पॉपर, कार्ल राइमुंट : (२८ जुलै १९०२) : जन्माने ऑस्ट्रियन असलेला, पण इंग्लडमध्ये स्थायिक झालेल्या विसाव्या शतकातील एक अग्रणी तत्त्ववेत्ता. जन्म व्हिएन्ना येथे.त्यांचे वडील बॅरिस्टर होते. व्हिएन्ना विद्यापीठात गणित, भौतिकी आणि तत्त्वज्ञान ह्या विषयांचा अभ्यास.१९३७ ते १९४९ पर्यंत तेन्युझिलंडमधिल कँटरबरी विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे अधिव्याख्याते होते.१९६४ पर्यंत लंडन विद्यापिठात तर्कशास्त्र आणि वैज्ञानिक पध्दति ह्या विषयाचे ते प्राध्यापक होते. १९६४ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला.

कार्ल पॉपर

तत्त्वज्ञानाच्या अनेक शाखांत पॉपर ह्यांनी मूलगामी चिंतन केले आहे पण ह्या विविधतेमध्येही एक सुत्र आहे.वैज्ञानिक ज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण काय आहे, खरेखुरे वैज्ञानिक ज्ञान हे कृतक-विज्ञानापासून (स्युडो-सायन्सपासुन) तसेच तत्त्वमीमांसेपासून वेगळे कसे काढता येइल, हा पॉपर ह्यांनी उपस्थित केलेला मध्यवर्ति प्रश्न होय. तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा पुरस्कार करणारया ‘व्हिएन्ना वर्तुळा’ चे पॉपर जरी सभासद नव्हते, तरी ह्या वर्तुळाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. पण व्हिएन्ना वर्तुळाने उपस्थित केलेला मुलभूत प्रश्न ‘ विधान अर्थपूर्ण कधी असते? विधानाच्या अर्थपूर्णतेचा निकष काय ?’ हा होता. पॉपर ह्यांचा प्रश्न वेगळा आहे. ‘वैज्ञानिक स्वरुपाचे विधान इतर प्रकाराच्या विधानांपासुन वेगळे कसे काढता येते ?’ असा हा प्रश्न होता. याचे सूत्रबध्द उत्तर असे, की खंडनक्षमता हा वैज्ञानिक विधानाचाव्यवच्छेदक धर्म असतो.

विज्ञानात आपण नेहमीच एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधीत असतो, कशाचा तरी उलगडा करण्याचा प्रयत्न करीत असतो. असा उलगडा करताना कल्पकतेने एक गृहितक पुढे करणे, एक अटकळ बांधणे ही पहिली पायरी असते. असे गृहितक रचण्यासाठी कल्पकतेची, ‘प्रतिभे’ची आवश्यकता असते. पण ह्या गृहितकाचे परिक्षण करण्यात वैज्ञानिक पध्दतीचे मर्म साठविलेले असते. गृहितकाचे परिक्षण करण्यासाठी आपण त्याच्यापासुन, निरीक्षणाने सत्य किंवा असत्य ठरविता येतील अशी विधाने म्हणजे निरीक्षण विधाने निगमनाने निष्पन्न करून घेतो. गृहितकापासून सतत अशी वेगवेगळी निरीक्षण-विधाने प्राप्त करुन घेत राहणे, निरीक्षणाची कसोटी लावून त्यांचे खंडन करण्याचा प्रयत्न करीत  राहणे, गृहितकाला असे खंडनाचे सतत आव्हान देत राहणे, हा वैज्ञानिक पध्दतिचा आत्मा आहे. ह्या खंडनाच्या आव्हानाला तोंड देउन टिकून राहणारे गृहितक म्हणजे वैज्ञानिक ज्ञान होय. वैज्ञानिक ज्ञान हे सत्य म्हणून प्रस्थापित झालेल्या विधानांचे बनलेलेनसते तर आतापर्यंत प्रयत्न करुनही ज्यांचे खंडन करण्यात यश आलेले नाही, अशा विधानांचे ते बनलेले असते पण उद्या त्यांचे खंडन होऊ शकेलही. ज्या विधानांचे असे खंडन करता

येणारच नाही, अनुभवाच्या कसोटीवर ज्याची असत्यता प्रस्थापित करण्याचा मार्गच मोकळा नसतो, असे विधान खरेखुरे वैज्ञानिक विधान नसते. उदा. ईश्वर करतो ते सर्व माणसांच्या भल्यासाठीच आहे, फक्त ते आपल्याला कळत नाही व म्हणून वैज्ञानिक विधान हे त्याचे स्वरूप उरत नाही.

ऐतिहासिकतावादाचे पॉपर ह्यांनी केलेले खंडन वैज्ञानिक ज्ञानाविषयीच्या ह्याच भुमिकेवर आधारलेले आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल यांच्या तत्त्वज्ञानात ऐतिहासिकतावादाची बीजे पॉपर यांना आढळतात आणि हेगेल व मार्क्स यांच्या मानवी समाज आणि इतिहास ह्यांविषयीच्या सिध्दांतात ह्या वादाचे विकसित स्वरुप दिसुन येते. ऐतिहासिकतावादाची भूमिका साररुपाने अशी : कोणत्याही समाजाच्या स्वरुपाचे एक सत्व असते आणि ह्या सत्वापासून निष्पन्न होणारया नियमांना अनुसरून त्या समाजाचा विकास अनिवार्यपणे घडून येत असतो. हया विकासाला साहाय्य करण्यात, त्याला अनुकूल असे वर्तन करण्यात व्यक्तीची नीती सामावलेली असते आणि विरोध करण्यात अनीती असते. पॉपर यांच्या मते असे समाजाच्या ‘सत्वा’ चे किंवा विकासाच्या अनिवार्य नियमांचे वैज्ञानिक ज्ञान असू शकत नाही पण समाजापुढील विषिष्ट प्रश्नांविषयीचे वैज्ञानिक ज्ञान आपण प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याच्या आधारे विषिष्ट बाबतीत सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतो. पण समाजाचे आमूलाग्र परिवर्तन करण्याच्या प्रयत्नाला काही अर्थ नसतो. शिवाय आपण कोणत्या नैतिक तत्त्वांना किंवा मूल्यांना अनुसरुन आचरण करणार ह्याचा निर्णय आपण करावयाचा असतो, विश्वाच्या स्वरुपापासुन किंवा इतिहासापासून मूल्ये निष्पन्न होत नाहीत, माणसांनी ती मूल्ये म्हणून स्वीकारल्यामुळे ती मूल्ये असतात.

पॉपर यांचे प्रमुख ग्रंथ असे : द लॉजिक ऑफ सायंटिफिक डिस्कव्हरी (मुळ जर्मन १९३५ इं.भा. १९५९), द ओपन सोसायटी अँड इट्स एनिमीज (२ खंड, १९४५), द पॉव्हर्टी अँड इट्स हीस्टॉरिसिझम (१९५७) आणि कन्जेक्चर्स अँड रेप्युटेशन्स (१९६३). 

संदर्भ : Schilpp, P. A., Ed. The Philosophy of Karl Popper, La Salle III., 1974

रेगे, मे. पुं.