आकार आणि उपादान : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात जे कित्येक मूलभूत भेद मान्यता पावलेले आहेत, त्यांपैकी एक म्हणजे आकार व उपादान ह्यांतील भेद. ग्रीक तत्त्वज्ञानात ह्या भेदाचा अर्थ असा लावण्यात येतो : विवक्षित वस्तूचे जे बुध्दीग्राह्य असे सामान्य स्वरूप असते (जे स्वरूप अंगी असल्यामुळे ती वस्तू एका विवक्षित प्रकारची वस्तू ठरते), ते स्वरूप म्हणजे तिचा आकार किंवा वस्तूच्या घडणीचे (सामान्य, बुध्दीग्राह्य) तत्त्व म्हणजे तिचा आकार उलट हे रूप ज्या आशयामध्ये, अधिष्ठानामध्ये मूर्त झालेले असते, ज्या अधिष्ठानाची योग्य तत्त्वानुसार घडण होऊन वस्तू सिध्द झालेली असते, ते अधिष्ठान म्हणजे उपादान. इंद्रियगोचर विवक्षित वस्तुमध्ये बुध्दिग्राह्य असा आकार अंतर्हित असतो, हा पायथॅगोरियन पंथाचा मोठा शोध होता. पण ग्रीक तत्त्वज्ञानाच्या प्रगल्भावस्थेतील प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्या तत्त्ववेत्त्यांनी आकार आणि उपादान ह्या तत्त्वांच्या स्वरूपाची, परस्परसंबंधाची सूक्ष्म आणि पध्दतशीर चिकित्सा केली व तत्त्वमीमांसा, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र इ. क्षेत्रात ह्या भेदाचा अर्थपूर्ण उपयोग केला. आकार व उपादान हा भेद सामान्य व विवक्षित वस्तू ह्या भेदाला काहीसा समांतर आहे आणि सामान्य हे बुध्दिग्राह्य व विवक्षित वस्तू प्रत्यक्ष-ग्राह्य असल्यामुळे बुध्दी आणि प्रत्यक्ष ह्या भेदाशीही तो समांतर आहे.

 आधुनिक काळात आकार आणि उपादान ह्यांतील भेदाचे ⇨इमॅन्युएल कांटने पुनरूज्‍जीवन केले. पण हा भेद त्याने वस्तूंच्या स्वरूपाच्या संबंधात न करता अनुभवाच्या संबंधात केला. कांटच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियवेदन म्हणजे अनुभवाचा आशय किंवा उपादान होय, पण इंद्रियवेदनांची मालिका म्हणजे अनुभव नव्हे. आपल्या अनुभवाचे जे रूप आहे (ज्ञात्याला बाह्य वस्तूंचा येणारा अनुभव हे रूप) ते ह्या आशयाला एका विवक्षित आकार दिल्याने प्राप्त होते. हा आकार बुध्दीप्रणीत, बुध्दीने दिलेला आकार असतो. कांटच्या म्हणण्याप्रमाणे हा अनुभवाचा आवश्यक आकार असतो. ह्याचा अर्थ असा, की अनुभवाचा आशय असलेली इंद्रियवेदने जर ह्या बुध्दिप्रणीत आकाराने समन्वित एकत्रित करण्यात आली नाहीत, तर आपल्याला परिचित असलेल्या स्वरूपाचा अनुभव अशक्य होईल. मग आपला अनुभव केवळ इंद्रियवेदनांची एक मालिका ह्या स्वरूपाचा राहिल एवढेच कांटला म्हणायचे नाही, तर वेदनांना बुध्दीप्रणीत आकार जर देण्यात आला नाही, तर त्या वेदनांचासुध्दा आपल्याला अनुभव यायचा नाही, असे कांटचे म्हणणे आहे. अनुभवाला आकार देणारे बुध्दी हे तत्व इंद्रियवेदनांहून भिन्न असल्यामुळे अनुभवाचा आकार पूर्वप्राप्त असतो. अनुभवाचा पूर्वप्राप्त आकार आणि याचे उपादान ह्या भेदाचा उपयोग कांटने नैतिक अनुभव आणि सौंदर्यानुभव ह्यांच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठीही केला. 

कांटच्या भूमिकेप्रमाणे ज्ञाता किंवा विषयी हा अनुभवाच्या पूर्वप्राप्त आकाराचा घटक असतो. आणि अनुभवाच्या उपादानाल आकारित करणे हे ज्ञात्याचे कार्य असते. तेव्हा आकार आणि उपादान हा भेद म्हणजे विषयी आणि विषय हा भेद होय, असे म्हणता येईल. विषयी आणि विषय किंवा आकार आणि उपादान ह्यांतील संबंधाचे स्वरूप काय हा कांटनंतर हेगेलच्या तत्त्वज्ञानाचा मध्यवर्ती प्रश्न आहे. 

हेगेलच्या म्हणण्याप्रमाणे एक द्वंद्वांत्मक प्रक्रियेनुसार हा बुध्दीस्वरूप आकार अधिकाधिक विकसित, प्रस्फुट होत जातो ह्या प्रक्रियेच्या प्रत्येक श्रेणीवरील आकार अनुरूप उपादानात मूर्त झालेला असतो. ह्या प्रक्रियेचा अंत, आकार परिपूर्ण रीतीने प्रस्फुट होण्यात होतो आणि ह्या अवस्थेमध्ये त्या आकाराचे उपादान आकारासी पूर्णपणे एकरूप झालेले असते. आकार आणि उपादान ह्यांची किंवा विषयी आणि विषय ह्यांची ही एकरूपता म्हणजेच अंतिम वास्तवता. आपला हा दृष्टीकोन घडविताना हेगेलने  उपादान म्हणजे केवळ आकाराहून भिन्न व त्याच्या विरोधी असे द्रव्य नाही, तर आकार धारण करण्याची क्षमता आणि प्रवृत्ती असलेले द्रव्य आहे, ह्या ॲरिस्टॉटलच्या मताचे पुनरुज्जीवन केले [→ हेगेल, जॉर्ज व्हिल्हेल्म फ्रीड्रिख]. 

सामान्यपणे असे म्हणता येईल, की ज्ञानमीमांसेतील ⇨अनुभववादी पंथ अनुभवाच्या केवळ उपादानाला महत्त्व देतो आणि आकाराकडे दुर्लक्ष करतो, उलट ⇨विवेकवादी पंथ आकारापासून उपादान निष्पन्न करण्याचा खटाटोप करतो. ॲरिस्टॉटल व कांट हे आकार व उपादान ह्यांची अनुभवातील भिन्न, पण परस्परावलंबी व परस्परपूरक कार्ये नेमकेपणे रेखाटण्याचा प्रयत्न करतात. अलीकडच्या काळातील ⇨लूडविग व्हिट्‌गेनश्टाइन हा तत्त्ववेत्ता ह्या दृष्टीने ॲरिस्टॉटल आणि कांट ह्यांच्या मालिकेत बसेल. जीवनाच्या किंवा अनुभवाच्या आकाराचा शोध घेणे हे तत्त्वज्ञानाचे कार्य आहे, ह्या त्याच्या भूमिकेमुळे  ‘आकार’ ह्या संकल्पनेला समकालीन तत्त्वज्ञानात महत्त्व प्राप्त झाले आहे. [→ तर्कशास्त्र, सौंदर्यशास्त्र].

भारतीय तत्त्वज्ञानात उपादान किंवा प्रकृती ही महत्त्वाची संकल्पना आहे. पण रूप किंवा आकार प्रकृतीला मर्यादित, सीमीत करतो. प्रकृती अनंत असल्यामुळे म्हणजे कोणत्याही एका विवक्षित आकारामध्ये नि:शेष सामावू शकत नसल्यामुळे, आकार हा क्षणभंगुर, अखेर प्रकृतीत विलीन होणारा असतो आणि निराकार असणे हे प्रकृतीचे स्वत:चे स्वरूप असते, असा भारतीय दृष्टीकोन आहे. उपादानाचा स्वतःचा असा आकार असतो, तो आकार हे त्याचे खरेखुरे स्वरूप असते आणि हा आकार म्हणजे स्वत:चे खरेखुरे स्वरूप प्राप्त करून घेण्याची ओढ प्रत्येक उपादानाला असते. हा मूळचा ग्रीक असलेला पाश्चात्त्य दृष्टीकोन मात्र भारतीय तत्त्वज्ञानात आढळत नाही.

रेगे, मे. पुं.