द्रव्य : एक तात्त्विक संकल्पना. द्रव्य व त्याच्या ठिकाणचे गुण वा धर्म तसेच द्रव्य व त्याच्या वेगवेगळ्या अवस्था हे भेद आपण व्यवहारात करतो. उदा., एखादा आंबा पिवळा, मऊ इ. आहे असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा एका विशिष्ट वस्तूच्या–द्रव्याच्या–अंगी कोणते गुण आहेत हे आपण सांगत असतो. त्याचप्रमाणे जे फळ काही दिवसापूर्वी कच्चे होते ते आता पिकले आहे असे आपण म्हणतो, तेव्हा त्याच वस्तूच्या–द्रव्याच्या–दोन भिन्न अवस्थांचे वर्णन आपण करीत असतो. सामान्य व्यवहारात ही जी द्रव्याची संकल्पना आपण वापरतो, तिचे विश्लेषण करून तिला नेमका आशय देण्याचा प्रयत्न तत्त्वमीमांसेत होतो पण अशा विश्लेषणातून अनेक समस्याही निर्माण होतात.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात द्रव्य ह्या संकल्पनेचे महत्त्व ओळखणारा व तिचे पद्धतशीर विवेचन करणारा पहिला श्रेष्ठ तत्त्ववेत्ता ⇨ ॲरिस्टॉटल (इ. स. पू. ३८४–३२२) होय. प्राथमिक आणि खऱ्याखुऱ्या अर्थाने पाहता ज्याचे इतरांविषयी विधेयन करता येत नाही आणि जे एखाद्या उद्देश्यामध्ये बसत नाही, ते म्हणजे द्रव्य. ह्या अर्थाने द्रव्य म्हणजे विशिष्ट, मूर्त व्यक्ती किंवा वस्तू. उदा., सॉक्रेटीस हा विशिष्ट माणूस, माझ्या समोरचे हे विशिष्ट टेबल इत्यादी. सॉक्रेटीसविषयी तो माणूस आहे असे विधेयन करता येते पण तसे सॉक्रेटीसचे कोणाविषयी विधेयन करता येत नाही. तसेच शहाणपणाचा गुण सॉक्रेटीस मध्ये वसतो पण या अर्थाने सॉक्रेटीस दुसऱ्या कशात वसत नाही. यावरून पाहता द्रव्याचे वैशिष्ट्य असे दिसते, की त्याचे अस्तित्व स्वायत्त, स्वतंत्र असते. माणूस असण्याचे रूप किवा शहाणपणा हा गुण यांचे अस्तित्व सॉक्रेटीस या विशिष्ट व्यक्तीशी, द्रव्याशी, संबंधित असण्यावर अवलंबून असते. उलट सॉक्रेटीसचे अस्तित्व स्वायत्त आहे. गुण द्रव्याच्या ठिकाणी वसतात व म्हणून द्रव्य हे गुणांचे अधिष्ठान किंवा आधार असते पण द्रव्य हे ज्याप्रमाणे गुणांचे अधिष्ठान असते त्याचप्रमाणे ते अवस्थांचेही अधिष्ठान असते. एकाच द्रव्याच्या भिन्न काळी भिन्न अवस्था असतात. म्हणजे द्रव्य हे बदलाचे किंवा परिवर्तनाचे अधिष्ठान असते. द्रव्य टिकून राहणारे असते, त्याच्या अवस्था काही कालापुरत्या असतात. ह्या वैशिष्ट्यांशी संबंधित असे द्रव्याचे एक तार्किक वैशिष्ट्य आहे. वस्तूचे वर्णन करणे म्हणजे तिच्या ठिकाणी कोणते गुण आहेत, होते किंवा ती कोणत्या अवस्थेत आहे, होती हे सांगणे. तेव्हा द्रव्य हे विधानाचे उद्देश्य असते आणि विधानात द्रव्याविषयी विधेयन करण्यात येते.

पण ‘द्रव्य’ याचा ‘विशिष्ट, मूर्त वस्तू’ याहून वेगळा अर्थ ॲरिस्टॉटलने केला आहे. विशिष्ट वस्तू ज्या जातीची किवा उपजातीची असते, त्या जातीला किंवा उपजातीला ॲरीस्टॉटल दुय्यम द्रव्य म्हणतो. उदा., ‘सॉक्रेटीस एक माणूस आहे’ किंवा ‘सॉक्रेटीस एक प्राणी आहे’ ह्या विधानांत अनुक्रमे सॉक्रेटीसच्या उपजातीचा आणि जातीचा निर्देश केला आहे. तेव्हा ‘माणूस’ ही उपजाती आणि ‘प्राणी’ ही जाती ही दुय्यम द्रव्ये आहेत आणि सॉक्रेटीस ही विशिष्ट व्यक्ती प्राथमिक द्रव्य आहे. ह्याचा अर्थ असा दिसतो, की प्रत्येक द्रव्याचे स्वतःचे सत्त्व असते आणि ह्या सत्त्वामुळे त्या द्रव्याचे स्वरूप सिद्ध होते. अर्थात ‘सॉक्रेटीस’ हे प्राथमिक द्रव्य एक व्यक्ती आहे , तर ‘माणूस’ हे दुय्यम द्रव्य एक सामान्य आहे. जाती आणि उपजाती यांत उपजाती हे अधिक यथार्थपणे द्रव्य असते कारण जातीपेक्षा उपजातीमध्ये द्रव्याचे, व्यक्तीचे स्वरूप अधिक पुरतेपणे व्यक्त झालेले असते. ‘सॉक्रेटीस हा माणूस आहे’, हे सॉक्रेटीसचे वर्णन ‘सॉक्रटीस हा प्राणी आहे’ या वर्णनापेक्षा सॉक्रेटीसच्या स्वरूपाला अधिक जवळचे आहे. कारण सॉक्रेटीसच्या अंगचे अधिक गुण या वर्णनात अंतर्भूत आहेत. ह्या भूमिकेचा अर्थ असा होतो, की एखादी वस्तू कमीअधिक प्रमाणात द्रव्यस्वरूप असते.

तेव्हा ‘द्रव्य’ या संकल्पनेचे वेगवेगळे पैलू आहेत. ह्या वेगवेगळ्या पैलूंवर भर देऊन तत्त्वज्ञानात ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थानी वापरण्यात आली आहे. उदा., द्रव्याचे अस्तित्व हे स्वायत्त, प्राथमिक असते आणि इतर प्रकारचे अस्तित्व दुय्यम, आधारित असते. ह्याला अनुसरुन परमाणूशिवाय इतर सर्व वस्तू परमाणूंच्या बनलेल्या असतात पण परमाणू अंतिम, अविभाज्य असतात असे मानणारे परमाणुवादी परमाणू हे निसर्गाचे द्रव्य आहे, असे म्हणतात. ह्याच प्रकारे वस्तुस्थितीचे तार्किक विश्लेषण करीत ज्या अंतिम घटकांपर्यंत जाता येईल त्या अविश्लेष्य घटकांना बर्ट्रंड रसेल (१८७२–१९७०) आणि ⇨ लूडविग व्हिट्‌गेन्श्टाइन (१८८९–१९५१) तार्किक परमाणू म्हणतात आणि हे तार्किक परमाणू म्हणजे जगाचे द्रव्य आहे, असे व्हिट्‌गेन्श्टाइनने म्हटले आहे.


द्रव्य म्हणजे ज्याच्यात गुणधर्म वसतात ते अधिष्ठान आणि द्रव्याचे सत्त्व काही विशिष्ट धर्मांत सामावलेले असते, ह्या विचाराला अनुसरुन ⇨ रने देकार्त (१५९६–१६५०) याने जडद्रव्य आणि मने असे परस्परांहून पूर्णपणे भिन्न असलेले द्रव्यांचे दोन प्रकार मानले होते. विस्तार हे जडद्रव्याचे सत्त्व असते आणि जाणीव हे मनाचे सत्त्व असते. पण द्रव्याचे अस्तित्व स्वायत्त, स्वतंत्र असले पाहिजे आणि जडद्रव्य व मने ईश्वराने निर्मिलेली असतात म्हणून त्याचे अस्तित्व परायत्त असते. ह्या दृष्टीने पाहता केवळ ईश्वर हेच द्रव्य आहे आणि जडद्रव्य व मने ही ह्या अर्थाने द्रव्ये नाहीत, असेही त्याला म्हणावे लागते. शिवाय मन आणि जडद्रव्ये जर द्रव्ये म्हणून स्वायत्त असली, तर ती परस्परांवर कार्ये करु शकणार नाहीत. पण माणसाला जेव्हा जडवस्तू पासून वेदने लाभतात किवा आपल्या इच्छांचे समाधान करण्यासाठी माणूस शारीरिक कृती करतो, तेव्हा मन आणि जडद्रव्य असलेले त्याचे शरीर ही परस्परांवर कार्ये करीत असतात. हे कसे शक्य होते, हा एक कूटप्रश्न आहे. या समस्यांतून मार्ग काढण्यायाठी ⇨ बारूक स्पिनोझा (१६३२–७७) ज्याचे अस्तित्व स्वायत्त असते, म्हणजे स्वतःच्या अनिवार्य स्वरूपापासून अनिवार्यपणे निष्पन्न होणारे असे ज्याचे अस्तित्व असते, असे एकच द्रव्य मानतो. ह्या द्रव्याला तो ‘ईश्वर’ आणि ‘निसर्ग’ ही नावेही देतो. सर्व विशिष्ट वस्तू, विशिष्ट मने आणि विशिष्ट जडवस्तू ह्या द्रव्यापासून निष्पन्न होतात व म्हणून ती द्रव्ये नसतात, अशी त्याची भूमिका आहे. शिवाय विस्तार आणि जाणीव ही दोन भिन्न प्रकारच्या द्रव्यांची सत्त्वे नसून हे द्रव्याचे दोन धर्म आहेत, द्रव्यापासून निष्पन्न होणाऱ्या कोणत्याही विशिष्ट वस्तूच्या ठिकाणी हे दोन्ही धर्म असतात अशी कोणतीही वस्तू आकार ह्या धर्माच्या दृष्टीने मन असते, असे मत त्याने मांडले. ⇨जी. डब्ल्यू. लाय्‌प्निट्झ (१६४६–१७१६) ह्या तत्त्ववेत्त्याची द्रव्याविषयीची संकल्पना ॲरिस्टॉटलच्या संकल्पनेशी बरीच जुळणारी आहे. जे सावयव किंवा मिश्र असते, ते त्याच्या अंतिम अवयवांचे बनलेले असते. त्याचे अस्तित्व त्याच्या घटकांवर आधारलेले व म्हणून दुय्यम असते. प्राथमिक अस्तित्व हे अंतिम घटकांचे असते. तेव्हा प्रत्येक द्रव्य हे निरवयव असते. तसेच द्रव्याचे अस्तित्व स्वायत्त असल्यामुळे प्रत्येक द्रव्याच्या अवस्था त्याच्या सत्त्वापासून अनिवार्यतेने निष्पन्न होतात. ह्या बाबतीत लाय्‌प्निट्झ एक तडजोड करतो. त्याच्या मते ईश्वर हे एकच द्रव्य असे आहे, की त्याचे अस्तित्व पूणपणे स्वायत्त असते. ईश्वराचे अस्तित्व केवळ त्याच्या स्वरूपापासून, सत्त्वापासून, अनिवार्यपणे निष्पन्न होते. इतर सर्व द्रव्यांचे अस्तित्व ईश्वरापासून अनिवार्यपणे निष्पन्न होते व ह्यापुरते ते परायत्त असते. पण कोणत्याही द्रव्याच्या अवस्था केवळ त्याच्या आंतरिक स्वरूपापासून अनिवार्यपणे निष्पन्न होतात व ह्या बाबतीत द्रव्य स्वायत्त असते. द्रव्याच्या स्वायत्ततेपासून निष्पन्न होणारा एक निष्कर्ष असा, की कोणत्याही द्रव्यावर इतर कोणतेही द्रव्य काही कार्य करू शकत नाही प्रत्येक द्रव्य स्वतःच्या सत्त्वाला अनुसरून अनिवार्यपणे विकसित होत जाते.

द्रव्य हे धर्मांचा किंवा अवस्थांचा आधार असते, ही कल्पना द्रव्याच्या संकल्पनेत अंतर्भूत असते पण अनुभवाने आपला परिचय केवळ वस्तूच्या धर्मांशी किंवा अवस्थांशी होतो. त्यांचा आधार असलेल्या अधिष्ठानाचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. तेव्हा ⇨ अनुभववादी ‘धर्मांचे अधिष्ठान’ ह्या अर्थाने द्रव्य ही संकल्पना नाकरतात ⇨जॉन लॉक (१६६२–१७१४) हा अनुभववादी तत्त्ववेत्ता द्रव्य ही संकल्पना झिडकारीत नाही हे खरे आहे पण द्रव्य म्हणजे ‘धर्माचा आधार असलेले अज्ञात असे काहीतरी’ अशी व्याख्या तो करतो. ही भूमिका अर्थातच अस्थिर आहे. ⇨डेविड ह्यूम (१७११–७६) हा अधिक सुसंगत असलेला अनुभववादी तत्त्ववेत्ता द्रव्य ही संकल्पनाच नाकारतो व विशिष्ट वस्तू म्हणजे कित्येक धर्मांची व घटनांची केवळ एक मालिका असते, असे प्रतिपादन करतो. पण मग ही मालिका एक मालिका कशी बनते, हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वेगवेगळ्या अवस्था परस्परसाम्य, साहचर्य आणि कार्यकारणसंबंध यांनी संबंधित होतात, त्यांची मालिका म्हणजे एक वस्तू, असे त्याचे उत्तर ह्यूम देतो. आधुनिक काळात ⇨ बर्ट्रंड रसेल ह्या अनुभववादी तत्त्ववेत्त्यानेही द्रव्य ही संकल्पना नाकारून विशिष्ट भौतिक वस्तूंच्या व मनांच्या एकतेचा उलगडा ह्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच्या उलट ⇨ इमँन्युएल कांट (१७२४–१८०४) याने द्रव्य ह्या संकल्पनेचे समर्थन केले आहे. अवकाशात स्थान असलेल्या, कालात टिकून राहून वेगवेगळ्या अवस्थांतून जाणाऱ्या, कार्यकारणनियमांना अनुसरून ह्याच प्रकारच्या इतर वस्तूंवर कार्य करणाऱ्या आणि जिच्यावर इतरांकडून कार्ये होतात, अशा वस्तूच्या–द्रव्याच्या–संकल्पनेचा वापर केल्यानेच मानवी अनुभवाची संगती लावता येते, असे कांटचे मत आहे.

तार्किक दृष्ट्या पाहता मूलभूत विधाने ही विशिष्ट वस्तूंचा निर्देश करून त्याचे वर्णन करणारी असतात, म्हणजे उद्देश्य–विधेय आकाराची असतात, असा एक सिद्धांत प्रचलित आहे. विधानाच्या उद्देश्याने ज्याचा निर्देश होतो, ते म्हणजे द्रव्य व म्हणून ‘द्रव्य’ ह्या संकल्पनेला मानवी अनुभवात अनिवार्य स्थान आहे, असा निष्कर्ष ह्या सिद्धांतापासून काढण्यात येतो. उलट ‘द्रव्य’ ही संकल्पनाच अप्रमाण असल्यामुळे उद्देश्य–विधेय ह्या प्रकारच्या विधानांच्या स्वरूपाचेही वेगळ्या पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न आधुनिक तर्कशास्त्रात होतो पण ह्या प्रयत्नात खूपच अडचणी येतात.

रेगे, मे. पुं.


भारतीय दर्शनांतील द्रव्यविचार : वैशेषिक दर्शनात प्रामुख्याने द्रव्यसंकल्पना द्रव्य या पदाने मांडली आहे . द्रव्यत्व हा सामान्य धर्म ज्या वस्तूत राहतो, ते द्रव्य होय. द्रव्यत्व ह्या सामान्याचे किंवा जातीचे व्यंजक म्हणजे ओळखण्याची खूण गुण होत. ज्या वस्तूंत गुण असतात किंवा जी वस्तू गुणांचा आश्रय़ असते, ते द्रव्य होय. र्धम म्हणजे गुण व धर्मी म्हणजे द्रव्य (प्रकृती) होय, असे याचे तात्पर्य होय (योगसूत्रमाष्य ३·१३). वैशेषिक सूत्रांत क्रिया व गुण यांचा आश्रय आणि कोणत्याही कार्याचे समवायी कारण द्रव्य होय, अशी द्रव्य या पदाची व्याख्या केली आहे. समवायी कारण म्हणजेच उपादान कारण होय. ज्या वस्तूत कार्य उत्पन्न होऊन त्या वस्तूतच नियमाने राहते, त्या वस्तूस सोडून राहत नाही, त्यास समवायी कारण किंवा उपादान कारण म्हणतात. उदा., मृत्तिकेची घट, थाळी, पेला, नळी इ. कार्ये बनतात ती कार्ये मृत्तिकेतच उत्पन्न होतात व मृतिकेहून वेगळी राहत नाहीत गुणांचेही असेच आहे. बोर, आवळा,पेरू इ. फळांत हिरवा, तांबडा, पिवळा, पांढरा इ. रूपे रस, गंध, स्पर्श इ. गुण उत्पन्न होतात व राहतात म्हणून वरील फळे वरील गुणांचे समवायी कारण होत.

पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, काल, दिक्, आत्मे व मने अशी नऊ द्रव्ये असून ती नित्य व अनित्य अशी दोन प्रकारची असतात. पृथ्वी, जल, तेज, वायू या द्रव्यांचे परमाणू नित्य होत व त्याचप्रमाणे आकाश, काल, दिक्, आत्मे आणि मने ही नित्य द्रव्ये होत. ही नित्य द्रव्ये अनित्य द्रव्यांचे किंवा गुणांचे त्याचप्रमाणे कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव यांचे आश्रय होत परंतु नित्य द्रव्यांना आश्रय किंवा आधार काही नसतो. अनित्य द्रव्ये आणि अन्य सहा पदार्थ यांचा अंतिम मूळ आधार नित्य द्रव्ये होत. तात्पर्य, आधार किंवा धर्मी म्हणजेच द्रव्य होय धर्म म्हणजे व्यापक अर्थाने गुण, असे न्यायवार्तिकात म्हटले आहे.

न्यायवार्तिकात (१·१४) वाक्यातील विशेष्य–विशेषण–भावावरून वा उद्देश–विधेय–भावावरून द्रव्य व गुण असा बोध होत नाही असे सूचित केले आहे. ‘अश्व श्वेत आहे’ येथे श्वेत गुण अश्वद्रव्याचे विशेषण वा विधेय आहे उलट ‘अश्वाचा श्वेतवर्ण’ या वाक्यात श्वेतवर्ण उद्देश व ‘अश्व’ हा ‘अश्वाचा’ या विधेयकोटीत प्रविष्ट आहे. शाब्दबोधाप्रमाणेच मूळविचारातही उद्देश हे विधेय किंवा विशेषणही बनते. विचारात वा ज्ञानात विशेष्यविशेषभाव उलटा सुलटा होत असतो परंतु धर्म तो धर्मच व धर्मी तो धर्मीच राहतो.

सांख्य व योग दर्शनांप्रमाणे पुरुष (ज्ञाता) व प्रकृती (ज्ञेय) ही दोन तत्त्वे होत. ही दोन्ही नित्य आहेत. प्रकृती हे द्रव्य होय. पुरुषाच्या ठिकाणी चैतन्य, भोक्तृत्व आणि विभुत्व हे धर्म आहेत. प्रकृतीच्या ठिकाणी सत्त्व, रजस् व तमस् हे तीन गुण आहेत. पुरुषात हे तीन गुण नसल्यामुळे त्यास निर्गुण म्हटले आहे. गुण आणि गुणी यांच्यात वैशेषिक भेद मानतात. उदा., आंबा या फळाच्या ठिकाणी असलेले रूप, रस, गंध, स्पर्श हे गुण आंबा या द्रव्याहून भिन्न आहेत. सांख्य व योग ही दर्शने त्यांचा तादात्म्य संबंध मानतात. तादात्म्य म्हणजे अगदी भेद नव्हे आणि अगदी अभेद नव्हे भेदाभेद म्हणजे तादात्म्य होय. प्रकृती ही महत् तत्त्वापासून पृथ्वी तत्त्वापर्यंतच्या विकारांचे किंवा कार्यांचे उपादान कारण होय. प्रकृतीची कार्ये आणि प्रकृती यांचा तादात्म्य संबंध मानला आहे. कार्याचा कायम आश्रय किंवा आधार असलेले कारण उपादान कारण होय. अशा प्रकारचा आधार म्हणजे द्रव्य होय. तात्पर्य, कार्य ज्या वस्तूचे बनते, ते द्रव्य होय. म्हणून सांख्य मताप्रमाणे आत्मा (ज्ञाता) कार्यांचा (ज्ञेयांचा) आश्रय नसल्यामुळे ‘द्रव्य’ असे त्यास म्हणता येणार नाही.

जैन दर्शनात गुणपर्यायवत् द्रव्य किंवा उत्पाद–व्यय–ध्रौव्यवत् द्रव्य अशी द्रव्याची व्याख्या सांगितली आहे. म्हणजे ज्याच्यात गुण राहतात आणि पर्याय म्हणजे क्रमाने कार्ये उत्पन्न होतात व राहतात, ते द्रव्य होय किंवा उत्पाद–व्यय (उत्पत्ति–विनाश) आणि ध्रौव्य ज्याला असते, ते द्रव्य होय. ज्या वस्तूत कार्य़े उत्पन्न होऊन विनाश पावतात, म्हणजे वस्तूत क्रमाने बदल होतो आणि जी वस्तू बदल होत असताना स्थिरही राहते, ती वस्तू द्रव्य होय. मृत्तिका स्थिर किंवा अनुस्यूत राहते परंतु तिच्यात घट, थाळी, पेला, नळी अशी कार्ये क्रमाने, एक जाऊन दुसरे अशी, उत्पन्न होतात मृत्तिकेला स्थैर्यच असते, म्हणून मृत्तिका हे द्रव्य होय. ‘देवदत्त’ द्रव्य होय. कारण देवदत्त जन्मापासून मरेपर्यंत तोच असतो व बदलतही असतो. जीव आणि (जीवभिन्न बाकीचे विश्व म्हणजे) अजीव असे दोन प्रकारचे द्रव्य होय. संपूर्ण विश्व या दोन द्रव्यांत विभागले आहे.


बौद्ध मताने स्थिर द्रव्य नाही गुणांचा किंवा कार्यांचा आश्रय असे द्रव्य वा अशी वस्तू म्हणून काहीही नाही. रूप, रस, गंध, स्पर्शादी भौतिक गुण किंवा ज्ञान, इच्छा, राग, द्वेष इ. आत्म्याचे गुण हेच सत्य आहेत गुणांचा समुदायच असतो त्यांचा आश्रय भौतिक द्रव्य किंवा आत्मा म्हणून काही नाही. म्हणजे जे जे सत् आहे, ते ते अनित्य वा क्षणिक आहे. स्थिर वस्तू वा शाश्वत राहणारे सत् किंवा द्रव्य काही नाही. या मताला ‘पर्यायार्थिक दृष्टी’ अशी संज्ञा जैन दर्शन देते.

उलट मायावादी वेदान्ती नित्य, अद्वैत असेच एक निर्गुण चैतन्यरूप वस्तुतत्त्व स्वीकारतात. गुण किंवा कार्ये ते असत्य किंवा मिथ्या मानतात. या वेदान्ती विचाराला जैन दर्शनात ‘द्रव्यार्थिक दृष्टी’ म्हणून संज्ञा आहे या दृष्टीप्रमाणे एकच एक स्थिर व शाश्वत द्रव्य आहे, बाकी सर्व मिथ्या आहेत. खरे पाहता या विचाराला ‘द्रव्यार्थिक दृष्टी’ म्हणता येत नाही. मायावादी वेदान्ती गुणांना वा कार्यविश्वाला मिथ्या मानतात व एकच चैतन्य केवल निर्गुण मानतात. त्यामुळे चैतन्य हे द्रव्यही नव्हे कारण गुणाश्रयच द्रव्य होय. जैन मताने पर्यायार्थिक दृष्टी आणि द्रव्यार्थिक दृष्टी यांचा समन्वय केला आहे. पर्याय म्हणजे परिवर्तन आणि स्थैर्य एकच यांच्यात एकरूपता स्विकारली आहे या दोन्ही दृष्टी त्यांनी तुल्यबल मानल्या आहेत.

पाणिनीय व्याकरणशास्त्रात द्रव्य शब्दाचे विवेचन आले आहे, ते असे : कृदन्त प्रकारणानुसार द्रव्य या पदात मूळ धातू ‘द्रु’ असून त्याचा अर्थ गमन करणे किंवा प्राप्त करून घेणे असा आहे, ‘द्रु’ धातूला ‘य’ प्रत्यय याेग्य किंवा गुणांना पात्र या अर्थी लागून ‘द्रव्य’ शब्द बनतो. गतियोग्य किंवा अनेक गुण धारण करण्यास पात्र, असा द्रव्य पदाचा अर्थ निष्पन्न होतो. तद्धित प्रकरणानुसारे ‘द्रु’ हे नाम असून त्याचा अर्थ वृक्ष किंवा काष्ठ असा आहे. त्याच्या पुढे ‘य’ हा प्रत्यय विकार किंवा सदृश या अर्थी लागतो. वृक्षापासून बनविलेले कार्य किंवा वृक्षाप्रमाणे असणारी वस्तू, म्हणजे इष्ट आकार धारण करणारी वस्तू वा वृक्षाप्रमाणे पात्र, असे दोन अर्थ द्रव्य शब्दाचे होतात. दुसरा अर्थ तत्त्वज्ञानातील द्रव्य संकल्पनेचा बोधक आहे.

पातंजलमहाभाष्यात द्रव्य संकल्पनेची अशी चर्चा आली आहे: शब्दाला भाववाचक ‘त्व’ किंवा ‘ता’ हे प्रत्यय गुणवाचक (धर्मवाचक) म्हणून लागतात. ज्या शब्दापुढे हे प्रत्यय लागतात तो शब्द द्रव्यवाचक होय. पण द्रव्य म्हणजे काय? व त्यातील गुण ते कोणते ? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे गुण होत आणि त्याशिवाय जे निराळे राहते, ते द्रव्य होय. परंतु गुणांपेक्षा द्रव्य म्हणून काही वस्तू निराळी आहे किंवा नाही? असली पाहिजे. कारण द्रव्याला म्हणजे द्रव्यवाचक शब्दाला गुणवाचक प्रत्यय लागतो. ह्यावरून गुणापेक्षा द्रव्य निराळे आहे असे म्हणावे लागते. यावर आक्षेप असा, की शब्द, स्पर्श इ. गुणांपेक्षा द्रव्य म्हणून निराळे उपलब्ध होत नाही. एखादा पशू मारला आणि त्याचे शेकडो तुकडे करून निरनिराळ्या पानांवर ठेवले, तरी गुणांच्यापेक्षा तेथे निराळे काहीच आढळत नाही. यावर उत्तर असे, की गुणांपेक्षा द्रव्य निराळे आहे, हे अनुमानाने सिद्ध होते. झाडे, वनस्पती यांची वाढ व ऱ्हास होत राहतो. त्यामुळे वाढ व ऱ्हास यांहून वाढणारे व ऱ्हास पावणारे निराळे आहे, असे अनुमान होत. सूर्य, चंद्र वगैरे पूर्वेकडे दिसणारे नंतर पश्चिमेकडे दिसतात. त्यावरून त्यांच्यात न दिसणाऱ्या गतीचे अनुमान होते तसे येथे समजावे. सारख्याच जाडीचे व उंचीचे लोखंड आणि कापसाचा गठ्ठा तराजूत घातल्यानंतर पारडे खालीवर होते. यावरून दोघांमधला फरक अनुमानाने कळतो. पदार्थांमध्ये नवे गुण येतात, जुने गुण जातात. ज्या वस्तूच्या अाधाराने हा बदल होतो, ती वस्तू म्हणजे तत्त्व होय. ज्या तत्त्वाचा विघात होत नाही ते तत्त्वच द्रव्य होय उदा., आवळा, बोर वगैरे फळांचे पिवळा रंग, तांबडा रंग इ. निरनिराळे गुण बदललेले दिसले, तरी आवळा तो आवळाच व बोर ते बोरच त्यांत काही फरक होत नाही. गुणांचा जो संद्राव (एकत्र आलेला पाझर) अथवा आश्रय, ते द्रव्य होय (पाणिनीयसूत्रभाष्य ५·१·११९).

पहा : केवलाद्वैतवाद जैन दर्शन द्वैतवाद बौद्व दर्शन योग दर्शन वैशेषिक दर्शन सांख्य दर्शन.

संदर्भ : Cassirer, Ernst Trans. Substance and Function and Einstein’s Theory of Relativity, Chicago, 1923.

जोशी, लक्ष्मणशास्त्री