बौद्ध साहित्य : आपले धर्मोपदेश ज्याने त्याने आपापल्या भाषेतून जाणून घ्यावेत, असा आदेश बुद्धाने दिला असल्याने बौद्ध साहित्य हे हल्ली निरनिराळ्या भाषांत उपलब्ध असलेले दिसते. त्यातील सर्वांत जुने साहित्य ⇨पाली भाषेत आहे. त्या भाषेत मूळ ‘त्रिपिटक’ ग्रंथ उपलब्ध झालेला असून भारत सरकारच्या मदतीने बिहार सरकारने ह्या सबंध ग्रंथाचे ४१ पुस्तकांत नागरी लिपीमध्ये मुद्रण पुरे केलेले आहे.

प्राकृत-संस्कृतमिश्र असा भाषेत काही ग्रंथ हल्लीही उपलब्ध आहेत. उदा.,⇨महावस्तु हा ग्रंथ पालि-प्राकृतची छाया पडलेल्या संस्कृतमध्ये लिहिलेला आहे. त्यातील व्याकरणाची रूपे व वाक्यप्रयोग पालि-प्राकृत भाषांतून घेतलेले आहेत. पूर्वजन्मीच्या काही कथा व ह्या जन्मी त्याने शारिपुत्र व मौदगल्यायन, शुद्धोदन व महाप्रजापती, राहुल प इतर शाक्यवंशीय राजपुत्र ह्यांना आपले अनुयायी बनवल्याची कथा व मगध देशाचा राजा बिंबिसार ह्याच्याशई झालेला संवाद ह्यात अंतर्भूत झालेले आहेत. ह्याचप्रमाणे ⇨ललितविस्तर  ह्या नावाचा ग्रंथ प्राकृत-संस्कृतमिश्र भाषेत असून ह्यात दिलेले बुद्धचरित्रही धर्मचक्रप्रवर्तनापर्यंतचेच आहे.⇨अश्वघोषाचे बुद्धचरितसौंदरनंद ही दोन काव्य व शांतिदेवाचे बोधिचर्यावतार शुद्ध संस्कृत भाषेत असून ‘काव्य’ह्या दृष्टीने त्यांची सरसता विद्वन्मान्य झालेली आहे. अश्वघोषाचे संस्कृतात उपलब्ध असलेले तेरा सर्गांचे बुद्धचरित  हेही अपूर्ण असून अमृतानंद नावाच्या विद्वानाने त्याला १४ ते १७ सर्गांपर्यंतची पुस्ती जोडलेली आहे. पण तिबेटी व चिनी भाषांत याचे २८ सर्ग असून कथाभाग बुद्ध-परिनिर्वाणानंतरच्या पहिल्या संगीतीपर्यंत आहे.आर्यसूराची जातकमाला  हाही ग्रंथ काव्यदृष्ट्या प्रसिद्ध आहे.ह्यात बुद्धाच्या पूर्वजन्मीच्या काही कथा सांगितल्या असून त्यात दानपारमिता, शीलपारमिता इ. गुणांचे निदर्शन केलेले आहे. [ →जातके].

अलीकडे सर्वास्तिवादी व मूलसर्वास्तिवादी ह्या संप्रदायांचे काही ग्रंथ त्रुटित स्वरूपात, पण बौद्ध-संस्कृत भाषेपेक्षा शुद्ध संस्कृतला जवळ आहे तरी पण काही शब्दांत व व्याकरणरूपांत पालि-प्राकृतची छाया स्पष्ट दिसते. सर्वास्तिवाद्यांचे त्रुटित प्रातिमोक्षसूत्र, त्रुटित महापरिनिर्वाणसूत्र तसेच मूलसर्वास्तिवाद्यांचे प्रतिमोक्षसूत्रविनयपिटकातील काही परिच्छेद हे आता संस्कृतमध्येही उपलब्ध झालेले आहेत.

अवदानशतक, दिव्यावदान यांसारख्या ग्रंथांत बुद्धाच्या मागील जन्मातील सद्‍गुणाचे निदर्शन गोष्टी असून प्रसंगोपात्त  तत्कालीन समाजासंबंधी माहितीही दिलेली आढळते. वज्रसूची  ह्या ग्रंथात जन्मजात शुद्धीच्या कल्पनेवर सजेतोड टीका आहे.

महायानिकांच्या वैपुल्य  नावाच्या सूत्रखंडात अष्टसाहस्त्रिका  प्रज्ञापारमिता,गंडव्यूहसूत्र समाधिराजसूत्र व सद्धर्मपुंडरीक  ह्यांचा उल्लेख करता येईल.⇨सद्धर्मपुंडरीक ह्या ग्रंथाला चीन व जपानमध्ये फार मोठे महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले असून ह्या ग्रंथाच्या भाषांतराचे तेथे मोठ्या श्रद्धापूर्वक पठन केले जाते.

वसुबंधूचा अभिधर्मकोश व त्यावरील त्याचे स्वतःचे भाष्य तसेच त्या भाष्यावरील यशोमित्राची स्फुटार्था अभिधर्मकोशव्याख्या व १९५९ मध्ये प्रसिद्ध झालेला अभिधर्मदीप  हे ग्रंथ वैभाषिक व सौत्रांतिक ह्या संप्रदायांची तात्त्विक विचारसरणी समजावयास फार उपयुक्त आहेत.⇨नागार्जुनाची मूलमध्यमककारिका  व त्यावरील चंद्रकीर्तीची प्रसन्नवदा  नावाची टीका ही माध्यमिकांची विचारसरणी सांगतात, तर ⇨लंकावतारसूत्र, ⇨ असंगाचे योगाचार-भूमि-शास्त्र व वसुबंधूची विंशतिका व त्रिंशिका  तसेच त्रिंशिकेवरील  स्थिरमतीची टीका हे ग्रंथ विज्ञानवादाचे समर्थन करतात. तांत्रिक बौद्धांचेही वाङ्मवय संस्कृत भाषेत असून श्री गुह्यसमाजतंत्र  हा त्यांचा ग्रंथ प्रमुख म्हणून गणला जातो.  ह्याशिवाय अद्वयवज्रसंग्रह, सहजसिद्धि, हेवज्रतंत्र, मंजुश्रीमूलकल्प वगैरेंसारखे अनेक ग्रंथ आहेत. साधनमाला नावाच्या ग्रंथात अनेक बौद्ध देवदेवतांच्या बाह्य स्वरूपाची वर्णने असून त्यांच्या पूजेची तंत्रेही त्यात सांगितलेली आहेत.

  तिबेटी भाषेत ‘कांजूर’ व ‘तांजूर’ असे दोन मोठे ग्रंथसंग्रह असून त्यांत साडेचार हजाराच्यावर ग्रंथ आहेत. ह्यांत प्रामुख्याने मूळ संस्कृत ग्रंथाची भाषांतरे असून स्वतंत्रपणे लिहिलेले ग्रंथही आहेत. पाली ग्रंथांपैकी काही किरकोळ सूत्रांचीही थोडी भाषांतरे आहेत. [→ तिबेटी भाषा-साहित्य]. अपभ्रंश भाषेतील दोहाकोश [→ बौद्ध गान ओ दोहा] ह्या ग्रंथाचेही तिबेटी भाषांतर उपलब्ध आहे. चिनी भाषेतही त्रिपिटक ग्रंथ असून इतरही २,००० च्या वर ग्रंथ आहेत. त्यांतही प्रामुख्याने मूळ संस्कृत ग्रंथाची चिनि संस्करणे व स्वतंत्र ग्रंथ आहेत. पाली सूत्रांचीही थोडीशी भाषांतरे चिनीत आहेत.

पहा :पालि साहित्य बुद्ध बौद्ध धर्मपंथ संस्कृत साहित्य.

संदर्भ :   1. Banerji, S.C. An Introduction to Pali Literature, Calcutta, 1964.

             2. Bapat, P.V. Ed. 2500 Years of Buddhism, Delhi, 1959.

             3. Conze, Edward and Others, Ed. Buddhist Texts Through the Ages, Oxford, 1954.

             4. Law, B. C. a History of Pali Literature, 2     Vols,. London, 1933.

             5. Rhys Davids,. T.W. Buddhist : Its History and Literature, New York, 1927.

             6. Winternitz, Maurice, A     History of Indian Literature, Vol. II, Calcutta, 1933.

बापट, पु.वि.