बेंथॅम, जेरेमी:(१५ फेब्रुवारी १७४८ – ६ जून १८३२). इंग्लंडमधील उपयुक्ततावादी नैतिक पंथाचा संस्थापक असे बेंथॅम यांना मानता येईल. हाउंडस्‌डिच, लंडन येथे जन्म. ऑक्सफर्ड येथील क्वीन्स कॉलेजमधून वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी पदवी घेतली.एकोणीस वर्षांचे असताना ‘लिंकन्स इन’ मधून ते बॅरिस्टर झाले. आपला वकिलीचा वडिलार्जित व्यवसाय त्यांनी कधी केला नाही पण इंग्लिश कायद्यांची जी संहिता होती तिला सुव्यवस्थित रूप देण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. हे कायदे इतिहासात हळूहळू घडत आणि बदलत आले होते आणि म्हणून त्यांच्यात अनेक कालबाह्य गोष्टी टिकून राहिल्या होत्या आणि संदिग्धता, विसंगती, निष्कारण गुंतागुंत इ. दोष मोठ्या प्रमाणावर होते. ह्या संहितेच्या जागी एक सुस्पष्ट, सुसंगत, सरळ आणि मानवतावादी प्रेरणा आणि उद्दिष्टे यांच्यावर आधारलेल्या कायद्यांच्या संहितेची स्थापना करण्याच्या कार्याला बेंथॅम यांनी वाहून घेतले. हे त्यांचे प्रमुख जीवितकार्य होते. पण त्याच्या अनुषंगाने आणि त्याचे साधक म्हणून त्यांनी नैतिक आणि राजकीय तत्त्वज्ञान आणि ज्ञानमीमांसा या क्षेत्रांतही महत्त्वाचे कार्य केले आहे. लंडन येथे ते निधन पावले.

जेरेमी बेंथॅम

लेखनाच्या बाबतीत बेंथॅम बहुप्रसव होते, परंतु आपले बरेचसे लिखाण त्यांनी अर्धवट सोडले आहे आणि पूर्ण केलेले काही ग्रंथही प्रसिद्ध करण्याची तसदी त्यांनी घेतलेली नाही. त्यांचे काही लिखाण एत्थेन द्यूमाँ (१७५९-१८२९) ह्या त्यांच्या एका स्विस अनुयायाने केलेल्या फ्रेंच भाषांतराच्या स्वरूपात प्रथम प्रसिद्ध झाले.

न इन्ट्रोडक्शन टू द प्रिन्सिपल्स ऑफ मॉरल्स अँड लेजिस्लेशन (म. शी. ‘नीती आणि कायदे यांच्या तत्त्वांची ओळख’) हा त्यांचा ग्रंथ त्यांनी स्वतः १७८९ साली प्रसिद्ध केला. ह्यापूर्वी शिक्षा देण्याच्या तात्त्विक अधिष्ठानाचे सोपपत्तिक विवेचन करणारा एक प्रबंध त्यांनी लिहिला होता पण ३५ वर्षांनी द्यूमाँ यांनी त्याचे, बेंथॅम यांच्या इतर काही लिखाणाची त्याच्यात भर घालून, जे फ्रेंच भाषांतर प्रसिद्ध केले तेव्हा तो प्रथम जगापुढे आला. तसेच ⇨ विल्यम ब्लॅकस्टोन (१७२३-८०) ह्या प्रसिद्ध कायदेशास्त्रज्ञाने इंग्लिश कायद्यांवर भाष्यकरणारा जो ग्रंथ लिहिला आहे (कॉमेंटरीज ऑन द लॉज ऑफ इंग्लंड – १७६५-६९) त्याच्यावरही बेंथॅम यांनी विस्तृत भाष्य लिहिले होते. ते जवळजवळ दीडशे वर्षानंतर १९२८ मध्ये प्रसिद्ध झाले. पण त्यातील एक भाग अ फ्रॅग्मेंट ऑन गव्हर्नमेंट (‘सरकारविषयी खंड’) ह्या नावाने १७७६ मध्ये प्रसिद्ध झाला. ह्याशिवाय ब्रिटिश कायदेव्यवस्थेच्या अनेक अंगांवर आणि विशेषांवर त्यांनी बरेच स्फुट लिखाण केले आहे. त्यांची इतर तात्त्विक पुस्तके म्हणजे : अ बुक ऑफ फॅलसीज (१८२४ – ‘तर्काभास संग्रह’), रॅशनेली ऑफ ज्युडिशिअल एव्हिडन्स (१८२७ – ‘न्यायालयीन पुराव्याची तात्त्विक उपपत्ती’), डीऑन्टॉलॉजी (१८३४ – ‘दंडकशास्त्र’ मरणोत्तर) ही होत. ही पुस्तके त्यांनी केलेल्या कच्च्या लिखाणाचे इतरांनी संपादन करून प्रसिद्ध केली आहे. कॉन्स्टिट्यूशनल कोड (प्रथम खंड १८३० – ‘राज्यघटना – संहिता’) ह्या आपल्या ग्रंथाकडे ⇨ कॅथरिन द ग्रेट ह्या रशियन राणीचे तसेच यूरोपमधील इतर राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून राज्यपद्धतीत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्नही बेंथॅम यांनी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात केला.


बेंथॅम यांचा प्रभाव रशिया, फ्रान्स इ. यूरोपीय देश तसेच नव्याने उदयाला आलेली अमेरिका यांच्यावर काही प्रमाणात पडला होता यात शंका नाही. पण त्यांचा खराखुरा व टिकाऊ प्रभाव इंग्लंडमध्येच दिसून येतो. जेम्स मिल, जॉन स्ट्यूअर्ट मिल हे पितापुत्र आणि जॉन ऑस्टिन हे न्यायशास्त्रवेत्ते बेंथॅम यांच्या प्रमुख अनुयायांपैकी काही होत. बेंथॅम यांचे अनुयायी ‘तात्त्विक जहालमतवादी’ (‘फिलॉसॉफिकल रॅडिकल्स’) म्हणून ओळखण्यात येऊ लागले. वेस्टमिन्स्टर रिव्ह्यू हे नियतकालिक तात्त्विक जहालमतवादी आंदोलनाचे मुखपत्र म्हणून सुरू करण्यात आले. लंडन येथील ‘युनिव्हर्सिटी कॉलेज’ ची स्थापना करण्याचे श्रेयही ह्याच आंदोलनाचे आहे. ब्रिटिश समाजव्यवस्थेचे आणि मनोवृत्तीचे ‘आधुनिकीकरण’ करण्यात ह्या आंदोनलनाने मोठीच कामगिरी बजावली. ‘फेबिअन समाजवाद’ हे ह्या आंदोलनाचेच एक अपत्य आहे, असे म्हणता येईल.

तत्त्वज्ञान:उपयुक्ततावादी नैतिक उपपत्तीच्या सुव्यवस्थितपणे केलेल्या मांडणीमुळे बेंथॅम मुख्यतः प्रसिद्ध आहेत. सुसंगत अशा नैतिक उपपत्तीची बेंथॅम यांना जी आवश्यकता भासत होती, ती मूलतः इंग्लिश कायद्यांच्या संहितेतला सुसंगत, सुव्यवस्थित आणि विवेकानुसारी स्वरूप देण्यासाठी. त्यांच्या मताप्रमाणे हे साधण्यात मुख्य अडचण प्रातिभज्ञानवादाचा अथवा अंतःप्रज्ञावादाचा लोकांवर जो पगडा होता त्याच्यातून उद्‌भवत होती. [⟶ अंतःप्रज्ञावाद]. प्रातिभज्ञानवादाप्रमाणे कित्येक प्रकारची कृत्ये (उदा., सत्य बोलणे) स्वरूपतःच योग्य किंवा नैतिक असतात आणि कित्येक प्रकारची कृत्ये (उदा., वचनभंग करणे) स्वरूपतःच अयोग्य किंवा अनैतिक असतात असे सरळ, साक्षात् ज्ञान, म्हणजेच प्रातिभज्ञान आपल्याला असते. ही कृत्ये स्वरूपतः योग्य किंवा अयोग्य असतात ह्या म्हणण्याचा अर्थ असा, की त्यांच्यापासून निष्पन्न होणारे परिणाम काहीही असोत त्यांचे स्वरूपच असे असते, की केवळ त्यांच्यामुळे ती योग्य किंवा अयोग्य ठरतात. आता बेंथॅम यांचे म्हणणे असे आहे, की प्रत्यक्षात कित्येक प्रकारची कृत्ये आपल्याला रूचतात आणि कित्येक प्रकारच्या कृत्यांचा आपल्याला तिटकारा किंवा उबग असते. आणि ह्या आपल्या भावनांना आणि त्यांच्यावर आधारलेल्या पूर्वग्रहांना आपण प्रातिभज्ञानाचा दर्जा आणि प्रामाण्य देतो. कायदे अनेकदा अशा पूर्वग्रहांवर आधारलेले असतात. उदा., लैंगिक विकृतीच्या कृत्यांविषयी आपल्याला उबग असते. म्हणून त्यांना कठोर शिक्षा देणारे कायदे करण्यात येतात. उलट ज्यांच्यामुळे समाजाचे खूपच अहित घडून येते अशाकृत्यांविषयी अशा तीव्र भावना आपल्याला अनेकदा असत नाहीत व म्हणून त्यांना सौम्य शिक्षा देणारे कायदे आपण करतो.

सार्वत्रिकपणे आणि निरपवादपणे प्रमाण असलेल्या नैतिक नियमांचे साक्षात् ज्ञान आपल्याला असते, असे मानल्याने आणखी एक अडचण निर्माण होते असेही बेंथॅम यांचे म्हणणे आहे. उदा., ‘वचनभंग करणे गैर असते’ ह्या सार्वत्रिक तत्त्वाला अनुसरून कायदा करण्यात येतो आणि वचनभंगांच्या कृत्यांना शिक्षा करण्यात येतात. परंतु अनेक करार सार्वजनिक हिताच्या किंवा मान्य अशा सार्वजनिक उद्दिष्टांच्या विरोधी असतात. अशा करारांची अंमलबजावणी करायला कायदे नाखूष असतात. परंतु वचनभंगाचे कृत्य गैर असते हा निरपवाद नियम नाही, सार्वजनिक हिताला पोषक असणारी कृत्ये योग्य असतात आणि त्याला प्रतिकूल असणारी कृत्ये गैर असतात ह्या वरिष्ठ तत्त्वाशी सुसंगत ठरेल अशा पद्धतीने हा नियम लावावा लागतो, असे कायदेपंडित म्हणत नाहीत. ते असे म्हणतात, की वचनभंगाचे कृत्य गैर असते हे सार्वत्रिक व निरपवाद तत्त्व खरे आहे परंतु जेव्हा करार हा सार्वजनिक हिताच्या विरोधी असतो तेव्हा तो खराखुरा करारच नसतो, तो करार झालेलाच नसतो, आणि म्हणून त्याचा भंग करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. म्हणजे वचनभंगाचे कृत्य सदैव गैर असते, ह्या तत्त्वाचे सार्वत्रिक प्रामाण्य सुरक्षित राखण्यासाठी प्रत्यक्षात झालेले करार झालेलेच नसतात अशी बतावणी करावी लागते असे एक विधि-कल्पित (लीगल फिक्शन) रचावे लागते. बेंथॅम यांची तक्रार अशी होती, की निरपवाद अशा प्रातिभ तत्त्वांवर जर कायदे आधारले, तर कायद्यांच्या उपपत्तीमध्ये आणि व्यवहारात अशा विधीकल्पितांचा सुळसुळाट होतो.

 तेव्हा, कायद्यांना सुसंगत आणि सुटसुटीत स्वरूप देण्यासाठी एका मूलभूत आणि व्यापक अशा तत्त्वाची आवश्यकता होती. बेंथॅम यांच्या मताप्रमाणे हे तत्त्व म्हणजे ‘उपयुक्तते’चे तत्त्व होय. ह्या तत्त्वाचे स्पष्टीकरण असे करता येईल : ज्या कृत्याचा परिणाम म्हणून अधिकात अधिक व्यक्तींना अधिकात अधिक सुख प्राप्त होते ते कृत्य योग्य होय. ह्या तत्त्वात असे गृहीत आहे, की कोणतेही सुख हे सुख म्हणून नेहमीच चांगले किंवा इष्ट असते आणि अर्थात सुखाच्या विरोधी असलेले दुःख हे नेहमीच वाईट किंवा अनिष्ट असते. तेव्हा एखादे कृत्य योग्य आहे की नाही, हे ठरविण्यासाठी प्रथम त्याचे सर्व संबंधितावर जे सुखदुःखस्वरूप परिणाम होतील त्यांतील सुखांची बेरीज करावी लागेल, त्याचप्रमाणे दुःखांचीही बेरीज करावी लागेल आणि सुखांच्या बेरजेतून दुःखांची बेरीज वजा करावी लागेल. ह्या वजाबाकीतून जे सुख (किंवा दुःख) बाकी राहिल त्याला शिलकी सुख (किंवा दुःख) म्हणूया. आता ‘‘एखाद्या प्रसंगी किंवा परिस्थितीत जी भिन्न कृत्ये करता येणे शक्य असते त्यांतील ज्या कृत्याचा परिणाम म्हणून सर्वांत अधिक शिलकी सुख (किंवा सर्वांत कमी शिलकी दुःख) अस्तित्त्वात येते, ते कृत्य त्या प्रसंगातील किंवा परिस्थितीतील योग्य कृत्य होय’’, हे तत्त्व म्हणजे उपयुक्ततेचे तत्त्व होय. म्हणजे कृत्य नैतिक दृष्ट्या योग्य आहे की नाही हे त्याच्या स्वतःच्या स्वरूपावरून ठरत नाही, ते त्याच्या परिणामांवरून ठरते. ज्या परिणामांवरून हे ठरते ते केवळ त्या कृत्यापासून निष्पन्न होणारी सुखे आणि दुःखे ह्या स्वरूपाचे परिणाम होत. शिवाय कृत्याच्या ज्या सुखदुःखात्मक परिणामांवरून ते योग्य आहे किंवा नाही हे ठरते, ते केवळ त्या कृत्याच्या कर्त्याला प्राप्त होणारे सुखदुःखात्मक परिणाम नव्हेत, त्या कृत्यापासून जी काही सुखदुःखे निष्पन्न होतील – मग ती कुणालाही भोगावी लागोत-त्या सर्वांची बेरीज-वजाबाकी केल्यावर उरणारे शिलकी सुख (किंवा दुःख), ते कृत्य योग्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी ध्यानात घ्यावे लागते. एखाद्या कृत्यापासून निष्पन्न होणारे असे शिलकी सुख (किंवा दुःख),त्या परिस्थितीत शक्य असलेल्या कोणत्याही पर्यायी कृत्यापासून निष्पन्न होणाऱ्या शिलकी सुखापेक्षा अधिक किंवा निदान त्याच्याएवढे (किंवा शिलकी दुःखापेक्षा कमी, किंवा त्याच्याएवढे) असेल, तरचे ते कृत्य योग्य ठरते. कृत्यापासून निष्पन्न होणाऱ्या शिलकी सुखदुःखाचे गणन करताना त्या कृत्याचा परिणाम म्हणून कुणालाही प्राप्त होणारी सुखदुःखे बेरीज-वजाबाकीत धरावी लागत असल्यामुळे उपयुक्ततेचे तत्त्व थोडक्यात असे मांडण्यात येते : ‘ज्या कृत्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख साधले जाते, ते कृत्य योग्य होय.’

ह्या तत्त्वाविषयी उपस्थित होणारा एक प्रश्न असा, की ते सत्य किंवा प्रमाण आहे हे आपल्याला कसे कळते ? बेंथॅम यांचे स्वतःचे म्हणणे असे, की हे तत्त्व सिद्ध करता येत नाही. इतर गोष्टी सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो ‘विशिष्ट परिस्थितीत करण्यात आलेले अमुक कृत्य योग्य होते’ अशा स्वरूपाची विधाने सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. परंतु विधाने सिद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. परंतु विधाने सिद्ध करण्यासाठी प्रमाणांची जी मालिका देण्यात येते तिला कुठेतरी प्रारंभ व्हावा लागतो. ज्या अंतिम तत्त्वांवर ती प्रमाणांची मालिका आधारलेली असते ती तत्त्वे सिद्ध करता येत नाहीत पण त्यांच्यापासून इतर तत्त्वे सिद्ध करता येतात. उपयुक्ततेचे तत्त्व हे असे अंतिम तत्त्व आहे असे बेंथॅम यांचे म्हणणे आहे. आता जे सिद्ध करता येत नाही असे अंतिम तत्त्व आपण सत्य म्हणून का स्वीकारतो ? याचे एक स्पष्टिकरण, असे असते, की अशी तत्त्वे स्वतः प्रमाण असतात. हे स्पष्टीकरण अर्थात् बेंथॅम स्वीकारू किंवा देऊ शकत नाहीत. कारण स्वतःप्रमाण असलेल्या तत्त्वांच्या प्रामाण्याचे साक्षात् दर्शन ज्याच्यात आपल्याला घडते अशा प्रातिभज्ञानाची संकल्पना ते अमान्य करतात. असे प्रातिभज्ञान असत नाही, सर्व विधानांची सत्यता अखेरीस अनुभवाच्या आधारे सिद्ध करावी लागते, अशी त्यांची भूमिका आहे. तेव्हा उपयुक्ततेचे तत्त्वही अनुभवाच्या आधारेच सिद्ध करावे लागेल.

उपयुक्ततेच्या तत्त्वात दोन गोष्टी अंतर्भूत आहेत:एक, फक्त सुख चांगले असते आणि म्हणून फक्त सुख साधणे योग्य असते. दुसरी गोष्टी अशी की, व्यक्तीने केवळ स्वतःचे सुख साधण्याचा प्रयत्न न करता सर्वांचे सुख साधण्याचा प्रयत्न करणे योग्य असते. ‘सुख चांगले असते’ ह्या विधानाचा अर्थ बेंथॅम ‘माणसांना सुखाची इच्छा असते’ असा करतात. आता ‘सुख’ ह्या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. एक अर्थ, असा की माणसांना अनेक गोष्टींची इच्छा असते आणि सुख ही ह्या अनेक गोष्टींमधील एक गोष्ट होय. उदा., माणसाला अन्न, निवारा, सत्ता, कीर्ती इ. अनेक गोष्टी जशा हव्या असतात तसेच सुख ही आणखी एक गोष्ट हवी असते. ‘सुख’ ह्याचा असा अर्थ लावला, तर ‘फक्त सुख चांगले असते’ ह्याचा अर्थ ‘माणसाला जरी अनेक गोष्टींची इच्छा असली तरी फक्त सुख ही गोष्ट अशी आहे, की त्याची इच्छा माणसाने धरणे योग्य असते’


असा लावावा लागेल आणि मग हे तत्त्व सिद्ध करावे लागेल. माणूस ज्या अनेक भिन्न गोष्टींची इच्छा धरतो त्यांतील सुख ही एक गोष्ट होय, असा ‘सुख’ ह्याचा अर्थ बेंथॅम यांनी आपल्या लिखाणात घेतलेला आढळत असला, तरी एकंदरीत ‘सुख’ ह्याचा वेगळा अर्थ त्यांना अभिप्रेत आहे. ह्या अर्थाप्रमाणे ‘माणूस सुख साधण्याचा प्रयत्न करतो’ ह्याचा अर्थ केवळ ‘माणूस आपल्या इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करतो’ असा होतो. ‘एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची इच्छा आहे’ ह्या म्हणण्यात ती गोष्ट साध्य करण्याचा प्रयत्न तो करील हे अभिप्रेत असते. आता माणसाला जर इच्छा असतात व त्या तृप्त करण्याचा तो प्रयत्न करतो हा मनुष्यस्वभाव आहे एवढाच ह्याचा अर्थ घ्यायचा आहे. ‘माणसाने आपले अधिकात अधिक सुख साधणे योग्य असते’ ह्याचा अर्थ ‘माणसाने आपल्या अधिकात अधिक इच्छा तृप्तकरण्याचा प्रयत्न करणे योग्य असते’ तेव्हा ज्या कृत्याने माणसाच्या जास्तीत जास्त इच्छा तृप्त होतील ते योग्य कृत्य होय, म्हणजे विवेकाला धरून होय हे ओघानेच येते.

पण उपयुक्ततेच्या तत्त्वात समाविष्ट असलेली दुसरी गोष्ट अशी, की व्यक्तीने स्वतःच्या इच्छांइतकेच इतरांच्या इच्छेचे समाधान करणे योग्य असते. म्हणजे ज्यांच्यामुळे जास्तीत जास्त इच्छांचे समाधान होईल, मग त्या इच्छा कुणाच्याही असोत, अशी कृत्ये माणसाने करणे योग्य असते. हे तत्त्व प्रमाण आहे हे सिद्ध करता येईल, हा प्रश्न आहे आणि त्याची बेंथॅम यांनी गंभीरपणे दखल घेतलेली नाही. पण त्याचे व्यावहारिक उत्तर त्यांनी दिले आहे. माणूस स्वतःच्या इच्छा तृप्त करण्याचा स्वाभाविकपणे प्रयत्न करीत असतो, पण माणसाला स्वतःच्या इच्छा स्वतःविषयीच्या इच्छा असतात असे नसते. माणसाला इतरांविषयी प्रेम किंवा आत्मीयता असते. ‘सहानुभूती’ हा मनुष्यस्वभावाचा विशेष आहे. आणि म्हणून स्वतःला स्वतःसाठी जे हवे असते ते साधण्याचा माणूस जसा स्वाभाविकपणे प्रयत्न करतो, त्याप्रमाणे इतरांना जे हवे असते ते साधण्याचाही माणूस स्वाभाविकपणे प्रयत्न करतो. पण भिन्न व्यक्तींच्या हितसंबंधांत, व्यक्तीला स्वतःसाठी जे हवे असते आणि इतरांना आपल्यासाठी जे हवे असते त्याच्यात जसा काही प्रमाणात सुसंवाद असतो त्याप्रमाणे काही प्रमाणात विरोधही असतो. ह्या विरोधाचे निराकरण करणे आणि सर्व व्यक्तींच्या हितामध्ये सुसंवाद स्थापन करणे हे कायदे करणारांचे काम आहे. जे कृत्य केल्याने माझा जेवढा लाभ होईल त्यापेक्षा इतरांची अधिक हानी होणार असते त्या कृत्याशी कायद्याने शिक्षेची सांगड घालू‌न दिली पाहिजे. आणि ही शिक्षा एवढी असली पाहिजे, की तिच्यामुळे होणारी माझी हानी ते कृत्य केल्याने माझा जो लाभ होईल त्याच्याहून अधिक आहे, असे मला दिसले पाहिजे. मग ते कृत्य मी करणार नाही व मी ते केले असते तर त्यामुळे इतरांची, मला होणाऱ्या लाभापेक्षा अधिक अशी जी हानी झाली असती ती टळेल. तेव्हा समाजामध्ये भिन्न व्यक्तींच्या हितामध्ये सहानुभूतीवर आधारलेला असा जो स्वाभाविक सुसंवाद असतो त्याला पूरक असा सुसंवाद कृत्रिमपणे निर्माण करणे हे कायद्याच्या व्यवस्थेचे कार्य असते.

सुखाचे गणन करता येते, सुखदुःखाची बेरीज-वजाबाकी करता येते हे बेंथॅम यांच्या विचारामध्ये गृहीत आहे. ह्या विधानाला अनेकांनी आक्षेप घेतला आहे. कधीकधी बेंथॅम सुखाचा तसेच दुःखाचा एकक असतो, असे मानतात. कोणतेही सुख किंवा दुःख किती एककांचे बनले आहे हे ठरविता येते व म्हणून एखाद्या कृत्यापासून जी सुखदुःखे निष्पन्न होतील त्यांतील सर्व सुखे एकत्र केली असता सुखांचे एकक होतील ते मोजून त्यांतून दुःखाचे एकंदर एकक वजा करता येतील, अशी भाषा ते वापरतात. ह्या विचाराचा पाठपुरावा करून बेंथॅम यांनी गुंतागुंतीचे ‘सुखगणन’ (हिडॉनिस्टिक कॅल्क्युलस) रचले आहे. विशिष्ट सुखाच्या परिणामाचे मापन करताना त्याच्या ज्या भिन्न ‘परिमिति’ ध्यानात घ्याव्या लागतील त्या त्यांनी निश्चित केल्या आहेत. त्यांनी नमूद केलेल्या परिमिती अशा : तीव्रता, अवधी, निश्चिती, सामीप्य, प्रसवता (विशिष्ट सुखानुभवाचा परिणाम म्हणून निर्माण होणारी इतर सुखे) आणि शुद्धता. उदा., अधिक तीव्र पण अल्पकाळ टिकणाऱ्या सुखापेक्षा कमी तीव्र पण अधिक काळ टिकणारे सुख अधिक मोठे म्हणजे अधिक एककांचे बनले असणे शक्य आहे, इत्यादी.

परिमाणाच्या दृष्टीने पाहता एक सुख दुसऱ्या सुखापेक्षा मोठे किंवा लहान असू शकते. अशा परिणामात्मक भेदाशिवाय गुणात्मक असा भेद दोन सुखांमध्ये नसतो, असेही बेंथॅम यांचे मत होते. सुखांचे भिन्न प्रकार असतात हे बेंथॅम अमान्य करीत नाहीत. पण एकाप्रकारचे सुख स्वरूपतः दुसऱ्या प्रकारच्या सुखापेक्षा श्रेष्ठ असते आणि म्हणून त्या प्रकारचे सुख दुसऱ्या प्रकारच्या सुखापेक्षा कितीही कमी असले, तरी ते दुसऱ्या प्रकारच्या सुखाऐवजी पसंत करणे योग्य असते, ही भूमिका ते नाकारतात. ज्यांना आपण उच्च प्रकारची सुखे म्हणतो – उदा., बौद्धिक सुख हे शारीरिक सुखापेक्षा उच्चअसते असे आपण मानतो- ती ती सुखाची सर्व परिमाणे ध्यानात घेतली, – विशेषतः अवधी, शुद्धता आणि बहुप्रसवता ही परिमाणे ध्यानात घेतली-तर परिमाणात्मक दृष्ट्याच मोठी ठरतात व म्हणून ती निवडणे योग्य असते, असे बेंथॅम यांचे म्हणणे आहे.

परंतु सुखाचा एकक असतो असे गृहती धरून विशिष्ट सुखांच्या परिमाणाचे काटेकोरपणे मापन करता येते, ही भूमिका बेंथॅम यांनी स्वीकारण्याचे कारण नाही. अनेकदा ते वेगळ्या भाषेत बोलतातही. दोन सुखांची ढोबळ मानाने तुलना करून एक दुसऱ्यापेक्षा मोठे आहे एवढे ठरविता येते एवढी गोष्ट मान्य झाली, की कोणते सुख पसंत करावे आणि कोणते कृत्य करणे योग्य ठरेल यांचा निर्णय करण्याचा मार्ग मोकळा रहातो, ही भूमिकाही ते अनेकदा मांडतात.

न्याय ह्या तत्त्वाची संगती कशी लावता येईल हा उपयुक्ततेच्या तत्त्वाच्या दृष्टीने एक अडचणीचा प्रश्न आहे. ज्या कृत्यामुळे एकंदरीत अधिकात अधिक सुख साधले जाते ते कृत्य योग्य होय, त्याचा परिणाम म्हणून एखाद्या व्यक्तीच्या वाट्याला दुःख येत असले, तरी ते कृत्य योग्य होय असे उपयुक्ततेच्या तत्त्वाप्रमाणे ठरते. पण इतरांचे अधिक सुख साधण्यासाठी निरपराध व्यक्तीला दुःख भोगावे लागणे न्यायाला धरून आहे का ? स्थूलमानाने न्यायाची तत्त्वे दोन आहेत व ती अशी मांडता येतील : (१) ज्या विशिष्ट परिस्थितीत इष्ट वस्तूंचे, म्हणजे सुखाचे, वाटप विषमपणे करण्यासाठी योग्य कारणे असतात त्या वगळल्या तर एऱ्हवी सुखाचे समान वाटप करणे योग्य असते. (२) अपराधी माणसाला त्याच्या अपराधासाठी म्हणून, अपराधाच्या प्रमाणात शिक्षा, म्हणजे दुःख, देणे योग्य असते. आता बेंथॅम ज्या कृत्यामुळे सर्व संबंधितांना समान सुख लाभेल ते योग्य कृत्य होय असे मानीत नाहीत तर ज्या कृत्यामुळे सर्वांत अधिक सुखाची निष्पत्ती होईल, मग त्याचे वाटप कसेही होवो, ते कृत्य योग्य होय असे ते मानतात. म्हणजे ते ‘महत्तमीकरणा’ चे तत्त्व मानतात, समानतेचे मानीत नाहीत. पण महत्तमीकरणाच्या तत्त्वाच्या अनुषंगाने समानतेचे तत्त्व व्यवहारात स्वीकारावे लागते असेही त्यांचे म्हणणे आहे. हे ‘उतरत्या सीमान्त मूल्या’ च्या नियमाला अनुसरून घडते. ह्याचा उलगडा असा करता येईल : व्यक्तीला जेवढे अधिक सुख असेल त्या प्रमाणात तिच्या सुखात जी भर पडेल तिचे मूल्य कमी असते, हा उतरत्या


सीमान्त मूल्याचा नियम होय. तेव्हा अ चे सुख जर १०० असेल आणि ब चे सुख ५० असेल तर अ च्या सुखात ५ सुखाची भर घातल्याने एकंदर सुखात जी वाढ होईल तिच्यापेक्षा ब च्या सुखात ५ सुखाची भर घातल्याने होणारी वाढ अधिक असेल. म्हणजे अ च्या सुखाऐवजी ब च्या सुखात ही भर घालणे महत्तमीकरणाच्या तत्त्वाला अनुसरून होईल. म्हणजे जेव्हा सुखाचे विषम वाटप असते तेव्हा ज्यांच्या वाट्याला अधिक सुख असते, त्यांच्या सुखाऐवजी ज्यांच्या वाट्याला कमी सुख आलेले असते त्यांच्या सुखात भर घालणे महत्तमीकरणाच्या तत्त्वाला धरून असते. अशा रीतीने समानतेचे तत्त्व महत्तमीकरणाच्या तत्त्वात अनुस्थूत असले, तरी त्याचा अधिकार गौणच असतो. कारण अ चे सुख १०० व ब चे सुख ५० असताना जर क्ष या कृत्याने अ च्या सुखात १०० ची व ब च्या सुखात ५ ची भर पडत असेल व य ह्या कृत्याने अ च्या सुखात १० ची व ब च्या सुखात २० ची भर पडणार असेल, तर निश्चितपणे क्ष हे कृत्य योग्य ठरेल.

अपराधी माणसाला त्याच्या अपराधामुळे आणि अपराधाच्याप्रमाणात शिक्षा -दुःख – देणे योग्य आहे ह्या न्यायाच्या दुसऱ्या तत्त्वाची संगती बेंथॅम पुढे दिल्याप्रमाणे लावतात : कुणालाही दुःख देण्याच्या कृत्याकडे दुःख देण्याचे कृत्य एवढ्यापुरतेच पाहिले तर ते गैर ठरते. पण अशा कृत्यापासून, ते जेवढे दुःख देते त्याच्याहून अधिक सुखाची निष्पत्ती जर होत असेल, तर ते योग्य ठरते. आता ज्या कृत्यांमुळे समाजात दुःख निर्माण होते अशा कृत्यांना शिक्षा देण्यात येत असते. शिक्षा ही दुःखद असते. पण समाजविघातक कृत्यांना नियमाने शिक्षा होते असा अनुभव जर लोकांना आला, तर शिक्षेचे दुःख टाळण्यासाठी लोक अशा कृत्यांपासून परावृत्त होतील व ती कृत्ये करण्यात आल्याने समाजात जे दुःख निर्माण झाले असते ते टळेल. यामुळे शिक्षा देण्याचे कृत्य दुःखद असले, तरी योग्य असते. पण शिक्षेमुळे हा इष्ट परिणाम घडून येण्यासाठी अपराध करणाऱ्याला निरपवादपणे शिक्षा होणे आवश्यक असते. नाहीतर अपराध केला, तरी शिक्षा न होणे शक्य आहे असे लोकांना वाटून ते समाजविघातक कृत्ये करायला प्रवृत्त होतील. तेव्हा अपराधाला योग्य त्या प्रमाणात शिक्षा झाली पाहिजे हा न्यायाचा नियम उपयुक्ततेच्या तत्त्वापासून प्राप्त होतो, असे बेंथॅम यांचे म्हणणे आहे.

ह्या विवेचनापासून निष्पन्न होणारा दुसरा एक मुद्दा असा:प्रत्येक विशिष्ट प्रसंगी कोणते कृत्य केल्याने समाजात जास्तीत जास्त सुख निर्माण होईल असा विचार करीत न बसता, कोणत्या प्रकारच्या परिस्थितीत कोणत्या प्रकारची कृत्ये केल्याने समाजात अधिकात अधिक सुख निर्माण होईल हे ठरवावे आणि त्या, त्या प्रकारच्या परिस्थितीत त्या, त्या प्रकारची कृत्ये नियमाने करीत रहावे अशी व्यवस्था अधिक लाभदायक असते, असे अनुभवाने दिसून येते. मात्र ही व्यवस्था परिणामकारक ठरण्यासाठी अगदीच अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर हे नियम कसोशीने पाळले जाणे आवश्यक असते. म्हणजे उपयुक्ततेच्या तत्त्वाला अनुसरून समाजात जास्तीत जास्त सुख निर्माण करणारे असे आचरणाचे योग्य नियम निष्पन्न करता येतात.

राजसंस्थेची घडण कशी असावी, राज्यसंस्थेचे अधिकार कोणते असावेत, नागरिकांची राज्यसंस्थेविषयक कर्तव्ये काय आहेत इ. प्रश्नांना बेंथॅम यांनी दिलेली उत्तरेही त्यांनी स्वीकारलेल्या उपयुक्ततेच्या तत्त्वापासून निष्पन्न होतात. एकतर, राज्य किंवा समाज अशी, व्यक्तींच्या अस्तित्त्वापलिकडचे अस्तित्त्व जिला असते अशी, वस्तू असते आणि घटक-व्यक्तींच्या हिताहून भिन्न असे तिचे हित असते ही गोष्ट ते नाकारतात. म्हणजे राज्याची सेंद्रिय उपपत्ती ते नाकारतात. राज्य हा केवळ त्याच्या घटक-व्यक्तींचा समुदाय असतो आणि ह्या व्यक्तींच्या हितांची किंवा सुखांची बेरीज म्हणजेच राज्याचे हित किंवा सुख होय ही व्यक्तिवादी भूमिका ते स्वीकारतात.

राज्यसंस्थेचा उगम आणि अधिष्ठान सामाजिक करारामध्ये आहे, ही उपपत्ती बेंथॅम अमान्य करतात. ह्या उपपत्तीप्रमाणे व्यक्तींनी परस्परांशी करार करून राज्यसंस्था अस्तित्वात आणलेली असते, तिने दिलेल्या आदेशांचे पालन करायला स्वतःला बांधून घेतलेले असते व ह्यामुळे राज्यसंस्थेने दिलेल्या आदेशांचे व्यक्तींनी पालन करणे योग्य असते. ह्या उपपत्तीवरील बेंथॅम यांचे आक्षेप असे, की ऐतिहासिक दृष्ट्या असा करार झाला आहे ह्याचा काही पुरावा नाही. पण समजा ‘जणू काही असा करार झाला आहे असे आपण मानले तर राज्यसंस्थेने दिलेल्या आदेशांचे, केलेल्या कायद्यांचे, पालन व्यक्तींनी का करावे याचा उलगडा होतो’, असे जर कुणी म्हटले तरी ते टिकू शकत नाही. कारण केलेल्या कराराचे पालन करणे योग्य का असते, हा प्रश्न उपस्थित होतो आणि केलेले करार नियमाने पाळले जातात अशी व्यवस्था असली, तर तिच्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींचे जास्तीत जास्त सुखसाधले जाते, हेच ह्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल. तेव्हा राज्यसंस्था ही अखेरीस उपयुक्ततेच्या तत्त्वावरच आधारावी लागते. 

सामाजिक कराराच्या संकल्पनेप्रमाणेच व्यक्तीला काही नैसर्गिक हक्क असतात आणि ते तिच्यापासून हिरावून घेणे कधीही योग्य नसते, ही उपपत्तीही बेंथॅम नाकारतात. व्यक्तीला असे नैसर्गिक हक्क असतात हे सिद्ध करणारा पुरावा असूच शकत नाही. शिवाय कोणताही कायदा हे व्यक्तीच्या ‘नैसर्गिक स्वातंत्र्या’ वरील बंधन नसते. म्हणजे कायद्यामुळे व्यक्तीचे नैसर्गिक स्वातंत्र्य काही प्रमाणात हिरावून घेण्यात येतेच. तेव्हा नैसर्गिक हक्कांची संकल्पना प्रमाणही नाही आणि उपयुक्तही नाही. कायद्यांमुळे समाजातील अधिकात अधिक व्यक्तींचे सुख साधले जात आहे की नाही, ह्या एकाच निकषावर कायदे समर्थनीय आहेत की नाहीत, हे ठरविता येईल.

ह्याच भूमिकेवरून बेंथॅम ‘नैसर्गिक कायदा’ ह्या संकल्पनेचा अव्हेर करतात. ही संकल्पना अशी, की माणसांनी बनविलेले आणि अंमलात आणलेले जे कायदे असतात त्यांना ‘भावरूप’ (पॉझिटिव्ह) कायदे म्हणूया. त्यांच्यामागे नैसर्गिक कायदा असतो. आपल्या विवेकशक्तीला हा नैसर्गिक कायदा प्रमाण म्हणून प्रतीत होतो. भावरूप कायदे नैसर्गिक कायद्याला धरून असले तरच योग्य असतात आणि म्हणून नैसर्गिक कायद्याशी सुसंगत असेच कायदे करणे हे कायदे करणाऱ्यांचे कर्तव्य असते. आता एकतर बेंथॅम विवेकशक्तीला प्रतीत होणारा असा कायदा असतो हा सिद्धांतच अमान्य करतात. कायदा हा भावरूपच असतो आणि एखादा कायदा अस्तित्त्वात आहे ह्याचा अर्थच असा, की त्याचा भंग कुणी केला तर त्यासाठी शिक्षा नेमून दिलेली असते व ती अंमलात आणण्यात येते. तेव्हा कायदा करणाऱ्याने नैस‌र्गिक कायद्याशी विरोधी 


असलेला कायदा जर केला आणि अशा रीतीने नैसर्गिक कायद्याचा भंग केला, तर त्यासाठी त्याला शिक्षा सांगण्यात आली असली पाहिजे आणि ती अंमलात आणण्याची तजवीज असली पाहिजे. असे नसेल, तर नैसर्गिक कायदा असे काही अस्तित्वात नाही हे दिसून येतेआणि नैसर्गिक कायद्याशी सुसंगत असे कायदे करणे हे कायदे करणाऱ्यांचे कायदेशीर कर्तव्य असते, हे म्हणणे फोल ठरते. पण ह्या संदर्भात बेंथॅम एक गोष्ट स्पष्ट करतात. आदर्श नैसर्गिक कायद्याशी सुसंगत असे कायदे बनविणे हे जरी कायदे करणाऱ्याचे कर्तव्य नसले, तरी प्रत्येक समाजात त्या त्या काळी काही नैतिक कल्पना व आदर्श दृढमूल असतात, आणि त्यांच्याशी विसंगत असे कायदे जर करण्यात आले, तर लोक त्यांच्याविषयी कमी-अधिक तीव्रतेने नापसंती व्यक्त करतात. ही एक प्रकारची शिक्षा, नैतिक शिक्षा, होय. तेव्हा प्रचलित नैतिक कल्पनांशी सुसंगत असे कायदे करणे, हे कायदे करणाऱ्यांचे नैतिक कर्तव्य ठरते.

राज्यसंस्था ही सार्वभौम सत्ता असते असे मानण्यात येते. ह्या सार्वभौम सत्तेचे धारक कोण असतात, हा राज्यशास्त्रातील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. येथेही बेंथॅम यांची भूमिका भावरूपवादी आहे. म्हणजे ज्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिंच्या समुदायाचे आदेश समाजातील बहुसंख्य व्यक्ती सवयीने पाळतात ती व्यक्ती किंवा तो समुदाय सार्वभौम असतो. अशा सार्वभौम शक्तीने जे आदेश दिलेले असतात आणि त्यांचा भंग केला तर त्यासाठी शिक्षा नेमून दिलेली असते, ते आदेश म्हणजे कायदे होत. तेव्हा सार्वभौम शक्ती कायद्यांच्या वर असते आणि कायद्याचे बंधन तिला नसते. पण कायदे करणाऱ्या सार्वभौम समूहाचा घटक म्हणून व्यक्ती सार्वभौम असेल पण त्याबरोबरच हे कायदे तिच्यावर बंधनकारही असतील आणि म्हणून व्यक्तीचे कायद्याशी दुहेरी नाते असेल ही शक्यता बेंथॅम मान्य करतात. शिवाय सार्वभौम शक्तीला कायद्याचे बंधन नसले, तरी नैतिक बंधन असते म्हणजे प्रचलित नीतीला विरोधी असलेले कायदे तिने केले, तर लोकांचा तिरस्कार आणि क्रोध तिला सहन करावा लागतो आणि म्हणून सार्वभौम शक्ती पूर्णपणे निरंकुश नसते, असे त्यांचे म्हणणे आहे.

नीती आणि कायदे यांच्या स्वरूपाविषयीच्या सिद्धांतांचे समर्थन करण्यासाठी आणि ह्या सिद्धांतांचे उपयोजन करताना जे युक्तिवाद करण्यात येतात त्यांचे विश्लेषण बेंथॅम यांना स्वाभाविकपणे करावे लागले आणि त्यातून भाषिक प्रयोगांच्या अर्थाविषयीची एक उपपत्ती त्यांनी बनवली. तत्त्वज्ञानात जी नाममात्रतावादी (नॉमिनॅलिस्ट) उपपत्ती म्हणून प्रसिद्ध आहे तिच्या वळणाची ही उपपत्ती आहे. ह्या उपपत्तीप्रमाणे विशिष्ट वस्तूच काय त्या खरोखर अस्तित्वात असतात आणि केवळ विशिष्ट वस्तूंचा निर्देश करणाऱ्या भाषिक प्रयोगांना खराखुरा अर्थ असतो. गुण, संबंध, क्रिया, वर्ग इ. हे केवळ कल्पित पदार्थ होत त्यांचा निर्देश करणाऱ्या भाषिक प्रयोगांना खराखुरा अर्थ नसतो. परंतु असे भाषिक प्रयोग ज्या वाक्यात उपस्थित असतात त्या सबंध वाक्याचे भाषांतर दुसऱ्या, ज्यात हे प्रयोग उपस्थित नाहीत अशा वाक्यात करता येते व त्याचा अर्थ स्पष्ट करता येतो. उदा., ‘तांबडा रंग अशुभ होय’ ह्या वाक्याचे ‘जो माणूस तांबडी वस्तू पाहतो त्याला वाईट अनुभव येतो’ असे भाषांतर करता येते. ह्या भाषांतरकारी वाक्यात ‘तांबडा रंग’ हा भाषिक प्रयोग उपस्थित नाही. म्हणजे कल्पित पदार्थांचा निर्देश करणाऱ्या शब्दप्रयोगाला स्वतंत्रपणे अर्थ नसतो, पण ज्या सबंध वाक्याला अर्थ असतो अशा वाक्यात तो उपस्थित असतू शकतो आणि ह्या सबंध वाक्याचा अर्थ स्पष्ट करता येतो. पुढे बर्ट्रंड रसेल यांनी ‘उपयोगांतर्गत व्याख्या’ ही कल्पना मांडली तिची बीजे बेंथॅम यांच्या ह्या विवरणात आहेत तसेच ‘वर्णनात्मक अर्थ’ आणि ‘भावनिक अर्थ’ हा तत्त्वज्ञानात पुढे करण्यात आलेला महत्त्वाचा भेदही बेंथॅम यांनी केला आहे.

पहा:उपयुक्ततावाद नीतिशास्त्र रसेल, बर्ट्रंड.

संदर्भ:   1. Baumgardt, David, Bentham And the Ethics of Today, Princeton, 1952.

            2. Halevy, Elie: Trans. Morris, Mary. The Growth of Philosophical Radicalism, London, 1928.

            3. Mack, Mary P. Jeremy Bentham : An Odyssey of Ideas, New York. 1963.  

                                                                                                                                                        रेगे, मे. पुं.