प्रस्थानत्रयी : वेदान्ताचे मुख्य तीन ग्रंथ म्हणजे उपनिषदे, भगवद्‌गीता आणि बादरायणाची ⇨ ब्रह्मसूत्रे. या तीन ग्रंथांना मिळून ‘प्रस्थानत्रयी’ म्हणतात. प्रस्थान म्हणजे मार्ग. ब्रह्मविद्या किंवा अध्यात्मविद्या प्राप्त करून घेण्याचे हे तीन ग्रंथ म्हणजे तीन मार्ग होत. उपनिषदे म्हणजे श्रुतिप्रस्थान, भगवद्‌गीता म्हणजे स्मृतिप्रस्थान आणि ब्रह्मसूत्रे म्हणजे न्यायप्रस्थान होय. ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य व बृहदारण्यक ही दशोपनिषदे व त्याचप्रमाणे कौषीतकी, श्वेताश्वतरजाबाल ही उपनिषदे सर्वांत प्राचीन उपनिषदे म्हणून ऐतिहासिकांनी मानलेली आहेत. वरील उपनिषदांमधील मांडूक्य आणि जाबाल ही अलीकडची उपनिषदे होत, असे म्हणता येते. विशेषतः प्राचीन उपनिषदांच्या व गीतेच्या आधारे ब्रह्मसूत्रे रचली आहेत, असे ब्रह्मसूत्रांची समीक्षा केली असताना लक्षात येते. आज उपलब्ध नसलेली काही प्राचीन उपनिषदे बह्मसूत्रकारांच्या पुढे असावीत, असे शक्य आहे. त्याचप्रमाणे उपनिषदपूर्व आरण्यकांचाही संदर्भ ब्रह्मसूत्रांच्या पुढे आहे. क्वचित अन्य स्मृतींचा अपवाद सोडल्यास स्मृती म्हणून भगवद्‌गीतेचा विशेषेकरून आधार ब्रह्मसूत्रांनी घेतला आहे. उपनिषदांमध्ये सृष्टीच्या आदितत्त्वांबद्दल निरनिराळ्या उपपत्ती सापडतात, त्याचप्रमाणे मूलतत्त्वांबद्दल व साधनमार्गाबद्दल मतभेदही आढळतात. हीच गोष्ट भगवद्‌गीतेला तत्त्वज्ञान व साधनमार्गाच्या बाबतीत विशेष लागू पडते. म्हणून श्रुती व स्मृती यांच्यामधील विरोधपरिहार करून व साधनमार्गातील मतभेद काढून टाकून समन्वय व अविरोध स्थापन करणाऱ्या युक्तिवादाचे नियम व न्याय ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितले आहेत म्हणून त्याला न्यायप्रस्थान म्हणतात. [⟶ आरण्यके व उपनिषदे].

शंकराचार्य यांनी केवलाद्वैतपर, भास्कराचार्यांनी द्वैताद्वैतपर, रामानुजाचार्यांनी वैष्णव विशिष्टाद्वैतपर, नीलकंठ शिवाचार्यांनी शैव विशिष्टाद्वैतपर, मध्वाचार्यांनी वैष्णव द्वैतपर, ⇨निंबार्काचार्यांनी व श्रीनिवासाचार्यांनी वैष्णव द्वैताद्वैतपर, वल्लभाचार्यांनी वैष्णव शुद्धाद्वैतपर, ⇨ चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी बलदेवाचार्यांनी अचिंत्यभेदाभेदपर व श्रीकरांनी षट्स्थल-भेदाभेदपर अशी भाष्ये ब्रह्मसूत्रांवर लिहिली आहेत. ⇨ शंकराचार्य व ⇨ मध्वाचार्य यांनी प्रस्थानत्रयीवर भाष्ये लिहिली आहेत. ⇨ रामानुजाचार्यांचे भगवद्‌गीतेवरील भाष्य उपलब्ध आहे. ⇨ वल्लभाचार्य यांच्या अनुयायांनी ब्रह्मसूत्रे सोडून उपनिषदे व भगवद्‌गीता यांच्यावर आपल्या टीका लिहिल्या आहेत. वरील आचार्यांशिवाय अन्य पंडितांनीही प्रस्थानत्रयीवर टीका लिहिलेल्या आढळतात. भगवद्‌गीतेवर शेकडो टीका उपलब्ध आहेत.

शंकराचार्यांपूर्वी झालेल्या उपवर्ष, बौधायन इ. आचार्यांनी ब्रह्मसूत्रभाष्ये लिहिली असावीत, असे शंकराचार्य आणि रामानुजाचार्य यांच्या ग्रंथांतील उल्लेखांवरून अनुमान करता येते परंतु ती शंकराचार्यांच्या पूर्वीची भाष्ये आज उपलब्ध नाहीत. उपनिषदे आणि भगवद्‌गीता यांच्यावरही अनेक आचार्यांची भाष्ये झालेली होती व त्यांच्या विचारांचा खंडन-मंडनात्मक परामर्श शंकराचार्यांनी आपल्या उपनिषदांवरील आणि भगवद्‌गीतेवरील भाष्यांत घेतला आहे परंतु ती पूर्वीची भाष्ये आज उपलब्ध नाहीत.

जोशी , लक्ष्मणशास्त्री