हेन्री सिज्विक

सिज्विक, हेन्री : (३१ मे १८३—२९ ऑगस्ट १९००). इंग्रज तत्त्वज्ञ. जन्म स्किप्टन, यॉर्कशर येथे. रग्बी आणि ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे त्याने शिक्षण घेतले. पदवीपूर्व शिक्षणात बुद्घिमान विद्यार्थी म्हणून आपला ठसा उमटविल्यानंतर ट्रिनिटी कॉलेजात अधिछात्र (फेलो) म्हणून त्याची नेमणूक झाली (१८५९). ह्या सुमारास धर्माविषयी त्याच्या मनात संशय निर्माण होण्यास प्रारंभ झाला होता. १८६० नंतर त्याने हिब्रू आणि अरबी ह्या भाषांचा सखोल अभ्यास केला. ह्या अभ्यासाच्या आधारे केलेल्या ऐतिहासिक संशोधनातून आपल्या मनातील संशयांचे समाधानकारक स्पष्टीकरण आपल्याला मिळेल, अशी त्याला आशा होती. ह्याच वेळी सिज्विक हा तत्त्वज्ञानाचे अध्यापन करीत होता आणि आपल्या धर्म-विषयक संशयांचे निराकरण व्हायचेच असेल, तर ते तत्त्वज्ञानातूनच होईल असे त्याला वाटू लागले. १८६९ मध्ये त्याने काही कारणांसाठी आपल्या अधिछात्रपदाचा राजीनामा दिला तथापि ट्रिनिटी कॉलेजने अधिव्याख्याता म्हणून त्याला नियुक्त केले. १८८३ मध्ये नैतिक तत्त्वज्ञानाचा ‘नाइटब्रिज प्राध्यापक’ म्हणून त्याची नेमणूक झाली. त्यानंतर आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्याने नीतिशास्त्राचे अध्यापन केले. केंब्रिज (केंब्रिजशर) येथे त्याचे निधन झाले.

तत्त्वज्ञान हा सिज्विकच्या स्वारस्याचा एकमेव विषय नव्हता. शिक्षण, मानसशास्त्र, साहित्य, राजकीय प्रणाली आणि राजकीय संस्थांचा इतिहास अशा विषयांवरही त्याने लेखन केले. स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातही त्याने महत्त्वपूर्ण काम केले. केवळ स्त्रियांसाठी असलेले ‘न्यूहॅम कॉलेज’ काढण्यासाठी त्याने आपला वेळ आणि पैसाही दिला. ‘सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च’ ही संस्था उभी करण्याच्या कामी त्याने भरीव सहकार्य दिले. ह्या संस्थेचे अध्यक्षपदही त्याला दोनदा देण्यात आले होते. विख्यात मानसशास्त्रज्ञ फेडरिक विल्यम, हेन्री मायर्स ह्यांच्यासह त्याने काही मानसशास्त्रीय प्रयोगही केले होते.

सिज्विकच्या तत्त्वज्ञानविषयक लेखनात द मेथड्स ऑफ एथिक्स (१८७४) हा ग्रंथ सर्वश्रेष्ठ होय. त्याचे इतर तत्त्वज्ञानीय लेखनही त्याच्या नैतिक तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकते पण ते बरेचसे प्रासंगिक स्वरुपाचे आहे. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ह्या विषयांवरील त्याचे लेखन फारसे महत्त्वाचे मानले जात नाही. द मेथड्स ऑफ एथिक्स मध्ये सिज्विकने तत्त्वज्ञानाच्या स्वरुपाविषयी त्याचे विचार मांडले आहेत. त्याच्या मते नवी तत्त्वे शोधून काढणे, हे तत्त्वज्ञानाचे उद्दिष्ट नसते, तर आपल्याकडे जे ज्ञानसंचित आधीच असते, त्याचेच पद्घतशीर व्यवस्थापन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विज्ञानांच्या माध्यमातून जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेले असते, त्याचे एकात्मीकरण करण्याचा प्रयत्न सैद्घांतिक तत्त्वज्ञान करीत असते. अशा प्रकारे एकात्म झालेल्या ज्ञानाकडे एक पूर्ण वा साकल्य म्हणून पाहता येते आणि विज्ञानात वापरल्या जाणाऱ्या सर्व पद्घती एकाच पद्घतीचे भाग म्हणून पाहता येतात.

सिज्विक हा उपयुक्ततावादी तत्त्वज्ञ म्हणून ओळखला जातो. स्वतः सिज्विकनेही अनेकदा स्वतःचा निर्देश उपयुक्ततावादी म्हणून केलेला आहे. ⇨ उपयुक्ततावादाची भूमिका अशी, की कित्येक गोष्टी स्वरुपतःच चांगल्या असतात. सुख ही स्वरुपतःच चांगली असलेली एकमेव गोष्ट आहे आणि दुःख ही स्वरुपतःच वाईट असलेली एकमेव गोष्ट आहे. ह्या अर्थाने ह्या भूमिकेला सुखवादी भूमिका म्हणता येईल. ⇨ जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२) आणि ⇨ जॉन स्ट्यूअर्ट मिल (१८०६– ७३) ह्यांनी ही भूमिका पद्घतशीरपणे मांडली. ती अशी : एखाद्या कृत्यामुळे घडून येणाऱ्या सर्व सुखद परिणामांची बेरीज करुन तिच्यातून त्या कृत्याचे सर्व दुःखद परिणाम वजा करता जी शिल्लक राहते, ती त्या परिस्थितीत कर्त्याला शक्य असलेल्या इतर कोणत्याही कृत्यापासून निष्पन्न होणाऱ्या ह्याच स्वरुपाच्या शिलकीहून अधिक असते परंतु ज्याला सुखदुःखांची बेरीज करुन एखादे कृत्य योग्य आहे, की अयोग्य हे ठरवायचे, ती सुखदुःखे कोणाची ? केवळ ते कृत्य करणाऱ्या कर्त्याची का इतरांचीही ? ह्या प्रश्नांच्या उत्तरांतूनच सुखवादाचे दोन प्रकार निष्पन्न होतात. एक, अहंवादी सुखवाद. ह्या अहंवादी सुखवादाची भूमिका अशी, की एखाद्या कृत्याची योग्ययोग्यता सामान्यतः ते कृत्य करणाऱ्या कर्त्याला का सुखदुःखे प्राप्त होतात, त्यावरुन ठरते. दुसरा प्रकार सार्विक सुखवादाचा. सार्विक सुखवादानुसार एखाद्या कृत्याची योग्यायोग्यता ठरवताना कुणाच्याही वाट्याला येतील, ती सुखदुःखे विचारात घेतली पाहिजेत. जेरेमी बेंथॅने सुखवादाचा आणखी एक प्रकार –मानसशास्त्रीय सुखवाद –प्रतिपादिला. त्याचा आशय असा : माणसे केवळ त्यांच्या स्वतःच्या सुखाची इच्छा धरतात. इतर कोणत्याही गोष्टीची इच्छा ते धरतात, तेव्हा स्वतःच्या सुखाचे साधन म्हणून ती ते धरतात. जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि बेंथॅम ह्या दोघांच्याही सुखवादी भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले जातात. [ ⟶ नीतिशास्त्र ].


सिज्विक हा स्वतःला उपयुक्ततावादी म्हणवीत असला, तरी जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि जेरेमी बेंथॅम ह्यांच्यापेक्षा काही बाबतींत त्याने वेगळी भूमिका घेतली होती. उदा., मिल हा अनुभववादी असल्यामुळे इंद्रियानुभव हाच मानवी ज्ञानाचा एकमेव उगम असून मानवी ज्ञानाचे प्रामाण्य इंद्रियानुभवावर आधारलेले असते, अशी त्याची भूमिका होती. त्यामुळे प्रातिभज्ञानावर (इन्स्ट्यूइटिव्ह नॉलेज) त्याचा विश्वास नव्हता तथापि सिज्विकने आपल्या सुखवादी भूमिकेची मांडणी करताना असे प्रतिपादन केले आहे, की साऱ्या साध्यांचा तटस्थपणे आणि शांतपणे विचार केल्यानंतर सुख हीच स्वरुपतः चांगली अशी एकमेव गोष्ट आहे, ह्याचे प्रातिभज्ञान आपल्याला होते. तसेच प्रत्येक माणसाने स्वतःचे जास्तीत जास्त सुख मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे तत्त्व प्रमाण आहे हेही आपल्याला प्रातिभज्ञानाने कळते. सिज्विक असेही म्हणतो, की सुखांचे दोन समूह घेतले, तर त्यांतला जो अधिक मोठा असेल, तो मिळवावा. तो सुखसमूह माझ्या वाट्याला येईलच असे नाही दुसऱ्या कुणाच्या वाट्याला तो जाईलही, ह्या तत्त्वाचेही प्रातिभज्ञान आपल्याला असते. मिल आणि बेंथॅम ह्यांच्या सहेतुकतावादी प्रणालींचा त्याने अव्हेर केला. ज्याला आपण आपले सुख समजतो ते मिळविण्याच्या हेतूने आपण नेहमीच कृती करतो, हे त्याला मान्य नव्हते.

सुखवादाच्या संदर्भात विवेकबुद्घीही काही मार्गदर्शन करते, अशी सिज्विकची भूमिका आहे. विवेकबुद्घीकडून आपल्याला तीन तत्त्वे मिळतात, असे तो म्हणतो, ही तत्त्वे अशी : (१) माझे अधिकतम सुख मिळविण्याचा मी प्रयत्न करणे हे वाजवी आहे. अधिकतम सुख ह्याचा अर्थ असा, की जवळच्या भविष्यकाळात काही अधिक सुख मिळाले, तरी दूरच्या भविष्यकाळात अधिक सुख आपण गमावणार असू , तर त्या थोड्याशा सुखाचा विचार करु नये हे विवेकबुद्घी आपल्याला सांगते, मात्र सिज्विकने ह्या मताचा स्वीकार केलेला नव्हता. तो सार्वत्रिक सुखवादाचा पुरस्कर्ता होता. (२) दुसरे तत्त्व विवेकनिष्ठ हितवादाचे. ते असे, की सुख ही एकमेव अशी चांगली गोष्ट असल्यामुळे तिचा भोक्ता कोण हा विचार गैरलागू ठरतो. (३) समानतेचे वा न्यायाचे तत्त्व. हे तत्त्व असे, की जर एखाद्या विशिष्ट परिस्थितीत एखादे कृत्य मी करणे योग्य असेल, तर त्याच प्रकारच्या परिस्थितीत इतर कोणीही त्या प्रकारचे कृत्य केल्यास ते कृत्य तितकेच योग्य ठरेल.

परंतु नीतिविवेकसुद्घा अडचणी निर्माण करतो, असे सिज्विकला दिसून आले. मी माझे जास्तीत जास्त सुख मिळविले पाहिजे, असे विवेक एकीकडे सांगतो पण एकाच परिमाणाचे सुख मी किंवा इतर कोणीही उपभोगिले, तरी त्या दोहोंचे मूल्य समान मानले पाहिजे. ही दोन्ही तत्त्वे विवेकाधिष्ठित असली, तरी त्यांच्यात विरोध आहे आणि हा विरोध नाहीसा करण्यासाठी विश्वरचनेसंबंधी आपणास काहीतरी गृहीत धरावयाला लागेल. विश्वरचना अशी असली पाहिजे, की ज्या रीतीने मी प्राणिमात्रांचे अधिकात अधिक सुख निर्माण करु शकेन, तीच रीत मला माझ्या अधिकारात अधिक सुखापर्यंत घेऊन जाईल आणि हे घडवून आणणारा कोणी विश्वनियंत्रक असला पाहिजे, अशी भूमिका घेऊन उपर्युक्त दोन विचारांचा त्याने समन्वय केला.

सिज्विकच्या नैतिक भूमिकेचे मुख्य पैलू उपयुक्ततावादी होते. केवळ अंतिम वा आंतरिक सुख हेच इष्ट असते कृतिकर्त्याला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही पर्यायापेक्षा अधिक सुख जिच्यामुळे निर्माण होईल, अशी कृतीच वस्तुनिष्ठपणे योग्य म्हणता येईल असे त्याचे प्रतिपादन होते.

पहा : उपयुक्ततावाद नीतिशास्त्र सुखवाद.

संदर्भ : 1. Broad, C. D. Five Types of Ethical Theory, London, 1930.

    2. Edwards, Paul, The Encyclopedia of Philosophy, Vol. VII, London, 1967.

    3. Havard, W. C. Henry Sidgwick and Later Utilitarian Political Philosophy, Gainesville (Fla.), 1959.

कुलकर्णी, अ. र.