झीनो, सीशीयमचा : (इ. स. पू. सु. ३३६–इ. स. पू. सु. २६५). ग्रीक तत्त्वज्ञानातील स्टोइक मत ह्या विचारपंथाचा प्रवर्तक. ह्याचा जन्म सायप्रसमधील सीशीयम ह्या नगरात झाला आणि अथेन्समध्ये त्याचे निधन झाले. हा मूळचा फिनिशयन होता पण त्याला ग्रीक भाषाही उत्तम प्रकारे अवगत होती. इ. स. पू. ३०० ह्या वर्षी झीनोने अथेन्समध्ये आपल्या पाठशाळेची स्थापना केली. ही पाठशाळा एका द्वारमंडपामध्ये (ग्रीक शब्द ‘स्टोआ’) असल्यामुळे त्याच्या पंथाला ‘स्टोइक’ हे नाव प्राप्त झाले. सॉक्रेटीसच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा त्याच्यावर विशेष प्रभाव होता. विशेषतः सॉक्रेटीसचे अनुयायी असलेल्या सिनिक पंथीयांपासून सद्‌गुणातच माणसाचे सर्वश्रेष्ठ कल्याण सामावलेले असते आणि स्वतःच्या विकारांवर संपूर्ण स्वामित्व असणे म्हणजे सद्‌गुणीअसणे, ही शिकवण त्याने स्वीकारली. पण ह्याबरोबरच सॉक्रेटीसचेच अनुयायी असलेल्या मेगेरियन पंथीयांनी विकसित केलेल्या, सूक्ष्म युक्तिवादांनी मतांचे खंडन-मंडन करण्याच्या पद्धतीचाही त्याने अंगीकार केला होता. झीनोच्या मताप्रमाणे वैश्विक विवेक हे विश्वातील सर्वोच्च तत्त्व होय आणि जे जे घडते ते ते ह्या विवेकाचा आविष्कार असल्यामुळे चांगले असते. म्हणून त्याचा स्वीकार करण्यात, विश्वातील घडामोडीत व्यक्त होणाऱ्या विवेकाधिष्ठित नियमानुसार वागण्यात, सद्‌गुण आणि शहाणपणा असतो. हेराक्लायटसने अग्नी हे आदितत्त्व मानले होते. हा अग्नी म्हणजेच वैश्विक विवेक होय, असे झीनोने प्रतिपादन केले. ह्या सिद्धांताबरोबरच सारे जग हे एकच नगर आहे असे मानले पाहिजे व त्याचे कायदे स्थानिक परंपरांवर न आधारता विवेकावर आधारलेले असले पाहिजेत, ह्या मताचाही त्याने पुरस्कार केला. झीनोचे व्यक्तिमत्त्व प्रखर व कर्कश होते पण त्याच्या शिकवणीत व वर्तनात विलक्षण संगती होती. ह्यामुळे समकालीनांना त्याच्याविषयी अतिशय आदर होता. त्याच्या हयातीत व मृत्यूनंतर अथेन्सच्या नागरिकांनी त्याचा मोठा सन्मान केला [⟶ स्टोइक मत].

रेगे, मे. पुं.