ग्रीन, टॉमस हिल : (७ एप्रिल १८३६–२६ मार्च १८८२). चिद्‌वादी इंग्रज तत्त्ववेत्ता. जन्म बिर्किन, यॉर्कशर येथे. शिक्षण रग्बी विद्यालय आणि बेल्यल कॉलेज, ऑक्सफर्ड येथे. १८६o मध्ये तो बेल्यल कॉलेजचा फेलो झाला आणि १८७८ मध्ये नीतिविषयक तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून ऑक्सफर्ड येथील ‘व्हाइट अध्यासना’वर त्याची नेमणूक झाली. ह्याच जागेवर त्याने शेवटपर्यंत काम केले. ऑक्सफर्ड येथे तो निधन पावला.

टी. एच्. ग्रीनकांट व हेगेल ह्यांचा ⇨ चिद्‌वाद  ज्या तत्त्ववेत्त्यांच्या प्रभावामुळे ब्रिटिश विद्यापीठांत रुळला, त्यांच्यात ग्रीन प्रमुख होता. तत्त्वज्ञानाची ब्रिटिश परंपरा अनुभववादी व सुखवादी होती आणि उपयुक्ततावाद ह्याच परंपरेचे परिणत स्वरूप होते [→ सुखवाद]. मानवी ज्ञानाचा उगम वेदनांमध्ये होतो व म्हणून ज्ञान म्हणजे केवळ वेदने आणि त्यांनी मागे ठेवलेल्या प्रतिमा व कल्पना ह्यांचा समूह होय. अशी ⇨अनुभववादाची शिकवण होती. त्याचप्रमाणे सुखप्राप्ती हेच सर्व इच्छांचे साध्य असते, माणूस जी कोणतीही कृती करतो ती कोणत्या तरी इच्छांचे समाधान सुख साधावे ह्यासाठी करतो आणि म्हणून अधिकात अधिक व्यक्तींचे अधिकात अधिक सुख जी कृत्ये केल्याने साधले जाईल, ती कृत्ये योग्य किंवा नैतिक होत, असे सुखवादी ⇨उपयुक्ततावादाचे म्हणणे होते. याशिवाय विज्ञानाच्या प्रगतीमुळे निसर्गवादी तत्त्वज्ञानही प्रभावी ठरत होते. माणूस आणि मानवी समाज हा निसर्गाचाच भाग आहे, तेव्हा मानवी वर्तनाचा, सामाजिक स्थित्यंतरांचा उलगडा निसर्गनियमांच्या आधारे करता येईल आणि ह्या नियमांना अनुसरून आदर्श मानवी समाज निर्माण करता येईल वा तो आपोआपच उत्क्रांत होईल, ही ⇨निसर्गवादाची भूमिका होती. जॉन स्ट्यूअर्ट मिल हा उपयुक्तवादाचा भाष्यकार होता, तर हर्बर्ट स्पेन्सर हा निसर्गवादी तत्त्वज्ञानाचा प्रतिनिधी होता. ह्याच्या उलट विद्यापीठांमध्ये पारंपरिक ख्रिस्ती धर्मशास्त्राचा बराच प्रभाव होता. ग्रीन ह्याच्या कामगिरीचा एक भाग असा, की त्याने तत्त्वज्ञानाची पारंपरिक धर्मशास्त्रापासून फारकत करून तत्त्वज्ञानाची स्वायत्तता प्रस्थापित केली पण त्याचबरोबर अनुभववादाचे आणि निसर्गवादाचे खंडन करून ज्ञाता व कर्ता म्हणून मानवी व्यक्ती स्वायत्त आहे, निसर्गाच्या अतीत आहे, ह्या भूमिकेचा पुरस्कार केला. अनुभववादाचे खंडन त्याने कांट आणि हेगेल ह्यांच्या भूमिकांच्या आधारे केले होते पण त्याचा कल हेगेलपेक्षा कांटकडे अधिक होता. त्याचे विचार प्रोलिगॉमिना टू एथिक्स (१८८३) आणि लेक्चर्स ऑन द प्रिन्सिपल्स ऑफ पोलिटिकल ऑब्लिगेशन (१८८५) ह्या त्याच्या महत्त्वपूर्ण ग्रंथांत आलेले आहेत. त्याने केलेल्या अनुभववादाच्या खंडनाचे सार असे : ज्ञान म्हणजे केवळ वेदने, प्रतिमा, कल्पना ह्यांचा समूह नव्हे स्वतःहून भिन्न अशा विषयाची कल्पना करू शकणारा व म्हणून आत्मजाणीव असणारा ज्ञाता जेव्हा आपल्याला प्राप्त झालेल्या वेदनांचे परस्परांशी सुसंगत संबंध जोडून त्याच्या द्वारा विषय सिद्ध करतो, तेव्हा त्याला विषयाचे, वस्तूचे ज्ञान होते. असा आत्मजाणीव असलेला ज्ञाता त्याने सिद्ध केलेल्या ज्ञानविश्वाच्या अतीत असतो त्या ज्ञानविश्वाचा तो धारक असतो, त्याचा भाग नसतो. शिवाय त्याने घडविलेले हे ज्ञानविश्व – विश्वाच्या एका भागाचे त्याने प्राप्त करून घेतलेले ज्ञान –जर सत्य असायचे असेल, तर ते विश्वाशी सुसंगत असले पाहिजे. म्हणजे ज्या चैतन्याने स्वतःपलीकडे जाऊन, स्वतःहून भिन्न असलेल्या व परस्परांशी सुसंगतपणे संबंधित असलेल्या वस्तूंच्या विश्वात स्वतःचा आविष्कार करणारे चैतन्य ह्या विश्वाचे अधिष्ठान असले पाहिजे. त्याचप्रमाणे प्राण्यांचे वर्तन व मानवी कृती ह्यांच्यात मूलगामी भेद आहे. प्राण्यात जागृत झालेली कोणतीही वासना स्वाभाविकपणे त्याच्या वर्तनात व्यक्त होते आणि त्या वासनेचे समाधान घडवून आणील, ह्या स्वरूपाचे हे वर्तन असते. मानवी व्यक्तीच्या ठिकाणीही अशा स्वाभाविक वासना असतात पण व्यक्तीला ह्या आपल्या वासना आहेत ही जाणीव असते आणि त्यांचे समाधान करण्यात आपले कल्याण आहे किंवा नाही, असा निर्णय तो घेतो आणि त्यांचे समाधान करतो किंवा करीतही नाही. स्वतःची, स्वतःच्या कल्याणाची संकल्पना माणसाला असते आणि हे कल्याण साधण्यासाठी आवश्यक ती कृती करण्याचे स्वातंत्र्य त्याला असते. तेव्हा मानवी कृती म्हणजे केवळ नैसर्गिक घटना नसते. व्यक्तीने स्वतःचे कल्याण साधण्यासाठी स्वायत्तपणे केलेली कृती, असे तिचे स्वरूप असते. ज्या प्रमाणात व्यक्ती असे स्वतःचे कल्याण साधते त्या प्रमाणात तिने मानव म्हणून परिपूर्णता साधलेली असते. प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती म्हणून आपले कल्याण, मानवी परिपूर्णता साधण्याचा सारखाच हक्क असतो. अधिकाधिक व्यक्तींना अधिकाधिक मानवी परिपूर्णता साधण्याची संधी लाभावी, ह्या दिशेने नैतिक प्रगतीची वाटचाल इतिहासात होत असते. राज्यव्यवस्थासुद्धा माणसांच्या नैतिक प्रयत्नांची, नैतिक संकल्पांची निर्मिती आहे. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वायत्त नैतिक जीवन जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करणे आणि राखणे, हे राज्यसंस्थेचे कार्य आहे.

ग्रीन केवळ तत्त्ववेत्ता नव्हता. आपल्या कल्पनांना अनुसरून ब्रिटिश समाजातील खालच्या वर्गांना अधिक चांगले जीवन जगण्याची संधी लाभावी व अधिक प्रमाणात ती लाभावी, यासाठी त्याने सतत प्रयत्न केले. त्याच्या नैतिक प्रभावामुळे ऑक्सफर्डचे विद्यार्थी सामाजिक प्रश्नांमध्ये अधिक कळकळीने आणि जबाबदारीने लक्ष घालू लागले. त्याच्यानंतरच्या फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅड्ली व बर्नार्ड बोझांकिट ह्या चिद्‌वादी तत्त्ववेत्त्यांचा बौद्धिक चमकदारपणा आणि खोली त्याच्या ठिकाणी नसली, तरी चिद्‍वादी तत्त्वज्ञान ब्रिटिश विद्यापीठांत रुजविण्यात त्याचा वाटा सिंहाचा होता.

संदर्भ : 1. Lamont, W. D. Introduction to Green’s Moral Philosophy, London, 1934.

   2. Richter, Melvin, The Politics of Conscience : T. H. Green and His Age, Cambridge, 

Mass., 1964.

  3. Sidgwick, Henry, Lectures on the Ethics of T. H. Green, London, 1902.

रेगे, मे. पुं.