नीकोला द मालब्रांशमालब्रांश, नीकोला द : (६ ऑगस्ट १६३८–१३ ऑक्टोबर १७१५). विवेकवादाचे प्रवर्तक म्हणून प्रसिद्ध असलेल्या ⇨ रने देकार्त (१५९६–१६५०) ह्या फ्रेंच तत्त्ववेत्त्याचे अनुयायी. देकार्तच्या अनेक सिद्धांतांचे मालब्रांश यांनी मोठ्या बौद्धिक कौशल्याने मंडन केले, त्यांचा विकास केला तसेच त्यांच्यात स्वतःची लक्षणीय भरही घातली  आंत्वान, आर्नो, लायप्निट्स, फूशे इ. प्रसिद्ध समकालीन तत्त्ववेत्त्यांशी विवाद करून मालब्रांश यांनी आपल्या सिद्धांतांची मांडणी आणि समर्थन केले. 

जन्म पॅरिस येथे. कॉलेज द ला मार्चेझ व सॉर्‌बॉन येथे तत्त्वज्ञान आणि ख्रिस्ती धर्मशास्त्र ह्यांचे अध्ययन. १६६४ मध्ये त्यांनी रोमन कॅथलिक चर्चच्या धर्मगुरूची दीक्षा घेतली. देकार्त यांचा मालब्रांशवर खूपच प्रभाव पडला व त्यांनी देकार्तचे तत्त्वज्ञान, गणित, भौतिक व निसर्ग विज्ञाने ह्या विषयांचा सखोल अभ्यास केला. तत्त्वज्ञानात्मक चिंतन आणि लिखाण ह्यांत त्यांनी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचे काही ग्रंथ चर्चने निषिद्ध ठरविले होते. पॅरिस येथे ते निधन पावले. 

देकार्त यांचे जे सिद्धांत मालब्रांश यांनी स्वीकारले होते, त्यांत पुढील सिद्धांतांचा अंतर्भाव आहे : जड पदार्थाची सम्यक व्याख्या म्हणजे ‘विस्तार हा घर्म ज्याच्या ठिकाणी आहे असे द्रव्य’ ही होय रंग, वास. ‘दुय्यम’ गुण जड वस्तुच्या ठिकाणी नसतात केवळ तिचा आकार आणि तिची गती ह्या गुणांनी ती कोणत्या प्रकारची वस्तू आहे हे ठरते माणसाच्या जड देहाहून भिन्न असा आत्मा किंवा मन माणसाला असते जाणीव हा मनाचा व्यवच्छेदक धर्म होय जड वस्तू व मन ही पूर्णपणे भिन्न प्रकारची द्रव्ये होत. यथार्थ ज्ञान संवेदना व प्रतिमा ह्यांच्या द्वारा होत नाही, तर स्पष्ट व असंदिग्ध अशा कल्पनांच्या द्वारा होते. 

देकार्त यांच्या तत्त्वज्ञानात उद्‌भवणारी एक महत्त्वाची समस्या अशी, की जर जड द्रव्य आणि मन ही दोन भिन्न प्रकारची द्रव्ये असतील, तर ती एकमेकांवर कार्य कसे करू शकतात? पण जेव्हा मनाला बाह्य पदार्थांकडून संवेदना प्राप्त होतात तेव्हा जड द्रव्य मनावर कार्य करते आणि जेव्हा आपल्या इच्छेनुसार आपण शारीरिक कृती करतो तेव्हा मन शरीरावर (जड द्रव्यावर) कार्य करते असे दिसते. ह्याचा उलगडा कसा करता येईल.

मालब्रांश यांच्यापुढील हा एक प्रमुख प्रश्न होता. कार्यकारणभावाची चिकित्सा करून त्याचे त्यांनी उत्तर दिले. जे कारण आहे ते कार्य घडवून आणते, म्हणजे कार्य घडवून आणण्याची शक्ती कारणाच्या ठिकाणी असते असे सामान्यपणे मानण्यात येते. पण मालब्रांश ह्या समजुतीचे खंडन करतात. वस्तूचा रंग, आकार इ तिच्या गुणांचा आपल्याला जसा निरीक्षणाने प्रत्यय येतो, तसा वस्तुच्या ठिकाणी असलेल्या अशा शक्तीचा प्रत्यय घेता येत नाही. तेव्हा विशिष्ट कार्य घडवून आणण्याची शक्ती विशिष्ट प्रकारच्या वस्तूच्या अंगी असते, असे मानायला काही आधार नाही. आपल्याला अनुभवतात जे आढळून येते ते एवढेच, की विशिष्ट प्रकारची घटना घडल्यानंतर दुसऱ्या एका प्रकारची घटना नियमितपणे घडून येते. हा साहचर्य नियम फक्त अनुभवात आढळून येतो. पहिली घटना स्वतःच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा वापर करून नंतरची घटना घडवून आणते असे आढळत नाही. मालब्रांश ह्यांच्या ह्या युक्तिवादाचा नंतर बर्क्ली व ह्यूम ह्यांच्या विचारांवर प्रभाव पडला आहे. ह्या संबंधात त्यांनी मांडलेला दुसरा मुद्दा असा, की ईश्वर सोडून इतर ज्या वस्तू आहेत त्यांची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. जे निर्मित आहे ते कारण असू शकत नाही. त्याचे अस्तित्व जसे ईश्वरावर अवलंबून असते त्याप्रमाणे त्याचे अस्तित्वात टिकून रहाणेसुद्धा ईश्वरावर, त्याच्या इच्छेवर अवलंबून असते. तेव्हा जगात ज्या घटना घडतात त्यांचे ईश्वराची इच्छा हे कारण असते. जर अ ह्या घटनेनंतर ब ही घटना नियमाने घडून येते असे आपल्याला आढळून येत असेल, तर अ हे ब चे कारण आहे असे ह्यावरून सिद्ध होत नाही, तर अनंतर ब नियमाने घडून यावी ही ईश्वराची इच्छा ह्या नियमबद्ध क्रमाचे कारण असते. तेव्हा अ ही घटना ब ह्या घटनेचे कारण नसते तर अ ही घटना घडण्याच्या प्रसंगानंतर नियमाने ब ही घटना घडावी ही ईश्वरेच्छा ब घडण्याचे कारण असते. सर्व भौतिक वस्तू आणि मने ईश्वराने निर्माण केलेली आहेत. तेव्हा कोणतीही भौतिक किंवा मानसिक घटना कोणत्याही घटनेचे कारण नसते. पण विशिष्ट भौतिक किंवा मानसिक घटना घडणे हा असा प्रसंग असतो, की त्यानंतर ईश्वर आपल्या इच्छेला अनुसरून दुसरी एक विशिष्ट घटना नियमाने घडवून आणतो. कार्यकारणभावाविषयीच्या मालब्रांश ह्यांनी मांडलेल्या ह्या उपपत्तीला ‘प्रसंगवाद’ (ऑकेजनॅलिझम) असे म्हणण्यात येते. 

ही उपपत्ती स्वीकारली तर मन शरीरावर किंवा शरीर मनावर कसे काय कार्य करू शकते, हा देकार्त यांच्यापुढे असलेला प्रश्न निकालात निघतो. मानसिक घटना किंवा शारीरिक (भौतिक) घटना दुसरी कोणतीही घटना घडवून आणूच शकत नाही. पण विशिष्ट मानसिक घटना घडण्याच्या प्रसंगानंतर–उदा., माझा हात उचलावा अशी इच्छा माझ्या मनात जागी झाल्यानंतर–ईश्वर आपल्या इच्छेला अनुसरून विशिष्ट भौतिक घटना–माझा हात उचलला जाण्याची घटना- घडवून आणतो. शारीरिक व मानसिक घटनांमधील संबंधाचा उलगडाही ह्याच प्रकारे करता येईल.

मालब्रांश ह्यांनी मांडलेला दुसरा सिद्धांत असा, की आपण सर्व वस्तू ईश्वरामध्ये पहातो, बाह्य वस्तूंचे, म्हणजे आपल्या मनाबाहेर असलेल्या वस्तूंचे ज्ञान आपल्याला मनात असलेल्या कल्पनांद्वारे होते. ह्या कल्पना म्हणजे खरेखुरे, अस्तित्वात असलेले पदार्थ असले पाहिजेत कारण नाहीतर त्यांच्या द्वारा आपल्याला बाह्य पदार्थांचे ज्ञान होणार नाही. ह्या कल्पना आपण निर्माण करू शकणार नाही कारण असे काही निर्माण करण्याची शक्ती आपल्या मनाला नसते. तेव्हा ह्या कल्पना ईश्वराने निर्माण केलेल्या आणि ईश्वराच्या मनात असल्या पाहिजेत, त्यांची जाणीव आपल्याला होते तेव्हा त्यांच्या द्वारा बाह्य पदार्थांचे ज्ञान आपल्याला होते. 

ईश्वर हे एकमेव कारण आहे आणि सर्व ज्ञान आपल्याला ईश्वराद्वारा साध्य होते. ह्या दोन सिद्धांतांतून मालब्रांश यांचा धार्मिक गूढवाद व्यक्त होतो. 

मालब्रांश यांच्या तत्त्वज्ञानात कार्टेझिॲनिझम, सेंट ऑगस्टीनचे विचार आणि नव प्लेटो मतातील विचार यांचा समन्वय साधलेला दिसतो. ‘फ्रेंच प्लेटो’ म्हणूनही त्यांचा गौरवाने उल्लेख केला जाई. त्यांच्या गद्यलेखनाची शैली उत्कृष्ट होती व व्हॉल्तेअरसारख्यांनीही ती वाखाणली होती. 

मालब्रांश यांचे लेखन फ्रेंचमध्ये आहे. त्यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरेही झाली असून त्यांतील काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : सर्च आफ्टर ट्रूथ (३ खंड १६७४–७५, इं. भा. १६९४–९५), ट्रिटाइज ऑफ नेचर अँड ग्रेस (१६८०, १६९५), अ ट्रिटाइज ऑफ मॉरॅलिटी (१६८३, १६९९), डायलॉग्ज ऑन मेटॉफॅजिक्स अँड ऑन रिलिजन (१६८८, १९२३), मेडिटेशन्स, क्रिश्चन अँड मेटॅफिजिकल (१६८३) इत्यादी.

पहा : विवेकवाद. 

संदर्भ : 1. Church, Ralph Withington, A Study in Philosophy of Malebranche, London, 1931.

           2. Rome, Beatrice K. The Philosophy of Malebranche, Chicago, 1963. 

रेगे, मे. पुं.