हर्बर्ट स्पेन्सरस्पेन्सर, हर्बर्ट : (२७ एप्रिल १८२०–८ डिसेंबर १९०३). क्रमविकासाचा सिद्धांत ज्ञानाच्या सर्व शाखांना लावून दाखविण्याचा प्रयत्न करणारा इंग्रज तत्त्वज्ञ. डर्बी येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडील विल्यम जॉर्ज स्पेन्सर ⇨ क्वेकर पंथाचे अनुयायी होते. ते स्वतंत्र विचारांचे होते. हर्बर्ट स्पेन्सरला जे शिक्षण मिळाले, तेही निर्बंधमुक्त असे होते. स्पेन्सरचा ओढा विज्ञानाकडे होता. वयाच्या सोळाव्या वर्षी त्याने गणिताचे काही ज्ञान प्राप्त केले. भाषा आणि इतिहास या विषयांत मात्र तो कच्चाच राहिला होता तथापि स्वप्रयत्नाने त्याने विविध वि ष यां चे ज्ञान संपादिले. स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षणही त्याला मिळाले होते. पुढे डर्बी येथे अल्पकाळ शिक्षकाची नोकरी केल्यानंतर तो एका रेल्वे कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होता (१८३७–४६). पुढे इकॉनॉमिस्ट या नियतकालिकात तो उपसंपादक होता (१८४८–५३). १८५० मध्ये सोशल स्टॅटिक्स हा त्याचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला आणि एक मौलिक विचारवंत म्हणून त्याची ख्याती झाली. ⇨ चार्ल्स डार्विन चा ऑरिजिन ऑफ स्पीशीज (१८५९) हा जगद्विख्यात ग्रंथ प्रसिद्ध होण्यापूर्वीच सोशल स्टॅटिक्स ह्या ग्रंथात डार्विनच्या क्रमविकासाच्या सिद्धांताशी मिळती-जुळती अशी एक प्रणाली स्पेन्सरने मांडली होती मात्र तिच्यावर ⇨ लामार्क या फ्रेंच शास्त्रज्ञाने मांडलेल्या विकासाच्या कल्पनेचा विशेष प्रभाव दिसून येत होता. पुढे त्याने मांडलेल्या काही विचारांची–उदा., मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कार–बीजेही या ग्रंथात होती.

 

त्याने प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी हा ग्रंथ लिहावयास आरंभ केला (१८५४) आणि (१८५५) मध्ये तो प्रसिद्ध झाला. डार्विनच्या उपर्युक्त ऑरिजिन ऑफ स्पीशीज या ग्रंथाने तो एवढा उत्साहित झाला, की क्रमविकासाची संकल्पना सर्व विज्ञानांना लावून दाखविण्यासाठी त्याने एक ग्रंथमालाच लिहिण्याचे ठरविले. अशा प्रयत्नातून सर्वसमावेशक स्वरूपाचा एक तत्त्वज्ञानीय सिद्धांत उभा करता येईल, असे त्याला वाटत होते. अशा तत्त्वज्ञानाला ‘सिंथेटिक फिलॉसफी’ (संश्लेषक तत्त्वज्ञान) असे नाव त्याने दिले होते. १८६० पासून ३३ वर्षे तो या कामात गुंतला होता. त्यातून तत्त्वमीमांसा, जीवशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि नीतिशास्त्र यांवरील ग्रंथ त्याने तयार केले.

स्पेन्सर अविवाहित होता. त्याची प्रकृती ठीक नसे. त्याच्या ग्रंथांपासून त्याला फारशी आर्थिक प्राप्तीही बरीच वर्षे होत नव्हती. ब्रायटन, ससेक्स येथेे दीर्घकाळाच्या आजारानंतर तो मरण पावला.

स्पेन्सरने लिहिलेले ग्रंथ असे : सोशल स्टॅटिक्स (१८५०), एज्युकेशन, इंटलेक्च्युअल, मॉरल अँड फिजिकल (१८६१), फर्स्ट प्रिन्सिपल्स (१८६२), प्रिन्सिपल्स ऑफ बायॉलॉजी (दोन भाग, १८६४–६७), प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी (दोन भाग, दुसरी आवृ. १८७०–७२), प्रिन्सिपल्स ऑफ सोशिऑलॉजी (तीन भाग, १८७६–९६), प्रिन्सिपल्स ऑफ एथिक्स (दोन भाग, १८७९–९३), मॅन व्हर्सस द स्टेट (१८८४), ऑटोबायॉग्रफी (१९०४), एसेज : सायंटिफिक, पोलिटिकल अँड स्पॅक्युलेटिव्ह (१८९०).

स्पेन्सरची ज्ञानमीमांसा : आपला अनुभव हा वास्तवता (रिॲलिटी) आणि विशिष्ट मानवी जीव यांच्यातील परस्परक्रियेचा परिणाम असतो तथापि आपल्याला जरी या बाह्य वास्तवतेचे अस्तित्व मान्य करावे लागत असले, तरी ह्या वास्तवतेचे नेमके स्वरूप काय आहे, हे आपल्याला कधीही कळत नाही. ह्या वास्तवतेच्या परिणामांचा शोध आपण घेऊ शकतो पण त्याचे कारण आपल्याला अंगभूतपणे अज्ञेय–म्हणजे ज्याचे ज्ञान घेणे अशक्य–असे राहते.

वास्तवतेचे स्वरूप आपल्याला अज्ञेय राहत असले, तरी ह्याचा अर्थ असा नव्हे, की आपण ईश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवला पाहिजे कारण आपण आपल्या ज्ञानासाठी इंद्रियगोचर सामग्रीवर पूर्णतः अवलंबून असतो. त्यामुळे अज्ञेय हे मुळात कुठल्याही प्रकारच्या ईश्वरी द्रव्याशी तुलनीय आहे किंवा नाही, हे सांगणे आपल्याला शक्यच नसते. जे केवल (ॲब्सोलूट), त्याच्याबद्दल आपण केलेली कोणतीही कल्पना बरोबर आहे किंवा नाही, हे आपण कधीच पारखू शकत नाही कारण जे केवल त्याचे खरेखुरे स्वरूप आपणास अज्ञेयच असते. केवल हे निरीक्षणाच्या पातळीवर आणताच येत नसल्यामुळे अनुमानाचा (रीझनिंग) मार्गही पत्करता येत नाही. स्पेन्सरच्या मते, अनुमान ही जीवाची एक प्रगत क्षमता होय. तिचा उपयोग जीव आपल्या परिसराच्या समस्या सोडविण्यासाठी करतो. त्यामुळे अनुमानाचा उपयोग करून केवल जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास तो विफल ठरतो. ईश्वरासारख्या ज्या संकल्पनेला अनुभवाच्या क्षेत्रापलीकडचा संदर्भ असतो, तिचे विश्लेषण करताना जे प्रश्न पुढे येतात, त्यांची एकतर उत्तरे देता येत नाहीत किंवा दिल्यास त्यांत व्याघाताचा दोष घडतो. उदा., काही प्रश्न असे : जर ईश्वर असेल, तर तो अस्तित्वात कसा आला ? ईश्वराला कुणीतरी निर्माण केले, असे असेल, तर ईश्वराचा निर्माता कोण ? ईश्वराने स्वतःच स्वतःला निर्माण केले असेल काय ? तसे अस-ल्यास कशापासून त्याने स्वतःची निर्मिती केली ? अशी निर्मिती करण्यासाठी त्याने कोणत्या सामग्रीचा वापर केला ? असे असेल, तर ही सामग्री कोणी निर्माण केली ? त्याने शून्यातून स्वतःची निर्मिती केली असेल, तर शून्यातून कशाचीही निर्मिती कशी होऊ शकेल ? आपल्याला उपलब्ध असलेल्या अनुभवसामग्रीतून या प्रश्नांची उत्तरे मिळू शकत नाहीत. तसेच शुद्ध तार्किक विश्लेषणातूनही ती मिळण्याऐवजी आणखी नवीन प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे अज्ञेयाचे स्वरूप व त्याचा आपल्याशी असलेला संबंध समजून घेण्यासाठी ईश्वरवादाचा उपयोग होत नाही, असे स्पेन्सरचे प्रतिपादन आहे.

चराचरेश्वरवादातूनही या संदर्भात हाताशी काही लागत नाही. ईश्वर ही अंतर्शायी शक्ती आहे, बाह्य शक्ती नाही असे अनेकदेवतावाद मानतो. परंतु त्यामुळे ईश्वरवादाच्या संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. विश्व हे कोणत्याही कारणावाचून केवळ शून्यातून निर्माण झाले, अशी कल्पना करणे अशक्यच राहते. मग असा विचार करावा लागतो, की विश्व हे प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यापूर्वी अव्यक्तावस्थेत असले पाहिजे. पण विश्वाच्या ह्या अव्यक्तावस्थेचा विचार करायचा झाला, तरी विश्व मुळात निर्माणच कसे झाले ? हा प्रश्न उरतोच.

असे असल्यामुळे निरीश्वरवाद स्वीकारावा, असेही स्पेन्सर म्हणत नाही. ईश्वरवाद आणि चराचरेश्वरवाद आपण नाकारतो, तेव्हा अज्ञेय अस्तित्वात नाही असे आपण म्हणत नसतो. अज्ञेय आपल्याला जाणून घेणे शक्य नाही, एवढेच आपल्याला म्हणायचे असते. ईश्वराबाबत फारतर आपण असे म्हणू शकतो, की तो अस्तित्वात आहे काय, हे आपल्याला माहीत नाही. अशी संशयवादी भूमिका घेणे हेच वाजवी आहे.

स्पेन्सरने ईश्वरवादी भूमिका नाकारल्या. निरनिराळ्या धर्मसंस्थांतून चालणाऱ्या अपप्रकारांवरही टीका केली. नैसर्गिक घटनांबद्दल चुकीची अनुमाने केल्यामुळे काही विश्वास निर्माण होतात आणि अनेक लोक ते बाळगत राहतात, अशी त्याची धारणा होती. आदिम समाजातील माणसांना अनेक गोष्टींचा उलगडा होत नव्हता. त्यातून आत्मा, भुते यांसारख्या कल्पना अस्तित्वात आल्या. माणसाचे व्यक्तिमत्त्व दुहेरी असते, माणसात दृश्य बदल झाले तरी त्याचे एक व्यक्तिमत्त्व अपरिवर्तनीय राहते, अशीही कल्पना करण्यात आली. नंतर ह्या कल्पनेतून चिरंतन, अपरिवर्तनीय आणि सर्वशक्तिमान अशा व्यक्तिमत्त्वांची कल्पना निर्माण झाली. अशी व्यक्ति-मत्त्चे देव म्हणून गणली गेली. म्हणूनच काही धर्मांतील देवांत माणसांच्याच स्वभाववैशिष्ट्यांचा आढळ झालेला दिसतो. देवांना माणसांचे स्वरूप देणारी धर्मप्रवृत्ती स्पेन्सरला मान्य नव्हती. वैज्ञानिक सिद्धांतांना चर्च करीत असलेला विरोधही त्याला नापसंत होता तथापि धर्मामुळे माणसा-माणसांतली मैत्री आणि सहकार्य वृद्धिगंत होते आणि गतकाळातली श्रेष्ठ मूल्ये रक्षिली जातात तसेच विश्वात आढळणाऱ्या रहस्यांमध्ये माणसे रस घेऊ लागतात आणि त्यामुळे वैज्ञानिक संशोधनाला चालना मिळते हे त्याला मान्य होते.


वैज्ञानिक ज्ञान : अज्ञेयाचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नसले, तरी अज्ञेयाचे काही आविष्कार आपल्या अनुभवास येतात. त्यांचा अभ्यास माणूस करू शकतो. उदा., सर्व वस्तूंमध्ये–त्यांत आपणही आलो–निर-निराळ्या प्रमाणांत काही ऊर्जा असते. वास्तवतेची अशी जी रूपे असतात, ती म्हणजे अज्ञेयाचेच आविष्कार असतात. अशा आविष्कारांबद्दल वाटणाऱ्या कुतूहलातून विज्ञानाचा उदय होतो. विविध प्रकारची माहिती गोळा करून तिच्या आधारे सर्वसामान्य नियम शोधून काढणे हे विज्ञानाचे काम होय. घटनांच्या विशिष्ट रूपांचे वा पैलूंचे संशोधन विज्ञानाच्या विशिष्ट शाखा करीत असतात. उदा., भौतिकीत आपल्या भोवतालच्या जड सृष्टीतील घटनांचा वा आविष्कारांचा एका विशिष्ट दृष्टिकोणातून विचार केला जातो. त्यातून ऊर्जेचे रक्षण, गुरुत्चाकर्षण ह्यांच्यासंबंधीचे नियम तयार होतात. पण निव्वळ अनुभवाधिष्ठित सामान्यीकरणे, असे या नियमांचे स्वरूप समजता येणार नाही कारण घटनांच्या जगात अज्ञेय कसे प्रकट होते, त्याचे हे नियम वर्णन करतात.

काल आणि अवकाश ह्या जन्मदत्त (इनेट) संकल्पना नाहीत कारण इतिहासात त्यांच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे दिल्या गेल्या आहेत, असे स्पेन्सरचे मत होते. या संकल्पना अशा आहेत, की ज्यांचा उलगडा कधीच पूर्णतः करता येत नाही. त्यामुळे ह्या संकल्पनाही अज्ञेयाच्या क्षेत्रातच येतात. वैज्ञानिकांनी त्यांचा वापर करताना या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत.

क्रमविकास : क्रमविकासाचे तत्त्व ज्ञेय विश्वात सर्वत्र लागू करता येते, हे दाखवून देण्याचा स्पेन्सरचा प्रयत्न होता. आरंभी अगदी साधी रचना असलेल्या जीवांचा विकास होऊन त्यांच्या रचनेत गुंतागुतीची कार्ये पार पाडण्याची क्षमता येते. मात्र ही प्रक्रिया हेतुरहित आहे. स्पेन्सरची विकासाची व्याख्या अशी : सापेक्षतः अनिश्चित, असंबद्ध अशा एकजिनसी-पणापासून सापेक्षतः निश्चित, सुसंबद्ध अशा बहुजिनसीपणाकडे जाणे. याचे उदाहरण म्हणजे अमीबा हा एकपेशीय जीव. त्याचे संपूर्ण शरीरच सर्व प्रकारची कार्ये करीत असते. त्यामुळे तेथे एकजिनसीपणा असतो. मात्र विकसित अशा मनुष्यप्राण्याची स्थिती अशी नाही. अनेक पेशींनी घडलेल्या त्याच्या शरीरातील वेगवेगळे अवयव त्याची विविध कार्ये पार पाडीत असतात. येथे बहुजिनसीपणा असतो. अमीबाचे संपूर्ण शरीर सर्व कार्ये करीत असल्यामुळे शरीराच्या विविध अवयवांत सुसंबद्धता असण्याचा प्रश्न येत नाही. माणसाची विविध कार्ये त्याच्या शरीरातील विविध अवयव पार पाडीत असतात. पण ते एकाच शरीराचे भाग असून त्यांच्यांत एकात्मता आणि सुसंबद्धता असते. लामार्क ह्या शास्त्रज्ञाच्या क्रमविकासविषयक कल्पनेचा स्पेन्सरवर प्रभाव होता. परिस्थितिसापेक्ष गरजेनुसार जीव आपल्या अवयवांचा कमीअधिक उपयोग करतात अगर मुळीच करत नाहीत त्यामुळे त्या अवयवांत फरक घडून येतात असे लामार्कचे प्रतिपादन आहे. स्पेन्सरने ह्याच विचाराला अनुसरले आहे. उदा., एका विशिष्ट संवेदनाशील पेशीवर प्रकाशाचा आघात पुनःपुन्हा होत राहिला आणि ती पेशी विशिष्ट प्रकारे कार्य करू लागली. ह्या प्रक्रियेतून डोळा अस्तित्वात आला [⟶ क्रमविका].

सामाजिकता आणि सहसंवेदना : भावना क्रमविकासातून निर्माण होतात. जीवन हे स्वत:ला टिकवून धरण्याचा प्रयत्न करीत असते. ह्या प्रयत्नामागचा आवेग टिकायचा असेल, तर सुखाची भावना आवश्यक आहे. अशी भावना जर सजीवाला अनुभवता आली नाही, तर जगण्याचा आवेग राहणार नाही. त्यामुळे जीवन जगण्याची इच्छा सुखभावनेच्या साथीने येते आणि जे वर्तन जीवन धोक्यात आणते, त्या वर्तनासोबत दुःख येत असते. सामाजिकता आणि सहसंवेदना ह्या भावना माणसांमध्ये विकसित होतात कारण जीवनाच्या झगड्यात अन्य माणसांचे सहकार्य आणि सहसंवेदना यांची आवश्यकता आहे, हे माणसांनी ओळखलेले असते. सहकार्याच्या सातत्यातून आनंद मिळत असतो. ह्या आनंदासाठी समाजाची निर्मिती होते. पण जीवाचे शरीर व समाज ह्यांत स्पेन्सर भेद दाखवतो. जीवाच्या शरीराच्या पेशी साहाय्यकांप्रमाणे शरीरासाठी एकत्र काम करीत असतात. परंतु समाज मात्र त्यात सदस्यांप्रमाणे राहणाऱ्या व्यक्तींच्या हितासाठी असतो. ह्या व्यक्तिवादी भूमिकेतूनच स्पेन्सर हा समाजवादाचा विरोधक आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा पुरस्कर्ता झाला होता.

सजीवांप्रमाणेच समाजालाही शैशव, प्रौढत्व आणि मरण असते, असेही स्पेन्सरचे म्हणणे होते तथापि त्याचे असेही प्रतिपादन होते, की किमान पश्चिमी संस्कृती तरी आता नुकतीच प्रौढावस्थेत प्रवेश करीत आहे. ह्या समाजात सहानुभूतीची आणि समजूतदारपणाची भावना वाढली आहे. उदा., युद्ध करण्यापेक्षा सामंजस्याने प्रश्न सोडवावेत ही वृत्ती बळावली आहे. भाषणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य अशा स्वातंत्र्यांचे महत्त्व प्रस्थापित झालेले आहे. प्रातिनिधिक सरकारे येत आहेत. त्यामुळे ही संस्कृती दीर्घकाळ आपले सातत्य टिकवून राहील. लामार्कच्या प्रणालीच्या प्रभावातून स्पेन्सरला असेही वाटत होते, की नैतिकतेचे धडे लोकांना पिढ्यान् पिढ्या दिले गेले, तर नैतिकता ही उपजतच होईल.

नीती : स्पेन्सरची नैतिक भूमिका सुखवादाची आहे असे दिसते. क्रमविकासवादाच्या आधाराने त्याने आपली नैतिक भूमिका मांडलेली आहे. विकासक्रमात जे नंतर येते त्याची गुणवत्ता वरच्या दर्जाची असते, असे डार्विनचे प्रतिपादन नाही पण स्पेन्सरची भूमिका काही अंशी तरी तशी वाटते. नीती हे वर्तनाचे वा कृतींचे शास्त्र आहे. सुख ही एकच गोष्ट स्वयंमूल्य असलेली आहे. जीवनानुकूल कृती सुखाच्या असतात आणि अशा कृती कोणत्या ह्याचे आकलन जीवनवादी विकासशास्त्राच्या उपपत्तीमुळे होते आणि तिच्यामुळे नीतीचे स्पष्टीकरणही देता येते,असे त्याचे म्हणणे आहे.

शिक्षण : माणसे सतत आपल्या परिसराशी झगडत असतात. त्यामुळे या झगड्यात त्यांना ज्यांचे साहाय्य होईल, असे विषय शिक्षणात असावेत. त्या दृष्टीने विज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानंतर मानसशास्त्र, सामाजिक शास्त्रे असे विषय उपयुक्त आहेत. त्यांच्या अभ्यासातून सामाजिक आणि कौटुंबिक समस्या सोडविण्यास मदत होईल. कलाही अर्थातच महत्त्वाच्या. त्यांतून जे समाधान, सुख प्राप्त होते वा होऊ शकेल, त्याचे विश्लेषण करता येत नाही. मुलांना शिकवण्यासाठी प्रत्यक्ष प्रायोगिक प्रसंग निर्माण करून त्यांतून त्यांना निरनिराळे नियम स्वतःच शोधून काढायला प्रवृत्त करावे. शिक्षकांनी कल्पनांच्या मुक्ताविष्काराला वाव द्यावा. ह्या जगात स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची वृत्ती निर्माण करावी.

स्पेन्सरचे तत्त्वज्ञान त्याच्या काळात जितके प्रभावी होते, तितके ते पुढे राहिले नाही. तो क्रमविकासवादी विचारवंत असला, तरी क्रम-विकासाची दिशा अमुक एक अशीच का झाली, ह्याचे स्पष्टीकरण त्याच्या तत्त्वज्ञानात मिळत नाही, असा काही अभ्यासकांचा आक्षेप आहे. तो विज्ञानाचा पुरस्कार करतो पण विज्ञानात प्रत्येक गोष्ट पारखून घ्यावी लागते. असे असताना जी पारखून घेणे शक्य नाही, अशी एक वस्तू–अज्ञेय–अस्तित्वात असल्याचे तो ठामपणे सांगतो. मुक्त अर्थव्यवस्थे-विषयीचे स्पेन्सरचे विचारही टीकारार्ह ठरलेले आहेत. डार्विनची उपपत्ती मानवी समाजाला लावून दाखवताना ‘जगण्याची ज्याची लायकी असेल, तोच जगेल ङ्ख, अशी धारणा त्याने व्यक्त केली. त्यामुळे सामाजिक विषमता आणि दुर्बलांचे शोषण ह्यांचे समर्थन करण्याचा हितसंबंधीयांचा मार्ग मोकळा झाला. जीवनानुकूल कृती सुखाच्याच असतात, हे त्याचे म्हणणेही तर्काला धरून नाही. समाजासाठी दुःख व कष्ट सोसणाऱ्या व्यक्तींमुळे तो समाज समृद्ध पावतो, असे दिसून येते.

स्पेन्सरने वैज्ञानिक ज्ञानाचा आणि पद्धतशीर तात्त्विक विश्लेषणाचा पुरस्कार केला हे महत्त्वाचे होय. शासनकर्त्यांनी व्यक्तींच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू नये तसेच त्यांनी लष्करी शक्तीला फार प्रभाव गाजवू देऊ नये, असेही त्याने म्हटले होते. साम्राज्यवाद आणि विस्तारवाद यांना त्याचा विरोध होता. ज्ञानाची त्याने प्रयत्नपूर्वक उपासना केली होती आणि अनेक विषयांचे ज्ञान त्याने मिळवलेही होते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रीय विचारवंतांवर त्याचा प्रभाव मोठा होता. समाजसुधारणावादी गोपाळ गणेश आगरकर हे याचे ठळक उदाहरण होय.

संदर्भ : 1. Asirvatham, E. Herbert Spencer’s Theory of Social Justice, New York, 1936.

            2. Bowne, B. P. The Philosophy of Herbert Spencer, New York, 1874.

            3. Ducan, David, Life and Letters of Herbert Spencer, 2 Vols. New York, 1908.

            4. Edwards, Paul, Ed. The Encyclopaedia of Philosophy, Vol.७·, New York and London, 1967.

             5. Gray, T. S. Herbert Spencer’s Political Philo-sophy : Individualism and Organism, Hampshire, 1996.

             6. Peel, J.D.Y. Herbert Spencer The Evolution of a Sociologist, London, 1971.

             7. Taylor, M. Men Versus the State – Herbert Spencer and Late Victorian Individualism, Oxford, 1992.

कुलकर्णी, अ. र.