शिलर, फेर्डिनांट कॅनिंग स्कॉट : (१६ ऑगस्ट १८६४–६ ऑगस्ट १९३७). ब्रिटिश तत्त्वज्ञ. जन्म जर्मनीतील हँबर्गजवळच्या ऑटनसेन गावी. शिक्षण इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात. त्याने तत्त्वज्ञानाचे अध्यापन प्रथम कॉर्नेल विद्यापीठात (१८९३-९७), नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात (१८९७-१९२६) व अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात (१९२९–३६) केले.

 विल्यम जेम्सच्या ⇨ फलप्रामाण्यवादाचा (प्रॅग्मॅटिझम) इंग्लंडमध्ये प्रसार करण्यात शिलरचा मुख्य भाग होता. माणूस हा सर्व गोष्टींचे प्रमाण आहे, हे ग्रीक तत्त्वज्ञ प्रोटॅगोरस याचे सूत्र शिलरला फार आवडत असे. सत्य आणि वास्तव ही मानवमान्य मूल्ये आहेत, असे मत त्याने आपल्या रिडल्स ऑफ द स्फिंक्स या पुस्तकात मांडले. मानवपरोक्ष वास्तव आहे आणि मानवाला त्याचे ज्ञान करून घ्यायचे आहे, या गोष्टीवर शिलरची श्रद्धा नव्हती. ⇨ फ्रान्सिस हर्बर्ट ब्रॅड्ली, मॅक्टॅगार्ट, ⇨ बर्नार्ड बोझांकेट या तत्कालीन इंग्लंडच्या अद्वैतवादी तत्त्वज्ञांविरुद्ध शिलरच्या तत्त्वज्ञानाचा रोख असल्याने त्याच्या भाषेत उपरोध बराच आढळतो. जरी विल्यम जेम्सचे तत्त्वज्ञान बऱ्याच अंशी त्याला पटले होते, तरी शिलरने आपल्या तत्त्वज्ञानाला फलप्रामाण्यवाद हे नाव न देता मानवतावाद (ह्यूमॅनिझम), पुरुषवाद किंवा व्यक्तिवाद (पर्सनॅलिझम), ऐच्छिकतावाद (व्हॉलंटरिझम) अशी नावे दिली.

शिलरचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : रिडल्स ऑफ द स्फिंक्स (१८९१), ह्यूमॅनिझम : फिलॉसॉफिकल एसेज (१९०३), स्टडिज इन ह्यूमॅनिझम (१९०७), प्रॉब्लेम ऑफ बिलीफ (१९२४), मस्ट फिलॉसॉफर्स डिस्ॲग्री? (१९३४), अवर ह्यूमन ट्रूथ्स (१९३९).

जीवशास्त्रातील क्रमविकासवादाच्या दृष्टीने मानवी बुद्धी हे निसर्गपरिसराशी सुमेळ साधण्याकरिता मानवाने निर्माण केलेले एक साधन आहे, हा सिद्धांत शिलरला पटला व या सिद्धांताच्या आधारे मानवाने आपल्या बुद्धीने निर्माण केलेल्या सर्व गोष्टींना – धर्म, तत्त्वज्ञान, कला, राजकारण इ. – मानवोपयोगी कृती यापेक्षा जास्त मोल देता येत नाही, असे शिलरचे मत होते. या गोष्टींत अंतिम सत्य किंवा वास्तवाचा शोध आहे, असे मानून त्यासाठी झगडण्यात मानव मानवी मूल्याशी प्रतारणा करीत असतो व जीवन दुःखमय बनवून घेतो. बदलत्या जीवनात आपल्याला सोयीस्करपणे ज्या गोष्टी बदलता येतील, त्या बदलून स्वतःच्या कर्तबगारीवर विसंबणे, हे परमेश्वरी कृपेची वाट पाहण्यापेक्षा अधिक बरे असे शिलरला वाटते. एखाद्या गोष्टीवर सत्य असा शिक्का मारण्याने मानव आपल्या ज्ञानसंवितींच्या क्रियेने वास्तवाला बदलून टाकतो आणि या प्रकारे आपल्या इच्छा आणि आकांक्षा आपल्या भोवतालच्या वास्तवाला घडविण्यात किती महत्त्वाचा भाग घेत असतात, हे सिद्ध करतो.

विल्यम जेम्स हा मानसशास्त्रज्ञ होता, तर्कशास्त्राचे त्याला वावडे होते. यामुळे आपल्या फलप्रामाण्यवादाच्या तत्त्वज्ञानाला तर्कशात्राचा आधार तो देऊ शकला नाही. फलप्रामाण्यवादाची विचारसरणी ज्यायोगे रास्त ठरविता येईल, अशा तर्कशास्त्राची रचना इंग्लंडमध्ये ज्यांनी केली, त्यात अल्फ्रेड सिज्विक आणि शिलर यांचा भाग मुख्य होता. व्यवहाराच्या दृष्टीने तर्कशास्त्राचे कार्य हेत्वाभास कसे टाळावे हे शिकविण्याचे आहे, असे मत सिज्विकने मांडले. ज्या विधानांपासून रूढ आकारिक तर्कशास्त्र सुरू होते, ते विचारकल्प व ती विधाने मुळातच मानवप्रणीत, मानवी भाषानियत असतात. त्यांचा एकमेकांशी मेळ घालण्यात अनेक हेत्वाभास निर्माण होतात. एका विधानातील धर्म हा शब्द व दुसऱ्या विधानातील धर्म हा शब्द यांचे अर्थ वेगळे असू शकतात पण हे लक्षात न घेतले, तर त्यावर आधारलेला तर्क खोटा ठरण्याचा संभव आहे. सिज्विकचे हे म्हणणे शिलरला पटले आणि त्याने आपल्या ग्रंथात आकारिक तर्कशास्त्राच्या फोलपणाविषयी पुष्कळ लिहिले. तर्कशास्त्राने अंतिम वैचारिक तत्त्वे हाती लागतात, हे त्याला मान्य नव्हते उलट, ते एक प्रायोगिक शास्त्र असून विज्ञान व मानसशास्त्र यांच्या संगतीतच ते वाढीस लागले, अशी त्याची श्रद्धा होती. विचारक्रिया जीवशास्त्रीय आधारावर समजून घेता आली पाहिजे, असा त्याचा आग्रह होता. शब्दांना किंवा भाषेला अर्थ प्राप्त होतो तो त्यांच्या व्यवहारामुळे, आणि तर्काचे नियम हे कुठल्याही अंतिम सत्याचे द्योतक नसून केवळ व्यवहारनियंत्रणासाठी मानवाने मानलेली गृहीततत्त्वे आहेत, असे शिलरचे स्पष्ट मत होते. ब्रॅड्लीने संस्थापनेला विधानाच्या नीच कोटीला उतरविले आहे, अशी टीका शिलरने केली आहे कारण त्याच्या मते विचार-संस्थापना ही वैयक्तिक गोष्ट आहे, तिच्यामागे विशिष्ट वैयक्तिक हेतू आहेत आणि म्हणून कोणत्याही विधानात तर्कशुद्ध, व्यवहारपरोक्ष अर्थ असतो, हे मानणे चुकीचे आहे. तर्क हा केवळ विधानसंगतीने साधणे शक्य नाही. ज्या उद्देशाने शब्द आणि वाक्ये वापरलेली असतील. तो उद्देश ध्यानात घ्यायला हवा. जॉन शहाणा आहे, हे वाक्य उपरोधाने किंवा विनोदाने म्हटले गेले असेल. त्या त्या उद्देशाप्रमाणे त्यावर आधारलेला तर्क वेगळा असू शकतो. आकारिक तर्कशास्त्र याबाबतीत कुचकामाचे ठरेल. म्हणून खरे तर्कशास्त्र हे सूचकशास्त्र (थिअरी ऑफ इन्क्वायरी ) असले पाहिजे. भाषेत व विचारात व्यवहारदृष्ट्या कोणते दोष व हेत्वाभास निर्माण होतात, यांचा अभ्यास त्यात व्हायला पाहिजे.

शिलरने सुचविलेल्या तर्कशास्त्राची रचना पुढे ⇨ जॉन ड्यूई या फलप्रामाण्यावादी अमेरिकन तत्त्वज्ञाने केली. शिलर व ड्यूई या दोघांनाही कांटपेक्षा हेगेलचे तत्त्वज्ञान अधिक पटले होते आणि दोघांच्याही मते वास्तव ज्ञानासाठी मानवी विचारक्रिया महत्त्वाची आहे. यासंबंधात विल्यम जेम्सच्या मानसशास्त्रातील व्यक्तिवादी आणि स्वकेंद्रित आशयावर शिलरने भर दिला उलट, ड्यूईने त्यातील परोक्ष व सामाजिक आशय उचलून धरला. त्यामुळे शिलरच्या मते ज्ञानासाठी वास्तव मानवापुढे दत्त म्हणून उभे नसून वास्तवाचे अवश्य ते स्वरूप स्वीकारून मानव हा त्याला जोपर्यंत गृहीत बनवत नाही, तोपर्यंत वास्तवाचे ज्ञान अशक्य आहे. मानवाने ग्रहण केलेले वास्तव हेच अंतिम होय, असे शिलरचे मत होते. उलट, विल्यम जेम्सच्या तत्त्वज्ञानात मानवपरोक्ष वास्तवाची स्वतंत्रता मान्य केलेली आढळते. यामुळेच शिलर आपल्या तत्त्वज्ञानाला मानवतावाद किंवा व्यक्तिवाद अशी नावे देतो. शिलरचा हा व्यक्तिवाद इतक्या थराला गेला, की इंग्लंडची लोकशाही ढोंगी आहे, अशी टीका करून त्याने तत्कालीन इंग्लंडमधील फॅसिस्ट पक्षाला उचलून धरले. शिलर तरुणपणी अमेरिकेला गेला होता म्हणून त्याच्या डोक्यात अमेरिकेचा फलपामाण्यावाद अकाली शिरला, अशी टीका त्याच्यावर केलेली आढळते.

संदर्भ : Abel, R. The Pragmatic Humanism of F. C. S. Schiller, New York, 1955.

माहुलकर, दि. द.