वर्गीकरणपद्धति : आपण विशिष्ट वस्तूंचे वर्गीकरण करतो, म्हणजे विशिष्ट वस्तूंना भिन्न भिन्न वर्गात समाविष्ट करतो. उदा.,  ‘हे झाड आहे आणि तो पक्षी आहे’ असे विधान मी केले, तर पहिली वस्तू ‘झाड’ ह्या वर्गात (किंवा झाडांच्या वर्गात) समाविष्ट आहे आणि दुसरी वस्तू ‘पक्षी’ ह्या वर्गात (किंवा पक्ष्यांच्या वर्गात) समाविष्ट आहे, असे मी म्हणत असतो. एखादी वस्तू एखाद्या वर्गात समाविष्ट आहे किंवा ती वस्तू त्या वर्गात मोडते, हे म्हणण्याचा दुसरा मार्ग  म्हणजे ती वस्तू त्या वर्गाची सदस्य आहे असे म्हणणे. तेव्हा वस्तूंचे वर्गीकरण करणे म्हणजे वस्तू कोणत्या वर्गात समाविष्ट आहेत किंवा मोडतात किंवा कोणत्या वर्गांच्या सदस्य आहेत हे सांगणे किंवा त्यांना त्या वर्गात समाविष्ट करणे.

‘झाड’ किंवा ‘पक्षी’ ही सामान्य नामे आहेत. अशा प्रत्येक सामान्य नामाकडून एक वर्ग निर्धारित होतो असे म्हणता येते. ज्या ज्या वस्तूला उद्देशून ती वस्तू म्हणजे एक झाड आहे असे म्हणणे बरोबर असते, त्या सर्व वस्तूंचा मिळून ‘झाडांचा वर्ग’ बनतो आणि अशी प्रत्येक वस्तू (आणि अशीच वस्तू) झाडांच्या वर्गाची सदस्य असते. सामान्य नामांप्रमाणे विशेषणांपासूनही वर्ग निर्धारित होतात. उदा., ‘तांबडा’ ह्या विशेषणाकडून वस्तूंचा वर्ग निर्धारित होतो. ज्या ज्या वस्तूविषयी ‘ती तांबडी आहे’ असे म्हणणे सत्य असते, अशा सर्व वस्तूंचा मिळून तांबड्या वस्तूंचा वर्ग बनतो आणि अशी प्रत्येक वस्तू तांबड्या वस्तूंच्या वर्गाची सदस्य असते.

ह्यावरून वस्तूंचे वर्णन करणे आणि वस्तूंचे वर्गीकरण करणे ही परस्परसंबंधित अशी कृत्ये आहेत हे स्पष्ट होईल. हा पक्षी आहे, असे ह्या वस्तूचे वर्णन करण्यात त्या वस्तूचे ‘पक्षी’ असे वर्गीकरण अभिप्रेत असते. म्हणजे ती वस्तू पक्ष्यांच्या वर्गात मोडते, असे अभिप्रेत असते.

‘पक्षी’ हा वर्ग आपण घेतला (किंवा पक्ष्यांचा वर्ग घेतला), तर त्याच्यात कोणत्या वस्तू समाविष्ट असतात ? ह्याचे उत्तर असे देता येईल : ज्या वस्तूच्या ठिकाणी काही विशिष्ट गुणधर्म असतात अशी वस्तू एक पक्षी असते असते आणि अशा सर्व वस्तू मिळून पक्ष्यांचा वर्ग बनतो. हे विशिष्ट गुणधर्म अंगी असणे म्हणजेच पक्षी ह्या प्रकारची वस्तू असणे होय. तेव्हा पक्षी हा एक वस्तुप्रकार आहे झाड हा दुसरा वस्तुप्रकार आहे माणूस हा तिसरा वस्तुप्रकार आहे इत्यादी. अशा वस्तुप्रकाराला ‘जाति’ (इंग्रजीत ‘जीनस’) असे म्हणतात. भारतीय न्यायदर्शनात ‘जाति’ हा पारिभाषिक शब्द ज्या अर्थाने वापरतात त्याहून भिन्न अर्थाने ‘जाति’ हा शब्द येथे वापरला आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. येथे ‘जाति’ हा शब्द केवळ एक वस्तुप्रकार ह्या अर्थाने वापरला आहे. आता असा एखादा वस्तुप्रकार घेतला, (एखादी ‘जाति’ घेतली), तर अनेकदा त्याचे काही उपप्रकारांत विभाजन करता येते (उपजातींत विभाजन करता येते). उदा., पक्षी ह्या वस्तुप्रकाराचे किंवा जातीचे कावळा, बगळा, मोर इ. उपप्रकारांत किंवा उपजातींत विभाजन करता येते. त्याचप्रमाणे ‘सरळ रेषांनी बंदिस्त (अशी) आकृती’ ह्या वस्तुप्रकाराचे किंवा जातीचे त्रिकोण, चौकोन, पंचकोन इ. उपप्रकारांत किंवा उपजातींत विभाजन करता येते. अशा उपजातीचेही उप-उपजातींत विभाजन करता येते. उदा., त्रिकोण ह्या उपजातीचे विषमभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण आणि समभुज त्रिकोण अशा उप-उपजातींत विभाजन करता येते. वस्तुप्रकारांचे वा जातींचे उपजातींत, उप-उपजातींत विभाजन करण्याच्या कृतीला तार्किक विभाजन (लॉजिकल डिव्हिजन) असे म्हणतात.

जातींचे तार्किक विभाजन करणे आणि वस्तूंचे वर्गीकरण करणे ह्या परस्परसंबंधित अशा कृती आहेत हे उघड आहे. समजा, आपल्याला ग्रंथालयातील पुस्तकांचे वर्गीकरण करायचे आहे. आपण त्यासाठी पुढील पद्धती स्वीकरू. प्रथम पुस्तकांचे प्रकार किंवा जाती मुक्रर करु. उदा., विज्ञानविषयक पुस्तके, इतिहासविषयक पुस्तके, समाजशास्त्रविषयक पुस्तके, ललित साहित्य इत्यादी इत्यादी. मग ललित साहित्य ह्या पुस्तकप्रकाराचे किंवा जातीचे कादंबरी, नाटक, काव्य इ. उपजातींत विभाजन करू. मग काव्य ह्या उपजातीचे महाकाव्य, खंडकाव्य, भावकाविता इ. उप-उपजातींत विभाजन करू. अशा रीतीने पुस्तकप्रकारांचे, किंवा पुस्तकजातींचे  उप-जातींत, उप-उपजातींत करण्यात येणारे विभाजन जेव्हा पुरे होते तेव्हा तिचे पर्यवसान ज्या शेवटच्या लघुजातीत होते तिला अंत्य-जाती (इन्फिमा स्पीशीज) असे म्हणतात. आता आपल्यापुढे ग्रंथालयातील पुस्तकांचे ढीग आहेत असे समजूया. त्यांचे वर्गीकरण करताना आपण प्रथम एका अंत्यजातीत मोडणारी पुस्तके एकत्र आणू. उदा., सर्व खंडकाव्ये एकत्र आणू सर्व महाकाव्ये एकत्र आणू इत्यादी. मग खंडकाव्यांचा वर्ग, महाकाव्यांचा वर्ग, भावकवितांचा वर्ग इ. हे वर्ग शेजारीशेजारी रचून काव्यांचा वर्ग एकत्र करू. मग काव्यांचा वर्ग, कादंबऱ्यांचा वर्ग, इतिहासविषयक पुस्तकांचा वर्ग इ. वर्ग शेजारीशेजारी राखून एकत्र करू. तेव्हा वर्गीकरण हे विशिष्ट वस्तूंचे असते आणि वर्गीकरणाची प्रक्रिया ही जातिविभाजनाच्या प्रक्रियेच्या उलटी असते. जातिविभाजनाच्या प्रक्रियेत आपण ‘वरून’ सुरुवात करून ‘खाली ’ जातो. सर्वांत व्यापक जातीपासून सुरुवात करून तिचे अधिक संकुचित उपजातींत विभाजन करतो, त्यांचे अधिकच संकुचित उप-उपजातींत जातीत विभाजन करतो इत्यादी. उलट वर्गीकरणात आपण विशिष्ट वस्तूंपासून सुरुवात करून त्यांचे अंत्य-उपजातींत वर्गीकरण करतो मग अशा अंत्य-उपजातींना तुलनेने अधिक व्यापक उपजातीत एकत्र आणतो आणि पायरीपायरीने अखेरीस सर्व विशिष्ट वस्तूंना तुलनेने सर्वांत व्यापक अशा एका वर्गात समाविष्ट करून घेतो.

वस्तूंचे वर्गीकरण आपण कोणत्या तरी उद्देशाने करतो. अनेकदा हा उद्देश व्यावाहारिक असतो. ग्रंथालयातील पुस्तकांचे त्यांच्या विषयांप्रमाणे आपण वर्गीकरण करतो, कारण कोणतेही पुस्तक कोणत्या विषयीचे आहे हे माहीत असले, की ते कोणत्या उपवर्गात किंवा उप-उपवर्गात आहे हे कळते आणि पुस्तके वर्गवारीने लावलेली असली, तर ते थोड्या वेळात शोधून काढता येते. ही व्यावहारिक सोय आहे. पण समजा, एखाद्या माणसाला जुनी पुस्तके जमविण्याचा छंद आहे. मग तो त्यांचे वर्गीकरण विषयवारीने न करता ज्या शतकांत आणि ह्या शतकांच्या ज्या दशकांत ती प्रसिद्ध झाली असतील त्यांना अनुसरून करील. उदा., सोळाव्या शतकाच्या दशकात प्रसिद्ध झालेली जी पुस्तके असतील, मग ती कोणत्याही विषयाची असोत, त्यांचा एक  उपवर्ग होईल.

पण विज्ञानात वस्तूंचे जे वर्गीकरण होते-उदा., वनस्पतिशास्त्रात, प्राणिशास्त्रात, रसायनशास्त्रात इ. ते औपपत्तिक दृष्टीने करण्यात आलेले असते, व्यावहारिक सोयीच्या दृष्टीने नव्हे. ज्या विशिष्ट वस्तूंमध्ये महत्त्वाच्या गुणधर्माच्या बाबतीत खूप साम्य असते, त्या वस्तूंना विज्ञानात एकत्र आणून त्यांचा एक वर्ग कल्पिलेला असतो. महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे जे गुणर्धम इतर अनेक गुणधर्मांशी कार्यकारणसंबंधाने निगडित झालेले असतात, असे गुणधर्म. उदा., वटवाघूळ उडते म्हणून उडणाऱ्या प्राण्यांत किंवा पक्ष्यांत त्याचे वर्गीकरण करता येईल आणि देवमासा पाण्यात असतो म्हणून जलचर प्राण्यांत किंवा माशांत त्याचे वर्गीकरण करता येईल. पण प्राणिशास्त्रात वटवाघूळ आणि देवमासा ह्यांचे सस्तन प्राणी (मॅमल) ह्या वर्गात वर्गीकरण करण्यात येते. कारण त्यांच्यात रक्त उष्ण असते, अपत्याला जन्म देणे आणि त्याला पाजणे हे गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म ह्या प्राण्यांच्या इतर अनेक गुणधर्मांशी संबंधित असतात. वेगवेगळ्या विज्ञानांत वस्तूंचे जे वर्गीकरण होते, ते त्या त्या विज्ञानात स्वीकरण्यात आलेल्या उपपत्तींशी (थिअरी) संबंधित असते आणि त्यांच्यावर आधारलेले असते.

संदर्भ : 1. Copi. Irving M. Introduction to Logic, London, 1963.

            २. वाडेकर, दे. द. हरोलीकर, ल. ब. तर्कशास्त्राची मूलतत्त्वे : भाग २विगमन, पुणे, १९५६.

रेगे, मे. पुं.