चिनी तत्त्वज्ञान : भारतीय तत्त्वज्ञान व चिनी तत्त्वज्ञान यांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत. ज्याप्रमाणे भारतीय तत्त्वज्ञानाची सुरुवात वेदांपासून, विशेषतः ऋग्वेदापासून होते, त्याप्रमाणे चिनी तत्त्वज्ञानाची सुरुवात ‘जिंग’ (सूत्र अथवा शास्त्रग्रंथ) नावाच्या सहा आद्य आचारसंहितांपासून झाली आहे. त्यांतील यी-जिंग्  अथवा परिवर्तनांची संहिता ही विशेष महत्त्वाची आहे. ‘यी-जिंग्’ या ग्रंथाचा मूळ उपयोग ज्योतिषविद्येसाठी होत होता परंतु हळूहळू त्यातील षट्‌कांचा सामाजिक मूल्यांसोबत संबंध जोडण्यात आला आणि त्याचा ज्योतिषविद्येबरोबरचा संबंध तुटून तो एक तत्त्वज्ञानाचा ग्रंथ बनला.

यी-जिंग्‌मध्ये सुरुवातीस चौसष्ट प्रतीके अथवा आकृती दिल्या आहेत. त्या आकृतींना ‘ग्वा’ म्हणतात. यांपैकी प्रत्येक आकृती सहा सरळ रेषांनी बनलेली आहे. मग त्या रेषा मधे भंग पावलेल्या असतील किंवा अखंड असतील किंवा दोन्ही तऱ्हेच्या असतील. म्हणून या आकृतींना परकीय विद्वान षट्‌के (हेक्सग्रॅम्स) म्हणतात. ही षट्‌के मुळात आठ मूलभूत प्रतीकांची बनलेली आहेत. हे प्रत्येक प्रतीक तीन अखंड किंवा तुटक सरळ रेषांचे बनलेले असते. या प्रतीकांना ‘बा-ग्वा’ किंवा ‘आठ-त्रिके’ म्हणतात. ती पुढीलप्रमाणे :

      

या आठ त्रिकांपैकी प्रत्येकाचा प्रत्येकाशी संयोग केल्यास एकूण चौसष्ट षट्‌के मिळतील. उदा., पहिले व चौसष्टावे षट्‌क.

898

पहिला प्राचीन सम्राट फू-स्यी (इ.स.पू.सु. २८५२–२७३८?) याने या आठ त्रिकांची निर्मिती केली, असे मानतात. या आठ त्रिकांच्या परस्परसंयोगापासून चौसष्ट षट्‌के तयार करण्याचे श्रेय एक तर स्वतः फू-स्यी यास किंवा त्याचा उत्तराधिकारी, दुसरा प्राचीन सम्राट षन्-नूंग् (इ.स.पू.सु. २७३७–२६९८?) यास दिले जाते.

या चौसष्ट षट्‌काकृतींच्या मिळून ३८४ रेषा होतात. त्यांना ‘याव्’ म्हणतात. या रेषा व त्यांनी बनणाऱ्या षट्‌कांच्या आकृती ह्या मिळून पुढील तत्त्वांचे सूचन करतात. प्रथम ‘थाय जी’, त्याचा अर्थ महान अंतिम तत्त्व. त्यानंतर दोन तत्त्वे येतात. त्यांना ‘ल्यांग यी’ म्हणतात. त्यांतील पहिले ‘यांग’ (—). त्याचा अर्थ भावरूप पुरुषतत्त्व व दुसरे ‘यीन’ (— —) म्हणजे अभावात्मक स्त्रीशक्ती. तिसरे स्स-स्यांग्. त्यात चार मान चिन्हे येतात : (१) प्राचीन यांग (), (२) नूतन यांग (), (३) प्राचीन यीन् () आणि (४) नूतन यीन्

(12p). शेवटचे तत्त्व म्हणजे विश्वातील सर्व नैसर्गिक घटनांचा व मानवी जीवनातील घडामोडींचा आविष्कार करणारे तत्त्व. दुसऱ्या शब्दांत सांगायचे म्हणजे अंतिम परम सत्यापासून दोन मूलतत्त्वे निर्माण झाली. या दोन मूलतत्त्वातून सृष्टीची चार मानचिन्हे निघाली आणि या चार चिन्हांतून सर्व सृष्टी निर्माण झाली. ‘ताओ’ वा ‘दाव’ ची अथवा विश्वाच्या उत्क्रांतीची दिशा यातून सुचविली जाते.

या चौसष्ट षट्‌कांच्या निर्मितीनंतर लगेचच ग्वा-त्स  अथवा षट्‌काकृतिदर्शन व याव्-त्स  तथा रेषादर्शन या नावांचे दोन ग्रंथ लिहिले गेले.

ग्वा-त्समध्ये सर्व षट्‌कांची नावे व व्याख्या दिलेल्या आहेत, तर याव्-त्समध्ये षट्‌काकृतींतील सर्व रेषांपैकी प्रत्येकीचे आकृतीतील स्थान लक्षात घेऊन तिचा अर्थ काय ते स्पष्ट केले आहे. संहिता व ब्राह्मण हे जे वेदांचे दोन भाग, त्याप्रमाणेच वरील ग्रंथ होत.

चिनी तत्त्वज्ञानातील संप्रदाय : ज्यांना षड्‌दर्शने म्हणतात असे भारतीय तत्त्वज्ञानपरंपरेत न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व उत्तरमीमांसा वा वेदान्त हे संप्रदाय आहेत. त्याच रीतीने चिनी तत्त्वज्ञानातसुद्धा सहा घराणी वा संप्रदाय आहेत. त्यांना ‘ल्यव्-ज्या’ असे समूहवाचक नाव आहे. ते पुढीलप्रमाणे : (१) रू-ज्या अथवा कन्फ्यूशसचा संप्रदाय, (२) दाव-ज्या अथवा ताओ संप्रदाय, (३) मो-ज्या अथवा मो संप्रदाय, (४) फा-ज्या अथवा निर्बंधवादी (लीगॅलिस्ट) अथवा वास्तववादी (रिॲलिस्ट) संप्रदाय. (५) यीन्-यांग-ज्या अथवा विश्वोत्पत्तिविषयक संप्रदाय आणि (६) मींग-ज्या अथवा तार्किक संप्रदाय. भारतीय तत्त्वज्ञानातील सहाही दर्शनांचे न्याय-वैशेषिक, सांख्य-योग व मीमांसा वेदान्त अशा तीन गटांत वर्गीकरण करता येते. चिनी तत्त्वज्ञानातील सहा संप्रदायही कन्फ्यूशस-निर्बंधवादी, दाव वा ताओ-विश्वोत्पत्तिविषयक आणि मो-तार्किक अशा तीनच गटांत विभागता येतात.


कन्फ्यूशस व निर्बंधवादी संप्रदाय : खुंग-फू-ज (म्हणजे आचार्य खुंग) अथवा कन्फ्यूशस (इ.स.पू. ५५१ – ४७९) याला विद्वत्ता व सभ्यता यांचा पूर्णावतार आणि आद्य आचार्य मानले जात असे. विद्वत्ता आणि सभ्यता या गोष्टी पूर्वी शासनकर्त्या अमीरउमरावांची मिरासदारी समजल्या जात होत्या पण कन्फ्यूशसने त्या जनसामान्यापर्यंत आणून पोहोचविल्या. या कारणाकरिता कन्फ्यूशस पंथाच्या लोकांत विद्या व सभ्यता या गोष्टींना फार मान होता.

लुन-यू  म्हणजे ‘प्रवचने’ या नावाचा कन्फ्यूशसच्या प्रवचनांचा एक संग्रह आहे. त्यातील पहिलाच शब्द ‘स्युए’ हा अध्ययन करणे, या अर्थाचा आहे. त्यात आचार्याने म्हटले आहे, ‘सतत चिकाटीने मन लावून अध्ययन करणे, ही आनंददायक गोष्ट नाही काय?’ (१·१). आपल्या शिष्यांबरोबर त्याने अनेकवार अध्ययन या विषयाची चर्चा केली आहे. उपयुक्त पुस्तकातील पुढील अवतरणे पहा : ‘पंधराव्या वर्षी अध्ययन करण्याची ओढ मला लागली. तिसाव्या वर्षी मी त्यात स्थिरावलो. चाळिसाव्या वर्षी सर्व संशयांचा निरास झाला. पन्नासाव्या वर्षी विश्वयोजना कळू लागली. साठाव्या वर्षी केवळ ऐकून सत्य काय व असत्य काय हे ठरविणे शक्य झाले. सत्तराव्या वर्षी युक्ताचाराचे उल्लंघन न करताही मी स्वच्छंदपणे जगू शकतो ’ (२·४). ‘कोणत्याही दहा कुटुंबात माझ्याइतका प्रामाणिक आणि निष्ठावंत माणूस सापडू शकेल पण माझ्याएवढे विद्याप्रेम असलेला माणूस जगाच्या पाठीवर मिळते कठीण’ (५·२७).

कन्फ्यूशसच्या मताप्रमाणे अध्ययनाबरोबरच स्वतः विचार करण्याची शक्तीही वाढीस लागली पाहिजे. त्याने म्हटले आहे, ‘विचारपरिशीलनाशिवाय केलेले अध्ययन म्हणजे व्यर्थ श्रम होत. अध्ययनाशिवाय केलेला नुसता विचार हा भयावह आहे’ (२·१५). केवळ अभ्यास आणि विचार एकत्र आले एवढेही पुरे नाही त्यांना कृतीची जोड पाहिजे. ज्ञान आणि विचार हे नेहमी आचरणात आणले पाहिजेत, असे तो म्हणे.

कन्फ्यूशसचे विचार आणि निष्कर्ष हे प्रामुख्याने नैतिक, सामाजिक आणि मानवतावादी आहेत. घटपटांची अथवा आस्तिक-नास्तिक यांबाबतची चर्चा त्याने बुद्ध्या टाळली. प्रवचनसंग्रहात म्हटले आहे, की पुढील विषयांसंबंधी कन्फ्यूशस चर्चा करीत नसे : (१) अद्‌भूत चमत्कार, (२) अतिभौतिक शक्ती, (३) असंगत व अव्यवस्थित विषय आणि (४) भुतेखेते आणि देवदेवता (७·२०). देवतांची आणि मृतात्म्यांची पूजा करण्यासंबंधी एकदा ज-लू नावाच्या शिष्याने विचारले असता कन्फ्यूशस म्हणाला, ‘माणसांची तुम्हाला नीट सेवा करता येत नाही. तर मृतात्मे आणि देवता यांना तुम्ही काय देऊ शकणार?’ यावर-ज-लू म्हणाला, ‘तर मग आम्हाला मृत्यूसंबंधी काही सांगा’. त्यावर आचार्याने उत्तर दिले, ‘तुम्हाला जर जीवन समजत नाही, तर मृत्यूसंबंधी तरी काय कळणार?’ (११·२). आपला शिष्य ज-गुंग यास कन्फ्यूशस स्वतःच एकदा म्हणाला. ‘मी मौनच पसंत करतो’. मग ज-गुंगने विचारले, ‘आचार्य, आपण बोललाच नाहीत, तर आम्ही शिष्यांनी लिहून तरी काय ठेवायचे?’ आचार्यांनी उत्तर दिले, ‘विश्वशक्ती बोलते काय? सर्व ऋतू नियमितपणे आपली परिक्रमणा करतात त्या त्या वस्तू योग्य वेळी नेहमीच निर्माण होतात पण ती विश्वशक्ती यासंबंधी काही सांगते काय?’ (१७·१९).

कन्फ्यूशसनंतर या संप्रदायात महत्त्वाच्या अशा दोन व्यक्ती झाल्या. मंग-ज अथवा ⇨मेन्सियस (इ.स.पू. ३७१-२८९) आणि स्युन-ज (इ.स.पू.सु.३३५-२८६). हे दोघेही कन्फ्यूशसला सर्वश्रेष्ठ गुरू म्हणून मान देत व सकृद्दर्शनी त्याच्याच शिकवणुकीचे पालन करीत. परंतु त्याच्या वचनांचा अर्थ दोघांनी भिन्न भिन्न रीतीने आणि भिन्न भिन्न दृष्टिकोणांतून लावला. मानवी स्वभावासंबंधीच्या सिद्धांताविषयी दोघांत लक्षणीय मतभेद आहेत. मेन्सियसच्या मताने मानवी स्वभाव मूलतःच निर्मल किंवा सत्प्रवृत्त आहे, तर स्युन-जचे मत असे, की मानवी स्वभाव हा निसर्गतःच पापप्रवृत्त आहे तथापि संस्काराने त्यात सत्प्रवृत्ती आणता येते. स्वतः कन्फ्यूशस फक्त एकदा म्हणाला होता, की निसर्गतः माणसे स्वभावाने जवळजवळ सारखीच असतात पण सवयींमुळे त्यांच्यात पराकाष्ठेचा फरक पडतो. तेव्हापासून चिनी तत्त्वज्ञानात, सत्प्रवृत्ती माणसात मूलतः असते की प्रयत्नाने तिचे संपादन करावे लागते, हा एक महत्त्वाचा विवाद्य विषय झाला.

निर्बंधवादी संप्रदायाचे तत्त्वज्ञान स्युन-जच्या तत्त्वज्ञानासारखे म्हणजे माणूस हा निसर्गतः पापवृत्तीचा असतो आणि त्याला कडक कायदे व निर्बंध यांच्याद्वारे वळण लावावे लागते. तसेच कायद्यापुढे सर्व मनुष्य प्राणी समान असतात, असे मानणारे आहे. उलट कन्फ्यूशसच्या मते राज्यकर्त्यांनी स्वतःचे आचरण स्वतःच सुधारावे व कायदे फक्त प्रजाजनांना लागू करावेत. निर्बंधवादी तत्त्वे अर्थातच कन्फ्यूशस-मेन्सियस यांच्या तत्त्वाच्या अगदीच विरोधी असल्यामुळे या दोन तत्त्वप्रणालींचा वैचारिक आणि राजकीय संघर्ष निर्माण होऊन तो अगदी पराकोटीस पोहोचला. तो इतका, की निर्बंधवादी च्यीन्‌-षृ-ह्‌वांग या चीनच्या सम्राटाने चिनी साम्राज्याचे एकीकरण केल्यानंतर कन्फ्यूशस मताच्या विद्वानांचा व अधिकाऱ्यांचा संहार केला आणि कन्फ्यूशन मतप्रणालीवर बंदी घातली. याच सूड म्हणून च्यीन राजवट उलथून पडल्यावर कन्फ्यूशस मताच्या अधिकाऱ्यांनी निर्बंधवादी तत्त्वज्ञानाचे वैचारिक जगातून उच्चाटन करण्याचे धोरण अंगीकारले. मात्र प्रत्यक्ष राजकारणात निर्बंधवादी धोरण उपयोगी असल्यामुळे ते आचारणात आणले गेले. निर्बंधवाद्यांच्या निर्देश काही लोक ‘वास्तववादी’ असाही करतात. कारण मानवाने निर्माण केलेले नियम या संप्रदायाचे आधार स्तंभ आहेत. या नियमांचा उपयोग करून राजाने आपला देश बलाढ्य आणि समृद्ध करावा, अशी या संप्रदायाची शिकवण होती. नीतीअनीतीचा या संप्रदायात फारसा ऊहापोह नाही. यामुळे हान राजवटीपासून वैचारिक कन्फ्युशस मत आणि प्रात्यक्षिक निर्बंधवाद यांचा समन्वय हे चिनी राजकारणाचे सूत्र झाले. [⟶ कन्फ्युशस].


ताओ व विश्वोत्पत्तिविषयक संप्रदाय : ‘दाव’ म्हणजे मार्ग. त्याचेच ‘ताओ’ हे पाश्चात्य अभ्यासकांनी रूढ केलेले रूप. ‘ताओ’ (दाव) हा शब्द चिनी भाषेत व वाङ्‌मयात मोठा वैशिष्ट्यपूर्ण, गूढ आणि व्यापक अर्थाचा आहे. केव्हा त्याचा अर्थ अंतिम वास्तवता अथवा सनातन सत्य असा होतो केव्हा अंतिम प्राणतत्त्व किंवा निसर्गाची सर्वश्रेष्ठ शक्ती असा होतो तर कधी विश्वाच्या विकासाचा आविष्कार, प्रक्रिया किंवा रीत असा होतो  आणि केव्हा केव्हा अंतिम सिद्धांत सच्चारित्र्य असाही होतो. ब्रह्म, धर्म आणि मार्ग या तीन संस्कृत शब्दांशी तो शब्द समानार्थक आहे. त्यातल्या त्यात ‘मार्ग’ हाच त्याचा सर्वांत जवळचा आणि समर्पक अर्थ आहे. जवळजवळ सर्वच चिनी धर्मग्रंथांतून हा शब्द वरचेवर उपयोगात आलेला असतो. विशेषतः धर्माचरणासंबंधी तसेच तात्त्विक वाङ्‌मयामध्ये ‘ताओ’ शब्द बऱ्याच ठिकाणी उपयोजिला जातो. जवळजवळ सर्वच विचारसंप्रदायांच्या सर्वच आचार्यांनी वेगवेगळ्या रीतीने, वेगवेगळ्या गोष्टींनी उद्देशून व निरनिराळ्या दृष्टीकोणांतून त्याचा वापर केला आहे. ताओ हे नाव ताओवादी संप्रदायाला प्राधान्याने मिळाले कारण त्याच्या वाङ्‌मयातून ताओच्या अर्थाचे विशदीकरण इतर कोणत्याही पंथापेक्षा अधिक सखोल, सुस्पष्ट आणि वैशिष्ट्यपूर्ण असे केलेले आहे.

ताओ मताचा सर्वप्रमुख आणि सर्वप्रसिद्ध आचार्य अर्थात लाव् ज (लाउत्स) हा होता. त्यानेच प्रत्यक्षात ताओ मताच्या तत्त्वज्ञानाची उभारणी केली, असे मानतात. ताओ मताचा त्याच्या खालोखाल महत्त्वाचा दुसरा श्रेष्ठ आचार्य ज्वांग-ज (आचार्य ज्वांग, इ.स.पू. ३६९-२८६) हा होय.

लाव्‌ जच्या मते ताओ हा विश्वाचा परम आत्मा आहे. तो विश्वात्मा स्वयंसिद्ध, अद्वितीय व शाश्वत आहे. त्यापासूनच विश्वातील सर्व पदार्थ उत्पन्न होतात व त्याच्यातच लय पावतात. लाव् ज याने लिहिलेले लाव् ज नावाचे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचे दुसरे नाव दाव-द-जिंग (मार्ग वा धर्मसूत्रे). त्यात त्याने म्हटले आहे,‘ ताओपासून एकम् निर्माण झाले, एकम्‌पासून द्वि उत्पन्न झाले, द्विपासून त्रि निर्माण झाले आणि त्रिपासून सर्व पदार्थ उत्पन्न झाले (अध्याय-४२). याच ग्रंथात आणखी एका ठिकाणी लाव् ज म्हणतो, ‘जगातील सर्व वस्तू या ‘यव्’ अथवा ‘सत्’ पासून निर्माण झाल्या आणि ‘यव्’ हे ‘वू’ अथवा असत्‌पासून उत्पन्न झाले’ (अध्याय-४०). येथे ‘यव’ अथवा सत् याचाच अर्थ ताओ असा आहे. मग ताओला ‘वू’ अथवा असत् असे का संबोधिले आहे? तर ताओ याचे वास्तविक स्वरूप शब्दांनी अनिर्वचनीय आणि अनाकलनीय आहे म्हणून. म्हणूनच ग्रंथाच्या अगदी सुरुवातीसच लाव् ज म्हणतो, की ‘ज्याचा शब्दांनी निर्देश होऊ शकतो ते शाश्वत ‘ताओ’ नव्हेच. ज्याचा नावाने निर्देश करता येतो ते अनिर्देश्याचे नाव नव्हे, जे शब्दांकित करता येत नाही, तेच स्वर्ग आणि पृथ्वी यांचे आदिकारण आहे. जे शब्दरूप आहे, त्यातून पृथ्वीवरील सर्व वस्तू उद्‌भूत झाल्या आहेत.

लाव् जच्या मतानुसार ताओ हे तत्त्वच विश्वातील सर्व वस्तू निर्मिते परंतु जणू ते काहीच निर्माण करीत नाही असे भासते. त्याच्याकडे सर्व वस्तूंचे कर्तृत्त्व आहे पण जणू ते अकर्ता आहे. म्हणूनच तो म्हणतो, ‘ताओ केव्हाच कोणतीच वस्तू अथवा कार्य करीत नाही परंतु त्याच्या मुळेच सर्व केले जाते’. शिवाय, ‘त्या सर्वव्यापी शक्तीचा महिमा असा आहे, की तीच फक्त ताओद्वारा कार्य करू शकते. कारण ताओ हे तत्त्व इंद्रियांना आकलन न होणारे व अमर्याद आहे. ते अमूर्त व अनंत असले, तरी सर्व नामरूपे त्यातच सुप्त रीतीने असतात. ते छायामात्र व अस्पष्ट असले, तरी सारगर्भ असते. हे सार शुद्धसत्त्व असले, तरीही कार्यप्रवण आहे. म्हणून माणसाने केवळ ताओचा मार्ग अनुसरावा, त्याविरूद्ध असे काही करू नये.

ताओ मताचा दुसरा प्रमुख आचार्य ज्वांग-जौ वा ज्वांग-ज हा होय. त्याने लाव् ज पेक्षाही अधिक सखोलतेने आणि विस्ताराने ताओ सिद्धांताची मांडणी केली. चीनमधील सर्वश्रेष्ठ गूढवादी म्हणूनही तो ओळखला जातो. प्रत्येक व्यक्तीचे संपूर्ण स्वातंत्र्य वा समानता तसेच सर्व जिवांची एकात्मता आणि अद्वैत ही त्याच्या विचाराची मूलभूत बैठक आहे. शिव-अशिव, युक्त-अयुक्त, मोठा -लहान, दीर्घ- ऱ्हस्व, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, सरदार-सामान्य, वृद्ध-तरूण, आरंभ-अंत, जीवन-मृत्यू अशा तऱ्हेचे फरक आणि भेदभाव करू नयेत. कारण शेवटी माणसानेच निर्माण केलेल्या या सापेक्ष कल्पना आहेत. वास्तवात हे सर्व एक आणि अद्वितीय आहे. कारण सर्वच जीव त्या एकाच ताओमधून उत्पन्न होतात व त्यामध्येच लय पावतात. परंतु लोकांची खरी अडचण ही असते, की एकदा या गोष्टी उत्पन्न झाल्या म्हणजे मग त्यांतील पायाभूत एकता त्यांच्या लक्षात न येता फक्त त्यांतील वेगळेपणा व भेदच त्यांच्या नजरेत भरतो. सर्व पूर्वग्रह व अज्ञान, कलह व भांडणे, द्वेष आणि वैर, हिंसा आणि क्रौर्य, पारतंत्र्य व गुलामी या आणि हरेक तऱ्हेचे क्लेश व यातना देणाऱ्या अशाच रीतीच्या आणखी कित्येक गोष्टींचे हेच मूळ आहे. जोपर्यंत यांचा समूळ नायनाट आपण करू शकणार नाही, तोपर्यंत खरे स्वातंत्र्य आणि समाधान जगात नांदू शकणार नाही.

अशा तऱ्हेच्या सर्व भेदभावांचे आणि फरकांचे जे उच्चाटन करू शकतील त्यांनाच खरे व निरपेक्ष समाधान व स्वातंत्र्य लाभेल. अशा लोकांना ‘जन्-रन’ म्हणजे सत्य पुरुष अथवा ‘जृ-रन’ म्हणजे पूर्ण मानव अथवा ‘षन्-रन’ म्हणजे आध्यात्मिक मानव अथवा ‘षंग्-रंन’ म्हणजे ऋषी अथवा साधू असे ‘ज्वांग-ज’ म्हणतो.


अशा खऱ्या, पूर्ण, आध्यात्मिक अथवा साधुवृत्ती असलेल्या मानवाबद्दल ज्वांग-ज म्हणतो, ‘पूर्ण मानवाला स्वतःचा असा आत्माच नसतो, आध्यात्मिक मानवाला काही साधावयाचे असे नसते व साधूला नाव नसते’.  शिवाय तो आणखी म्हणतो, ‘प्राचीन काळच्या सत्य पुरुषाने जीवनावर प्रेम केले नाही अगर मृत्यूचा द्वेषही केला नाही. जिवंत असताना तो हुरळून गेला नाही आणि मरताना त्याने प्रतिकारही केला नाही. या जगात त्याचे येणे आणि जाणे दोन्हीही अजाणता, निर्हेतुकच झाले. आपली उत्पत्ती कशी झाली, हे विसरण्याचा त्याने जाणीवपूर्वक प्रयत्नही केला नाही किंवा आपला शेवट काय होईल याचाही त्याने प्रयत्नपूर्वक शोध घेतला नाही. आपल्या वाट्याला जे येईल त्याचा त्याने आनंदाने स्वीकार केला आणि जे मिळायचे राहून गेले त्याची त्याने खंत केली नाही, यालाच म्हणावयाचे चित्त-चैत्त-संघाताला ताओ पेक्षा जास्त महत्त्व न देणे किंवा मानवाला निसर्गापेक्षा अधिक महत्त्व न देणे. असे जो वागतो तोच खरा माणूस’. ज्वांग-ज पुन्हा असे म्हणतो, की ‘पूर्ण मानव हा विशुद्ध आत्म्याप्रमाणे असतो. जरी सर्व तलाव वाफ होऊन संपले, तरी त्याला उष्णता जाणवणार नाही किंवा महानद्या गोठून गेल्या तरी त्याला थंडी वाजणार नाही. विजा पडून पर्वत दुभंगले किंवा जोराच्या वादळाने समुद्रावर राक्षसी लाटा उठल्या तरी त्याला भय वाटणार नाही. तो असा असल्यामुळे ढगांवर स्वार होईल. सूर्यचंद्रावर आरूढ होऊन त्यांना चालवील आणि अशा रीतीने साती समुद्र सहजपणे पार करील. मृत्यू अगर जीवनाचे ज्याला काहीच वाटत नाही, त्याला स्वतःच्या क्षुद्र, फायद्यातोट्यांची काय तमा?’.

विश्वोत्पत्तिविषयक संप्रदायाचे तत्त्वज्ञान ‘यीन्’ आणि ‘यांग’ या दोन विश्वविषयक मूलतत्त्वावर आधारलेले आहे. म्हणून त्यास ‘यीन्-यांग-ज्या’ म्हणजे विश्वोत्पती आणि विश्वरचना सांगणारा तत्त्वसंप्रदाय म्हणतात. मागे सांगितल्याप्रमाणे यीन् आणि यांग या संज्ञा प्रथम यी-जिंग्  वा परिवर्तनांचे पुस्तक यात आल्या. या दोहोंच्या संयोगातून सर्व विश्व निर्माण झाले. कन्फ्यूशसवादी आणि ताओवादी या दोघांनीही या सिद्धांताचे विस्ताराने आणि सखोलतेने प्रतिपादन केले आहे. पण यीन् आणि यांग ही दोन तत्वे विश्ववादी संप्रदायने मानवी व्यवहारातील अगदी बारीकसारीक गोष्टींना लावून दाखविली. हा संप्रदाय ताओ मताला अधिक जवळचा. म्हणून त्याचा समावेश ताओमध्ये वा ताओ मतात केला आहे. [⟶ ताओ मत].

मो व तार्किक संप्रदाय : मो-डी अथवा मो-ज (इ.स.पू. ४६३-३७६) हा सामान्यपणे या संप्रदायाचा संस्थापक समजला जातो. त्याच्यावरून या संप्रदायाचे नाव मो-इस्ट अथवा मो-वादी असे पडले. प्राचीन चीनच्या इतिहासात मो-ज ही एक महत्त्वाची व्यक्ती होऊन गेली.

भारतात प्राचीन काळी होऊन गेलेले जैन तीर्थंकर महावीर व आधुनिक काळातील महात्मा गांधी यांच्याशी मो-जची कित्येक बाबतींत तुलना करता येईल. त्यांची मते व जीवनपद्धती यांत फारच साम्य आहे. मानवतेबद्दलचे प्रेम, अहिंसा, निरपेक्ष परहिततत्परता व यतिचर्या ही मो-जने प्रतिपादलेली महत्त्वाची तत्वे होत.

कन्फ्यूशस संप्रदायातील तत्त्ववेत्ता मेन्सियस याने एकदा म्हटले होते, की कोणताही भेदभाव न ठेवता मो-ज सर्व माणसांवर प्रेम करतो. आपादमस्तक स्वतःच्या शरीराचा चेंदामेंदा करून जर जगाचे काही हित होणार असते, तर त्या त्यागालाही तो तयार झाला असता. केवळ सुटे विचार या दृष्टीने पाहता मानवतेचे प्रेम, अहिंसा, परहितवाद, यतिचर्या या गोष्टी मो-जच्या पूर्वीही चिनी विचारपरंपरेत होत्या. मो-जने हे विचार स्वतःच्या आचरणात आणले इतकेच नव्हे, तर त्यांना एक बौद्धिक बैठक दिली व त्यांचे व्यवस्थापन करून एक तात्त्विक संप्रदाय निर्माण केला. चिनी तत्त्वज्ञानास त्याने दिलेली ही महत्त्वाची देणगी होय.

मो-जने केवळ कन्फ्यूशस आणि त्याचा संप्रदाय यांच्या सिद्धांतांना विरोध केला असे नव्हे, तर प्राचीन चीनमधील परंपरागत रूढी व संस्था यांनाही त्याने विरोध केला. कन्फ्यूशसवादी लोक स्वतःच्या नफ्यातोट्याचा विचार न करता नेकीने वागत, पुण्यार्जन होईल की नाही, याचा विचार न करता ते तत्त्वाला धरून वागत पण मो-ज आणि मो-वादी संप्रदायाचे लोक केवळ जनहित वा जनकल्याण यावरच विशेष भर देत. मो-जने म्हटले आहे, ‘सज्जनांचा जीवितहेतू जगाचे अधिकाधिक कल्याण व्हावे आणि अहिताचा परिहार व्हावा हा असतो’. आणखी तो म्हणतो, ‘एकमेकांवर प्रेम करण्याने एकमेकांचा फायदा होतो. आपपरभाव न राखता केलेली प्रीती ही लाभकारक असते. इतरांवर प्रेम करण्यामुळे आणि त्यांचा फायदा करून दिल्यामुळे सर्वांचेच हित होते. जो दुसऱ्यावर प्रेम करतो, त्याच्यावर दुसरेही प्रेम करतात’.

मो-जचा दुसरा महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे त्याची युद्धविरोधी शिकवण. मो-जच्या मते, कोणत्याही राष्ट्रावर आक्रमण करणे, हा सर्वांत मोठा गुन्हा आहे. अशा कृतीला काहीही समर्थन असू शकत नाही. राज्याराज्यांतील संबंधांविषयी त्याच्या काळी जी मते प्रचारात होती, त्यावर त्याची शिकवणूक हा जणू एक उताराच होता.

तार्किक अथवा तर्कवादी संप्रदायाला चिनी भाषेत ‘मींग्-ज्या’ म्हणजे नामसंप्रदाय किंवा ‘फन्-ज्या’ म्हणजे विवादपटू म्हणतात. त्यांना तर्कपंडित वा तर्कवेत्ते म्हणणे अधिक युक्त ठरेल. कारण पाश्चात्य तत्त्वज्ञानातील तर्कपंडितांशी त्यांचे खरोखरीच साम्य आहे. कन्फ्यूशस, लाव् ज, मो-ज यांनी आणि विशेषेकरून मो-वादी यांनी या संप्रदायाचे मूलभूत सिद्धांत पूर्वीच मांडलेले होते. चिनी तर्कपंडितांनी तत्त्वज्ञानास ह्या सिद्धांतांना एका सुसंगत दर्शनाचे स्वरूप दिले, एवढेच. म्हणून येथे त्यांचा उल्लेख मो-वादी संप्रदायाबरोबर केला आहे.

या तत्त्वशाखेचे सर्वांत प्रमुख प्रतिनिधी दोन आहेत : (१) ह्‌वै-षृ (इ.स.पू.सु. ३५०-२६०) व (२) गुंग स्वुन्-लूंग (इ.स.पू.सु. २८४-२५९). ह्‌वै-षृ याचा वान्-वु-श्वो  म्हणजे ‘दशसहस्त्रपदार्थचर्चा’ हा ग्रंथ फार पूर्वीच नष्ट झाला. गुंग-स्वुन-लंग  याच्या गुंग-स्वुन-लूंग ज  या ग्रंथाचा अस्सलपणाही शंकास्पदच आहे. त्याच्या तत्त्वज्ञानाची जी काही माहिती आपल्याला आहे ती म्हणजे षृ-षृ अथवा ह्‌वै-षृ याच्या दहा समस्या आणि अर्ष-इ-षृ अथवा गुंग-स्वुन-लूंग व इतर तर्कवेत्ते यांच्या एकवीस समस्या एवढीच होय. गुंग-स्वुन्-लूंग याच्या एकवीस समस्यांमधील पहिली समस्या अशी आहे. ‘शुभ्र अश्व हा अश्व नव्हे’. याचे कारण म्हणजे पांढरा घोडा हा एक विशिष्ट प्रकारचाच घोडा आहे तेव्हा त्याची गणना सर्वसाधारण ‘घोडा’ या वर्गात करता येत नाही.


ह्या तर्कवादात आणि भाषेत कसरत असल्यामुळे त्यावर बरीच टीका झाली आणि इ.स. तिसऱ्या-चौथ्या शतकानंतर गुंग-स्वुन्-लूंगचे महत्त्व फारच कमी झाले. साधारणपणे या समस्यांना विरोधाभासाची उदाहरणे समजतात. वास्तविक ते विरोधाभास नसून तात्त्विक व वैज्ञानिक स्वरूपाच्या, तत्त्वमीमांसात्मक तसेच इंद्रियसंवेदनविषयक सत्ताशास्त्रीय तसेच विश्वस्थितिविषयक, ज्ञानमीमांसात्मक तसेच तर्कशास्त्रीय अशा खऱ्याखुऱ्या समस्या आहेत. जगातील सर्व पदार्थ सापेक्ष आहेत, हे दाखवून देणारी ती उदाहरणे आहेत. त्यांचा मथितार्थ असा : (१) अवकाशातील आणि कालातील सर्व विभाग आणि भेद हे कृत्रिम व असत्य आहेत. (२) सर्व घटना आणि पदार्थ यांमधील भेदही वरवरचे व सापेक्ष आहेत, निरूपाधिक वा केवल नाहीत. (३) सर्व वस्तुजात आणि प्राणी मूलतः एकच आहेत. (४) दिक्, काल व विश्व ही शाश्वत, अनादी, अनंत व अमर्याद आहेत. यावरून ह्‌वै-षृ असे तात्पर्य काढतो, की सर्वांवर सारखेच प्रेम करा. पृथ्वी आणि स्वर्ग ही एकच आहेत.

आतापर्यंतच्या विवेचनावरून असे दिसून येते. की चिनी तत्त्वज्ञानातील निरनिराळ्या संप्रदायांचे वेगवेगळे दृष्टीकोण असले व त्यांनी वेगवेगळी तत्त्वे स्वीकारली असली तरी त्यांच्यात बऱ्याच बाबतींत मतैक्य आहे. त्यांतून विविधतेतील एकता व एकतेतील विविधताच दृग्गोचर होते.

ज्याप्रमाणे मानवाची मुक्ती अथवा मोक्ष हे सर्वच भारतीय दर्शनांनी परमप्राप्तव्य म्हणून मानले आहे, त्याप्रमाणे विविध चिनी तत्त्वसंप्रदायाचे परमप्राप्तव्यही ‘ज्यी-षृ’ आणि ‘ज्यी-रन’ किंवा विश्व व मानवता यांचा मोक्ष किंवा मुक्ती हेच आहे. मोक्ष आणि निःश्रेयस् ही दोन्हीही पूर्णावस्थेचीच रूपे आहेत. पूर्णता म्हणजे खरेखुरे समाधान, खरे समाधान म्हणजेच खरी शांती, प्रीती, सुसंवादित्त्व, स्वातंत्र्य, समता आणि एकता. या सर्व गोष्टी इहलोकात, इथेच आणि आताच प्राप्त करून घेता येतात परलोकात नव्हे.

म्हणून सर्वच विविध चिनी तात्त्विक संप्रदाय मानवी जीवन आणि नीतिशास्त्र यांवर विशेष भर देतात. नीतिशास्त्राचा चिनी भाषेत खूपच व्यापक अर्थ होतो. केवळ माणसामाणसांतील संबंधच नव्हे, तर मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध व मानव आणि या विश्वातील सर्वच मानवेतर जड व चेतन वस्तू यातील संबंध यांचाही त्यात विचार होतो. चिनी तत्त्वज्ञानाप्रमाणे पाहता मानव्य म्हणजेच सुसंवादी, सामुहिक जीवन होय केवळ आत्मनिष्ठ, स्वनिर्भर अशी ती वैयक्तिकता नव्हे. एकेकट्या व्यक्तीचे नव्हे, एखाद्या मानववंशाचे नव्हे किंवा एखाद्या राष्ट्राचेही नव्हे, तर अखिल मानवजातीचे कल्याण साधणे, हेच मानवाचे अंतिम ध्येय आणि परमप्राप्तव्य असावयास हवे.

संदर्भ : 1. Bodde, Derk, Ed, A Short History of Chinese Philosophy, New York, 1948.

           2. Creel, H. G. Chinese Thought from Confucius to Mao-Tse-Tung, Chicago, 1953.

           3. Day, Clarence Burton, The Philosophers of China, Classical and Contemporary, New    York, 1962.

           4. Hughes E. R. Chinese Philosophy in Classical Times, London, 1954.

           5. Waley, Arthur, Three Ways of Thought in Ancient Chiana, London, 1939.

थान, युन,शान, (इं) दीक्षित मीनाक्षी (म.)