाणी उकळते आहे ह्या प्रकारची घटना) का घडते?’ ह्या प्रश्नाचे उत्तर ‘अ ह्या प्रकारच्या परिस्थितीत (पाण्याला उष्णता दिली जात आहे ह्या प्रकारच्या परिस्थितीत) ब नेहमीच घडते’ ह्या सामान्य नियमाचा हवाला देऊन देण्यात येते. पण ‘अ नंतर ब नेहमीच घटते’ ह्या सामान्य नियमाचे विशदीकरण मागता येईल. असे जर कुणी मागितले, तर माग आपल्याला उष्णता म्हणजे काय, उष्णतेचा व गतीचा-वस्तूच्या घटकांत, रेणूंत किंवा परमाणूंत होणाऱ्या हालचालींचा काय संबंध आहे, वाफ होणे म्हणजे जिच्यात पाण्याचे रेणू एकमेकांपासून जलद गतीने दूर होत असतात अशी अवस्था असते, इ. गोष्टींचा निर्देश करून हे विशदीकरण द्यावे लागेल. म्हणजे, ‘ब ही विशिष्ट घटना का घडली?’ ह्याचे स्पष्टीकरण ‘अ ह्या स्वरूपाच्या परिस्थितीत ब ह्या प्रकारची घटना नेहमीच घडते’ अशा सामान्य नियमाचा आधार घेऊन देण्यात येते. पण अशा सामान्य नियमांचे विशदीकरण करण्याचा प्रश्न जेव्हा उपस्थित होतो तेव्हा त्याच्याहून अधिक सामान्य असलेल्या नियमाचा किंवा अशा अनेक नियमांचा आधार घेऊन त्यांच्यापासून हा नियम कसा निष्पन्न होतो हे अनुमानाने दाखवावे लागते. अशा स्वरूचाच्या विशदीकरणाचे एक उत्तम उदाहरण न्यूटनच्या उपपत्तीमध्ये आढळते. ⇨गॅलिलिओने वस्तू उंचावरून खाली पडतात, त्या कोणत्या नियमाला अनुसरून पडतात हे दाखवून दिले होते. ⇨केप्लरने सूर्यमालिकेतील ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळात्मक मार्गाने भ्रमण करतात आणि ह्या लंबवर्तुळाचा सूर्य हा एक केंद्र असतो हा नियम आणि ग्रहांच्या भ्रमणाविषयीचे आणखी दोन नियम निरीक्षणांच्या आधारे सिद्ध केले होते. समुद्राला जी ⇨भरती -आहोटी येते, तिचा त्या त्या ठिकाणी चंद्र उगवण्याशी संबंध असतो हा नियमही अनुभवाने लोकांना माहीत झाला होता. न्यूटनने ⇨गुरुत्वाकर्षणाचा नियम–कोणत्याही दोन भौतिक वस्तू एका विशिष्ट शक्तीने एकमेकींना आकर्षून घेतात हा नियम–आणि इतर काही नियम गृहीत धरून, त्यांच्यापासून गणिताने, गॅलिलिओचा नियम, केप्लरचा नियम, भरती-ओहोटीचे नियम हे सर्व निष्पन्न करून दाखविले. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळात्मक मार्गाने का भ्रमण करते ह्याचे, किंवा समुद्राला विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळीच ठिकाणी विशिष्ट वेळीच भरती का येते ह्याचे स्पष्टीकरण आता मिळते.

वैज्ञानिक विशदीकरणाचे स्वरूप कसे असते हे आपण पाहिले. विशिष्ट घटनांचे विशदीकरण अनुभवावर आधारलेल्या सामान्य नियमांच्या आधारे करण्यात येते आणि अशा नियमांचे विशदीकरण त्यांच्याहूनही अधिक सामान्य असलेल्या नियमांपासून, हे नियम गणिताने किंवा इतर प्रकारच्या प्रमाण अनुमानांनी निष्पन्न होता असे दाखवून करण्यात येते. विशदीकरणाच्या ह्या प्रक्रियेला अर्थात मर्यादा आहे. अत्यंत सामान्य नियमांपासून तुलनेने विशिष्ट असलेले नियम निष्पन्न होतात असे दाखवून आपण ह्या विशिष्ट नियमांचे विशदीकरण करतो. ह्या अत्यंत सामान्य नियमांचे ह्य पद्धीने विशदीकरण करता येणार नाही हे उघड आहे. वैज्ञानिक विशदीकरणाची ही मर्यादा आहे हे स्पष्ट आहे. पण येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कोणत्याही काळी विज्ञानात जे अंतिम सृष्टिनियम म्हणून मानण्यात आलेले असतात, अधिक सामान्य नियमांपासून ज्यांची निगमनाने प्राप्ती करून घेता येत नाही असे जे नियम असतात त्यांचा दर्जा नेहमीच तसा राहतो, ते नेहमीच अंतिम नियम म्हणून मान्य करण्यात येतात असे नसते. अधिक सामान्य नियमांपासून ते निगमनाने प्राप्त करून घेता येतात असे दाखविले जाण्याची नेहमीच शक्यता असते. उदा., न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला बराच काळ अंतिम सृष्टिनियमाचा दर्जा होता. पण आइन्स्टाइनने अधिक व्यापक अशा सिद्धांताची-‘व्यापक सापेक्षता सिद्धांताची’ (जनरल थिअरी ऑफ रेलटिव्हिटी)-कल्पना करून त्यांच्यापासून निगमनाने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत प्राप्त करून घेता येतो हे दाखवून दिले. विज्ञानात स्वीकारण्यात आलेले अंतिम सृष्टिनियम, किंवा सृष्टीचे अंतिम घटक इत्यादींची अंतिमता ही नेहमीच तात्पुरती असते. त्याच्याहून अधिक ‘अंतिम’ असे नियम (घटक इ.) शोधले जाण्याची नेहमीच शक्यता असते.

सृष्टीत घडणाऱ्या घटना, प्रक्रिया यांच्याप्रमाणे मानवी कृतींचे विशदीकरणही आपण करतो. विशिष्ट प्रसंगी अ हा माणूस रागावलेला आढळला तर ‘तो का रागावला आहे ?’ असा प्रश्न उपस्थित होतो आणि ‘ब ह्या माणसाने त्याचा अपमान केला म्हणून तो रागावला आहे’ ह्या स्वरूपाचे त्याचे स्पष्टीकरणही देण्यात येते. असे अनेक ‘मानसशास्त्रीय’ नियम अनुभवाने आपल्याला माहीत झालेले असतात आणि त्यांना अनुसरून माणसांच्या वर्तनांचे विशदीकरण आपण करतो. पण माणसांच्या वर्तनात निदान दोन प्रकारची गुंतागुंत असते. एक अशी : विशेषतः ⇨सिग्मंड फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाच्या सिद्धांतानंतर माणसांच्या कृतीवर त्यांच्या अजाण वा अबोध (अन्कॉन्शस) अनुभवांचा, इच्छांचा, प्रेरणांचा अनेकदा पगडा असतो, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. उदा., एखाद्या माणसाला, त्याचे हात स्वच्छ असतानाही, वारंवार हात धुण्याची उबळ येते आणि अनेकदा कारण नसतानाही तो हात धूत राहतो असे आढळून येते. ह्याचे एखादा मनोवैज्ञानिक असे स्पष्टीकरण देईल, की ह्या माणसाच्या मनात आपण पाप केले आहे अशी अजाण भावना आहे, – उदा., त्याने आपल्या वडिलांना त्यांच्या म्हातारपणी वाईट वागविले असेल – पापाने आपले हात बरबटलेले आहेत अशी ती भावना आहे आणि हे हात स्वच्छ करण्यासाठी तो ते वारंवार धूत असतो. म्हणजे त्याची ही कृती एक प्रतीकात्म कृती आहे आणि ती समजून घ्यायची, तर त्याच्या अजाण प्रेरणांशी तिचे असलेले नाते समजून घ्यावे लागेल. दुसरी गुंतागुंत अशी, की व्यक्ती ही नेहमी एका विशिष्ट समाजाचा घटक असते. ह्या समाजात नीतिमत्तेचे, सभ्यतेचे इ. काही मानदंड प्रस्थापित असतात आणि त्यांना अनुसरून वागण्याचे प्रशिक्षण व्यक्तीला मिळालेले असते. उदा., वयाने खूप वडील असलेल्या व्यक्तीचा निरोप घेताना तिच्या पाया पडावे हा संकेत हिंदू समाजात रूढ आहे. एखादी व्यक्ती अशा रीतीने वागली, तर ती तशी का वागली हे परक्या समाजातील एखाद्या माणसाला समजावून सांगताना ह्या रूढ संकेताचा निर्देश करावा लागेल. मानवी वर्तनातील ह्या गुंतागुंतीमुळे अनेक तत्त्ववेत्यांनी असे मानले आहे, की निसर्गात घडणाऱ्या घटनांचे विशदीकरण करणे आणि मानवी वर्तनाचे, कृतींचे विशदीकरण करणे ह्यांत मूलभूत भेद आहे. नैसर्गिक घटना कोणत्या सामान्य नियमांना अनुसरून घडली आहे हे सांगितले, की तिचे विशदीकरण होते. पण एखाद्या अपरिचित व्यक्तीच्या कृतीचे विशदीकरण करताना ती व्यक्ती ज्या समाजातील असेल त्याच्यात रूढ असलेली मूल्ये, संकेत ह्यांचे तसेच बालपणापासून तिच्यावर कोणते संस्कार झाले आहेत, कोणत्या प्रसंगांतून ती गेली आहे ह्यांचे आकलन करून घेऊन ह्या विशिष्ट प्रसंगी तिच्या मनात कोणत्या भावना, प्रेरणा, आकांक्षा जागृत झाल्या असतील, ह्यांची अटकळ करावी लागते व तिच्या अनुरोधाने तिच्या त्या विशिष्ट कृतीचा उलगडा करावा लागतो. थोडक्यात, निसर्गातील घटना केवळ सामान्य नियमांना अनुसरून घडतात. मानवी कृतींन विशिष्ट सांस्कृतिक व मानसिक संदर्भ असतो. ह्या संदर्भात त्या अर्थपूर्ण कृती असतात आणि हा अर्थ स्पष्ट करणे म्हणजे त्या कृतीचे विशदीकरण करणे असते.

वैयक्तिक कृतींप्रमाणे ऐतिहासिक घटनांचाही-उदा., फ्रेंच राज्यक्रांती-उलगडा करण्यासाठी विशदीकरण करावे लागते. अशा ऐतिहासिक घटना ह्या सामूहिक कृती असतात आणि लक्षावधी व्यक्तींनी केलेल्या परस्परांना पोषक असलेल्या आणि परस्परांना छेद देणाऱ्या कृतींचे अंतिम फलित म्हणून त्या घटलेल्या असतात. अशा घटनांत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या काही व्यक्तींनी घेतलेले निर्णय त्या घटनांना वळण देतात. उदा., सेनापतींनी किंवा राजाने किंवा लोकनेत्यांनी घेतलेले निर्णय. पण ह्याबरोबरच अशा घटनांत लक्षावधी लोक कार्यरत असतात आणि त्यांच्या आकांक्षा, गाऱ्हाणी इ. समजून घेण्यासाठी त्या समाजाची सांस्कृतिक घडण, त्यांची आर्थिक परिस्थिती इ. गोष्टीही ध्यानात घ्याव्या लागतात. तेव्हा व्यक्तीच्या कृतींचे स्पष्टीकरण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या अंतरंगाचे जसे आकलन करावे लागते, त्याचप्रमाणे ऐतिहासिक घटनांसारख्या सामाजिक घटनांचे विशदीकरण करताना त्या समाजाचे अंतरंगही समजून घ्यावे लागते. वैयक्तित कृतीचे विशदीकरण करण्यात जेवढी गुंतागुंत असते त्यापेक्षा ऐतिहासिक घटनांचे विशदीकरण करण्यात कितीतरी गुंतागुंत असली, तरी ही दोन्ही विशदीकरणे मूलतः एकाच स्वरूपाची आहेत असे अनेकांचे म्हणणे आहे. हे विशदीकरण करण्यासाठी भेदक कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. दुसऱ्या व्यक्तीशी वा समाजाशी एकरूप होऊन त्याच्या अंतरंगात शिरण्यासाठी, त्याला जग आणि आपले त्याच्यातील स्थान कसे दिसत असेल, कसे भावत असेल ह्याची यथार्थ कल्पना करण्यासाठी एक प्रकारची प्रतिभा आवश्यक असते असे हे म्हणणे आहे. उलट ऐतिहासिक घटना ह्या अखेरीस मानवी व्यक्तींनी केलेल्या कृतींची बेरीज असते, मानवी व्यक्ती म्हणजे देह आणि त्यांच्याशी संलग्न असलेली मने असतात, ह्या मनातील व्यापार हे मेंदू, मज्जासंस्था इत्यादींमध्ये घडणाऱ्या घटनांनी निर्धारित असतात आणि हे शारीरिक व्यापार निसर्गनियमांना अनुसरूनच घडत असतात, तेव्हा सर्व मानवी कृतीचे–आणि त्यांत ऐतिहासिक घटनाही आल्या-विशदीकरण तत्त्वतः निसर्गनियमांना अनुसरूनच करता येते अशी वेगळी भूमिकाही अनेक तत्त्ववेत्ते स्वीकारतात.

संदर्भ : y3wuoeph, H. W. B. An Introduction to Logic, Oxford, 1916.

रेग, मे. पुं.