तार्किक प्रत्यक्षार्थवाद : तत्त्वज्ञानातील ही विचारप्रणाली ‘तार्किक अनुभववाद’ ह्या नावानेही ओळखली जाते. १९२२ मध्ये संघटित झालेल्या ‘व्हिएन्ना मंडळ’ (व्हिएन्ना सर्कल) ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या तत्त्ववेत्त्यांनी तिचा आपली अधिकृत विचारसरणी म्हणून स्वीकार केला आणि तिचा पद्धतशीरपणे प्रसार करायला सुरुवात केली. मॉरिझ श्लिक हे व्हिएन्ना विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक ह्या मंडळाच्या केंद्रस्थानी होते आणि ओटो नॉइराट, फ्रीड्रिख व्हाइसमान, फेलिक्स काउफमान, हर्बर्ट फायग्‌ल, फीलिप फ्रांक, कार्ल मेंगर, कुर्ट गोडेल आणि हान्स हान हे त्याचे प्रमुख सभासद होते. रूडॉल्फ कारनॅप हे १९२६ पासून मंडळात सामील झाले आणि तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या विकासात आणि प्रसारात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला. लूडविग व्हिट्‌गेनश्टाइन आणि कार्ल पॉपर हे तत्त्ववेत्ते जरी मंडळाचे सभासद नसले, तरी चर्चेत अनेकदा भाग घेत. व्हिट्‌गेनश्टाइन ह्यांचे ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिकस (१९२२, म. शी. तर्कतत्त्वज्ञानविषयक प्रबंध) ह्या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव व्हिएन्ना मंडळाच्या विचारसरणीवर पडला होता.

व्हिएन्ना मंडळाचे प्रवर्तिक केलेल्या तार्किक प्रत्यक्षार्थवादाला काहीसे चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आणि यूरोप–अमेरिकेतील अनेक महत्त्वाचे तत्त्ववेत्ते तिचे अनुयायी बनले किंवा तिच्याकडे आकर्षित झाले. अमेरिकेतील सी. डब्ल्यू. मॉरिस, अर्न्स्ट नागेल, डब्ल्यू. व्ही. क्वाईन, इंग्लंडमधील एल्. एस्. स्टेबिंग, जॉन विजडम, गिल्बर्ट राईल आणि विशेषतः ⇨ ए.जे. एअर व स्कॅंडिनेव्हियातील आर्ने नेस ह्या तत्त्ववेत्त्यांवर तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा मोठा प्रभाव पडला होता. १९३० नंतर व्हिएन्ना मंडळाचे विघटन झाले. अनेक सभासदांनी परदेशात स्थलांतर केले, मॉरिझ श्लिकचा १९३६ मध्ये एका वेडसर विद्यार्थ्याने खून केला आणि नाझी आक्रमणानंतर इतर सभासदही अनेक देशांत पांगले. एक चळवळ म्हणून १९४० च्या सुमारास तार्किक प्रत्यक्षार्थवाद संपुष्टात आला आणि त्याचे आजघडीच्या अनुभववादी तत्त्वज्ञानात विसर्जन झाले.

तार्किक प्रत्यक्षार्थवादामागची प्रेरणा त्याला मुख्यतः ब्रिटिश अनुभववादाकडून आणि ⇨ एर्न्स्ट माख ह्यांच्या विज्ञानवादी, तत्त्वमीमांसाविरोधी तत्त्वज्ञानाकडून लाभली होती ‘पण पारंपारिक’ ब्रिटिश अनुभववादाने आणि माख ह्यांनाही तर्कशास्त्र व गणित ह्या आकारित शास्त्रांना योग्य ते महत्त्व दिले नव्हते. आपल्या अनुभवांचे वर्णन करणे हेच आपल्या नेहमीच्या व्यवहारातील आणि विज्ञानातील विधानांचे एकमेव कार्य असते, ह्याच्यातच त्यांचा अर्थ सामावलेला असतो, हा अनुभववादी सिद्धांत स्वीकारून त्याबरोबरच अनुभवांचे असे वर्णन करण्याच्या व्यवहारात तर्कशास्त्र आणि गणित जे महत्त्वाचे कार्य पार पाडते त्याची योग्य दखल घ्यावी, ह्या आकारित शास्त्रांचा अनुभववादाशी सुसंगत ठरेल असा उलगडा करावा, अशी तार्किक प्रत्यक्षार्थवादाची आकांक्षा होती. ह्या प्रयत्नांत ⇨ बर्ट्रंड रसेल ह्यांच्या नवीन तर्कशास्त्राचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी खूप आधार घेतला.

तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा मूलभूत दृष्टिकोन असा होता, की अनुभवाधिष्ठित विज्ञाने आणि तर्कशास्त्र व गणित ह्यांच्यामध्ये सर्व ज्ञान सामावलेले आहे. पारंपारिक तत्त्वमीमांसेत अनुभवातीत अशा वास्तवतेचे वा पदार्थांचे ज्ञान प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पण हा प्रयत्न फोल असतो. अशा स्वरूपाचे ज्ञान नसते. हा सिद्धांत अर्थात सर्वच अनुभववाद्यांनी स्वीकारलेला असतो. पण तार्किक प्रत्यक्षार्थवादाचे वैशिष्ट्य असे, की  अनुभवातीत पदार्थांविषयी केलेली विधाने भ्रामक, निराधार व म्हणून त्याज्य असतात असे ते मानीत नाहीत, तर अशी विधाने अर्थशून्य असतात, ती खरीखुरी विधानेच नसतात तर कृतक–विधाने असतात, असा सिद्धांत ते मांडतात. विधाने अर्थपूर्ण कधी असतात ह्याविषयी स्वीकारलेल्या एका निकषाच्या आधारे ह्या सिद्धांताचे ते समर्थन करतात. हा निकष ‘प्रचीतिक्षमतेचे तत्त्व’(प्रिन्सिपल ऑफ व्हेरिफायेबिलिटी) म्हणून प्रसिद्ध आहे. हा निकष असाः कोणतेही विधान जर विश्लेषक असेल किंवा प्रचीतिक्षम असेल, म्हणजे अनुभवांच्या निरीक्षणांच्या आधारे ते सत्य आहे किंवा असत्य आहे असे ठरविता येत असेल तर आणि तरच ते अर्थपूर्ण असते, नाहीतर ते अर्थशून्य असते. आता अनुभवातीत अशा पदार्थांविषयी म्हणून केलेले विधान–उदा., ‘ब्रम्ह आनंदमय आहे’–हे सत्य आहे किंवा असत्य आहे असे निरीक्षणांच्या आधारे ठरविता येणारच नाही हे उघड आहे. तेव्हा असे विधान जर विश्लेषक नसले, तर ते अर्थशून्य असणार. ‘विश्लेषक विधान’ ह्याचा अर्थ असा स्पष्ट करता येईल : एखादे विधान, ज्या वाक्याने ते व्यक्त करण्यात आले असते त्या वाक्यातील शब्दांच्या केवळ अर्थांमुळे सत्य ठरत असेल, तर विश्लेषक असते. उदा., ‘शाकाहारी माणूस मांस भक्षण करीत नाही.’ आता गणितातील ‘७ + ५ = १२’ ह्यासारखी विधाने विश्लेषक असतात म्हणजे ‘७’, ‘+’, ‘५’, ‘=’ आणि ‘१२’ ह्यांसारख्या चिन्हांच्या अर्थांमुळेच ती सत्य ठरतात, असे तार्किक प्रत्यक्षार्थवादी दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. तसेच तर्कशास्त्रातील विधाने–उदा., ‘ख हा वर्ग ग ह्या वर्गात सामावलेला असेल आणि क हा ख चा घटक असेल, तर क हा ग चा घटक असतो’ – त्यांतील ‘वर्ग’, ‘सामावणे’, ‘घटक असणे’, ‘जर–तर’ इ. शब्दप्रयोगांच्या अर्थांमुळेच सत्य ठरतात, असाही त्यांचा दावा आहे. तर्कशास्त्र आणि गणित ह्यांमधील विधाने विश्लेषक असतात हे सिद्ध करायला गोटलोप फ्रेग आणि रसेल ह्यांच्या नवीन तर्कशास्त्राचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी आधार घेतला. तेव्हा तर्कशास्त्र आणि गणित ह्यांमधील विधाने विश्लेषक असल्यामुळे अर्थपूर्ण ठरतात. आता ‘ब्रम्ह आनंदमय आहे’ ह्यांसारखे इंद्रियातीत पदार्थांविषयीचे विधान प्रचीतिक्षम नसल्यामुळे, जर ते विश्लेषक असले तरच अर्थपूर्ण ठरेल. पण ‘ब्रम्ह आनंदमय असते’ हे विधान विश्लेषक आहे असे मानले, तर ते ‘ब्रम्ह’ ह्या संकल्पनेची केवळ व्याख्या करते असे मानावे लागेल मग ‘ब्रम्ह’ ह्या पदार्थांचे वर्णन करणारे विधान आहे असे त्याचे स्वरूप राहणार नाही, उलट ब्रम्ह ह्या पदार्थाचे वर्णन करणारे ते विधान असे मानले, तर ते विश्लेषक उरणार नाही आणि प्रचीतिक्षम नसल्यामुळे अर्थशून्य ठरेल. सारांश पारंपारिक तत्त्वमीमांसेतील इंद्रियातीत पदार्थांचे वर्णन करणारी विधाने विश्लेषक नसतात आणि प्रचीतिक्षम नसतात व म्हणून अर्थशून्य असतात.


नीतिशास्त्रातील आणि सौंदर्यशास्त्रातील विधानेही प्रचीतीक्षम नसतात. ‘हे फूल तांबडे आहे’ हे विधान जसे प्रचीतिक्षम आहे, तसे ‘चोरी करणे वाईट असते’ किंवा ‘हा पुतळा सुंदर आहे’ हे विधान प्रचीतिक्षम नाही. ‘तांबडा’ ह्याने जसा एक इंद्रियगम्य गुण व्यक्त होतो, तसा ‘वाईट’ किंवा ‘सुंदर’ ह्याने होत नाही. पण ‘चोरी करणे वाईट’ असे कुणी म्हटले, तर त्याने अर्थशून्य वाक्य उच्चारले आहे असे आपण म्हणणार नाही. तेव्हा तार्किक प्रत्यक्षार्थवादी शब्दप्रयोगांच्या अर्थांमध्ये वर्णनपर अर्थ आणि भावनिक अर्थ असा भेद करतात. ‘तांबडा’ ‘लवचिक’ इ. शब्दांचे अर्थ वर्णनपर असतात. वस्तूंचे वर्णन करण्यासाठी ते वापरण्यात येतात. पण ‘वाईट’, ‘चांगले’, ‘सुंदर’ इ. शब्दांचे अर्थ भावनिक असतात, म्हणजे हे शब्द वापरणारा वस्तूंविषयीच्या वा कृत्यांविषयीच्या आपल्या अनुकूल किंवा प्रतिकूल भावना उत्तेजित करण्यासाठी ते वापरीत असतो. नैतिक किंवा सौंदर्यविषयक वाक्ये वस्तूंचे वर्णन करण्यासाठी करीत नाहीत व म्हणून सत्य किंवा असत्य विधाने व्यक्त करीत नाहीत. पण ह्या वाक्यांना भावनिक अर्थ असतो व म्हणून ती अर्थपूर्ण असतात.

तत्त्वमीमांसक केवळ ब्रम्ह, केवलसत्ता अशा इंद्रियातील पदार्थांविषयीच विधाने करतात असे नाही, ते आपल्या अनुभवाचे विषय असलेल्या पदार्थांच्या तार्किक स्वरूपाविषयी आणि तार्किक घडणीविषयीही बोलतात. उदा., फूल ही एक वस्तू आहे तर तांबडेपणा हा एक गुण किंवा धर्म आहे, अशी विधाने ते करतात. आता ‘हे फूल तांबडे आहे’ हे विधान आवश्यक ते निरीक्षण करून सत्य आहे की असत्य आहे हे जसे ठरविता येते, तसे ‘तांबडेपणा हा एक गुण आहे’ ह्या विधानाच्या बाबतीत करता येत नाही. तेव्हा ‘तांबडेपणा हा एक गुण आहे’ ह्यासारखी पदार्थांचे तार्किक स्वरूप वर्णन करू पाहणारी विधाने प्रचीतिक्षम नसल्यामुळे अर्थशून्य ठरतात. ह्यावर कारनॅप ह्यांनी काढलेला तोडगा असा : वस्तूंचे वर्णन करण्यासाठी जे शब्द, शब्दप्रयोग आपण वापरतो त्यांची मिळून वस्तुभाषा बनते. उदा., ‘फूल’ ‘तांबडे’ हे शब्द वस्तुभाषेतील शब्द होत. आता वस्तुभाषेतील शब्दक वाक्ये यांच्याविषयी विधाने करण्यासाठी आपल्याला एक वेगळी भाषा लागते. ही भाषा म्हणजे अधिभाषा होय. अधिभाषेतील वाक्यांच्या द्वारा वस्तुभाषेतील शब्दप्रयोगांचे आपण वर्णन करतो. उदा., “ ‘तांबडे’ हा शब्द एक विशेषण आहे” हे अधिभाषेतील एक वाक्य आहे आणि ते ‘तांबडे’ हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे हे सांगते. आता कारनॅप ह्यांचे म्हणणे असे आहे, की ‘तांबडेपणा हा एक गुण आहे’ हे गैरसमज निर्माण करणारे वाक्य आहे. कारण अशा वाक्यांमुळे जगात तांबडी फुले ह्यासारखे पदार्थ जसे आहेत, तसे द्रव्य, धर्म, प्रक्रिया इ. पदार्थही आहेत अशी समजूत होते. पण द्रव्य इ. पदार्थ कृतकपदार्थ आहेत. वस्तुतः अशी विधाने वस्तुभाषेतील शब्दांविषयीची विधाने असतात आणि हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत आणि त्यांच्यापासून बनविलेल्या वाक्यांत त्यांचे परस्परांशी कोणते संबंध असतात, हे ही विधाने सांगतात. उदा., ‘तांबडेपणा हा एक गुण आहे’ हे एका कृतकपदार्थाविषयी असल्यासारख्या वाटणाऱ्या वाक्याऐवजी ‘तांबडे’ हा शब्द एक विशेषण आहे हे वाक्य आपण योजिले पाहिजे. कृतकपदार्थांविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याला कारनॅप विषयवाचक वाक्‌प्रकार म्हणतात. जेव्हा वस्तुभाषेतील शब्दांविषयी आपण बोलतो तेव्हा त्याला कारनॅप आकारवाचक वाक्‌प्रकार म्हणतात. विषयवाचक वाक्‌प्रचाराऐवजी आकारवाचक वाक्‌प्रकारांचा उपयोग केल्याने आपण जी विधाने करीत असतो, त्यांचे तार्किक स्वरूप स्पष्ट होते. आकारवाचक वाक्‌प्रकारातील वाक्ये शब्दांचे प्रकार, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध ह्यांचे वर्णन करीत असल्यामुळे ती केवळ विन्यासात्मक (सिन्टॅक्टिकल) असतात. भाषेची विन्यासात्मक घडण स्पष्ट करणे, हे तत्त्वज्ञानाचे एक प्रमुख कार्य होय.

तार्किक प्रत्यक्षार्थवादाचा मूलभूत सिद्धांत असलेल्या प्रचितिक्षमतेच्या तत्त्वाविषयी अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले. त्यांपैकी काही असे : हा सिद्धांत हेही एक विधान आहे आणि हे विधान जर अर्थपूर्ण असायचे असेल, ह्या सिद्धांताप्रमाणे पाहता ते प्रचीतिक्षम तरी असले पाहिजे किंवा ते विश्लेषक असले पाहिजे, म्हणजे ती एक व्याख्या असली पाहिजे. आता ते प्रचीतिक्षम असणे शक्य नाही. कारण अमुक प्रकारच्या विधानांनाच अर्थ असतो, ही गोष्ट काही निरीक्षणाने सिद्ध करता येणार नाही. तेव्हा ती एक व्याख्या असली पाहिजे. पण ही व्याख्या, म्हणजे ‘अर्थपूर्ण विधान’ ह्या शब्दप्रयोगाचा तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांनी लावलेला अर्थ इतरांनी का स्वीकारावा? जो तत्त्वमीमांसक ही व्याख्या स्वीकारणार नाही त्याच्या तत्त्वमीमांसेचे खंडन, त्याला पटेल अशा रीतीने, करताच येणार नाही.

निरीक्षणांच्या आधारे ज्या विधानाची सत्यता ठरविता येते ते विधान प्रचीतिक्षम असते अशी जर ‘प्रचीतिक्षम’ ह्याची व्याख्या केली, तर ‘सर्व माणसे मर्त्य आहेत’ अशी सर्ववाची विधाने प्रचीतिक्षम ठरणार नाहीत. कारण अशी विधाने सत्य आहेत हे ठरविण्यासाठी अमर्यादित निरीक्षणे आवश्यक असतात आणि प्रचीतिक्षम नसल्याने ती अर्थशून्य ठरतील. तसेच विज्ञानातही विद्युत् लहरी, इलेक्ट्रॉन इ. ज्यांचे साक्षात निरीक्षण करता येत नाही, अशा पदार्थांचे अस्तित्व आपण मानतो. त्यांचे वर्णन करणारी विधाने प्रचीतिक्षम नसल्यामुळे ह्या निकषाप्रमाणे अर्थशून्य ठरतील. ह्या कारणांसाठी हा निकष सौम्य करावा लागला. अनुभवांच्या आधारे ज्यांची सत्यता प्रस्थापित करता येते ती विधाने प्रचीतिक्षम असतात असे न मानता, अनुभवांच्या आधारे ज्यांना पुष्टी किंवा पाठिंबा देता येतो अशी विधाने प्रचीतिक्षम असतात, ह्या स्वरूपात हा निकष स्वीकारावा लागला. पण प्रचीतिक्षमतेचा निकष त्याच्या कठोर स्वरूपात स्वीकारला, तर विज्ञानातील आणि व्यवहारातील सर्ववाची विधाने अर्थशून्य ठरतात, उलट अशा सौम्य स्वरूपात स्वीकारला, तर तत्त्वमीमांसक विधानेही प्रचीतिक्षम व म्हणूम अर्थपूर्ण ठरतात, अशी शृगांपत्ती उभी राहते.


आणखी एक महत्त्वाची अडचण अशी, की विधानाची प्रचीती ज्या अनुभवांद्वारे आपण घेतो, ते अनुभव खाजगी असतात पण बाह्य वस्तूविषयी जी विधाने आपण करतो ती सार्वजनिक असतात. ज्या वस्तूंचे वर्णन मी ‘तांबडी वस्तू’ असे करतो ती मला जशी साक्षात दिसते तशीच ती इतरांना दिसते की नाही, हे मी कधीच पडताळून पाहू शकत नाही. ह्या अर्थाने आपले सर्व अनुभव खाजगी असतात. उलट भौतिक वस्तूंविषयी आपण जी विधाने करतो त्यांचा आशय सर्वांसाठी एकच असतो, असे आपण मानतो आणि ती सत्य असली, तर सर्वांसाठी सत्य असतात असेही मानतो. ह्या अर्थाने भौतिक वस्तूंविषयीची विधाने सार्वजनिक असतात. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की खाजगी अनुभव अशा सार्वजनिक वस्तुनिष्ठ विधानांना पुष्टी कशी देऊ शकतील? ह्याचे श्लिक ह्यांनी सुचविलेले उत्तर असे की भिन्न व्यक्तींना जे साक्षात प्रतीत होते त्याचे आशय भिन्न भिन्न असले, तरी ह्या सर्वांची घडण एकच असते आणि विज्ञानातील सार्वजनिक विधाने अनुभवांच्या आशयाविषयी नसतात, तर घडणीविषयी असतात व म्हणून सर्वांना समान असतात. हा फारसा समाधानकारक मार्ग नाही. ओटो नॉइराट ह्यांनी स्वीकारलेला दुसरा पर्याय असा, की अनुभव विधानांना पुष्टी देतात ही भूमिकाच सोडून द्यायची. अनुभव विधानांना पुष्टी देतात, त्यांची सत्यता किंवा असत्यता प्रस्थापित करतात किंवा संभाव्य ठरवितात, असे नसून एक विधान दुसऱ्या विधानाला पुष्टी देते किंवा विरोध करते. पण ह्याचा अर्थ असा होतो, की काही मूलभूत विधाने आपल्याला स्वीकारावी लागतात आणि ही विधाने खाजगी अनुभवांविषयी असता कामा नयेत, ती सार्वजनिक, भौतिक वस्तुंविषयी असली पाहिजेत. अशा मूलभूत विधानांची सुसंगत व्यवस्था म्हणजे विज्ञान आणि तिच्याशी जे विधान विसंगत असेल ते असत्य. मूलभूत विधाने केवळ भौतिक वस्तूंविषयी असतात, ह्या सिद्धांताला भौतिकतावाद म्हणतात. उदा., ‘मेघश्याम रेगे ह्याने असे निवेदन केले, की सकाळी ९ वाजता त्याने पाहिलेल्या झुडुपावर एक लाल फूल होते.’ आता हे विधान पूर्णपणे सार्वजनिक आहे ह्यात शंका नाही. पण हे मूलभूत विधान आहे ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत आहे, की ते सत्य आहे की असत्य आहे, हा प्रश्नच उपस्थित करता येत नाही किंवा मेघश्याम रेगेला एक फूल दिसले ह्या अनुभवावर हे विधान आधारलेले आहे, असेही म्हणता येत नाही. ही सर्वच भूमिका विचित्र व कृत्रिम आहे यात शंका नाही.

अधिभाषेच्या साहाय्याने वस्तुभाषेची तार्किक घडण स्पष्ट करण्याच्या कारनॅप ह्यांच्या कार्यक्रमात अशाच अडचणी आल्या. शब्दांच्या अर्थाविषयी बोलणे, उदा., ‘तांबडे’ ह्या शब्दाने एक गुण व्यक्त होतो असे म्हणणे अर्थशून्य असते आणि म्हणून अधिभाषेतील वाक्यांनी वस्तुभाषेतील शब्दांच्या अर्थांचा निर्देश करता कामा नये, तर केवळ ह्या शब्दांचे तार्किक किंवा आकारिक प्रकार, त्यांचे परस्परांशी असलेले आकारिक संबंध ह्यांचे वर्णन ह्या वाक्यांनी केले पाहिजे, अशी कारनॅप ह्यांची सुरुवातीची भूमिका होती. म्हणजे थोडक्यात अधिभाषेतील वाक्ये चिन्हविन्यासात्मक असली पाहिजेत, असे त्यांचे मत होते. पण वस्तुभाषा आपण वस्तूंचे वर्णन करण्यासाठी वापरतो आणि वाक्याने वस्तुचे जसे वर्णन केले जाते तसेच तिचे स्वरूप असले तर आणि तरच ते वाक्य सत्य ठरते हे ध्यानी घेतले, की वस्तूभाषेतील वाक्यांविषयी बोलताना त्यांच्या सत्यतेविषयी आणि म्हणून त्यांच्या अर्थांविषयी बोलणे अटळ ठरते. तेव्हा तत्त्वज्ञानात भाषेची केवळ चिन्हाविन्यासात्मक घडण स्पष्ट करून भागणार नाही, तिची चिन्हार्थक (सेमॅंटिक) घडणही स्पष्ट केली पाहिजे, ह्या भूमिकेपर्यंत कारनॅप आले.

सारांश, तार्किक प्रत्यक्षार्थवादाने स्वीकारलेल्या सुरुवातीच्या कडव्या भूमिकेमुळे ज्या अडचणी त्याच्यापुढे आल्या त्यांचे निरसन करता करता त्याची भूमिका पालटत गेली, काहीशी उदार होत गेली व आधुनिक तर्कशास्त्राने पुरविलेल्या तंत्रांचा वापर करून तात्त्विक समस्यांचे विश्लेषण करणाऱ्या, भाषेच्या तार्किक घडणीकडे सूक्ष्म लक्ष देणाऱ्या अनुभववादी तत्त्वज्ञानात ही चळवळ विलीन पावली.

संदर्भ : 1. Ayer, A. J. Language, Truth and Logic, London, 1946.

   2. Ayer, A. J. Ed. Logical Positivism, Glencoe, Illinois, 1960.

   3. Carnap. Rudolf, Logical Syntax of Language, London, 1937.

   4. Weinberg, J. R. An Examination of Logical Positivism, New York, 1936.

रेगे, मे. पुं.