द्यूरकेम, एमील : (१५ एप्रिल १८५८–१५ नोव्हेंबर १९१७). प्रख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता. त्याचा जन्म फ्रान्समधील एपीनाल येथे एका ज्यू कुटुंबात झाला. फ्रान्स आणि जर्मनीत त्याचे शिक्षण झाले. कायदा, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, लोकमानसशास्त्र, मानवशास्त्र इ. विषय त्याने अभ्यासिले. १८८२ मध्ये पदवीधर झाल्यावर त्याने स्वतःस समाजशास्त्राच्या अभ्यासास वाहून घेतले. १८८२–८७ ह्या कालात त्याने तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून फ्रान्समध्ये विविध संस्थांत काम केले. ह्या काळातच त्याने दर्जेदार नियतकालिकांतून समाजशास्त्रावर अनेक लेख प्रसिद्ध केले आणि त्यामुळे समाजशास्त्रज्ञ म्हणून त्याचा चांगलाच लौकिक झाला.

बोद्‌र्यूक्स विद्यापीठात १८८७ मध्ये त्याची समाजशास्त्राचा अधिव्याख्याता म्हणून नेमणूक झाली. फ्रान्समधील विद्यापीठात समाजशास्त्र हा विषय नव्यानेच अभ्यासक्रमात ठेवण्यात आला आणि तो शिकविण्याचा पहिला मान द्यूरकेम यास मिळाला. १८९६ मध्ये याच विद्यापीठात समाजशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याची नेमणूक झाली. १८९८ मध्ये त्याने L’annee Sociologique नावाचे नियतकालिक सुरू केले. १९०२ मध्ये तो पॅरिस विद्यापीठात समाजशास्त्र शिकविण्यासाठी गेला आणि १९०६ मध्ये तो तेथे शिक्षणशास्त्राचा प्राध्यापक झाला. तेथेच १९१३ मध्ये त्याची शिक्षणशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पहिल्या महायुद्धात त्याने प्रभावी राष्ट्रीय प्रचारक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले. पॅरिस येथे तो कालवश झाला.

एमील द्यूरकेम

समाजशास्त्रास एक पद्धतशीर शास्त्र म्हणून मानाचा दर्जा प्राप्त करून द्यावा हे, त्याचे उद्दिष्ट होते. त्याच्या समाजशास्त्रात नीतिशास्त्राचाही अंतर्भाव होतो आणि त्यामुळेच सामाजिक धोरण ठरविण्यास त्याची मदत होते. द्यूरकेमच्या समाजशास्त्रीय विचारांवर फ्रेंच तत्त्वज्ञ सी. बी. रनुव्ह्या (१८१५–१९०३) आणि ऑग्यूस्त काँत (१७९८–१८५७) यांच्या विचारांचा बराच प्रभाव पडलेला आहे. केवळ व्यक्तिवादी केवळ उपयुक्ततावादी अशा दोन्हीही विचारसरणी त्याला मान्य नव्हत्या. तत्त्वज्ञानाच्या समस्यांकडे समाजशास्त्रीय पद्धतीतून पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन काँतच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झालेला आहे.

समाजशास्त्राच्या फ्रेंच प्रणालीची प्रणेता म्हणून त्याची गणना केली जाते. त्याने आणि त्याच्या अनेक अनुयायांनी केलेल्या समाजशास्त्रीय कार्याचा सर्वच सामाजिक शास्त्रांच्या पद्धतींवर फार मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याच्या प्रभावळीत समाजशास्त्रीय संशोधन करणारे अनेक प्रख्यात समाजशास्त्रज्ञ निर्माण झाले. मानवी संबंधाच्या क्षेत्रात त्याने वस्तूनिष्ठ पद्धतीचे उपयोजन करून दाखविले. व्यक्तिमत्त्वाच्या समस्यांसाठी द्यूरकेमची विशेष ख्याती आहे. १८९७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या Le suicide ह्या ग्रंथात त्याने ह्या समस्या विस्ताराने मांडल्या आहेत. त्याने आत्महत्येचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले आहे. समाजातील ‘श्रमविभागणीचे तत्त्व’ ह्या महत्त्वपूर्ण संकल्पनेचाही त्याने विशेष विकास केला. त्याच्या मते धर्म आणि सदाचार यांचा उगम समाजाच्या सामुदायिक जाणिवेतून (कॉन्शन्स कलेक्टिव्ह) झालेला आहे. द्यूरकेमची ही सामुदायिक जाणिवेची कल्पना मानसशास्त्रीय कल्पनेहून वेगळी असून तीत नैतिक अधिकाराचा प्रमुख भाग आहे.

त्याने प्रतिपादन केलेले ‘सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्ति’ चे तत्त्व त्याच्या सर्वच समाजशास्त्रीय विचारांचे केंद्रीभूत तत्त्व आहे. त्याच्या ह्या तत्त्वास बौद्विक आणि भावनिक अशी दोन अंगे आहेत. तो ह्या अभिव्यक्ती मूलतः सामुदायिक स्वरूपाच्या मानतो परंतु त्या ‘यूनिव्हर्सल’ म्हणजे सार्वत्रिक स्वरूपाच्या नसतात, असे तो म्हणतो. ह्या अभिव्यक्ती व्यक्तिमनोबाह्य असतात आणि त्यामुळेच त्यांचा परिणाम हा अपरिहार्य स्वरूपाचा असतो, असे त्याचे प्रतिपादन आहे. सामाजिक एकात्मतेची त्याची कल्पनाही ह्या केंद्रीभूत तत्त्वास अनुसरणारीच आहे. सामाजिक प्रकारांचीही त्याने विभागणी केलेली आहे.

आदिम किंवा प्राथमिक धर्मासंबंधीच्या जडप्राणवादी आणि निसर्गवादी अशा दोन्हीही उपपत्ती त्याला मान्य नव्हत्या. त्याबाबत तो ⇨देवकवादाचा (टोटेमिझम) पुरस्कार करतो. धर्माला तो विचारांची व पदार्थ–प्रकारांची (कॅटिगरीज) जननी मानतो.

त्याने फ्रेंच भाषेत महत्त्वपूर्ण ग्रंथरचना केली असून त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. इंग्रजीत भाषांतरित झालेले त्याचे काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : डिव्हिजन ऑफ लेबर इन सोसायटी (१८९३, इ. भा. १९३३), द रूल्स ऑफ सोशिऑलॉजिकल मेथड (१८९५, इं. भा. १९३८), सुइसाइड: अ स्टडी इन सोशिऑलॉजी (१८९७, इ. भा. १९५१), एलिमेंटरी फॉर्म्स ऑफ द रिलिजिअस लाइफ (१९१२, इ. भा. १९१५), सोशिऑलॉजी अँड फिलॉसॉफी (१९२४, इ. भा. १९५३) इत्यादी.

संदर्भः 1. Alpert, Harry, Emile Durkheim and His Sociology, New York, 1939.

          2. Gehlke, C. E. Emile Durkhelm’s Contributions to Sociological Theory, New York, 1915.

सुर्वे. भा. ग.