लोत्से, रूडॉल्फ हेर्मान : (२१ मे १८१७-१ जुलै १८८१). जर्मन चिद्‌ वादी तत्त्ववेत्ता. जन्म बाऊट्सेन येथे. लोत्से ह्यांनी लाइपसिक विद्यापीठातून वैद्यक आणि तत्त्वज्ञान ह्या दोन्ही विषयांचा अभ्यास करून त्यांत ‘डॉक्टोरेट’ ही पदवी संपादन केली होती. लाइपसिक, गटिंगेन आणि अखेरचे थोडे दिवस बर्लिन ह्या विद्यापीठांत लोत्से ह्यांनी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून काम केले. Metaphysik (मराठी अर्थ-तत्त्वमीमांसा, १८४१), Logik (१८४३) आणि त्रिखंडात्मक Mikrokosmus (मराठी अर्थ-अणुविश्वे, १८५६-६४) हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ होत.

रूडॉल्फ हेर्मान लोत्सेवैज्ञानिक ज्ञानाच्या प्रगतीमुळे एकोणिसाव्या शतकात यूरोपीय विचारवंतांपुढे तीत द्वंद्वे उभी राहिली होती. एक, विज्ञान आणि धर्म ह्यांतील द्वंद्व दुसरे बुद्धी किंवा विवेक आणि भावना ह्यांतील द्वंद्व आणि तिसरे म्हणजे ज्ञान आणि मूल्य ह्यांच्यामधील द्वंद्व. लोत्से ह्यांच्या तत्त्वज्ञानात ह्या तीन द्वंद्वांचे निरसन करण्याचा प्रयत्न आढळतो. विश्वातील वस्तू व घटना ह्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून, ह्या  निरीक्षणांच्या आधारावर सार्वत्रिक निसर्गनियमांचा शोध घेऊ पहाणारे वैज्ञानिक ज्ञान हेच अस्तित्वाविषयीचे खरेखुरे ज्ञान असते, असे लोत्से मानतात. अशा वैज्ञानिक ज्ञानापलीकडे जाणारे अस्तित्वाविषयीचे ज्ञान तत्त्वज्ञान प्राप्त करून देते, हा दावा ते अमान्य करतात. वैज्ञानिक ज्ञानात ज्या संकल्पना अंतर्भूत असतात आणि ज्या उपपत्ती ग्राह्य ठरतात त्यांची तार्किक व्यवस्था लावण्याचे कार्य काय ते तत्त्वज्ञान करू शकते ही भूमिका ते स्वीकारतात.

तथापि त्यांच्या मताप्रमाणे वैज्ञानिक ज्ञानाला मर्यादा आहे, कारण वैज्ञानिक ज्ञान संकल्पानात्मक असते आणि म्हणून अस्तित्व आणि वैज्ञानिक ज्ञान ह्यांच्यात अंतर रहाते. वस्तूंच्या साक्षात अनुभवात अस्तित्व आणि त्याचे ज्ञान एकजीव होतात. भावना ह्या अशा साक्षात अनुभवाचा गाभा असतो. चांगले आणि वाईट, सुंदर आणि कुरूप ह्यांची साक्षात जाणीव ही भावनेच्या स्वरूपाची असते आणि ही जाणीव आपल्याला मूल्यांचा अनुभव उपलब्ध करून देते. भावनेला सुसंगतीची, संवादाची आकांक्षा किंवा ओढ असते आणि म्हणून ज्ञानातील सुसंगती किंवा सौंदर्यातील सुसंगती ह्यांचा अनुभव घेण्याची प्रेरणा माणसाला प्राप्त होते. तेव्हा सुसंवादात साफल्य पहाणारे प्रेम हे भावनेचे शुद्ध रूप होय.

विश्वात ज्या अर्थी सुसंगत व्यवस्था आहे, त्या अर्थी विश्वाचे अधिष्ठान प्रेमाच्या तत्त्वावर झालेले असणार, असा निष्कर्ष लोत्से काढतात. हे प्रेमाचे तत्त्व म्हणजेच ईश्वर. विश्व अनेक पदार्थां चे बनलेले आहे, हे आपल्याला साक्षात निरीक्षणाने कळते. तेव्हा विश्व हे परमात्मा आणि अनेक आत्मे ह्यांचे मिळून बनलेले आहे. परमात्मा प्रेमस्वरूप असल्यामुळे ह्या सर्व आत्म्यांच्या उद्दिष्टांमध्ये अंतिमतः सुसंगती असते. निसर्गातील घटना सार्वत्रिक नियमांना अनुसरून घडतात. त्या तांत्रिक असतात. जलद आत्म्यांना उद्दिष्टे असतात आणि ती साधण्यासाठी ते कृत्ये करतात. म्हणजे आत्म्यांची कृत्ये सहेतुक असतात आणि निसर्गातील प्रक्रिया निर्हेतुक, यांत्रिक असतात. पण ह्यात काही विसंगती नाही, असे त्यांचे म्हणणे आहे, कारण यांत्रिक प्रक्रियांच्या माध्यमातून आत्मे आपली उद्दिष्टे साध्य करीत असतात. सारांश, लाइप्निट्सचा मोनॅडिझम लोत्से ह्यांनी स्वीकारला आणि त्याची नवी मांडणी करण्याचा प्रयत्न केला.

लोत्से यांच्या हातून तत्त्वज्ञानात एक नवीन पंथ जरी स्थापन झाला नाही, तरी त्यांचा प्रभाव नंतरच्या अनेक पाश्चात्त्य तत्त्ववेत्त्यांवर पडला होता. बर्लिन येथे ते निधन पावले.

रेगे, मे. पुं.