निंबार्क : (सु. अकरावे शतक). निंबार्क, निंबादित्य अथवा नियमानंद हे वैष्णव पंथातील द्वैताद्वैतवादी सनक संप्रदायाचे संस्थापक अकराव्या शतकाच्या सुमारास होऊन गेले. त्यांचे जन्मस्थान कर्नाटकात बेल्लारी जिल्ह्यातील निंब किंवा निंबापूर हे असावे. त्यांच्या वडिलांचे नाव जगन्नाथ होते, असे त्यांच्या दशश्लोकीवरील हरिव्यासदेवांच्या टीकेत म्हटले आहे. ते जन्माने तेलुगू ब्राह्मण होते परंतु त्यांच्या जन्माविषयी तसेच घराण्याविषयी फारशी माहिती मिळत नाही. रा. गो. भांडारकरांच्या मते त्यांचा मृत्यू इ. स. ११६५ च्या सुमारास झाला असावा. राधाकृष्णन त्यांच्या मते ते रामानुजांनंतर पण मध्वाचार्यांच्या पूर्वी होऊन गेले. काहींच्या मते ते वल्लभाचार्यांनंतर होऊन गेले. निंबार्काच्या लेखनात रामनुजांच्या श्री संप्रदायाचा व मध्वाचार्यांच्या ब्रह्म संप्रदायाचा उल्लेख आहे. शिवाय मध्वमुखमर्दन नावाची एक टीकाही त्यांच्या नावावर आहे. यावरून ते रामानुज व मध्वाचार्य या दोघांच्याही नंतर, पण वल्लभाचार्यांच्या पूर्वी होऊन गेले असावे, असेही म्हणता येईल.

निंबार्काचार्यांच्या वेदान्तपारिजातसौरभ या ब्रह्मसूत्रंभाष्यात स्वत:चे गुरू नारद आणि नारदाचे गुरू परमाचार्यकुमार म्हणजे सनत्कुमार यांचा उल्लेख केला आहे. छांदोग्योपनिषदातील सातव्या अध्यायात सनत्कुमाराने नारदाला ‘भूमा’ हेच परब्रह्म असल्याचा उपदेश केला आहे. त्याचाही निर्देश या संदर्भात निंबार्कांनी केला आहे. भविष्यपुराणात निंबार्कांचा निर्देश केला आहे. भविष्यपुराणात निंबार्कांचा निर्देश असून त्यांना सुदर्शन हेही नाव दिले आहे. ब्रह्मवैवर्तपुराणात विष्णूच्या प्रिय सुदर्शन आयुधाचा हा अवतार होय, असे म्हटले आहे. श्रीमद्‌भागवतातील (६·१५) ऋषिगणांच्या नावांमध्ये आरुणीऋषी म्हणजे निंबार्क होय, असे निंबार्क संप्रदाय मानतो. द्वारपयुगाच्या शेवटी निंबार्कांचा जन्म झाला, असे भविष्यपुराणात म्हटले आहे. ऐतिहासिक दृष्टीने हे मत रा. गो. भांडारकरांनी मान्य केले नाही.

निंबार्कांनी ब्रह्मसूत्रावर वेदान्तपारिजातसौरभ नावाचे भाष्य लिहिले आहे. त्यांनी आपल्या दशश्लोकीत जीव, जगत व ईश्वर यांतील भेद स्पष्ट करणारे द्वैताद्वैत तत्त्वज्ञान स्पष्ट केले आहे. याशिवाय श्रीकृष्णस्तवराजमध्वमुखमर्दन हे त्यांचे इतर ग्रंथ आहेत. केशवकाश्मीरी याने भगवद्‌गीतेवरील तत्त्वप्रकाशिका नावाच्या आपल्या टीकेत मुख्यत्वे निंबार्कांचे तत्त्वज्ञान विशद केले आहे. पुरुषोत्तमाचार्य यांनी त्यांच्या दशश्लोकीवर वेदान्तरत्नमंजूषा नावाची टीका लिहिली आहे.

भाष्यकार श्रीनिवासाचार्य हे निंबार्कांचा शिष्य म्हणून स्वत:चा निर्देश करतात. लक्ष्मणभट्ट, उदुंबर, गौरमुख व हरिव्यास हेही त्यांचेच शिष्य होत. मधुरा किंवा रागात्मक भक्तीचा एक संप्रदाय म्हणूनही यांचा संप्रदाय ओळखला जातो. निंबार्कांना ‘कृष्णसखी रंगदेवी’चा अवतार मानतात. या संप्रदायाचे मठ आणि मंदिरे राजस्थानातील सलेमाबाद, तसेच वृंदावन, मथुरा, राधाकुंड, गोवर्धन, निंबगाव, मथुरेजवळील ध्रुवसेन येथे आहेत. या संप्रदायातील अनुयायांचे विरक्त व गृहस्थ असे दोन भेद आहेत.

कपाळावर गोपीचंदन व बुक्क्याचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, ‘जयसर्वेश्वर’ असा घोष आणि नावापुढे ‘दास’ किंवा ‘शरण’ असे उपपद ही संप्रदायाची बाह्य लक्षणे होत.

पहा : द्वैताद्वैतवाद.

माहुलकर, दि. द.