निरपेक्ष आदेश : (कॅटिगॉरिकल इंपेरेटिव्ह). इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) या जर्मन तत्त्वचिंतकाच्या ‘निरपेक्ष आदेश’ या नैतिक सिद्धांताची मांडणी पुढीलप्रमाणे करता येईल : जिला विनाअट, निःसंदेहपणे, निरुपाधिकपणे सत् अथवा चांगले म्हणता येईल अशी सत्‌संकल्पना ही एकच गोष्ट जगात आहे. बुद्धिमत्ता, शक्ती, संपत्ती, कीर्ती, रूप, यौवन अशा इतर गोष्टींनाही चांगले म्हणता येईल. पण त्यांचा चांगुलपणा सोपाधिक असतो, त्याला ‘जर-तर’ ची मुरड असते. बुद्धीमत्ता चांगली खरी पण तिचा उपयोग केला तर. शक्ती चांगली पण दुर्बळांना छळण्यासाठी ती वापरली नाही तर. पण सत्‌संकल्पांचा चांगुलपणा अशा प्रकारच्या कोणत्याही उपाधीवर अवलंबून नसतो. सत्‌संकल्प हा एखाद्या रूपतारुण्यवती स्त्रीच्या ठिकाणी आढळला अथवा जराजर्जर हिडिंबेच्या ठिकाणी प्रतीत झाला, तरी स्वयंप्रकाश-रत्नाच्या तेजाप्रमाणे त्याचा चांगुलपणा अविचल राहतो.

संकल्प हा सत् कशामुळे ठरतो ? संकल्पात जे उद्दिष्ट (उदा., सुखनिर्मिती) अंतर्भूत असते त्याच्या स्वरूपामुळे संकल्पाचे सद्‌सदत्त्व ठरत नाही, तर त्याच्या पाठीमागे असलेल्या प्रेरणेच्या स्वरूपामुळे संकल्प सत् ठरतो. ही प्रेरणा अनुकंपा, करुणा अशांसारख्या नैसर्गिक प्रवृत्तींची असेल, तर तिच्यातून निघणाऱ्या संकल्पाला नैतिक मूल्य नाही. ‘कर्तव्यासाठी कर्तव्य’ या एकाच भावनेतून जो संकल्प प्रेरित होतो तोच सत्‌संकल्प होय. कर्तव्य हे करावयाचेच. ते कशासाठी करावयाचे या प्रश्नास उत्तर नाही. कारण, ‘अमक्यासाठी करावयाचे’ असे म्हटल्यास ज्याच्यासाठी ते करावयाचे ती गोष्ट कर्तव्याची उपाधी ठरेल. पण कर्तव्यप्रेरणेतून मिळणारा आदेश निरपेक्ष असतो. निरपेक्ष आदेशाच्या सिद्धांताने कर्तव्याची ही निष्कामता अथवा फलनिरपेक्षता सांगितली जाते.

कर्तव्य हे कर्तव्यपूर्तीसाठीच करावयाचे असे म्हटले, तरी अमुक अमुक कृती ही कर्तव्य होय हे ठरवावयाचे कसे, हा प्रश्न राहतोच. त्या कृतीच्या परिणामावरून ते ठरणार नाही. कारण तसे झाल्यास नीतीच्या निरपेक्षतेस (अथवा स्वायत्ततेस) बाध येईल. म्हणून एखाद्या कृतीची कर्तव्यता त्या कृतीत अंतर्भूत असलेल्या तत्त्वावरून ठरते असे कांटने म्हटले. त्या तत्त्वाचे पालन करण्यासाठी त्याने पुढील नियम सांगितला : ‘केव्हाही झाले तरी अशीच कृती करीत जा, की तिच्यामागील तत्त्व हे सार्वत्रिक नियम व्हावा अशी इच्छा तू करू शकशील’. कृतीसंबंधीच्या या नियमास ‘निरपेक्ष आदेश’ असे नाव आहे. त्याला ‘नीतीचे परमतत्त्व’ असेही म्हणता येईल. कारण त्या आदेशात कृतीचा अमूक एक नियम सांगितला आहे असे म्हणण्यापेक्षा, तो नियम ठरवावा कसा याचे तत्त्व सांगितले आहे. (नियमाचा नियमपणा त्याच्या सार्वत्रिकतेत असल्यामुळे कांटने सांगितलेल्या निरपेक्षतेच्या सिद्धांतात केवळ सार्वत्रिकपणाचा साचाच मांडला गेला आहे).

समजा, वचन पाळण्याचा प्रश्न उपस्थित झाला, तर निरपेक्ष आदेशाच्या तत्त्वाप्रमाणे वचन पाळावे असे निघेल. कारण वचन पाळण्याचे तत्त्वच सार्वत्रिक होऊ शकेल. दिलेले वचन मोडावे असा नियम करू गेल्यास वचने दिली-घेतली जाणार नाहीत. त्यामुळे ती मोडताही येणार नाहीत. अर्थात वचन मोडण्याच्या तत्त्वास सार्वत्रिकता येणार नाही, म्हणून वर सांगितलेल्या निरपेक्ष आदेशाच्या तत्त्वावरून वचन पाळावे हे कर्तव्य होय असे ठरते. याच पद्धतीने नीतीच्या या परमतत्त्वापासून आपणास इतर विशिष्ट कर्तव्यांचा बोध होऊ शकेल.

कर्तव्यासाठी कर्तव्य या भावनेतून प्रेरित होऊन वर दिलेल्या रीतीने ठरणारे कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प म्हणजे सत्‌संकल्प होय. ज्या वस्तुगत तत्त्वाने संकल्प नियत होतो त्याला नियत म्हणता येईल. मनुष्य केवळ विवेकशील एवढाच असता, तर त्याचे संकल्प या वस्तूगत नियमाला अनुसरून झाले असते. पण माणसात विवेकाबरोबर विकाराचा अंशही आहे. त्यामुळे तो वस्तुगत नियम ‘आदेश’ म्हणून बुद्धीला प्रतीत होतो. विशिष्ट उद्देश साधण्याची अपेक्षा त्या आदेशाच्या बुडाशी असेल, तर तो सोपाधिक आदेश होय जसे (आरोग्य पाहिजे असेल तर) नेहमी व्यायाम करीत जा. याचे दोन पोटविभाग होतात. शक्यसंभव उद्दिष्टांना धरून असलेल्या आदेशांना सोपाधिक संभवादेश म्हणता येईल जसे नाचावयास शिकवायचे असेल, तर वजन कमी करा. सुख हे उद्दिष्ट निसर्गतःच प्राप्त आहे. त्याच्या अपेक्षेने जो आदेश येईल तो सोपाधिक निश्चयादेश होय. निरपेक्ष आदेश मात्र कोणतेही उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी नसतो. कृतीत अनुस्यूत असलेल्या तत्त्वासाठीच ती करावी असा तो आदेश असतो. ते तत्त्व म्हणजे नियमाच्या नियमपणाचे अथवा सार्वत्रिकतेचे तत्त्व होय. ते तत्त्व असे सांगितले आहे : ‘अशा रीतीने कृती कर, की तूझ्या कृतीमागील तत्त्व जणू तुझ्या संकल्पामुळे एक निसर्गनियम होणार आहेत’. निरपेक्ष आदेशाच्या या मांडणीशिवाय आणखी दोन रीतींनी कांटने ते तत्त्व सांगितले आहे. पैकी एक रीत अशी : ‘मनुष्यव्यक्तीला, मग ती स्वतः तू असो वा इतर कोणीही असो, केवळ साधन म्हणून न वागवता ती एक साध्यमूल्य आहे या दृष्टीने तुझे वर्तन असू देत’. प्रथम सांगितलेल्या निरपेक्ष आदेशाहून हा आदेश भिन्न आहे. पण कांटच्या म्हणण्याप्रमाणे त्या पहिल्या आदेशाची ही केवळ फेरमांडणी आहे. मानवी व्यक्ती निरपेक्षपणे अंतिम मूल्य असल्याने तिला केवळ साधन म्हणून वापरू नकोस हा आदेश निरपेक्षच ठरतो, असे समर्थन तो करतो. तिसऱ्या  एका तऱ्हेने निरपेक्ष आदेश सांगितला आहे. ‘साध्यमूल्यांच्या एका सुव्यवस्थित जगाचा स्वतःला एक घटक समजून तू वागवत जा’. स्वतंत्र नीतितत्त्व म्हणून यास मान्यता देणे शक्य आहे पण कांटने प्रथम सांगितलेल्या निरपेक्ष आदेशापासून हा नियम उत्पन्न होतो, हे म्हणणे पटण्यासारखे नाही.

कांटच्या (प्रथम सांगितलेल्या) या परमनीतितत्त्वावर पुढील आक्षेप घेतले जातात : (१) हे तत्त्व पराकाष्ठेचे आकारिक आहे. नैतिक जीवनाचा आशय काय असावा यासंबंधी या आदेशात मुग्धता स्वीकारली आहे. नैतिक वर्तन हे नियमानुसारी असावे, म्हणजे ते सुसंगत असावे असा तो आदेश आहे. ठीक आहे. पण ते नियम कशाशी सुसंगत असावेत ? केवळ एकमेकांशी ? ‘होय’ असे म्हटल्यास विशिष्ट प्रसंगी मी कसे वागावे, कोणता नियम पाळावा यासंबंधीचे मार्गदर्शन त्या नियमातून मिळत नाही. म्हणून ते निव्वळ आकारिक होत त्यामुळे त्यांचा उपयोग झालाच तर तो निषेधक रीतीने होईल, जी गोष्ट स्वतःशी विसंगत आहे, जी गोष्ट सार्वत्रिक करता येणार नाही, ती आचरू नये एवढेच कळेल. पण अमुक अमुक गोष्टी आचरणात आणाव्यात असे भावरूप मार्गदर्शन त्यातून मिळणार नाही.

या आक्षेपास दोन तऱ्हांनी उत्तर देता येईल. (अ) विशिष्ट प्रसंगी कोणती कृती योग्य आणि कोणती अयोग्य हे सांगण्यासाठी कांट प्रवृत्त झाला नव्हता. नैतिक कृतीमागील सामान्य तत्त्व म्हणजे तिचा आकार सांगावा हेच त्याचे उद्दिष्ट होते. तर्कशास्त्राकडून विशिष्ट प्रसंगी वापरण्यास उपयोगी पडणारे युक्तिवाद मिळणार नाहीत, केवळ युक्त विचाराची सामान्य तत्त्वेच मिळतील, हे उत्तर सी. डी. ब्रॉडचे आहे. (आ) मनुष्य हा वासनाविरहित प्राणी आहे असे कांट समजून राहिला नव्हता. आपल्या वर्तनाचा आशय आणि ओघ वासनांनी ठरतो पण त्याला आकार मिळतो व त्याचे उदात्तीकरण होते ते नीतितत्त्वाकडून, असे सांगण्याचा कांटचा रोख होता.

(२) कांटचे नीतितत्त्व अकारण कठोर आहे असा दुसरा आक्षेप आहे. ती कठोरता दोन प्रकारची आहे. (अ) नैतिक नियमाला अपवाद करणे कांटला मान्य नाही पण नियम माणसासाठी असतो हे जाणून व्यवहारात आपण अनेक नियमांना मुरड घालतो. तसे न करणे कठोरपणाचे होईल. या आक्षेपावर असे उत्तर देता येईल, की कांटचे परमनीतितत्त्व कोणताही अनुल्लंघनीय नियम घालून देत नाही. ‘माझ्या विशिष्ट परिस्थतीत दुसरी एखादी व्यक्ती असती, तर तिने जसे वागावे अशी मी इच्छा करीन तसे मी वागावे’ असे सांगण्याने कोणताही सामान्य नियम प्रतिपादला जात नाही. नैतिक दृष्टीकोन हा विश्वतोमुख अथवा अहंकारविरहित असावा एवढेच सांगितले आहे. त्यामुळे आंधळ्या नियमपालनाचा दोष येत नाही. (आ) मैत्री, अपत्यप्रेम अशांसारख्या भावनांतून एखाद्या कृतीस प्रेरणा मिळाली, तर तिला कांट नैतिक मूल्य देत नाही. अशा रीतीने भावनांची कदर न करण्याने नीतीला अकारण उग्रता येते. या आक्षेपावर कांटच्या बाजूने उत्तर देता येते. या आक्षेपावर कांटच्या बाजूने उत्तर देता येईल, की करुण-कोमल भावनांचे अस्तित्व नीतिविरोधी मानले नाही. मात्र विशुद्ध कर्तव्यभावनेचे सह-अस्तित्व नसेल, तर इतर भावनांचा अतिरेकही होऊ शकतो. म्हणून कृतीस नैतिक मूल्य प्राप्त होण्यासाठी कर्तव्यप्रेरणेची आवश्यकता आहे. शिवाय, कर्तव्यप्रेरणेविषयी आदर ही एक मनोरम भावना आहेच.

कर्तव्यतेचा निरपेक्ष आदेश समर्थनीय ठरविण्यासाठी (१) आत्मस्वातंत्र्य, (२) ईश्वराचे अस्तित्व आणि (३) आत्म्याचे अमरत्व या तीन गोष्टी गृहीत धरल्या पाहिजे, असे कांट म्हणतो : (१) जर कर्तृत्व हे निरपेक्षपणे बंधनकारक आहे तर कोणत्याही परिस्थितीत मला ते करता येणे शक्य असले पाहिजे याचेच नाव आत्मस्वातंत्र्य. (२) सुखाची आशा ही कर्तव्याची प्रेरणा नव्हे पण नीतिमान व्यक्ती असुखीच राहील तर विश्वमांगल्यात उणेपणा आल्यासारखे होईल. पण नीती आणि सुख यांच्यात पुरे साहचर्य या जगात दिसत नाही. इतरत्र ते घडवून आणण्यासाठी ईश्वरास्तित्व मानणे अगत्याचे आहे. (३) नीती ही पूर्णतेसाठी चाललेली धडपड होय. पण आपले जीवस्वरूप लक्षात घेता केवढ्याही दीर्घ अवधीत पूर्णता प्राप्त होणे अशक्य आहे. म्हणून जीवाचे अनंतकालपर्यंत अस्तित्व मानणे नितीस आवश्यक आहे.

संदर्भ : Kant, Immanuel Trans. Paton, H. J. T he Moral Law or Kant’s Groundwork of the Metaphysics of Morals, New York, 1950.

दीक्षित, श्री. ह.