विवेकवाद : हा ज्ञानमीमांसेतील एक विचारपंथ आहे. सर्वोच्च मानवी ज्ञान किंवा ज्याला यथार्थपणे ‘ज्ञान’ म्हणता येईल असे संपूर्णपणे प्रमाण ज्ञान केवळ विवेक किंवा बुद्धी या मनःशक्तीपासून मिळते अनुभवापासून ते मिळू शकत नाही असे विवेकवादाचे म्हणणे आहे. विवेकवादाला विरोधी असलेले ज्ञानमीमांसेतील मत म्हणजे ⇨अनुभववाद. अनुभववादाचे म्हणणे असे, की मानवी ज्ञानाचा उगम इंद्रियानुभवात होतो इंद्रियानुभवाच्या क्षेत्रापलीकडे मानवी ज्ञानाचा विस्तार होऊ शकत नाही अनुभवावर आधारलेल्या ह्या ज्ञानाची व्यवस्था लावणे, अनुभवापासून प्राप्त झालेल्या संकल्पनांचे स्पष्टीकरण करणे ही आवश्यक पण दुय्यम कार्ये बुद्धी करते. ज्ञानमीमांसेतील ह्या दोन परस्परविरोधी मतांच्या विवादातून आणि ह्या विवादातून घडून आलेल्या त्यांच्या विकासातून आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे पहिले पर्व-रने देकार्तपासून कांटपर्यंतचे पर्व-रचले गेले असे म्हणता येईल. ⇨देकार्त, ⇨स्पिनोझा, ⇨लायप्निट्स हे प्रमुख विवेकवादी तत्त्ववेत्ते होत. ⇨जॉन लॉक, ⇨जॉर्ज बर्क्ली, ⇨डेव्हिड ह्यूम हे प्रमुख अनुभववादी तत्त्ववेत्ते होत. ⇨इमॅन्युएल कांट ह्याने विवेकवाद आणि अनुभववाद ह्या दोहोंच्याही गृहीतकृत्यांचे परीक्षण करून ही दोन्ही मते एकांगी व म्हणून त्याज्य ठरविली आणि मानवी ज्ञानाचा उगम, स्वरूप आणि व्याप्ती ह्यांविषयी एक नवी उपपत्ती पुढे मांडली. कांट ह्याच्यापासून पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या एका नवीन युगाला सुरुवात झाली.

विवेकवादाची आधारभूत भूमिका ही, की खरेखुरे ज्ञान, ज्याला यथार्थपणे ज्ञान म्हणता येईल असे ज्ञान, हे निश्चित आणि संशयातीत असले पाहिजे. एखाद्या गोष्टीचे एखाद्याला ज्ञान आहे किंवा ती गोष्ट त्याला माहीत आहे असे आपण कधी म्हणतो ? ती गोष्ट निश्चितपणे खरी असल्याशिवाय तिचे ज्ञान एखाद्याला आहे असे आपण म्हणू शकणार नाही. उदा., “ ‘पृथ्वी गोल आहे’ हे ज्ञान क्ष-ला आहे किंवा ‘पृथ्वी गोल आहे’ हे क्ष-ला माहीत आहे” असे आपण म्हणू शकू. परंतु “ ‘पृथ्वी सपाट आहे’ हे ज्ञान क्ष-ला आहे किंवा ही गोष्ट क्ष-ला माहीत आहे” असे म्हणणे विचित्र ठरेल. ‘पृथ्वी सपाट आहे’ असे क्ष-ला वाटते, अशी त्याची समजूत आहे असे आपण म्हणू. ज्ञान असणे आणि समजूत किंवा मत असणे ह्याच्यात भेद आहे. एखाद्या गोष्टीचे कुणालाही ज्ञान आहे असे म्हणण्यात ती गोष्ट निश्चितपणे खरी आहे हे अभिप्रेत असते. एखादी गोष्ट जर खरी नसेल किंवा ती खरी आहे की नाही ह्याविषयी आपल्या मनात यत्किंचितही शंका असेल, तर त्या गोष्टीचे ज्ञान एखाद्याला आहे असा दावा आपण मांडू शकत नाही. हीच गोष्ट वेगळ्या रीतीने मांडता येईल. एखाद्या विधानात- समजा, ‘वि’ ह्या विधानात-मांडलेल्या गोष्टीचे ज्ञान एखाद्याला आहे हे म्हणणे जर योग्य असेल, तर ‘वि’ हे विधान खरे असलेच पाहिजे किंवा आवश्यकतेने खरे असले पाहिजे हे त्यापासून निष्पन्न होते. सारांश, ज्ञान हे आवश्यकतेने आणि निश्चितपणे सत्य असलेल्या विधानांचेच असते.

आता अनुभवापासून लाभणारे ज्ञान असे निश्चित, संशयातीत, आवश्यकतेने खरे असू शकत नाही असे विवेकवादाचे म्हणणे आहे. अनुभवावर आधारलेले ज्ञान नेहमी संशयग्रस्त असते. मी कोपऱ्यात साप पाहतो. पण यावरून ‘कोपऱ्यात साप आहे’ हे विधान निश्चितपणे सत्य आहे हे निष्पन्न होत नाही, कारण मला भास होत असेल किंवा स्वप्न पडत असेल. तेव्हा निश्चित, संशयातीत असे ज्ञान इंद्रियानुभवावर आधारता येत नाही. त्याचप्रमाणे, आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांचे ज्ञान इंद्रियानुभवाने प्राप्त होऊ शकत नाही. समजा, मी पाहत असलेले फूल पिवळे आहे असे मला दिसून आले, तर ह्या अनुभवावरून ‘हे फूल पिवळे आहे’ हे विधान सत्य आहे हे निष्पन्न होते पण हे विधान सत्य असणे आवश्यक आहे हे निष्पन्न होत नाही. हे फूल पिवळे आहे अशी वस्तुस्थिती आहे हे मला ह्या अनुभवावरून कळून येते पण हे फूल पिवळे असणे आवश्यक आहे, हे फूल पिवळे असलेच पाहिजे हे मला दिसू शकत नाही ही गोष्ट अनुभवापासून निष्पन्न होत नाही. तेव्हा संशयातीत, निश्चित, आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांचे ज्ञान अनुभवावर आधारता येत नाही.

पण असे निश्चित आणि आवश्यकतेने खरे असलेले ज्ञान मानवी मनाला उपलब्ध आहे. अशा ज्ञानाचे एक उदाहरण म्हणजे गणित. गणितात प्रमेये सिद्ध केलेली असतात. तेव्हा गणितातली विधाने केवळ खरी असतात असे नव्हे, तर ती निश्चितपणे खरी असतात. ती खरी असली पाहिजेत हे दाखवून दिलेले असते म्हणजे ती आवश्यकतेने खरी असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज दोन काटकोनांएवढी असते एवढेच नव्हे, तर ती इतकी असलीच पाहिजे असे त्या विधानाच्या सिद्धीत दाखवून दिलेले असते. शिवाय गणिती ज्ञान हे अनुभवावर आधारलेले नसते. त्रिकोणाचे कोन आपण प्रत्यक्ष मापत नाही. प्रमाण म्हणून स्वीकारलेल्या कित्येक विधानांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी इतर विधाने प्राप्त करून घेऊन, त्यांच्यापासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी इतर विधाने प्राप्त करून घेऊन क्रमाक्रमाने गणिती ज्ञानाची उतरंड रचली जाते. गणिती ज्ञानाची रीत निगामी असते त्यातील विधाने अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेऊन मान्य केली जात नाहीत. गणिती ज्ञान अनुभवाधिष्ठित नाही ते पूर्वप्राप्त विवेकजन्य आहे.

निश्चितपणे आणि आवश्यकतेने सत्य असलेल्या गणिती ज्ञानाला विवेकवादी ज्ञानाचा आदर्श (मॉडेल) मानतात. ह्या दृष्टीने पाहता ⇨प्लेटो हा पहिला विवेकवादी होता. ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणेसुद्धा आवश्यकतेने आणि सार्वत्रिकपणे सत्य असलेल्या तत्वांचे ज्ञान आपल्याला विवेकद्वारा होते आणि अशा तत्वांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी विधाने निगमनाने सिद्ध करून आपण मानवी ज्ञानाची रचना उभारतो. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल हे दोघे विवेकवादी होते आणि ॲरिस्टॉटलला अनुसरणाऱ्या मध्ययुगीन यूरोपीय तत्त्वज्ञानावर विवेकवादाची छाप होती.

पण विवेकवादाची सुस्पष्ट मांडणी प्रथम केली ती आधुनिक पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या उगमस्थानी असलेल्या रने देकार्त ह्याने. त्याचे मत थोडक्यात असे मांडता येईल : इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान आणि त्यावर आधारलेल्या स्मृती, ऐतिहासिक परंपरा इत्यादिकांपासून लाभणारे ज्ञान संशयग्रस्त असते म्हणून ते खऱ्याखुऱ्या ज्ञानाच्या पदवीला पोहोचू शकत नाही. यथार्थपणे ज्याला ज्ञान म्हणता येईल असे ज्ञान आपल्याला गणितात उपलब्ध असते आणि त्याचा उगम इंद्रियानुभवाहून अन्यत्र शोधला पाहिजे. गणिती ज्ञानाची सुरुवात स्वतःप्रमाण (सेल्फ-एव्हिडंट) अशा विधानांपासून झालेली असते. ह्या विधानांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी इतर काही विधाने निगमनाने प्राप्त करून घेण्यात येतात त्यांच्यापासून अशाच रीतीने इतर काही विधाने सिद्ध करण्यात येतात आणि ह्या पद्धतीने गणिती ज्ञान विकसित आणि संघटित होते.

पण ह्या ज्ञानाचा उगम आणि आधार असलेली मूलविधाने आपल्याला कशी उपबल्ध होतात? त्यांचे स्वरूप कसे असते? देकार्तच्या म्हणण्याप्रमाणे ही विधाने अशी असतात, की ती सत्य आहेत हे आपल्या विवेकशक्तीला सुस्पष्टपणे दिसते त्यांच्या सत्याचे साक्षात दर्शन आपल्या विवेकाला घडते. विधानांच्या सत्याच्या अशा प्रकारच्या साक्षात दर्शनाला देकार्त प्रतिमान (इन्ट्यूइशन) म्हणतो. प्रतिमानात घडणारे विधानांच्या सत्याचे दर्शन इतके सुस्पष्ट असते, की  संशयाला काही  जागाच उरलेली नसते. अशा प्रकारच्या, म्हणजे ज्यांच्या सत्याचे असे सुस्पष्ट व साक्षात दर्शन घडते व म्हणून जी निश्चितपणे आणि संशयातीतपणे सत्य असतात, अशा विधानांची देकार्तने दिलेली काही उदाहरणे अशी :

‘मी विचार करतो म्हणून मी आहे’, ‘एकच वस्तू अस्तित्वात आहेही आणि नाहीही असे असू शकणार नाही’, ‘शून्यापासून शून्यच निष्पन्न होईल’ (आउट ऑफ नथिंग, नथिंग कम्स), ‘कार्याचा आशय कारणाच्या आशयापेक्षा अधिक असू शकणार नाही’ इत्यादी.

आता समजा, वि हे अशा स्वरूपाचे स्वतःप्रमाण, साक्षात दर्शनाने ज्याचे सत्य प्रतीत झाले आहे असे विधान आहे आणि समजा, ‘जर वि तर वि’ ह्या अवतरणचिन्हांतील सबंध विधानाचे सत्यही असे साक्षात दर्शनाने प्रतीत होते. मग ह्या दोन विधानांपासून वि हे विधान सिद्ध होते. तसेच जर ‘जर वि तर वि’ हेही असे स्वतःप्रमाण विधान असेल तर ते आणि वि ह्या दोन विधानांपासून वि हे विधान सिद्ध होते. विवेक म्हणजे अशा प्रकारची, स्वतःप्रमाण विधानांच्या सत्याचे साक्षात दर्शन घेण्याची शक्ती. गणिती ज्ञानाची आणि ज्याला यथार्थपणे ज्ञान म्हणता येईल अशा सर्वच ज्ञानाची घडण निगामी  असते. त्याची मूलविधाने स्वतःप्रमाण असतात, त्याप्रमाणे ह्या उतरंडीवरील प्रत्येक पायरीही स्वतःप्रमाण असते. मूलविधाने निश्चिततेने आणि आवश्यकतेने सत्य असतात आणि ह्या विधानांपासून सिद्ध करण्यात आलेली विधाने त्यांच्यापासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी अशी असतात व म्हणून तीही निश्चितपणे आणि आवश्यकतेने सत्य असतात.

आता संशयातीत, निश्चित, आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांचे ज्ञान आपल्याला केवळ विवेकाकडून प्राप्त होते हे विवेकवादाचे म्हणणे मान्य केले, तरी आपले काही ज्ञान अनुभवावर आधारलेले असते हेही उघड आहे. इंद्रियगोचर विश्वाचे, त्यातील वेगवगळ्या प्रकारच्या पदार्थांचे, त्यांच्या गुणधर्माचे, ते एकमेकांवर करीत असलेल्या परिणामांविषयीचे आपले ज्ञान इंद्रियानुभवावर आधारलेले असते. ह्या ज्ञानाची व्यवस्था लावण्यासाठी विवेकवादी सामान्यपणे ज्ञानाच्या दोन पातळ्या कल्पितात. एक, खरेखुरे ज्याला यथार्थपणे ज्ञान म्हणता येईल असे विवेकजन्य ज्ञान आणि दुसरे, इंद्रियानुभवावर आधारलेले कनिष्ठ, हीणकस ज्ञान उदा., प्लेटो ज्ञान आणि मत किंवा विश्वास ह्यांच्यात भेद मानतो. विवेकाधिष्ठित ज्ञान हे निश्चितपणे सत्य असल्यामुळे स्थिर आणि शाश्वत असते. अनुभवावर आधारलेले मत अस्थिर असते म्हणजे खरे मानले गेलेले मत खोटे आहे आणि होते असे ठरू शकते. त्याचप्रमाणे स्पिनोझा स्वतःप्रमाण विधाने आणि त्यांच्यापासून आवश्यकतेने निष्पन्न होणाऱ्या विधानांनाच विवेकी ज्ञान (रॅशनल नॉलेज) मानतो. इंद्रियसंवंदनांवर आधारलेल्या ज्ञानाला तो कल्पनांचा समूह मानतो.


आता, ज्ञान हे जे अस्तित्वात असते त्याच्याविषयीचे असते वस्तूंचे अस्तित्व आणि स्वरूप हा ज्ञानाचा विषय असतो. तेव्हा ज्ञानाच्या जर दोन पातळ्या कल्पिल्या, तर ज्ञानविषयाच्या, अस्तित्वाच्याही दोन पातळ्या कल्पाव्या लागतील. एक, विवेकजन्य, स्थिर, आवश्यकतेने सत्य असलेल्या ज्ञानाचा विषय असलेले असे स्वयंभू, चिरंतन अस्तित्व आणि दुसरे, इंद्रियानुभवावर आधारलेल्या ज्ञानाचा विषय असलेले, परावलंबी, परिवर्तनशील, इंद्रियगोचर वस्तूंचे अस्तित्व. स्वयंभू,स्वायत्त, चिरंतन अशा अस्तित्वाचे आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांत व्यक्त होणारे ज्ञान म्हणजे सत्ताशास्त्र. पराधिष्ठित, परतंत्र, चंचल अशा इंद्रियगोचर वस्तूंचे इंद्रियानुभवावर आधारलेले ज्ञान कनिष्ठ खरे पण ह्या वस्तूंचे वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या प्रकारचे ज्ञानही आपल्याला प्राप्त होऊ शकते. स्वयंभू अस्तित्वाचे ज्ञान करून देणाऱ्या स्वतःसिद्ध, स्वतःप्रमाण अशा विधानांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी विधाने पायरीपायरीने प्राप्त करून घेत इंद्रियगोचर वस्तूंच्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारी विधाने सिद्ध करता येतात. इंद्रियगोचर पदार्थांविषयी निगमनाने सिद्ध करण्यात आलेल्या आणि आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांचा समुदाय म्हणजे विज्ञानय इंद्रियगोचर पदार्थांविषयीचे इंद्रियानुभवावर आधारलेले कनिष्ठ ज्ञान ह्यांच्यात भेद केला पाहिजे. विवेकवादी भूमिका अशी, की विज्ञानातील विधाने इंद्रियगोचर वस्तूंविषयी असली तरी त्यांची सत्यता निरीक्षणाने पडताळून मान्य करण्यात आलेली नसते. ही विधाने स्वतःप्रमाण विधानांपासून निगमनाने सिद्ध करण्यात आलेली असतात आणि इंद्रियगोचर वस्तूंच्या खऱ्याखुऱ्या आंतरिक स्तवाचे (एसन्स) ज्ञान त्यांच्यात सामावलेले असते. उलट, इंद्रियगोचर वस्तूंच्या गुणधर्मांचे केवळ इंद्रियानुभवावर आधारलेले ज्ञान बहिरंगस्पर्शी असते. विवेकवादी ज्ञानमीमांसेप्रमाणे स्वयंभू, अत्युच्च अस्तित्वाचे ज्ञान करून देणारे सत्ताशास्त्र आणि परावलंबी इंद्रियगोचर अस्तित्वाचे ज्ञान करून देणारे विज्ञान ही सलग असतात. सत्ताशास्त्र व विज्ञान ह्या दोन विभिन्न, आपापल्या विषयाला आणि उद्दिष्टांना अनुरूप अशा भिन्न पद्धती अनुसरणाऱ्या स्वतंत्र ज्ञानशाखा नव्हेत, तर अस्तित्वाविषयीच्या एकसंघ आणि एकच प्रमाण रीत अनुसरणाऱ्या ज्ञानाच्या पूर्व आणि उत्तर अशा पायऱ्या आहेत.

आणखी एका गोष्टीचा निर्देश येथे केला पाहिजे. कोणत्याही विधानात संकल्पना घटक म्हणून असतात. उदा., ‘हे फूल तांबडे आहे’ ह्या विधानात ‘तांबडे’ ही संकल्पना एक घटक आहे. आता खऱ्याखुऱ्या ज्ञानात ज्यांचा अंतर्भाव होतो अशी विधाने जर पूर्वप्राप्त असतील, त्यांचे ज्ञान जर विवेकजन्य असेल, तर त्यांच्या घटक असलेल्या संकल्पना मनाला कशा प्राप्त होतात? ह्या संकल्पना आपल्याला अनुभवाद्वारा प्राप्त होऊ शकणार नाहीत. खऱ्याखुऱ्या ज्ञानात अंतर्भूत असलेल्या विधानांच्या घटक असलेल्या संकल्पना ज्ञात्यामध्ये उपजत असतात असे विवेकवाद्यांचे उदा., देकार्त ह्याचे-म्हणणे आहे. ⇨द्रव्य, कार्यकारणभाव, अस्तित्व, विस्तार इ. संकल्पनांचा अंतर्भाव देकार्त उपजत संकल्पनांमध्ये करतो. ह्या संकल्पना आशयसमृद्ध असतात आणि त्यांचे परस्परांशी आवश्यक असे संबंध असतात. अशा दोन संकल्पनांमध्ये असलेल्या आवश्यक संबंधाचे दर्शन विवेकाला होणे म्हणजे एक स्वतःप्रमाण, आवश्यकतेने सत्य असलेले विधान अवगत होणे. अशा विधानांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी विधाने सिद्ध करून ज्ञानाची उभारणी होते. देकार्त, स्पिनोझा, लायप्निट्स ह्या विवेकवादी तत्त्ववेत्यांच्या सत्ताशास्त्रात द्रव्य ह्या संकल्वनेचे स्थान मध्यवर्ती आहे. ह्या संकल्पनेच्या आशयावर आधारलेली विधाने निश्चित करून किंवा निष्पन्न करून स्पिनोझा, लायप्निट्‌स ह्यांची सत्ताशास्त्रे उभी रहातात.

इंद्रियगोचर, भौतिक वस्तूंचे खरेखुरे, आंतरिक स्वरूप विशद करणारी विधाने निरीक्षणाचा आधार न घेता केवळ स्वतःप्रमाण अशा विधानांपासून निगमनाने सिद्ध करता येतात आणि भौतिकशास्त्राची  रीत अशी निगामी आहे हे विवेकवादाचे म्हणणे आज निश्चितच चमत्कारिक वाटेल पण सोळाव्या आणि सतराव्या शतकांत गणिती पदार्थविज्ञानाचा झालेला उदय आणि विकास ध्यानात घेतला आणि विशेषतः विज्ञानाचे हे नवीन रूप प्रस्थापित करण्यात गणिती पदार्थविज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांच्या घडणीत देकार्त, लायप्निट्स इ. विवेकवाद्यांची ही भूमिका इतकीशी विचित्र वाटणार नाही. कारण गणिती पदार्थविज्ञानात गणिताच्या इतर कोणत्याही शाखेप्रमाणे, स्वीकारलेल्या मूलविधानापासून निगमनाने इतर विधाने सिद्ध करण्यात येतात असे करताना निरीक्षणाचा आधार घेण्यात येत नाही. परंतु निगमनाने निष्पन्न होणारी ही विधाने इंद्रियगोचर भौतिक वस्तूंना बरोबर लागू पडतात. निरीक्षणाने पाहिजे तर त्यांचा पडताळा घेता येतो, पण ती निगमनाने सिद्ध करण्यात आलेली असतात. भौतिक पदार्थाचे स्वरूप उलगडून दाखवण्यात विलक्षण सामर्थ्यशाली ठरलेल्या पदार्थविज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विवेकवादी ज्ञानमीमांसेकडे पाहिले, की ती स्वीकारार्ह का वाटली हे समजून येते. परंतु वैज्ञानिक रीतीच्या स्वरूपाविषयीची समज अधिक सुजाण झाली, विशेषतः ह्या रीतीला निरीक्षणाचा आधार सतत कसा घ्यावा लागतो हे समजून आले, तेव्हा विवेकवाद आपोआप गतार्थ झाला.

वैज्ञानिक रीतीविषयी अशी प्रगल्भ समज कांट ह्याच्या विचारात दिसून येते. कांट ह्याने विवेकवादाविषयी कित्येक मूलभूत प्रश्न उपस्थित केले. केवळ निश्चितपणे आणि आवश्यकतेने सत्य असलेल्या विधानांचा ज्ञानात अंतर्भाव होतो असे विवेकवाद्यांचे म्हणणे. पण अशा विधानांचे स्वरूप, घडण कशी असते? स्वतःप्रमाण विधानांपासून आवश्यकतेने निष्पन्न होणारी विधाने निगमनाने सिद्ध करून ज्ञानाचा विकास होतो असे मानले, तर दोन प्रश्न उपस्थित होतात. स्वतःप्रमाण विधानांचे स्वरूप कसे असते? आणि निगमनाने अवगत होणारी विधाने जर ज्ञानात भर घालणारी अशी असायची तर त्यांचा आशय, ज्या विधानांपासून ती निष्पन्न होतात त्यांच्या आशयाहून वेगळा, नवीन असला पाहिजे पण एखाद्या विधानापासून त्याच्या आशयापलीकडे जाणारे विधान आवश्यकतेने कसे निष्पन्न होऊ शकते? निगमनाचे, गणिती ज्ञानाचे खरे स्वरूप काय आहे? द्रव्य, कार्यकारणभाव ह्या संकल्पना, ‘तांबडा’, ‘गोड’, ‘उष्ण’ इ. संकल्पनांहून भिन्न स्वरूपाच्या आहेत हे मान्य करता येईल. ‘तांबडा’ इ. संकल्पना विवक्षित इंद्रियानुभवांपासून प्राप्त होतात, तशा ‘द्रव्य’ इ. संकल्पना होत नाहीत, ह्या अर्थाने त्या पूर्वप्राप्त आहेत. पण ह्या संकल्पनांवर आधारलेल्या स्वतःप्रमाण विधानांपासून अनुभवाचा आधार न घेता, केवळ निगमनाने इंद्रियगोचर वस्तूंच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपाचे ज्ञान करून देणारी विधाने कशी निष्पन्न करता येतील? इंद्रियगोचर वस्तूंविषयीच्या मानवी ज्ञानात, आपल्या अनुभवाच्या घडणीत त्यांचे नेमके कार्य काय असते? हे प्रश्न विचारले गेल्यानंतर कांटपूर्व, साधाभोळा विवेकवाद मूळ स्वरूपात टिकणे अशक्य झाले. कांटनंतर ⇨हेगेलने विवेकवाद नवीन स्वरूपात मांडला. परंतु विवेकशक्तीचे स्वरूप, ज्ञानविषयाशी असलेला तिचा संबंध, अनुभवाच्या घडणीतील विवेकाचे कार्य ह्यांविषयी हेगेलची मते कांटपूर्व विवेकवाद्यांच्या भूमिकेहून सर्वस्वी भिन्न आहेत ती समजावून घ्यायची तर हेगेलच्या सबंध तत्त्वज्ञानाच्या संदर्भात त्यांच्याकडे पाहणे आवश्यक आहे.

संदर्भ : 1. Beck, L. J. The Method of Descartes: A Study of the Regular, Oxford, 1952.

            2. Russell, Bertrand, A Critical Exposition of the Philosophy of Leibniz. Cambridge, 1900 2nd Ed. 1937.

           3. Smith, N. K. New Studies in the Philosophy of Descartes, London, 1952.

           4. Smith, N. K. Studies in the Cartesian Philosophy, London, 1902.  

           5. Wolfson, H. A. the Philosophy  of  Spinoza,  2 Vols. Cambridge (Mass.), 1954.

रेगे, मे. पुं.