अलेक्झांडर, सॅम्युएल : (६ जानेवारी १८५९—१३ सप्टेंबर १९३८). इंग्रज तत्त्वज्ञ. नववास्तववादी तत्त्वमीमांसेचा प्रणेता. ऑस्ट्रेलियातील सिडनी (न्यू साउथ वेल्स) येथे जन्म. वेस्ली कॉलेज, मेलबर्न येथे त्याचे शिक्षण झाले. ऑक्सफर्ड येथे गणित, प्राचीन भाषा व तत्त्वज्ञान यांचा त्याने अभ्यास केला. १८८९ मध्ये लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे फेलो म्हणून त्याची निवड झाली. पुढे जर्मनीमध्ये म्यून्स्टरबेर्कच्या मनोवैज्ञानिक प्रयोगशाळेत एक वर्ष घालविले. यानंतर मँचेस्टरमध्ये प्राध्यापक झाला व निवृत्त होईपर्यंत तो तेथेच होता. त्याचे प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : मॉरल ऑर्डर अँड प्रोग्रेस(१८८९) लॉक (१९०८) स्पेस, टाइम अँड डिइटी(दोन खंडांत, १९२०) ब्यूटी अँड द अदर फॉर्म्स ऑफ व्हॅल्यू (१९३३) फिलॉसॉफिकल अँड लिटररी पीसेस (१९३९) इत्यादी.

 

अलेक्झांडरच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे उद्गम वा नवनिर्मिती हे अंतिम तत्त्व आहे. नियमबद्धता व नवीन उद्भवणाऱ्या गुणांची अतर्क्यता ही दोन्ही सत्ये आहेत. स्थलकाल हे द्विमुख पण एकात्मक तत्त्व जगाच्या बुडाशी आहे.‘स्थलाप्रमाणेच काल हादेखील द्रव्याचा गुणधर्म आहे असे स्पिनोझाने मानले असते, तर त्याच्या व माझ्या तत्त्वज्ञानात काही फरक राहिला नसता’असे अलेक्झांडरचे म्हणणे होते. जडता, दुय्यम गुण, जीव व मन हे सर्व स्थलकालांतून उद्गम पावलेले आहेत.

 

मज्‍जासंस्थेतच जाणिवेच्या शक्तीचा उद्गम होतो. ज्यात ज्ञाता व ज्ञेय असे द्वैत असते असे बाह्य वस्तूंचे ज्ञान व ज्यात असे द्वैत नसते अशी आंतरिक अनुभूती अशी दोन प्रकारची ज्ञाने आहेत. एका विशिष्ट स्तरानंतर उद्भवणारे तत्त्व हे त्या स्तराच्या लेखी दैवतस्वरूप मानावे. जीवाच्या अपेक्षेने मन हे दैवतस्वरूप आहे. मनोयुक्त तत्त्वांच्या ठायी अधिक उच्च गुणांच्या निर्मितीची प्रकृती असते. अशा तत्त्वांच्या लेखी हे उच्च तत्त्व म्हणजेच दैवत होय. मानवाच्या दृष्टीने असे दैवत अजून उद्भवले नाही पण मानवाच्या ठायी त्याच्या उद्भवाची प्रवृत्ती आहे.

 

अलेक्झांडरचे तत्त्वज्ञान प्राचीन तत्त्वज्ञानाप्रामणे परिकल्पनेच्या स्वरूपाचे आहे. जगाचे स्वरूप कसे आहे, ते उत्पन्न कसे झाले, वगैरे प्रश्नांचा निकाल केवळ तर्काच्या आधारे लागू शकतो, अशी प्राचीन तत्त्वज्ञांची समजूत होती. अलेक्झांडरने याच प्रकारचे तर्क केले आहेत असे दिसते. हे तर्क खरे की खोटे हे तपासून कसे पाहावे, हे सांगता येणार नाही. दैवत म्हणजे पुढे उत्पन्न होऊ घातलेले उच्च तत्त्व, अशी स्वच्छंदी व्याख्या करून काही साधता नाही. उच्च तत्त्वांच्या निर्मितीची सोय नियतीतच आहे, असे मानण्यास काहीही आधार नाही.

 

अलेक्झांडरने सौंदर्य व मूल्य या विषयांवरही काही निबंध प्रसिद्ध केले आहेत. मूल्यांचा संबंध प्रेरणांच्या तृप्तीशी आहे मूल्य हा तृतीय प्रकारचा गुण आहे व तो निर्माण होण्यास परिणामादी प्राथमिक व रंगादी दुय्यम गुणांबरोबरच रसिक मनाचीही आवश्यकता आहे. सौंदर्यनिर्मिती व सौंदर्यभोग काहीतरी रचना करण्याच्या प्रवृत्तीतून उद्भवले आहेत. निरनिराळ्या व्यक्तींच्या इच्छाप्रेरणादिकांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याच्या आंतरिक ऊर्मीमधून नैतिकतेचा जन्म झाला.

 

संदर्भ : 1. MaCarthy, J. W. The Naturalism of Samuel Alexander, New York, 1948.

 

वऱ्‍हाडपांडे, नी. र.