थेलीझ, मायलीटसचा : (इ. स. पू. सातवे–सहावे शतक). ग्रीक तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, गणिती व ग्रीसमधील सात शहाण्यांपैकी एक. मायलीटस येथे त्याचा जन्म झाला. यूरोपमधील तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाचा पाया त्याने रचला. ग्रीक तत्त्वज्ञानामधील मायलीशियन मताचा (आयोनियन संप्रदायाचा) हा संस्थापक. निसर्गाच्या वैचित्र्यपूर्ण अंगोपांगांमागे पाण्यासारखी एकच अद्‌भुत शक्ती कारणीभूत आहे, हे त्याचे तत्त्वज्ञान. जगातील भौतिक घटनांमागे अमानवी शक्ती आहे, हे दाखविणाऱ्या सनातन कल्पनांना त्याने धक्का दिला व विचारांना योग्य दिशा दिल्याचे श्रेय त्याला मिळाले. त्याचे सर्वांत मोठे कार्य म्हणजे त्याने यूरोपला भूमितीची दिलेली देणगी. भूमितीची काही प्रमेये त्याच्या नावावर टाकली जातात. भूमितीच्या आधारे त्याने पिरॅमिडची उंची मोजली व समुद्रातील जहाजांची अंतरे सांगितली. इ. स. ५८५ (२८ मे) मध्ये झालेल्या सूर्यग्रहणाविषयी त्याने आधीच भाकित केले होते, असे म्हटले जाते. त्यावरून तो उत्तम खगोलशास्त्रज्ञ असावा. त्याच्या लेखनाचा किंवा इतर प्रकारचा पुरावा अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्या कार्याची निश्चिती करणे अशक्य आहे. ग्रीक इतिहासकार हीरॉडोटसच्या मते थेलीझ हा चागंला मुत्सद्दी होता. ग्रीक नगरराज्यांचा एकच संघ असावा असे त्याचे मत होते. तसे करण्याची त्याने खटपटही केली. पृथ्वी पाण्यावर तरंगते ही कल्पना त्याने मांडली. थेलीझ यास आकाशातील ताऱ्यांकडे पाहण्याचा फार नाद होता आणि याच नादात एक दिवस वर पाहत चालला असताना तो विहिरीत पडल्याचे सांगतात. ॲनॅक्सिमँडर व ॲनॅक्सिमीनीझ हे त्याचे शिष्य होत.

पहा: ग्रीक तत्त्वज्ञान.

शाह, र. रू.