कन्फ्यूशस : (५५१ – ४७९ इ. स. पू.). कन्फ्यूशस हे नाव खुंग-फू-ज (म्हणजे आचार्य खुंग) ह्या मूळ चिनी नावाचे लॅटिनीकरण आहे. हा चीनचा सर्वांत प्रभावी आणि पूज्य मानण्यात येणारा तत्त्ववेत्ता. ह्याचा जन्म लू (सध्याच्या शँटुंग) राज्यात एका खानदानी कुटुंबात झाला होता. तथापि त्याचे पूर्वायुष्य गरिबीत गेले. पण कष्टमय परिस्थितीत त्याने जिद्दीने विद्या संपादन केली आणि त्या काळातील एक असामान्य विद्‌वान अशी त्याची ख्याती झाली. आयुष्याची अनेक वर्षे शासनात वेगवेगळ्या पदांवर त्याने कामे केली आणि काही काळ तो न्यायदानाचा मंत्रीही होता. पण राज्यकारभाराच्या उद्दिष्टांविषयीच्या आपल्या कल्पना राज्यकर्त्यांना रुचत नाहीत, हे पाहून त्याने मंत्रिपद सोडले व वयाच्या पन्नाशीनंतर तेरा वर्षे आपल्या काही शिष्यांबरोबर प्रवासात घालविली. चीनमधील नऊ राज्यांतून त्याने हा प्रवास केला पण आपल्या मतांचा प्रभाव कुणाही राज्यकर्त्यावर पडत नाही, हे पाहून तो वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी लू राज्यात परतला.तरुणपणी सरकारी नोकरीत असतानाच त्याने अध्यापनाला सुरुवात केली होती. ते काम त्याने परत हाती घेतले. आपल्या लिखाणाचे परिष्करण तसेच ‘वसंतआणि शरद ऋतूंतील कहाण्या’, ‘परिवर्तन सूत्रे’, ‘इतिहास सूत्रे’, ‘गीत सूत्रे’, ‘विधी सूत्रे’ आणि ‘संगीत सूत्रे’ ह्या शीर्षकार्थाच्या प्राचीन अभिजात ग्रंथांचे संपादन-संस्करणही त्याने ह्याच काळात केले असावे. वयाच्या बहात्तराव्या वर्षी त्याचे निधन झाले. त्याची समाधी चूफू येथे आहे. कन्फ्यूशसच्या निधनानंतर त्याच्या शिष्यांनी त्याची प्रवचने लुन-यू (प्रवचने) ह्या नावाने ग्रंथबद्ध करून ठेवली. त्याची स्वतःची वचने समाविष्ट असलेला म्हणजे एका अर्थी त्याने लिहिलेला असा हा एकमेव ग्रंथ आहे.

मानवतावाद हे कन्फ्यूशसच्या तत्त्वज्ञानाचे सूत्र आहे. नीतिमान व्यक्ती आणि सुव्यवस्थित समाज निर्माण करणे, हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट होते. ह्यासाठी त्याने ‘विश्वतत्त्व ’ (T’ien-थिअन), ‘सज्‍जन पुरुष’ (Chun Tzu) व ‘माणुसकी ’ (Jen -रन) ह्या पारंपारिक संकल्पनांना नवीन अर्थ दिला. माणसावर प्रेम करणारा, स्वतःला ओळखणारा आणि स्वतःच्या झालेल्या ओळखीतून  इतरांना ओळखणारा, स्वतःचे शील उन्नत करीत असताना इतरांचे शील उन्नत करणारा पुरुष, त्याच्या मते सज्जन अथवा उत्तम पुरुष होय. व्यक्तीचे स्वतःच्या प्रकृतीशी संवादित्व असले पाहिजे आणि माणसामाणसात संवादित्व असले पाहिजे, अशी त्याची शिकवण होती. समाजात पाच प्रकारचे परस्परसंबंध असतात ते म्हणजे : राजा-प्रजा, पिता-पुत्र, पती-पत्‍नी, भाऊ-भाऊ आणि मित्र-मित्र. ह्या संबंधांची घडी नीट बसली म्हणजे समाजरचना संवादी बनून तीत सुरळीतपणा येतो, हे तत्त्व त्याने रूढ केले. म्हणूनच राज्यसंस्थेचे व्यवहारही परस्परसहकार्यावर आधारले असले पाहिजेत, असा त्याचा आग्रह होता. नैतिक आचरणाचे आद्यक्षेत्र आणि नैतिक शिक्षणाचे साधन म्हणून, तो कुटुंबसंस्थेला अतिशय महत्त्व देत असे. अखेरीस सर्व मानवजात एक कुटुंब आहे असे मानले पाहिजे, अशी त्याची शिकवण होती. प्रजेचे सुख साधणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे आणि ह्यासाठी ते सद्‌गुणी व कुशल असले पाहिजेत. ह्या गुणांमुळेच राज्य करण्याची पात्रता राज्यकर्त्यांच्या ठिकाणी येते असा त्याचा विश्वास होता. पात्रता जन्माने लाभत नाही, ती गुणांमुळे लाभते, हे तत्त्व त्याने प्रतिष्ठित केले आणि व्यक्तींच्या गुणांचा विकास व्हावा म्हणून त्याने पद्धतशीर रीतीने शिक्षणाचा प्रसार केला. चीनमध्ये जवळजवळ दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या शिक्षणपद्धतीचा वैचारिक पाया त्यानेच घातला. नैतिक विकास आणि सामाजिक सुधारणा ही ह्या शिक्षणपद्धतीची उद्दिष्टे होती. गुरूने मार्गदर्शन केले पाहिजे, पण शिष्याने स्वतःच्या प्रयत्‍नाने विद्या संपादन केली पाहिजे, असे त्याचे म्हणणे होते.

कन्फ्यूशस

कन्फ्यूशसच्या पंथाला अनेकदा धर्मपंथ मानण्यात येत असले, तरी तो धर्मसंस्थापक नव्हता. विश्वात एक मंगल शक्ती आहे, अशी त्याची श्रद्धा होती. धार्मिक विधी आणि समारंभ ह्यांना त्याचे खूपच महत्त्व दिले. तथापि नैतिक आचरणाने आणि व्यक्तिव्यक्तींतील संबंधांना योग्य रूप देऊनच वैयक्तिक व सामाजिक कल्याण साधता येईल, असा त्याचा विश्वास होता. त्याच्या विचारांचा आणि आदर्शांचा प्रभाव चिनी संस्कृतीवर कायमचा पडला आहे.

कन्फ्यूशसचा पंथ हा परिचित अर्थाने धर्मपंथ नव्हे. कन्फ्यूशस स्वतः धार्मिक वृत्तीचा होता आणि विश्वामध्ये सत्याचा आणि न्यायाचा पक्ष घेणारी एक शक्ती आहे, अशी त्याची श्रद्धा होती तथापि त्या काळी चीनमध्ये प्रचलित असलेल्या धर्माचा बराचसा भाग अंधश्रद्धेवर आधारलेला आहे, असेच त्याचे मत होते. मानवतावाद हे कन्फ्यूशसच्या पंथाचे सार आहे. त्याच्या मते माणसावर प्रेम करणे म्हणजे चांगुलपण आणि माणसाला समजून घेणे म्हणजे शहाणपण. स्वतःची प्रवृत्ती ओळखल्याने माणूस दुसऱ्याच्या प्रवृत्ती ओळखू शकतो आणि ह्यातून इतरांशी कसे वागावे हे त्याला कळते. कन्फ्यूशसने ज्या मार्गाचे प्रतिपादन केले, तो माणुसकीचा किंवा प्रेमाचा मार्ग होता. नैतिक साधनेने स्वतःचे शील स्थिर करण्याचा प्रयत्‍न करीत असताना, इतरांना त्यांच्या नैतिक साधनेत साहाय्य करणारा सद्‌गुणी माणूस कन्फ्यूशसच्या दृष्टीने ‘सज्‍जन ’ वा ‘उत्तम पुरुष ’ असतो. केवळ स्वतःचे शील कमवण्यापुरतीच नीती मर्यादित नसते, तर इतरांशी योग्य वर्तन करणे हेही नीतीचे अविभाज्य अंग असते. म्हणून व्यक्तींच्या नैतिक साधनेमुळे कुटुंब सुसंवादी बनते, राज्य सुव्यवस्थित होते आणि जगात शांती नांदते. नैतिक साधनेतून अशी सुसंवादी सामाजिक आणि राजकीय व्यवस्था निर्माण करणे, हे कन्फ्यूशसच्या पंथाचे मध्यवर्ती उद्दिष्ट होते. कन्फ्यूशस पंथीय केवळ शिक्षक नव्हते, ते क्रियाशील सुधारकही होते.

माणसाने आपल्या परिस्थितीचा शोध घ्यावा, ज्ञान मिळवावे, संकल्प दृढ करावा, वासनांना वळण लावावे, सद्‌गुण संपादन करावे, कुटुंबाची घडी नीट बसवावी, राज्य सुव्यवस्थित करावे आणि जगात शांती स्थापन करावी, हे त्याच्या उपदेशाचे सार आहे. कन्फ्यूशसच्या ह्या शिकवणीतून इ. स. पू. पाचव्याशतकात दोन भिन्न प्रवृत्ती उदयास आल्या. त्यांपैकी एक सामाजिक आणि राजकीय साध्यांवर भर देते. ‘परमज्ञान ’ (Ta-hsueh) ह्या शीषकार्थाच्या लहानशाकन्फ्यूशस पंथीय अभिजात ग्रंथात ही प्रवृत्ती व्यक्त झाली आहे आणि त्यावरील भाष्य ‘जंग ज ’ (Tsengtzu, ५०५–४३६ इ. स. पू.) ह्या त्याच्या शिष्याने लिहिलेआहे असे मानण्यात येते. दुसरी प्रवृत्ती धार्मिक आणि अधिक तात्त्विक आहे. ‘मध्याचा सिद्धांत ’ (Chung-Yung) ह्या शीर्षकार्थाचा ग्रंथ बहुधा जू स्स (Tzu Ssu,४८३–४०२ इ. स. पू.) ह्या कन्फ्यूशसच्या नातवाने लिहिलेला असून, तो ह्या दुसऱ्या प्रवृत्तीचे प्रतिनिधित्व करतो. ‘मध्या ’च्या आदर्शाची दोन अंगे असतात : एकमध्यवर्तित्व आणि दुसरे संवादित्व. मध्यवर्तित्व म्हणजे मध्यापासून विचलित न होणे आणि संवादित्व म्हणजे समान मानवतेचे तत्त्व स्वीकारणे. व्यक्तिजीवनात ह्यादोन गुणांमुळे भावना जागृत होण्यापूर्वी आणि नंतर मनाची समधातता साधली जाते आणि सामाजिक जीवनात त्यांच्यामुळे व्यक्तिव्यक्तिंमधील सर्वं संबंधांतसुसंगती निर्माण होते. पण मध्याच्या आदर्शाचे क्षेत्र मानवी जीवनापुरते मर्यादित नाही हा नैतिक आदर्श स्वीकारल्याने विश्वतत्त्व आणि पृथ्वी ह्यांच्यामध्ये सुव्यवस्था निर्माण होऊ शकते आणि सर्वच वस्तू आपापली कार्ये सुसंगतपणे पार पाडतात. व्यक्तिजीवनाचे आणि समाजजीवनाचे असे व्यवस्थापन होणे म्हणजे‘मार्ग ’ (Tao-दाव) – योग्य रीतीने जगण्याचा मार्ग – प्रस्थापित होणे. ऋजुतेने, सरलतेने जगणे, हे ह्या मार्गाचे सार आहे हा मार्ग म्हणजे विश्वतत्त्वाचा मार्ग होय. कन्फ्यूशसच्या मते सर्व वस्तूंची उत्पत्ती विश्वतत्त्वापासून होते. म्हणजे विश्वतत्त्व हे अंतिम सत्त्व होय. जीवनमार्गातही विश्वतत्त्वाची प्रकृती व्यक्त झालेली असते आणि सर्वांनाच हा जीवनमार्ग आधारभूत असतो. पण माणसाच्या नैतिक प्रयत्‍नांतूनच हा जीवनमार्ग मूर्त होऊ शकतो माणूस मार्गाला महानता प्राप्त करून देऊ शकतो मार्ग माणसाला नव्हे. 


मध्याच्या सिद्धांताचा कन्फ्यूशस पंथीयांवर बराच प्रभाव पडला. मानवी प्रकृतिविषयीच्या एका विवक्षित कल्पनेवर हा सिद्धांत आधारलेला होता आणि ह्या प्रकृतीला अनुसरून ऋजुतेने जगावे, असे तो प्रतिपादन करीत होता. मेन्सियसने (चिनी नाव मंग ज) ह्या कल्पनांचा विकास केला. माणसाची प्रकृती मूलतः सुष्ट असते, तिच्यात स्वभावतःच सद्‌गुणांची बीजे असतात आणि म्हणून आपल्या मनाचे पोषण केल्याने आणि आपल्या प्रकृतीचा पूर्ण विकास घडवून आणल्याने,माणूस परिपूर्णता साधतो, असे त्याचे मत होते. उलट मानवी प्रकृती स्वभावतः दुष्ट असते आणि धार्मिक विधी, समारंभ, कायदे, संगीत ह्यांच्या साहाय्याने तिला शिस्त लावून, तिच्यात सुधारणा घडवून आणणे आवश्यक असते, असे मत स्युन ज (Hsun-tzu, ३३५ – २८६ इ. स. पू.) याने मांडले. व्यक्तीच्या स्वभावात आणि सामाजिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचा एक मार्ग म्हणजे, संज्ञाशुद्धी करणे हा होय. कन्फ्यूशसने संज्ञाशुद्धीचा अर्थ सामाजिक व्यवस्थेत व्यक्तींच्या स्थानांचे वर्णन करणारी पदे आणि ह्या स्थानांना अनुसरून त्यांची कर्तव्ये ह्यांच्यात मेळ घालणे, असा केला होता. मेन्सियसने त्याचा अर्थ, आपले नैतिक दोष आणि उणिवा सुधारणे असा केला तर स्युन ज याने त्याचा तार्किक अर्थ लावला. वस्तू आणि त्यांच्या संज्ञा वा नावे ह्यांच्यात भेद करणे, वस्तुवस्तूंतील साम्ये आणि भेद,त्यांची सामान्य रूपे आणि विशेष गुण ध्यानी घेणे, म्हणजे संज्ञाशुद्धी करणे. पण ह्या सर्वांच्या दृष्टीने संज्ञाशुद्धी करण्याचे उद्दिष्ट एकच होते आणि ते म्हणजे व्यक्तिजीवन व सामाजिक जीवन ह्यांच्यात मेळ निर्माण करणे. मेन्सियसच्या मते विश्वतत्त्व ही आध्यात्मिक, गूढ अशी शक्ती आहे. ही कल्पना कन्फ्यूशसच्या कल्पनेशी जुळती होती. उलट स्युन जच्या मते विश्वतत्त्व म्हणजे निसर्गाची शक्ती.

कन्फ्यूशसच्या पंथाचे ताओमतवादी, मो-मतवादी (Moists) आणि नंतर हान फैजप्रणीत (Han Fei Tzu, मृ. २३३ इ. स. पू.) निर्बंधवादी (Legalists) हे विरोधक होते. इ. स. पू. तिसऱ्या शतकात निर्बंधवादाची राजकीय सरशी झाली आणि इतर पंथांबरोबरच कन्फ्यूशस पंथही नष्टप्राय झाला. पण पुढे हान राजवटीच्या (इ. स. पू. सु. २०६ ते इ. स. सु. २२१) उत्तरार्धात कन्फ्यूशस मत हे राज्याचे अधिकृत मत म्हणून स्वीकारण्यात आले. त्याच्या अभिजात ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात आले. ह्या ग्रंथांत पारंगत असलेल्यांना सरकारी अधिकारी नेमण्यात येऊ लागले. कन्फ्यूशसच्या पंथाला राष्ट्रीय धर्म हे स्थान प्राप्त झाले पण रूढ अर्थाने हा धर्म नव्हता. पवित्र पर्वत, नद्या, पूर्वज ह्यांची परंपरागत उपासना जरी ह्या पंथाने स्वीकारली होती व काही नवीन धार्मिक विधींची जरी त्याने स्थापना केली होती, तरी त्याचे कार्य मुख्यतः ऐहिक जीवनाच्या क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. शिक्षण, राज्यकारभार, समाजकारण ह्या क्षेत्रांचे नियमन करणे, हे त्याचे मध्यवर्ती कार्यक्षेत्र होते. कन्फ्यूशस पंथ अशा रीतीने मान्य होण्याचे एक कारण असे, की ह्या कालखंडात ह्या तत्त्वज्ञानाचा, ‘यीन्‌-यांग ’ तत्त्वज्ञानाशी समन्वय साधण्यात आला आणि ही नवीन रूपातील शिकवण राज्यकर्त्यांना पसंत पडेल अशी होती. ‘यीन्‌ ’ हे विश्वातील जड,विघातक, विघटनात्मक स्त्री तत्त्व ‘यांग ’ हे चैतन्यशील, विधायक संघटनात्मक पुरुष तत्त्व. ह्या दोन तत्त्वांच्या सहकार्याने, त्यांची परस्परांवर क्रिया-प्रतिक्रिया होऊन सर्व वस्तूंची निर्मिती होते. ‘परिवर्तन सूत्रे ’ ह्या शीर्षकार्थाच्या कन्फ्यूशस पंथाच्या एका अभिजात ग्रंथात यीन्‌-यांग तत्त्वज्ञानाचा प्रभाव ठळकपणे दिसतो. दुंग जुंग-शू (Tung Chung-Shu, १७६–१०४ इ. स. पू.) हा ह्या कालखंडातील प्रमुख कन्फ्यूशसपंथीय तत्त्ववेत्ता होय. कन्फ्यूशसच्या नैतिक विचारांचा आणि यीन्‌-यांग तत्त्वज्ञानाचा त्याने समन्वय केला. लोभ आणि करुणा ह्या आपल्या आचाराचे नियमन करणाऱ्या दोन प्रमुख प्रवृत्तींची त्याने अनुक्रमे यीन्‌ आणि यांग ह्यांच्याशी सांगड घातली. त्याचप्रमाणे मानवी भावना यीन्‌शी जुळतात, तर मानवी प्रकृती यांगशी जुळते. यांगस्वरूपी तत्त्वाने यीन्‌-स्वरूपी तत्त्वाचे अर्थात नियमन करायचे असते. राज्यकर्ते, पिता आणि पती यांग असतात मंत्री, पुत्र आणि पत्‍नी यीन्‌ असतात. ही शिकवण राज्यकर्त्यांना रुचली ह्यात काहीच नवल नाही. यांग व यीन्‌ हे ब्रह्मांडाचे घटक आणि त्यांच्याशी जुळणारे मानवी पिंडातील घटक ह्यांच्यात समरूपता आहे, एवढेच दुंग जुंग-शूचे मत नव्हते. ब्रह्मांड आणि पिंड ह्यांतील समरूपी घटक परस्परांवर क्रियाप्रतिक्रिया करतात आणि म्हणून माणसाचे विश्वाशी दृढ असे नाते असते विश्व हा एक पूर्ण आणि माणूस त्याचा अविभाज्य घटक आहे, असेही त्याचे मत होते.

दुंग जुंग-शूनंतर अनेक शतके कन्फ्यूशस मताचा म्हणण्यासारखा विकास झाल्याचे आढळत नाही. प्राचीन ग्रंथांच्या अध्ययनावर आणि संशोधनावर त्यांनी भर दिला. यीन्‌-यांग तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने विश्वाच्या घडणीचा आणि विकासाचा उलगडा करण्याचा प्रयत्‍न करणे हा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा एक भाग होता. विश्वाच्या उगमस्थानी एक आदिशक्ती आहे, ती भौतिक स्वरूपात स्वतःला व्यक्त करते, यांग हे तिचे विधायक स्वरूप आहे आणि यीन्‌ हे तिचे विघातक स्वरूप आहे. ह्या दोन तत्त्वांचे वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रण होऊन खडक, वनस्पती, प्राणी आणि अखेरीस मानव ह्यांची उत्पत्ती झाली ही चढती श्रेणी आहे. मानवी प्रकृतीत यीन्‌ आणि यांग ह्या तत्त्वांचा सर्वांत चांगला समतोल साधला आहे, असा विश्वाच्या घटनेविषयीचा त्यांचा सिद्धांत होता. मानवी प्रकृती हा त्यांच्या चिंतनाचा दुसरा विषय होता. मानवी प्रकृती मूलतः सुष्ट आहे की दुष्ट आहे, की सुष्टही नाही व दुष्टही नाही, की सुष्ट-दुष्ट अशी दोन्ही आहे, ह्या प्रश्नांचा बराच ऊहापोह होत असे. पण सामान्यपणे मानवी प्रकृती मूलतः सुष्ट आहे आणि भावनांचा समतोल बिघडल्याने दुष्टपणा निर्माण होतो, हे मेन्सियसचे मतच त्यांना मान्य होते.

तिसऱ्या आणि चौथ्या शतकांपासून चीनमध्ये ताओमत (मार्गवाद) आणि बौद्ध दर्शने ह्यांचा वेगाने विकास झाला. तत्त्वमीमांसा आणि ज्ञानशास्त्र ह्यांमध्ये ह्या पंथांच्या अनुयायांनी अतिशय महत्त्वाची भर घातली आणि जनमानसावरील व शासनकर्त्यांवरील ह्या पंथांचा प्रभावही विशेष वाढला. हा प्रभाव इतका वाढला, की कन्फ्यूशस पंथाचे चीनचा अधिकृत पंथ हे जे स्थान होते, त्याला धोका निर्माण झाला. ह्याचा परिणाम असा झाला की, हान यू (Han Yu, ७६८–८२४) ह्या थांग (Ta’ng) राजवटीतील (६१८–९०७) सर्वश्रेष्ठ कन्फ्यूशसपंथीय तत्त्ववेत्त्याला आपल्या पंथाच्या संरक्षणासाठी ह्या दोन्ही पंथांवर कडाडून हल्ला करावा लागला. परस्परांच्या जीवनाची धारणा करणे आणि कुटुंब आणि राज्य ह्यांचे नियमन करणे, ही विधायक उद्दिष्टे बाळगणाऱ्या कन्फ्यूशस पंथाचा, उदासीनता आणि निष्क्रीयता शिकविणाऱ्या शून्यवादी ताओमतापासून आणि बौद्धमतापासून बचाव केला पाहिजे, अशी त्याची मागणी होती. बौद्धमताचा त्यामुळे छळही झालातथापि ताओमत आणि बौद्धमत यांतील अनेक तत्त्वे आणि संकल्पना कन्फ्यूशस मतात प्रविष्ट झाल्या आणि कन्फ्यूशस मताने नवीन रूप धारण केले. ते नव-कन्फ्यूशस मत म्हणून ओळखले जाते. [→Ž ताओमत बौद्ध दर्शन]. 

नव-कन्फ्यूशसमत : नव-कन्फ्यूशस मताचा उदय साधारणपणे अकराव्या शतकात झाला. बौद्धमताप्रमाणे ‘शून्य ’ हे अंतिम सत्तत्त्व आहे. नव-कन्फ्यूशस मत त्याच्या जागी ‘ली ’ (तत्त्व किंवा बुद्धी) या तत्त्वाची स्थापना करते. मूर्त आणि भावस्वरूप असलेले ली हे तत्त्व म्हणजेच केवल, चिरंतन आणि अंतिम सत्तत्त्व होय,असा ह्या मताचा सिद्धांत आहे. नव-कन्फ्यूशस मताचा प्रारंभ जव दुन-ई (Chou Tun-I ‘जव ल्यन श्य’ Chou Lien – hsi हे त्याचे दुसरे नाव, १०१७ – १०७३) ह्याच्या तत्त्वज्ञानात झाला पण त्याचा विकास दोन वेगळ्या दिशांनी झाला. छंग ई (Ch’eng I, १०३३ – ११०७) आणि जू श्यी (Chu Hsi, ११३०—१२००) ह्यांनी नव-कन्फ्यूशस मताचा बुद्धिवादाच्या दिशेने विकास केला. उलट लू श्यिआंग शान (Lu Hsiang Shan, ११३९—११९३) ह्याने त्याचा चिद्‌वादाच्या दिशेने विकास केला. चिद्‌वादी नव-कन्फ्यूशस मताचा सारांश असा : शून्य हे अस्तित्वात असलेल्या वस्तूंचे तत्त्व असू शकत नाही अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूचे निश्चित आणि स्वयंपूर्ण असे तत्त्व असले पाहिजे. पण अनंत वस्तू अस्तित्वात असू शकतील आणि म्हणून त्यांची अनंत भिन्न तत्त्वेही असू शकतील. पण ही सारी भिन्न तत्त्वे म्हणजे मूलतः एकच तत्त्व आहे हे एकच तत्त्व भिन्न वस्तूंत वेगवेगळ्या प्रकारांनी आविष्कृत होते. ह्या तत्त्वाला ‘महत अंतिम तत्त्व ’ म्हणण्यात येते. हे महत अंतिम तत्त्व भौतिक शक्तिद्वारा कार्य करते. यीन्‌ आणि यांग ह्या दोन स्वरूपांत ही भौतिक शक्ती कार्य करते. ज्या द्रव्यामुळे वस्तूंना मूर्त स्वरूप लाभू शकते, त्याचा उगम ह्या भौतिक शक्तीमध्ये होतो. तत्त्व जरी ह्या भौतिक शक्तीचा आधार असले आणि भौतिक शक्ती तत्त्वावर अधिष्ठित असली, तरी भौतिक शक्तीशिवाय तत्त्वाला मूर्त अस्तित्व प्राप्त होऊ शकणार नाही व म्हणून ह्या दोहोंची फारकत करता येत नाही.


हेच तत्त्व मानवी प्रकृतीचे रूप धारण करते. मानवी प्रकृती मूलतः सुष्ट असते कारण तत्त्व सत्‌स्वरूप आहे आणि जे जे चांगले आहे त्याचा उगम तत्त्वात आहे. पण भावना आणि स्वार्थी इच्छा जागृत झाल्याने, माणूस आपल्या मूळ प्रकृतीपासून विचलित होतो आणि दुष्टता निर्माण होते. नैतिक साधनेने दुर्वासना नष्ट करता येतात व मूळ प्रकृती प्राप्त करून घेता येते. नव-कन्फ्यूशस मताप्रमाणे नैतिक साधनेची पहिली पायरी म्हणजे सर्वच चराचर वस्तूंचे संशोधन करणे. प्रत्येक वस्तूमध्ये तत्त्व प्रकाशित झालेले असते आणि म्हणून सर्व वस्तूंचा शोध घ्यावा. ह्यामुळे आपले ज्ञान वाढते आणि ज्ञान वाढल्याने आपले संकल्प शुद्ध आणि स्थिर होतात. आपल्या भावनांना त्यांचे उचित रूप लाभते, आपल्या प्रकृतीचा पूर्ण विकास होतो पण मानवी प्रकृतीचा विकास झाल्याने केवळ व्यक्तीला पूर्णता लाभते असे नव्हे. कन्फ्यूशसच्या विचारानुसार जे शील अंगी असले, तर माणूस खराखुरा माणूस असतो ते शील म्हणजे माणुसकी (रन). मानवी प्रकृतीचा विकास झाला,की व्यक्ती रन प्राप्त करून घेते. पण नव-कन्फ्यूशस मताने रन म्हणजे सर्व अस्तित्वामागचे सत्तत्त्व असा अर्थ केला. व्यक्तीने रन प्राप्त करून घेतले, की त्याच्या द्वारा ती सर्व अस्तित्वाशी एकरूपता साधते. ह्या विचारावर बौद्धमताची छाया आहे हे उघड आहे. छंग ईचा बंधू छंग हाव (Ch’eng Hao, १०३२—१०८५) ह्याने ह्या विचाराला वेगळे वळण दिले. रनचा अर्थ उत्पत्तीचे, वर्धनाचे तत्त्व असा त्याने केला. सर्व वस्तूंमध्ये हे तत्त्व असते अशी त्याची शिकवण होती. ‘तत्त्व ’ ह्या संकल्पनेलाही त्याने वेगळा अर्थ दिला. तत्त्वाचे स्वरूप बौद्धिक नसून, ते निसर्गतत्त्व असते असा त्याचा सिद्धांत होता. हे निसर्गतत्त्व सर्व वस्तूंत असते आणि ते योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे, ह्यांच्यात स्वाभाविकपणे भेद करते आणि योग्य असेल, ते करण्याचा आदेश देते. म्हणून बाह्य वस्तूंचे संशोधन करण्याऐवजी माणसाने स्वार्थ आणि कृत्रिम प्रयत्‍न वर्ज्य करून चित्ताची समधातता साधली पाहिजे म्हणजे त्याचे वर्तन स्वाभाविकपणेच समतोल राहील.

जांग जाय (Chang Tsai, १०२०—१०७७) हा छंग बंधूंचा चुलता. त्याच्या मताप्रमाणे तत्त्व हे भौतिक शक्तीहून वेगळे नसते, तर भौतिक शक्तीच्या व्यापाराचा नियम असते. तिच्या द्रव्य ह्या स्वरूपात, ही भौतिक शक्ती म्हणजे ‘महान रिक्तता ’ असते पण तिचे कार्य विघटनात्मक आणि संघटनात्मक असे दुहेरी असते. कारण यीन्‌ आणि यांग ही तिच्या स्वरूपाची दोन अंगे आहेत. पण मूलतः ही शक्ती एकच आहे. विश्वात ह्या एक असलेल्या शक्तीचे असे वेगवेगळे आविष्कार होतात, तसे नैतिक व्यवहारात रन एकच असले, तरी पिता-पुत्र, भाऊ-भाऊ ह्या वेगवेगळ्या नात्यांच्या संदर्भात ते वेगवेगळी रूपे धारण करते. शाव युंग (Shao Yung, १०११—१०७७) ह्याने नव-कन्फ्यूशस मताला वेगळेच वळण दिले. विश्वातील अंतिम तत्त्वांच्या स्वरूपाचे आकलन संख्यांच्या द्वारा करता येते, असे ताओमताला जवळ असलेले, गूढवादी मत त्याने मांडले. आध्यात्मिक तत्त्वापासून संख्येची उत्पत्ती होते, संख्येपासून आकारांची होते आणि आकारांपासून मूर्त वस्तूंची होते, असा त्याचा सिद्धांत होता.

चिद्‌वादीनव-कन्फ्यूशसमत : बुद्धिवादी नव-कन्फ्यूशस मताचा मुख्य भर वस्तूंच्या संशोधनावर आणि अशा ज्ञानाद्वारे साधलेल्या नैतिक उन्नतीवर होता. मानवी प्रकृती हे तत्त्वाने धारण केलेले एक रूप होते आणि मन हे ह्या प्रकृतीचे केवळ एक कार्य होते. उलट लू श्यिआंग शान ह्या चिद्‌वादी नव-कन्फ्यूशसपंथीयाच्या मताप्रमाणे मन हेच तत्त्व आहे. मन सबंध अस्तित्वाला व्यापते. मनाची सर्व वस्तूशी एकरूपता असते, तेव्हा सर्व तत्त्वे मनात अंतर्भूत असल्यामुळे, मनाचे संशोधन करणे म्हणजे सर्व वस्तूंचे संशोधन करणे. मानवी इच्छा, मनाचा भाग असल्यामुळे त्याही मूलतः सुष्ट असतात. तेव्हा मूलतः सुष्ट असलेली मानवी प्रकृती आणि दुष्ट मानवी इच्छा, ह्यांच्यात जू श्यी याने जो भेद केला होता, तो गैर आहे. लू याचा जू श्यी याच्यावरील मुख्य आक्षेप असा, की वस्तूंचे संशोधन करीत बसल्यामुळे माणसाला तपशीलात शिरावे लागते व त्याचा नैतिक प्रयत्‍न विस्कळित होतो. उलट मन हे सर्व वस्तूंच्या एकतेचे तत्त्व असते, हे त्याने ध्यानी घेतले आणि मनाचे स्वरूप समजून घेतले, तर त्याचा नैतिक प्रयत्‍न एकाग्र व दृढ होऊ शकतो. ह्या चिद्‌वादी विचारावर मेन्सियसचा आणि बौद्धमताचा पगडा आहे, हे उघड आहे. लूची चिद्‌वादी भूमिका सुरुवातीला फारशी प्रभावी ठरू शकली नाही. पंधराव्या शतकापर्यंत बुद्धिवादी विचारसरणीच प्रभावी ठरली. पण वांग यांग-मींग (Wang Yang-ming, १४७२—१५२९) ह्याच्या विचारात चिद्‌वादी भूमिकेचे पुनरुत्थान झाले. वांगने लूचा ‘सर्व वस्तू म्हणजे मनच होत’, हा सिद्धांत स्वीकारला आणि त्याच्यात महत्त्वाची भर घातली. संकल्पशक्ती ही मनाची मूलभूत शक्ती आहे आणि म्हणून आपल्या कल्पना स्वाभाविकपणे कृतीत उतरतात, हे मत त्याने मांडले. कल्पना अशा कृतीत उतरल्यानेच त्यांना वास्तवता प्राप्त होते. म्हणून वस्तूंचे संशोधन करून प्रमाण कल्पना प्राप्त करून घेतल्याने, आपले संकल्प शुद्ध होतात असे नसून, आपली संकल्पशक्ती शुद्ध असली, की प्रमाण कल्पनांना वास्तवता लाभते, असे म्हटले पाहिजे.

  

वांगची चिद्‌वादी विचारसरणी सतराव्या शतकापर्यंत प्रभावी ठरली. पण पुढे जू आणि वांग ह्या दोहोंच्या दर्शनांविरुद्ध प्रतिक्रिया झाली. दोघांच्याही सूक्ष्म,तत्त्वमीमांसात्मक उपपत्ती आपला मूर्त अनुभव आणि प्रत्यक्ष व्यवहार ह्यांपासून फार दुरावलेल्या आहेत, असा त्यांच्याविरुद्ध आक्षेप घेण्यात आला. तत्त्व, भौतिकशक्ती, महत अंतिम तत्त्व ही आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या वस्तूंच्या अतीत असलेली अमूर्त तत्त्वे आहेत, असे मानता कामा नये. ही तत्त्वे म्हणजे ह्या मूर्तवस्तूंत वसत असलेली व्यवस्था आणि रचना आपल्या सामान्य व्यवहाराची चिकित्सा आणि विश्लेषण केल्यानेच ही तत्त्वे ग्रहण करता येतात आपल्या सामान्य भावना आणि तत्त्वे ह्यांत विरोध मानणे गैर आहे सुव्यवस्थित भावना म्हणजेच तत्त्व, असे विचार वांग फु-जृ (Wang Fu-Chih, १६१९—१६९२) आणि दाय जन (Tai Chen, १७२३—१७७७) ह्यांनी मांडले आहेत. एकोणिसाव्या शतकापासून चिनी तत्त्ववेत्त्यांना डार्विन, ई. एच्‌. हेकेल, नीत्शे, शोपेनहौअर, बेर्गसाँ, कांट, देकार्त, जेम्स, ड्यूई, मार्क्स इ. पाश्चात्य विचारवंतांच्या विचारांचा परिचय होऊ लागला आणि अनेकांनी पारंपरिक कन्फ्यूशस-तत्त्वज्ञानातील विचारांचा आणि पाश्चात्य विचारांचा वेगवेगळ्या प्रकारे समन्वय करण्याचा प्रयत्न केला. ह्यांमध्ये खांग यौ-वय (K’ang Yu-Wei, १८५८—१९२७), फंग यू-लान (Fung Yu-lan, ज. १८९५) आणि शिउंग शृ-ली (Hsiung Shih-li, ज. १८८५) हे प्रमुख आहेत.

कन्फ्यूशस-परंपरेने बुद्धिवादी, चिद्‌वादी, अनुभववादी अशी वेगवेगळी वळणे घेतली असली, तरी मानवी प्रकृती, नैतिक जीवन आणि नैतिक वर्तनाने साधले जाणारे वैयक्तिक व सामाजिक कल्याण हेच तिच्या चिंतनाचे मध्यवर्ती विषय होते. कन्फ्यूशसने रनचा अर्थ मानवता असा केला होता. रन अंगी असलेला पुरुष हा उत्तम पुरुष होय. मानवता, सच्छील, औचित्य, शहाणपण आणि निष्ठा हे पाच स्थिर सद्‌गुण होत. नैतिक वर्तनाचे पहिले आणि मूलभूत क्षेत्र म्हणजे कुटुंब.कौटुंबिक नाती आणि कौटुंबिक कर्तव्ये हा वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा आधार आहे. माणसामाणसांतील प्रमुख नाती म्हणजे पिता-पुत्र, राजा-मंत्री,पति-पत्‍नी, भाऊ-भाऊ आणि मित्र-मित्र ही नाती. सारी कर्तव्ये ह्या नात्यांवर आधारली आहेत आणि ही चांगल्या प्रकारे पार पाडायची झाल्यास, वर्तनात औचित्य पाहिजे आणि वृत्तीत ऋजुता पाहिजे. प्रजेचे सुख साधणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य आहे आणि त्याच्यात ते अपयशी झाले, तर त्यांनी अधिकारत्याग केला पाहिजे,अशी कन्फ्यूशस पंथाची – विशेषतः मेन्सियसची – शिकवण होती. सद्‌गुणी राजे व अधिकारी हेच प्रजेचे हित साधू शकतात व म्हणून राज्यकर्त्यांच्या आणिअधिकाऱ्यांच्या शिक्षणावर कन्फ्यूशस पंथाने भर दिला. दोन हजार वर्षे चीनच्या शिक्षणाचे नियमन कन्फ्यूशसपंथीयांनी केले. हे शिक्षण सर्वांना मोकळे होते.व्यक्तीच्या मानवतेचा विकास साधणे आणि त्याच्या द्वारा सुसंवादी, सुखी समाज निर्माण करणे, हे शिक्षणाचे उद्दिष्ट होते. अधिकाराच्या जागी स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी झालेल्यांना नेमण्यात येत असल्यामुळे, अधिकार जन्माने प्राप्त होणे योग्य नसून गुणवत्तेने प्राप्त झाला पाहिजे, हे तत्त्व समाजात रूढ झाले. पण प्राचीन अभिजात ग्रंथांच्या अध्ययनावर आधारलेले आणि प्रामुख्याने साहित्यिक स्वरूपाचे असलेले हे शिक्षण आधुनिक काळात फारसे उपयुक्त नाही, असे आढळून आल्यामुळे ही शिक्षणपद्धती बंद करण्यात आली. तथापि तिने चिनी समाजात सांस्कृतिक एकरूपता निर्माण केली आणि गुणवत्तेचे तत्त्व दृढमूल केले. कन्फ्यूशसपंथाचे धर्मग्रंथ, धर्मगुरू, धर्मपीठ असे काही नाही. धार्मिक सणांचे व उत्सवाचे कार्य सामाजिक नाती दृढ करणे हेच आहे, असे मानण्यात येत असे. कन्फ्यूशसला वाहिलेली मंदिरे होती, तरी त्याला केवळ एक थोर शिक्षक, उपदेशक एवढेच मानण्यात येत असे. साऱ्या तत्त्वांचा आणि नीतिमत्तेचा उगम असलेले अतीत असे तत्त्वआहे, अशी कन्फ्यूशस पंथाची श्रद्धा होती. सामाजिक जीवनाप्रमाणेच मानवी इतिहासाचेही नियमन नैतिक नियमांनी होते, असे कन्फ्यूशसचे मत होते.इतिहासाचा विकास कसा होतो, ह्याविषयीच्या अनेक भिन्न संकल्पना कन्फ्यूशसपंथीयांनी मांडल्या असल्या, तरी इतिहासाची गती चक्रगती आहे प्राचीन काळीसुवर्णयुग होते, सांप्रत अवनत स्थिती आहे पण भविष्यात सुवर्णयुग परत अवतरेल, हीच कल्पना बहुमान्य होती. इतिहासाला दिलेल्या ह्या महत्त्वाचे दोन प्रकारचेपरिणाम झाले. आपल्या नैतिक, सामाजिक संकल्पनांचे प्रामाण्य, इतिहासात काय घडले, ह्याच्या आधारे सिद्ध करण्याची प्रथा पडली आणि एकाप्रकारे परंपरावाद बळावला. पण पृथ्वीवर, ह्या जगातच जे सुवर्णयुग अवतरणार आहे,त्यासाठी झटणे हे सर्वांचे कर्तव्य ठरले. इहलोकापलीकडचे कल्याण साधणे हे माणसाचे अंतिम साध्य आहे, असे शिकविणाऱ्या बौद्ध आणि ताओ मतांचा कन्फ्यूशसपंथीयांनी अव्हेर केला. पण ऐहिकतावाद, क्रियाशीलता, मूर्त वस्तू आणि व्यवहारह्यांविषयीची आस्था, ही कन्फ्यूशसपंथीयांच्या विचारसरणीची वैशिष्ट्ये असूनही, ते निसर्गविज्ञाने निर्माण करू शकले नाहीत. त्यांची सर्व शक्ती नैतिक व सामाजिक प्रश्नांवर केंद्रित झाली होती, हे ह्याचे कदाचित कारण असेल.


पहा : चिनीतत्त्वज्ञान.

संदर्भ : 1. Creel, H. G. Confucius, The Man and the Myth, New York, 1949.

2. Lin Yutang, Ed. &amp Trans. The Wisdom of Confucius, New York, 1938.

3. Liu, Wu-chi, Confucius: His Life and time, New York, 1955.

4. Waley, Arthur Trans. Analects of Confucius, Longon, 1949.

थान, युन-शान (इं.) रेगे, मे. पुं. (म.)