शंकराचार्य, आद्य : (इ.स. ७८८ – ८२०). प्रस्थानत्रयीचे महान भाष्यकार, केवलाद्वैतवादाचे प्रवर्तक आणि युगकर्ते वेदान्ती. केरळातील अलवाये शहरापासून सु.१० किमी. वर असलेल्या चूर्णा (पूर्णा/अलवाये/पेरियार) नदीच्या काठावरील कलटी (काळादी, काल्टी शिवरहस्यात ससाला) नावाच्या एका खेड्यात कृष्णयजुर्वेदीय तैत्तिरीय शाखेच्या नंपूतिरी (नंबुद्री) ब्राम्हण कुळात जन्म. पित्याचे नाव शिवगुरू (शिवभट्ट), तर माता आर्याम्बा (‘विशिष्टा’/’सती’), केरळात शिवगुरू (शिवाचा पिता) असे नाव फारसे प्रचलित नसल्याने आचार्य हे साक्षात शिवाचा अवतार ही समजूत रूढ झाल्यवर हे नाव प्राप्त झाले असावे. आचार्यांच्या जीवनासंबंधी विश्वासार्ह माहिती देणारे ग्रंथ उपलब्ध नाहीत. शांकरविजय (शंकरविजय किंवा शांकरदिग्विजय) या नावाचे अनेक काव्यप्रकार ग्रंथ आढळतात पण त्यांच्यात ऐतिहासिक विश्वासार्हता, सुसंवाद व चिकित्सक वृत्तीचा अभावच दिसून येतो. उण्यापु-या बत्तीस वर्षांच्या आयुष्यात प्रस्थानत्रयीवर परिपूर्ण भाष्ये, अनेकविध स्तोत्ररचना, भारतभर संचार करून चार दिशांना केलेली मठांची स्थापना यांसारख्या असाधारण कार्यामुळे आचार्य शंकराचा अवतार मानले जाऊ लागले. याचमुळे एखाद्या थोर मानवाचे लौकिक जीवन सांगण्यापेक्षा एक अवतारी पुरुषाचे दैवी चमत्कारच उपलब्ध संबंधित ग्रंथांत प्रामुख्याने आढळतात. आहिताग्नी राजवाडे यांना हे ग्रंथ संन्साशांच्या संघटनेचे संन्यासमार्गाची भलावण करण्यासाठी प्रसृत केलेले ग्रंथ वाटतात.

सर्वमान्य पुराव्यांच्या अभावी आचार्यांची जन्मतिथी, जीवनकाळ, जन्मस्थळ इ. बाबी कमालीच्या विवाद्य ठरल्या आहेत. उपलब्ध शांकरविजय ग्रंथांच्या अभ्यासानंतर शंकराचा काळ या आपल्या इंग्रजीत लिहिलेल्या ग्रंथात (१९१६) मद्रासचे टी.एस. नारायणशास्त्री इ.स.पू. ५०९ हे आचर्यांचे जन्मवर्ष ठरवतात. शंकरविजयकार आनंदगिरी यांच्या मताने आचार्यांच्या जन्म कालटीला नव्हे, तर चिदंबरमला इ.स.पू. ४४ मध्ये झाला व इ.स. १२ मध्ये त्यांचे निर्वाण झाले. डॉ. श्री. द. कुलकर्णी [अद्वितीय कर्मयोगी : श्री आद्य शंकराचार्य(१९९२) या पुस्तकाचे लेखक] व डॉ. अंतरकर (संशोधनप्रबंध, पुणे विद्यापीठ, १९६०) इ.स.पू. ५०९ याच काळाबाबत सहमती दाखवितात. पण एकूणच भारतीय इतिहासाच्या कालनिर्णयाची समग्र आणि समाधानकारक चिकित्सा झाली नसल्याने माक्स म्यूलर  ए.बी. कीथ यांनी आद्य शंकराचार्यांचा जीवनकाल इ.स.७८८ ते ८२० असा निर्धारित केला असून यास सर्वसाधारणपणे मान्यता देण्यात येते. रा. गो. भांडारकर हा काळ थोडा आधीचा म्हणजे इ.स. ६८० वा त्याहूनही पूर्वीचा असावा, असे मानतात.

श्री. कृ. बेलवलकर (बसु मलिक लेक्चर्स ऑन वेदांत, १९२९, पृ. २४०) म्हणतात, त्याप्रमाणे अखेरीस आचार्यांचे ग्रंथ हेच त्यांचे खरे जीवनचरित्र म्हणावयास हवे. एकूण शांकरविजय ग्रंथाची बहुतेक एकवाक्यता पुढील श्लोकात सांगितली जाते:

“अष्टवर्षे चतुर्वेदी, द्वादशे सर्वशास्त्रविद ! 

षोडशे कृतवान भाष्यं, द्वात्रिंशे मुनिरभ्यगात !!” 

अर्थ: आठव्या वर्षी चारही वेदांचे अध्ययन, बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ज्ञान, सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयीवर भाष्य व बत्तिसाव्या वर्षी महाप्रस्थान.

वयाच्या आठव्या वर्षीच बालशंकराच्या मनात संन्यासाचा विचार प्रबळ झाला, पण विधवा आर्याम्बा म्हातारपणाचा एकमेव आधार असलेल्या एकुलत्या एक मुलाला संन्यास घेण्यास अनुमती देईना. यानंतर एक चमत्कार घडला. नदीत स्नानासाठी उतरलेल्या शंकराचा पाय मगरीने पकडला. संन्यासाला अनुमती दिल्यासच मगर पाय सोडेल, असे शंकराने सांगितल्यावर पुत्राच्या जीवनासाठी मातेने अखेर संन्यासाला संमती दिली. संसाराच्या मगरमिठीतून पाय सोडवून घेऊन बालब्रह्मचारी शंकर गुरुशोधार्थ बाहेर पडला तो थेट नर्मदेच्या तीरावर तपश्चर्या करणाऱ्या गौडपादाचार्यांच्या गोविंदभगवत्पाद या शिष्यांच्या पायाशी जाऊन पोहचला. आचार्यांच्या केवलाद्वैत संप्रदायाची परंपरा साक्षात भगवान नारायणांपासून सांगितली जाते. नारायण, ब्रह्मदेव, वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक्र येथपर्यंत ही साक्षात पितापुत्र परंपरा आहे तर शुक्रशिष्य गौडपाद, गोविंदभगवत्पाद, शंकराचार्य व त्यांचे चार शिष्य (पद्यपाद, हस्तमलक, तोटक व वार्त्तिककार सुरेश्वर) ही त्या संप्रदायातील गुरुशिष्यपरंपरा आहे. विख्यात मीमांसक कुमारिल भट्ट यांना त्यांच्या अंतिमक्षणी शंकराचार्यांचे केवळ दर्शनच घडू शकले. कर्ममार्गी मंडनमिश्र यांना वादात जिंकून आचार्यांनी ज्ञानमार्गाकडे वळवले व ह्याच मंडनमिश्रांनी सुरेश्वराचार्य या नावावे नैष्कर्म्यसिद्धीबृहदारण्यकवार्तिक असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले (काही संशोधकांच्या मतानुसार मंडनमिश्र व सुरेश्वराचार्य या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत).

ऋग्वेदापासून प्रारंभ होऊन अथर्ववेदातील ब्रह्मपर सूक्तांच्या द्वारा उपनिषदांत परिपूर्ण रीतीने परिणत झालेल्या ब्रह्मात्मैक्य तत्त्वाचे प्रतिपादन आणि उपनिषद-वाक्यातील आपातत: आढळणा-या विरोधांचा परिहार करून, त्यांच्या तर्कदृष्ट्या समन्वय घालून व सांख्य-योग, न्याय-वैशेषिक, पूर्वमीमांसा अशा आस्तिक व बौद्ध, जैन, लोकायत अशा नास्तिक दर्शनांचे पद्धतशीर खंडन करून केवलाद्वैत तत्त्वज्ञानाची भक्कम पायावर मांडणी करणे, हे आचार्यांचे सर्वात मोठे योगदान आहे. देशभर परिभ्रमण करून आचार्यांनी बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी व शृंगेरी असे चारही दिशांना मठ स्थापन करून व तेथे अधिकारी पीठाधीशांना नेमून आपल्या तत्त्वज्ञानची परंपरा अखंडपणॆ चालू ठेवण्याची व्यवस्था केली. या चार मठांव्यतिरिक्त काशीचा सुमेर मठ तथा कांचीचे कामकोटिपीठ यांचीही त्यांनी स्थापना केली. कांचीच्या कामकोटिपीठाचे ते स्वत: पीठाधीश झाले अशीही एक परंपरा दिसते. कामकोटीचा मठ हा चारही वेदांच्या अध्ययनाला वाहिलेला मठ आहे आणि आचार्यांचे देहावसान येथेच झाले, असेही एक मत हिरिरीने मांडले जाते.

वैदिक संस्कृतीमधून विकसित होत गेलेला व कालानुसार बदलत गेलेलाच धर्म पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला, असे मत सर्वसामान्यपणे मांडले जाते. या धर्मातील विषमताधिष्ठित चातृर्वर्ण्य, हिंसायुक्त यज्ञ, अनेकदेवतावाद या विविध कारणांमुळे जैन, बौद्ध, पांचरात्र, भागवत अशा प्रकारच्या चळवळी निर्माण झाल्या व लोकांचा ओढा या चळवळीकडे वळला. तत्कालीन भारतातील छोटीछोटी राज्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करीत राहिली. एकूण समाजातील सुसंवाद नाहीसा होऊन तो अधिकाधिक विघटित होऊ लागला. त्यांमध्ये सलोखा निर्माण करण्याचे महान कार्य या संन्यस्त अद्वैती यतीने केले. शैव, वैष्णव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि कौमार्य या सहा हिंदू पंथीयांना एकत्रित करण्याचे लोकसंग्राहक महतकार्य यशस्वी रीतीने साधल्यामुळे आचार्यांना षण्मठस्थापकाचार्य म्हटले जाऊ लागले. आदित्य, अंबिका, विष्णू, गणनाथ आणि महेश्वर या तत्कालीन पाच लोकप्रिय देवतांची एकत्र पूजा करण्याचा समन्वयी मार्ग पंचायतन पूजेच्या द्वारा आचार्यांनी दाखवून दिला. हिंदू मनात मंदिरांविषयी असलेली श्रद्धा जाणून आचार्यांनी भारतातील बहुतेक प्रमुख मंदिरांना भेट देऊन तेथील पूजापद्धतीत शुचित्व आणले.


दहा मुख्य उपनिषदे, बादरायणप्रणीत ब्रह्मसूत्रे आणि भगवदगीता या प्रस्थानत्रयीवरील आचार्यांची भाष्ये विस्तृत, तत्त्वविवेचनाच्या दृष्टीने अत्यंत मोलाची व उपलब्ध भाष्यग्रंथांपैकी सर्वात प्राचीन भाष्ये आहेत. प्रत्येक भाष्याची भूमिका आचार्य उपोदघातरूपी प्रस्तावनेने करतात. केवलाद्वैताच्या विरोधी असलेल्या पूर्वपक्षाची मते पूर्णपणाने, प्रामाणिक रीतीने सविस्तर मांडून व त्यांना पूर्ण न्याय देऊन मग अतिशय प्रभावी युक्तिवादांनी ती मते आचार्य खोडून काढतात. खंडनमंडनाचा आदर्श म्हणजे आचार्यकृत भाष्ये. त्यातील शैली प्रसन्न, ओघवती व निर्दोष अशी असून उत्तम संस्कृत गद्याचा नमूना म्हणून ती मान्य झालेली आहेत. श्रुतींचा आधार (श्रृतेस्तु शब्दमूलत्वात-ब्रह्मसूत्र १·१ – २७) घेणे न नेमक्या श्रुती व प्रसंगी स्मृती उदधृत करणे, हा आचार्यांचा विशेष आहे. रामानुज-वल्लभादी नंतरचे भाष्यकार पुराणांचा फार आधार घेतात. आचार्य अधिककरून श्रुती व प्रसंगी स्मृती (महाभारतादी) यांचा वापर करतात. श्रुतीला बाधक न ठरणाऱ्या तर्काचे त्यांना वावडे नाही. (श्रुत्यैव च सहायत्वेन तर्कस्याभ्युपेतत्वात-ब्रह्मसूत्र भाष्य १·१ –२) मात्र शेकडो श्रुती जरी अग्नी अनुष्ण आहे, असे सांगू लागल्या, तर त्यांचे प्रामाण्य स्वीकारता येणार नाही, हे अनुभववादी दृष्टिकोणातून ते सांगतात. त्यांचा दृष्टिकोन प्रागतिक सुधारणावद्याचा आहे. “पूर्वज वेडा होता म्हणून आपणही वेडे असायला पाहिजे असा काही नियम नाही” (ब्रह्मसूत्र भाष्य २·१ – ११) हे ते मार्मिक मिस्कीलतेने सांगतात. ब्रह्माचे ज्ञान व कर्म यांत ते विरोध मानतात. “अहो, ज्ञान म्हणजे तरी काय, मानसिक क्रियाच ना!” त्यांच्या म्हणण्याचा आशय असा, की कर्माचे स्वरूपच असे असते, की ते ज्या आश्रयावर घडते, त्या आश्रयाला बदलणे (विकार), सुधारणे (संस्कार), प्राप्त करणे यांपैकी काहीतरी घडतेच. ब्रह्म हे उत्पाद्य, संस्कार्य, विकार्य, प्राप्य असे नसते. ब्रह्म हे उत्पाद्य नाही ते परिनिष्पन्न असते. गीता निष्काम कर्माचरणाचा उदघोष करते पण आचार्यांच्या मताने गीता ही एक उपनिषद आहे. मोक्ष हेच तिचे ध्येय आहे. ते सर्व कर्म संन्यासपूर्वक ज्ञाननिष्ठनेच प्राप्त होते. निष्काम कर्माचरण व भगवतभक्तीने चित्तशुद्धी प्राप्त होईल. विशुद्ध चित्ताला ज्ञान प्राप्त होईल व ज्ञानानेच केवळ मोक्ष प्राप्त होईल. ब्रह्म हे जगाचे उपादान कारण नव्हे ते विवर्तोपादान आहे. दुधाचे दही व्हावे, त्याप्रमाणे ब्रह्माचे जगत होत नाही. दोरीवर सर्प दिसावा, त्याप्रमाणे माया वा अविद्या यामुळे ब्रह्माचे ठिकाणी जगत भासते.

आचार्यांना त्यांच्या विरोधकांनी जगन्मिथ्यावादी म्हणून हिणवले आहे. ब्रह्मसूत्र २·१ – १६ यावरील आपल्या भाष्यात आचार्यांनी एकदाच स्पष्ट रीतीने सांगून टाकले आहे, की “ज्याप्रमाणे करुणारूप ब्रह्म तिन्ही काळी सत्त्वाशी (अस्तित्वाशी) फारकत घेत नाही, त्याचप्रमाणे कार्यरूप ब्रह्मही तिन्ही काळी अस्तित्वाशी फारकत घेत नाही’’. थोडक्यात ब्रह्म जितके सत्य आहे, तितकेच जगही सत्य आहे.

आचार्यांवर प्रच्छन्न बौद्धत्वाचाही आरोप होतो. अनेकांना असे वाटते की, ब्रह्मसूत्रातील तर्कपादामध्ये आचार्यांनी विज्ञानवादी व शून्यवादी बौद्धांविरूद्ध जे आक्षेप घेतले आहेत, ते तितक्याच प्रमाणात त्यांच्या केवलाद्वैतवादावर घेतले जाऊ शकतील. आचार्य ‘परिनिष्पन्न’ यासारखे बौद्ध परिभाषिक शब्द वापरतात. आचार्यांचे आजेगुरू गौडपादाचार्य हेही बौद्ध विचारांनी, परिभाषेने व विश्लेषणाने प्रभावित झाले होते. बौद्धांनी शब्दप्रामाण्य झुगारण्याचे धैर्य दाखवले. मात्र जनतेची वेदांवरील श्रद्धा ध्यानात घेऊन आचार्यांनी उघडपणे वेदप्रामाण्य न झुगारता वेदांचा आपल्यापरीने सोयीस्कर अर्थ लावला आहे. या वादात फार न शिरता असे म्हटले तरी पुरे आहे, की ‘आनन्दमय अधिकरण’ (ब्र.सू.१·१·१२-१९). भाष्य करताना आचार्यांनी ब्रह्म हे ‘आनंदमय’ नसून साक्षात ‘आनंद’च आहे हे सांगितले. बौद्धांची निर्वाण-कल्पना दु:खमुक्तीची होती, निखळ आनंदाची नव्हती.

आचार्यांच्या तार्किक व तात्त्विक धाष्टर्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गीतोक्त अवतारकल्पनेला आचार्य ‘मायिक’ मानतात. परमेश्वर म्हणजे परब्रह्म असेल, तर ‘सृजाम्यहम’ (भगवदगीता ४·७) व ‘संभवमि युगे युगे’ (भगवतगीता २·२७) म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यू पावतो. अवतार सत्य मानला, तर परब्रह्म जननमरणधर्मी होईल आजात, अमृत राहणार नाही.

प्रस्थानत्रयीवरील भाष्यांखेरीज आचार्यांच्या नावावर सु.चारशे स्फुट ग्रंथ असल्याचे हस्तलिखितांच्या समग्र याद्यांवरून दिसून येते. या प्रश्नाचा ऊहापोह श्री. कृ. बेलवलकर यांनी आपल्या वर उल्लेखिलेल्या ग्रंथात केला आहे. (पृ. २१७ – २२४). आचार्यांचे ग्रंथ मुख्यत्वे भाष्य, स्तोत्र व प्रकरणग्रंथ या तीन प्रकारचे आहेत. भक्तीला आचार्यांनी मुक्तीचे साक्षात साधन मानले नसले, तरी चित्तशुद्धीच्या द्वारा भक्ती ज्ञानाचे कारण ठरू शकते. यासाठी भाविकांना ज्ञानप्राप्तीसाठी भक्तीचा उपयोग होऊ शकेल. याच भावनेने आचार्यांनी शिव, विष्णू, चंडी, सूर्य इ. देवतांना उद्देशून दक्षिणामूर्ती, हरिमीडे, आनन्दलहरी, सौंन्दर्यलहरी इ. स्त्रोत्रे व आत्मबोध, दशश्लोकी इ. तत्त्वपर श्लोकग्रंथ आणि विवेकचूडामणी, उपदेशसाहस्त्री इ. प्रकरणग्रंथ लिहिले असावेत. बाकीचे ग्रंथ उत्तरकालीन शंकराचार्यांचे असण्याचाच संभव अधिक आहे. ज्ञानमार्गी आचार्यांनी ज्ञानाचा अधिकार नसणाऱ्या व्यक्तीसाठी भक्तीयुक्त स्त्रोत्रे रचावीत यास विसंवाद भूमिका, प्रत्यक्ष कार्य व जनमानातील त्या व्यक्तीविषयीचा भाव यांची गल्लत होऊ नये. अवतारधारक ईश्वर न मानणाऱ्या आचार्यांनाच भाविकांनी साक्षात शंकराचा अवतार मानले. कर्मसंन्सासपूर्वक ज्ञाननिष्ठा हे गीतेचे सार सांगणाऱ्या आचार्यांना त्यांच्या प्रत्यक्ष कार्यामुळे भारावलेल्या भक्तांनी ‘अद्वितीय कर्मयोगी’ अशा शब्दांत संबोधिले. एवढे खरे की, पारमार्थिक पातळीवरील आचार्यांचा केवलाद्वैतवाद व्यावहारिक पातळीवर चातुर्वर्ण्याधिष्ठित मानवी विषमतेला दूर करू शकला नाही. पण आचार्यांच्या तत्त्वज्ञानात समतेची व भक्तीचीही बीजे असल्यामुळे विवेकानंदांसारखे वेदांताधिष्ठित समतेचा पुरस्कार करणारे नव्या-वेदान्ती व ज्ञानोत्तर निरपेक्ष भक्तीचा मार्ग दाखवणारे मधुसूधन सरस्वती यांसारखे केवलाद्वैतवादी निर्माण झाले.

संदर्भ : 1. Radhakrishna, S. The Vedanta According to Sankara and Ramanuja, London, 1928.

           २.  अभ्यंकर, वासुदेवशास्त्री, ब्रह्मसूत्र-शांकरभाष्य (मराठी भाष्यांतर), पुणे, १९५७.

           ३. कुलकर्णी, श्री.द. अद्वितीय कर्मयोगी श्री आद्य शंकराचार्य, ठाणे,१९९२.

           ४. जोग, द. वा. संपा. भारतीय दर्शन-संग्रह, पुणे, १९५८.

           ५. महादेवन, टी. एम .पी. शंकराचार्य, अनु. गांगल, का. दि. नवी दिल्ली, १९७२.

धडफळे, मो. गो.