निर्मातृदेववाद : (डीइझम). सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये उदयास आलेली एक महत्त्वाची बुद्धिवादी धार्मिक-तात्त्विक चळवळ. ‘डीइझम’ ही संज्ञा लॅटिनमधील deus म्हणजे ‘देव’ या शब्दावरून आली. ह्या सृष्टीचा निर्माता एकमेव ईश्वर असून तो ह्या सृष्टीपासून तसेच मानवापासून सर्वस्वी वेगळा, अलिप्त आहे असे निर्मातृदेववादात मानले जाते. ईश्वराने प्रकट केलेला (रिव्हील्ड) म्हणजे बायबलप्रणीत धर्म अर्थातच निर्मातृदेववादास मान्य नाही. निसर्गाचा प्रकाश म्हणजे मानवी बुद्धी हीच मानवाचा खरा व एकमेव आधार आहे, असा निर्मातृदेववाद्यांचा विश्वास होता.

ईश्वरवाद (थिइझम), चराचरेश्वरवाद (पॅन्‌थिइझम), निरीश्वरवाद (एथिइझम) व निर्मातृदेववाद यांच्या विचारसरणीत नेमका फरक व साम्य कोणते आहे, हे पाहणे उद्‌बोधक ठरेल. निर्मातृदेववादात किंवा ⇨ ईश्वरवादात सृष्टीचे आदिकारण म्हणून ईश्वराचे अस्तित्व मान्य करण्यात येते. म्हणूनच ⇨ चराचरेश्वरवादाहून व ⇨ निरीश्वरवादाहून ह्या दोन्हीही मतांतील ईश्वरविषयक कल्पना भिन्न होत. चराचरेश्वरवादात ईश्वराचे व सृष्टीचे तादात्म्य मानले जाते, तर निरीश्वरवादात ईश्वराचे अस्तित्वच नाकारण्यात येते. निर्मातृदेववाद व ईश्वरवाद यांना ईश्वराचे अस्तित्व मान्य असले, तरी ईश्वर व सृष्टी यांच्यामधील संबंधांबाबत त्यांच्या भूमिका भिन्न आहेत. ईश्वराचे सृष्टीतील अंतर्शायीत्व (इमॅनन्स) व आत्म्यांच्या कल्याणाची त्याला असलेली कळकळ (प्रॉव्हिडन्स) बायबलप्रणीत ईश्वरवादात मान्य केली जाते, तर निर्मातृदेववादात ईश्वर हा सृष्टीचा निर्माता असला, तरी तो सृष्टीहून संपूर्णपणे वेगळा, निराळा, अलिप्त असतो असे मानले जाते. ईश्वराने अतिशय संतुलित व नियमबद्ध अशी सृष्टी एकदा निर्माण केली असून त्याने घालून दिलेल्या नियमांनुसारच ती चालते. ह्या नियमांत ईश्वर कधीच बदल वा ढवळाढवळ करीत नाही. ह्या घालून दिलेल्या सृष्टीच्या नियमांस अपवाद असे नाहीतच व ईश्वर त्या नियमांत कधी बदलही करत नाही, ह्या निर्मातृदेववादी भूमिकेत व पारंपरिक ख्रिस्ती धर्मातील सिद्धांतांत उघडच विरोध आहे.

निर्मातृदेववादी चळवळ सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये उदयास आली, तेव्हा सर्वसामान्य सुशिक्षित माणसाचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराच बदलला होता. ⇨ ज्ञानोदय चळवळीमुळे सर्वच क्षेत्रांत बुद्धिप्रामाण्याला महत्त्व प्राप्त होत होते. विविध क्षेत्रांतील ह्या वैचारिक प्रगतीचा प्रभाव निर्मातृदेववादावरही पडल्यावाचून राहिला नाही. तत्त्वज्ञानातील नव्या पद्धतींचा प्रवेश, सैद्धांतिक स्वरूपाची मतभिन्नता, राजकीय व सामाजिक विचारांचा विकास, दूरस्थ प्रदेशांचा शोध, अनुभववादी विज्ञानांतील विविध शोध, वैज्ञानिक दृष्टीचा उदय इत्यादींच्या प्रभावातून निर्मातृदेववादी चळवळ उगम पावून विकसित झाली. निर्मातृदेववाद्यांना कधीकधी ‘मुक्तविचारवंत’ (फ्री थिंकर्स) म्हटले जाते. मानवाची प्रत्येक कृती ही ईश्वराकडून नियंत्रित होते, या पारंपरिक ख्रिस्ती धर्मातील कल्पनेशी निर्मातृदेववादी भूमिकेचा विरोध होता. ख्रिस्ती धर्मातील ईश्वरी प्रकटीकरणाची कल्पना तसेच ईश्वरी चमत्कार घडणे, ह्या कल्पनाही त्यांना मान्य नव्हत्या. प्रकटीकरण वा चमत्कार घडणे म्हणजे ईश्वराने निर्माण केलेल्या संतुलित व नियमबद्ध सृष्टीत ईश्वरानेच ढवळाढवळ करणे होय आणि हे त्यांच्या मूळ कल्पनेशीच विसंगत, व्याघाती आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या मते मानवाने आपल्या स्वतःच्या बुद्धीवर विसंबूनच ईश्वराचे अस्तित्व, त्याचे स्वरूप तसेच स्वतःची नैतिक जबाबदारी व कर्तव्ये पार पाडावयास हवीत. यांबाबत पवित्र धर्मग्रंथांचे प्रामाण्य मानण्याची आवश्यकता नाही.

आपल्या मतांच्या प्रतिपादनार्थ निर्मातृदेववाद्यांनी विविध ग्रंथ लिहून ही चळवळ सतराव्या-अठराव्या शतकांत जोमाने विकसित केली. त्यांच्यातील काही विचारवंतानी धर्माचा खरा आधार कोणता असू शकतो, याबाबत चिकित्सा करून व बायबलप्रणीत धर्मतत्त्वे बाजूला सारून काही बुद्धिप्रणीत धर्मतत्त्वे प्रतिपादन केली. या संदर्भात De Veritate (१६२४) हा शेरबरीचा लॉर्ड हर्बर्ट (१५८१–१६४८) याचा ग्रंथ उल्लेखनीय होय. लॉर्ड हर्बर्ट हा निर्मातृदेववादाचा जनक समजला जातो. स्वाभाविक वा नैसर्गिक बुद्धिगम्य धर्म व ईश्वराने प्रकट केलेला पारंपरिक धर्म यांतील फरक नाकारण्याकडे ह्या चळवळीची प्रवृत्ती दिसते. मॅथ्यू टिंड्‌ल (१६५६–१७३३) याने आपल्या क्रिश्चॅनिटी ज ओल्ड ज द क्रिएशन (१७३०) या ग्रंथात बायबल हे निसर्गनियमाचीच पुनरावृत्ती असल्याचे म्हटले आहे. हा ग्रंथ ‘निर्मातृदेववाद्यांचे बायबल’ म्हणून ओळखला जातो. नैसर्गिक धर्म आणि ईश्वराने प्रकट केलेला धर्म हे एकाच बुद्धिवादी धर्माचे दोन भिन्न आविष्कार होत, असे त्याने प्रतिपादले आहे. जॉन टोलंड (१६७०–१७२२) हा स्वतःस निर्मातृदेववादी म्हणवीत नाही तथापि त्याने आपल्या क्रिश्चॅनिटी नॉट मिस्टिरिअस (१६९६) या ग्रंथात असे सूचित केले, की बायबलमध्ये बुद्धीशी विसंगत या बुद्धीच्या पलीकडील असे काहीच नाही म्हणूनच ख्रिस्ती धर्मातील कुठलाही सिद्धांत गूढ वा अनाकलनीय मानण्याचे कारण नाही. अँथनी ॲशली कूपर (१६७१–१७१३) याने आपल्या लेखनातून निर्मातृदेववादी नीतिकल्पना मांडली. दैवी मार्गदर्शनाचा उपयोग मानवाच्या नैतिक कृतीत होत नाही, या आधारविधानावरून ख्रिस्ती धर्मातील मरणोत्तर स्वर्ग वा नरकप्राप्तीचा अथवा मरणोत्तर जीवनाचा सिद्धांत काही निर्मातृदेववादी नाकारतात. नव्याजुन्या करारांतील चमत्कारांचा व भविष्यवाणीचा (प्रॉफिसी) भाग त्यांच्या मूळ कल्पनेशीच विसंगत म्हणून निर्मातृदेववाद्यांनी नाकारला. बायबलमधील भविष्यवाणीचा अर्थ त्यांनी रूपकात्मक व चमत्कारांचा अर्थ निसर्गनियमांनुसार लावला. याबाबत निर्मातृदेववाद्यांच्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. अशा प्रतिक्रियेतून निर्माण झालेला एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे द ॲनालॉजी ऑफ रिलिजन (१७३६) हा होय. डरॅम येथील बिशप ⇨ जोसेफ बटलर (१६९२–१७५२) याने तो लिहिला.

फ्रान्समध्ये अठराव्या शतकातील बुद्धिवाद्यांनी बायबलमधील अंधश्रद्धेची जागा घेऊ शकेल अशा बुद्धिवादी नैसर्गिक धर्माचे तत्त्वज्ञान प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. ‘एन्साइक्लोपीडिस्ट’ विचारवंतानी, विशेषतः व्हॉल्तेअर (१६९४–१७७८) व रूसो (१७१२–७८), यांनी निर्मातृदेववादी विचार प्रसृत केले. रूसोचे म्हणणे असे, की हृदय हे देवाचे मंदिर आहे. बाह्य विश्वाच्या आकर्षणातून मुक्त झालेले निर्विकार हृदय हे ईश्वराचे मंदिर आहे. पावित्र्य, साधुत्व, नीती, सद्‌गुण ह्यांची आवश्यकता आहे असे ईश्वर सांगतो आणि त्यांचे फलही देतो. हे गुणच ईश्वराची पूजा होय. जर्मनीत प्रशियाचा सम्राट दुसरा फ्रीड्रिख (१७१२–८६) याच्या दरबारात तसेच गोथोल्ट लेसिंग (१७२९–८१) व हेर्मान-रीमारुस (१६९४–१७६८) यांच्या लिखाणात निर्मातृदेववादी विचार आढळतात.

ब्रिटिश व फ्रेंच निर्मातृदेववादी विचारांनी अमेरिकेतील बेंजामिन फ्रँक्लिन (१७०६–९०), टॉमस जेफर्सन (१७४३–१८२६), टॉमस पेन (१७३७–१८०९), ईथन ॲलेन (१७३८–८९) इ. लेखक प्रभावित झाले. पेन याने द एज ऑफ रीझन (२ भाग, १७९४, ९६) आणि ॲलेनने रीझन द ओन्ली ऑरकल ऑफ मॅन (१७८४) यांसारखे निर्मातृदेववादी विचार व्यक्त करणारे ग्रंथ लिहिले.

निर्मातृदेववादी विचारसरणीतील धार्मिक सहनशीलता, नैतिक आदर्शांशी असलेला निगडित संबंध तसेच धर्म व विज्ञान यांत सुसंगती निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या जमेच्या बाजू म्हणता येतील. वैज्ञानिक शोधांतील गृहीत धरलेला अतिव्याप्त परिणाम व बायबलप्रणीत धर्मावर त्यांनी केलेली कठोर टीका ह्या त्यांच्या विचारांतील दोन प्रमुख उणिवा म्हणता येतील. ह्या विचारसरणीचा प्रभाव व्यापक प्रमाणावर मात्र पडू शकला नाही व अठराव्या शतकातच ही चळवळ क्षीण होत गेली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक महात्मा ⇨ जोतीबा फुल्यांच्या विचारांतील काही विचारांचे (विशेषतः त्यांच्या सार्वजनिक सत्यधर्म ह्या ग्रंथातील) साम्य निर्मातृदेववादी विचारांशी आहे. सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरास ते ‘निर्मीक’ अशी संज्ञा देतात.

संदर्भ : 1. Koch, G. A. Republican Religion : The American Revolution and the cult of Reason, Magnolia, Mass., 1964.

           2. Torrey, N. N. Voltaire and the English Deists, New Haven, Conn., 1930.

सुर्वे, भा. ग.