सायरीनीइक्स पंथ : पश्चिमी तत्त्वज्ञानातील आद्य सुखवादी पंथ.थोर ग्रीक तत्त्वज्ञ ⇨ सॉक्रेटीस ह्याचा शिष्य ॲरिस्टिपस (इ. स. पू. सु. ४३५–३५६) हा ह्या पंथाचा संस्थापक. जन्म लिबियामधील (उत्तर आफ्रिका) सायरीनी येथे. तरुण वयात तो अथेन्सला आला आणि लवकरच सॉक्रेटीसच्या निकटवर्तीयांपैकी एक झाला. ⇨ सॉफिस्टांच्या वर्तुळातही त्याचे जाणे-येणे होते. सॉक्रेटीसच्या मृत्यूनंतर सिराक्यूज, आशियामायनर, कॉरिंथ, मेगारा इ. ठिकाणी भ्रमंती करून त्याने तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. त्याच्या आयुष्याच्या अखेरी अखेरीस तो आपल्या जन्मस्थळी (सायरीनी) आला असावा आणि आपल्या सायरीनीइक्स पंथाची स्थापनाही त्याने तेथेच केली असावी. त्याच्या जन्मस्थळाच्या नावावरूनच त्याच्या पंथाला सायरीनीइक्स हे नाव पडले. जीवनाचे अंतिम साध्य काय, ह्याचे निःसंदिग्ध उत्तर सॉक्रेटीसने कधी दिले नाही परंतु असे जे काही साध्य असेल, ते सद्‌गुणांमुळेच प्राप्त होऊ शकते, ही त्याची ठाम धारणा होती. जीवनाच्या अंतिम साध्याबद्दल सॉक्रेटीस मुग्ध राहिल्यामुळे ॲरिस्टिपसने स्वतःच्या विचाराने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि सुख हेच जीवनाचे अंतिम साध्य होय, असे मानले. हे सुखही, त्याच्या मते, शारीरिकच असते. ॲरिस्टिपसची ज्ञानमीमांसा वेदनवादी होती. इंद्रियवेदनांचे आपल्याला जे ज्ञान होते, तेच विश्वसनीय असते ते वेदन ज्या क्षणी होते, त्या क्षणापुरतेच ते ज्ञान असते, असे त्याचे प्रतिपादन होते. सुखद इंद्रियवेदन हेच कृतीचे उद्दिष्ट असले पाहिजे. इंद्रियवेदनांना गती असतात. जेव्हा त्यांची गती वेगवान, तीक्ष्ण असेल, तेव्हा दुःख होईल आणि ती मृदू असेल, तेव्हा सुख वाटेल. सर्व जीव सुखाकडे आकर्षित होत असतात माणसे त्यांच्या बालपणापासूनच सहजप्रेरणेने सुखाकडे ओढली जातात हे सर्व अत्यंत नैसर्गिक असल्यामुळे सुखप्राप्ती हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे. सुख म्हणजे दुःखाचा केवळ अभाव नव्हे तर ते एक सकारात्मक इंद्रियवेदन होय तथापि ॲरिस्टिपसचे असेही म्हणणे होते, की जो माणूस सुखाच्या आधीन होत नाही त्यावर नियंत्रण ठेवतो, तो सुख वर्ज्य मानतो असे नाही तो फक्त वाहवून जात नाही. गलबताचा कप्तान किंवा घोड्याचा मालक त्या वस्तूंचा उपयोग करीत नाही, असे नाही पण तो त्यांना त्याला योग्य वाटेल त्या दिशेने नेत असतो.

ॲरिस्टिपस हा अत्यंत व्यक्तिवादी असल्यामुळे कोणत्याही विशिष्ट राज्याचा नागरिक म्हणवून घेणे, त्याला उचित वाटत नव्हते. आपण सर्वच राज्यांत परके आहोत, असे त्याचे म्हणणे होते. भौतिकी आणि गणित ह्या विषयांचा सुखी जीवनासाठी काही उपयोग नाही, अशी त्याची धारणा होती.

ॲरिस्टिपसच्या नातवाचे (आर्ते ह्या त्याच्या मुलीचा मुलगा) नावही ॲरिस्टिपस असेच होते. आर्तेने त्याला ह्या पंथाची दीक्षा दिली आणि पुढे तो आपल्या आजोबांच्या संप्रदायाचा प्रमुख झाला.

हेगेसिअस, ॲनिकेरिस आणि थिओडोरस ह्या पंथानुयायांनी पुढे ह्या पंथात काही नवीन विचार आणले. या जगात सुखापेक्षा दुःखेच अधिक आहेत, तेव्हा व्यवहारतः सुख हे अप्राप्यच आहे, असे हेगेसिअसचे मत होते. त्यामुळे जीवन लवकरात लवकर संपवणे हितावह असे त्याने प्रतिपादिले. सुखे ही साठवण्यासाठी नसतात आयुष्यात येणारे एकेक सुख आस्वादून घ्यावे, असे ॲनिकेरिसने सांगितले. थिओडोरसने कृतीच्या उद्दिष्टाची पुन्हा एकदा व्याख्या केली आणि सुखाच्या इंद्रियवेदनाऐवजी व्यावहारिक शहाणपणामुळे जो मानसिक आनंद मिळतो, त्यालाच कृतीचे उद्दिष्ट समजावे, असे मत मांडले. व्यावहारिक शहाणपण महत्त्वाचे कारण दुःख हे मूर्खपणामुळे पदरी येते, ही त्याची धारणा होती. सायरीनीइक्स पंथाचे यथावकाश विघटन झाले मात्र सुखवादी तत्त्वज्ञान मांडणारे ⇨ एपिक्यूरस मत अधिक यशस्वी ठरले.

पहा : एपिक्यूरस मत ग्रीक तत्त्वज्ञान सुखवाद.

कुलकर्णी, अ. र.