स्वहितवाद आणि परहितवाद : स्वहितवाद (एगोइझम) आणि परहितवाद (ॲल्ट्रइझम) ह्या हेतुवादी वा प्राप्तव्य-वादी नीतिमीमांसेतील दोन उपपत्ती आहेत. आपल्या कृतीचे उद्दिष्ट काय असावे, आपण काय मिळवावे, आपले कल्याण कशात आहे किंवा आपले प्राप्तव्य काय, ह्या प्रश्नांच्या विचारांतून हे दृष्टिकोण निर्माण झाले आहेत. माणसाच्या कर्तव्यतेचा उगम मानवी कल्याणाच्या संकल्पनेतून होतो असे मानून नीतिशास्त्राच्या ज्या रचना झाल्या, त्यांना प्राप्तव्यवादी वा हेतुवादी उपपत्ती (टेलिऑलॉजिकल थिअरीज्) असे म्हणण्यात येते. स्वतःच्या हिताला प्राधान्य देणार्‍या उपपत्तीस स्वहितवाद, तर स्वतःखेरीज इतरांच्या सुखाला प्राधान्य देणार्‍या उपपत्तीस परहितवाद म्हणतात. स्वहितवादाचे नीतिशास्त्रीय स्वहितवाद व मानसशास्त्रीय स्वहितवाद असे उपप्रकार आहेत. या दोन्हींमध्ये जवळचा संबंध असला, तरी ते परस्परांपासून भिन्न आहेत. नीतिशास्त्रीय स्वहितवाद असे मानतो, की प्रत्येक व्यक्तीने आपले स्वतःचे जास्तीत जास्त हित साधण्याचा प्रयत्न करणे हेच योग्य आहे, नीतीला धरून आहे तर मानसशास्त्रीय स्वहितवादानुसार स्वहित हीच माणसाच्या वर्तनामागची मूलभूत प्रेरणा आहे. म्हणजेच नीतिशास्त्रीय स्वहितवाद मूल्यात्मक आहे, तर मानसशास्त्रीय स्वहितवाद तथ्यात्मक आहे. खरे तर मानसशास्त्रीय स्वहितवाद सत्य असेल, तर नीतिशास्त्रीय स्वहितवादाची गरजच नाही पण मानसशास्त्रीय स्वहितवाद चुकीचा असला, तर नीतिशास्त्रीय सुखवादाचा पाया काहीसा डळमळीत होतो.

प्रत्यक्ष जीवनात आपल्याला असा अनुभव येतो, की माणसे कधीकधी स्वहिताचा त्याग करून परहितासाठी कृती करताना दिसतात. म्हणजेच स्वहितवादाच्या भूमिकेशी विसंगत असे वर्तन करतात. ही एक विरोधापत्ती तर नव्हे ? की परहिताची कृती म्हणजे स्वहिताचा विचार झाकण्यासाठी चेहर्‍यावर चढवलेला एक मुखवटा आहे ? स्वहितवाद आणि परहितवाद ह्यांचे नेमके संबंध तरी कसे असतात ? असे प्रश्न स्वहितवाद आणि परहितवाद ह्यांचा विचार करताना समोर येतात.

ह्या प्रश्नांचा विचार सतराव्या-अठराव्या शतकांत विशेषत्वाने सुरू झाला. ग्रीक आणि मध्ययुगीन जगात तो झाला नाही. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल ह्यांनी परोपकाराचा सद्गुणांत समावेश केलेला नव्हता. मध्ययुगीन जगात माणसाने आपले आत्मसाफल्य ईश्वरी प्रेमात शोधावे, असाच विचार प्रभावी होता. निक्कोलो मॅकिआव्हेली (१४६९ — १५२७) ह्या राजकीय तत्त्वज्ञाचा अपवाद सोडला, तर मनुष्यस्वभावाचे पूर्णतः व्यक्तिवादी असे चित्र उभे करणारा टॉमस हॉब्ज हा पहिला महत्त्वाचा तत्त्वज्ञ ठरतो. कोणत्याही जटिल साकल्याचा उलगडा करण्या-साठी त्याचा प्रत्येक भाग वेगळा करून मग त्या साकल्याची पुनर्रचना करण्यासाठी वेगळ्या झालेल्या सर्व भागांची पुन्हा एकत्र जुळणी करून दाखविणे, ही हॉब्जची पद्धती होती त्याच दृष्टीने तो सामाजिक जीवनाचा विचार करीत होता. समाज हे एक जटिल साकल्य मानले, तर प्रत्येक व्यक्ती हा त्या साकल्याचा एकेक घटक होय. आता, ज्या व्यक्तींनी समाज घडविण्यासाठी एकत्र यावयाचे, त्या व्यक्ती समाजपूर्व अवस्थेतील असणार आणि त्यांच्या वर्तनाच्या प्रेरणाही त्या अवस्थेशी सुसंगत असणार. सामाजिक अवस्थेत व्यक्तीला जे तडजोडीचे जीवन जगावे लागते, ते जगण्याची त्याची मानसिकता नसणार. समाजपूर्व अवस्थेतील व्यक्तींच्या वर्तनप्रेरणा स्पर्धात्मक आक्रमकतेच्या असणार.

ह्यातून मनुष्यस्वभावाचे उभे राहणारे चित्र अपरिहार्यपणे व्यक्तिवादी, अ-सामाजिक ( नॉन सोशल ), स्पर्धात्मक आणि आक्रमणशील असे आहे.  ह्या पार्श्वभूमीवर माणसे काही वेळा करीत असलेल्या परहितवादी वर्तनाचे स्पष्टीकरण कसे देता येईल ? हॉब्जचे स्पष्टीकरण असे आहे, की वरपांगी जे वर्तन परहितवादी आहे असे दिसते, त्याच्या मुळाशी छुपा स्वार्थच असतो. जो स्वार्थ उघडा आहे, ज्याला कसलीही मुरड घातलेली नाही, असा स्वार्थ समाजामध्ये युद्ध घडवून आणील आणि असे युद्ध कोणालाही परवडणारे नसल्यामुळे त्याच्या भीतीपोटी माणसे इतरांच्या हितसंबंधांचा विचार करतात, ते साधले जावेत म्हणून सहकार्यही देतात पण तसे करण्यामागे त्यांचा स्वहिताचाच विचार असतो. एखादा भुकेने कळवळणारा भिकारी पाहिल्यानंतर एखादा माणूस त्याला काही खाऊ घालतो. त्यामुळे भिकार्‍याची भूक भागते आणि भुकेमुळे त्या भिकार्‍याला होणार्‍या यातना पाहून त्या दात्याला होणारा मानसिक त्रासही संपतो. ह्या प्रकारच्या स्वहिताची आणखीही काही उदाहरणे देता येतील. माणसे एखाद्या समान ध्येयासाठी एकमेकांना सहकार्य करतात. त्यात इतरांबरोबर एकेका व्यक्तीचाही फायदा होत असतो. स्वहित आणि परहित ह्यांची अशा तर्‍हेने सांगड घातली जाते. माणसे कधीकधी दु:खी होतात, मनाच्या तात्पुरत्या उद्विग्नावस्थेत जातात. ही जी नकारात्मक भावावस्था असते, तीही इतरांना साहाय्य करण्याची प्रेरणा देऊ शकते. सामाजिकीकरणाचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींना अशी जाणीव असते, की चांगली कृत्ये करण्यामुळे एक प्रकारचे व्यक्तिगत समाधान लाभते आणि हे समाधान मनाची उद्विग्नता दूर करू शकते. त्याचाच अर्थ उद्विग्नता नष्ट होण्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे दुःख पाहूनच ते नाहीसे करायला हवे, असे नाही. एखाद्याचे व्यक्तिगत अपयश, एखाद्या दुःखद घटनेचा विचार किंवा एखादा शोकात्म चित्रपट पाहिल्यावर होणारे दु:ख ह्यांतून निर्माण होणारी मनाची नकारात्मक अवस्था नाहीशी करण्यासाठीही दुसर्‍याला मदत करण्याची प्रेरणा मिळू शकते तथापि आपल्या स्वार्थाचा यत्किंचितही विचार न करता माणसे इतरांच्या भल्यासाठी कृती करू शकतात, असेही मत व्यक्त केले गेले आहे. येथे समानुभूती ( इम्पथी) प्रभावी ठरते, असे गृहीत धरले जाते.

हॉब्जप्रमाणेच बर्नार्ड मँडेव्हिल (१६७०—१७३३) ह्या तत्त्वज्ञानेही माणूस पूर्णपणे स्वार्थी असतो, हा सिद्धांत स्वीकारून त्याच्यावर नीतीची उभारणी करण्याचा प्रयत्न केला.

ब्रिटिश तत्त्वज्ञ शाफ्ट्सबरी [अँथनी ॲश्‍ली कूपर— शाफ्ट्सबरीचा तिसरा अर्ल (१६७१—१७१३र्)] ह्याने मानवी स्वभाव पूर्णपणे स्वार्थी असतो, हे हॉब्जचे मत अमान्य केले. त्याच्या मते हॉब्जने मानवी स्वभावाचे फक्त एक चित्र उभे केले आहे आणि तेच सर्वथा बरोबर आहे किंवा कसे, त्याचा विचार करणे आवश्यक आहे. स्वहित किंवा स्वार्थी-पणा ही एकच नैसर्गिक भावना का असावी ? सामाजिक भावना, तसेच आपण मानवतेचा एक भाग आहोत, अशी जाणीवही नैसर्गिक असू शकते. त्याचा युक्तिवाद असा आहे, की सामाजिक भावना ही नैसर्गिक असली पाहिजे कारण ती तशी नसती, तर मुळात समाज कसा अस्तित्वात आला असता ? समाज ही जर संकेतव्यवस्था असेल, तर संकेतांची निर्मिती करणार्‍या मानवी स्वभावाचे अस्तित्व समाजाच्या अस्तित्वात अनुस्यूत असले पाहिजे. त्यामुळे मानवी स्वभावाचे स्वार्थप्रवण चित्र एकांगी असले पाहिजे. स्वार्थीपणा हीच एक नैसर्गिक मानवी भावना असती, तर समाज अस्तित्वातच आला नसता. इतकेच नव्हे, तर सामाजिक भावनेचे अस्तित्व हेच समाजनिर्मितीसाठी मूळ कारण म्हणून पुरेसे असेल, तर समाजासाठी धार्मिक मंजुरी ही प्रत्यक्ष समाजनिर्मिती झाल्यानंतरच मिळू शकते आणि म्हणूनच ती दुय्यम स्वरूपाची ठरते.


शाफ्ट्सबरीने सद्गुणांचा विचार केला. त्याच्या मते समाजहिताचा पाठपुरावा करणे, हाच सद्गुण होय. सद्गुणांबद्दल प्रेम असते, म्हणूनच आपण सद्गुणांचे भान ठेवून वर्तन करतो. आत्मलाभाचे वा स्वहिताचे समाधान आणि इतरांचे हित ह्यांच्यात संघर्ष नसून एकात्मता आहे, असे त्याचे मत होते.

बर्नार्ड मँडेव्हिल ह्याने द फेबल ऑफ द बीज : ऑर, प्रायव्हेट व्हाइसिस पब्लिक बेनिफिट्स (१७१४) ह्या आपल्या ग्रंथात शाफ्ट्सबरीच्या विरोधी मत नोंदविलेले आहे. त्याच्या मते कोणत्याही कृतीमागची प्रेरणा ही खाजगी आणि स्वार्थमूलक असते आणि तशी ती असणे, सार्वजनिक हिताचेच असते.  

फ्ररान्सिस हचिसन (१६९४—१७४६) ह्या स्कॉटिश तत्त्वज्ञाने मांडलेले विचार थोडयात असे : आपल्यापाशी जसे इंद्रियसंवेदन असते, तसे नीतिसंवेदनही असते. इंद्रियसंवेदनांमुळे आपल्याला वस्तूंच्या गुणधर्मांचे प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याचप्रमाणे मानवी कृत्यांच्या ठिकाणी असलेल्या अनेक नैतिक गुणांचे ज्ञान आपल्याला नीतिसंवेदनांद्वारे होते. काही मानवी कृत्यांच्या ठिकाणी जे गुण असतात, त्यांच्या दर्शनाने आपल्या मनात पसंतीचा सुखद भाव निर्माण होतो. ह्या कृत्यांना ( आणि त्यांच्यातून व्यक्त होणार्‍या मानवी स्वभावविशेषांना ) आपण चांगली, नीतिमान कृत्ये म्हणतो. आपल्या मनात अनुकूल भाव किंवा संवेदन निर्माण करणारे कोणते गुण ह्या कृत्यांच्या ठायी असतात ? हचिसनच्या मते एखादे कृत्य परोपकारी असेल, तरच त्याच्या दर्शनाने आपल्या मनात अनुकूल संवेदना निर्माण होते.

जोसेफ बटलर (१६९२—१७५२) ह्या ब्रिटिश नीतिमीमांसकाच्या मते मानवी प्रकृतीत विशिष्ट इच्छा सामावलेल्या असतात. तसेच स्वतःचे हित वा सुख साधण्याची एक प्रवृत्ती माणसात असते. बटलरने ह्या प्रवृत्तीला आत्मप्रेम म्हटले आहे. आत्मप्रेमाबरोबर परोपकाराची वा इतरांना सुख देण्याची प्रवृत्तीही माणसात असते. आत्मप्रेम आणि परोपकाराची प्रवृत्ती ह्यांच्यात अटळपणे विरोध असतोच असे नाही. त्या परस्परपूरकही असू शकतात. आपण आपल्या सुखाच्या इच्छेचे समाधान करतो पण परोपकारी वृत्तीने आपण इतरांना जे सुख देतो, त्यातही आपल्याला आनंद मिळतो. शिवाय माझे आत्मप्रेम आणि माझ्या इच्छा ह्यांत कधीकधी विसंवादही असू शकतो. आपल्या अनेक इच्छांपैकी एखाद्याच इच्छेचा आपल्यावर सर्वाधिक प्रभाव पडला, तर आपल्या इतर इच्छा दुर्लक्षित राहतील त्यामुळे आपल्या एकूण सुखाची हानी होईल. सदसद्बुद्धी ही मनःशक्ती आपल्या प्रकृतीचा एक घटक आहे. स्वहितबुद्धी आणि परहितबुद्धी ह्या प्रेरणांवर सदसद्बुद्धीचे नियंत्रण असते. ज्या तत्त्वांमुळे आपल्या सबंध प्रकृतीचे समाधान होते आणि जी तत्त्वे सदसद्बुद्धीला प्रतीत होतात, त्यांच्या आदेशांनुसार आणि स्वहितबुद्धी व परहितबुद्धी ह्या प्रेरणांशी सुसंगत ठरेल अशा प्रकारे आपल्या इच्छांचे समाधान करण्यात माणसाचे सुख असते. 

स्कॉटिश तत्त्वज्ञ डेव्हिड ह्यूम (१७११—७६) ह्याने आपल्या ए ट्रीटाइझ ऑफ ह्यूमन नेचर (१७३९) ह्या ग्रंथात असा प्रश्न उपस्थित केला आहे, की जे नियम मोडणे आपल्या हिताचे म्हणता येईल, असे नियम आपण का स्वीकारतो आणि पाळतो ? ह्यावर त्याचे उत्तर असे आहे, की स्वहिताचा पाठपुरावा करीत राहिल्यास न्यायाच्या नियमांकडे आपले दुर्लक्ष होते त्यांची कदर आपल्याकडून होत नाही, असे अनेकदा दिसून येते. आपण इतरांच्या हिताचा जरूर विचार करतो पण तो व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असतो. त्या त्या व्यक्तीशी आपले संबंध किती जवळचे आहेत, ह्यावर तो अवलंबून असतो. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल, की मानवी मनात व्यक्तिगत गुणांहून स्वतंत्र असे मानवतेविषयीचे प्रेम अशी काही वासना ( पॅशन ) नसतेच. आता, जर स्वहिताची जाणीव आपल्याला न्यायाचे नियम मोडण्यास प्रवृत्त करते आणि सार्वजनिक हितासंबंधी आपल्याला स्वभावत: काही कदर नसेल, तर नियम कसे अस्तित्वात येतात आणि आपण ते का स्वीकारतो ? ह्या संदर्भात महत्त्वाची वस्तुस्थिती अशी आहे, की न्यायाचे नियम जर आपण पाळले नाहीत, तर आपली मालमत्ता ठिकाणावर राहणार नाही. मालमत्ता ह्या संस्थेचे अस्तित्वच राहणार नाही. मालमत्ता आणि तिचे स्थैर्य आपल्या हिताचेच असते आणि न्यायाचे नियम आपण पाळले नाहीत, तर इतरांकडून आपण कसे दुखावले जाऊ, ह्याची जाणीव आपल्याला असतेच. त्यामुळे एखाद्या प्रसंगी आपले ताबडतोबीचे वा अल्पावधीचे हित नियम मोडण्यात असले, तरी आपले दीर्घकालीन हित नियम पाळण्यातच सामावलेले असते.

ह्यूमने त्याचा पुढचा ग्रंथ इन्क्वायरी कन्सर्निंग ह्यूमन अंडरस्टँडिंग (१७४८) लिहिला, तेव्हा त्यात त्याच्या विचारातील परिवर्तन दिसून येते. स्वत:चे हित आणि सार्वजनिक हित, शांततेचे संवर्धन, सामाजिक सुसंवाद आणि व्यवस्था हे कृतीचे दोन स्वतंत्र स्रोत असून त्यांचे सह-अस्तित्व असते, असे त्याचे प्रतिपादन आहे. सहसंवेदनेची स्वतंत्र शक्ती त्याला प्रतीत होते आणि ही शक्तीच आपल्याला परहितासाठी कृती करण्यास उद्युक्त करते असेही तो मानतो. 

एब्राहम टकर (१७०५—७४) आणि विल्यम पेली (१७४३—१८०५) ह्या धर्मशास्त्रज्ञांनीही आत्महितवाद आणि परहितवाद ह्यांच्या संदर्भातील प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. हे उत्तर त्यांनी व्यक्तिवादी भूमिकेवरून दिलेले आहे. ते असे : माणसाच्या स्वभावाची एकूण घडण पाहता, तो केवळ स्वतःच्याच सुखासाठी धडपडणार पण मूलभूत नियम असा आहे, की जगात सुखाची जास्तीत जास्त वृद्धी करण्याचा प्रयत्न करावा मग ते सुख आपल्याला किंवा अन्य कोणालाही लाभो. नीतिनियम आपण अशासाठी पाळले पाहिजेत, की कुणाही माणसाच्या प्रयत्नांनी जे सुख निर्माण होते, ते एकत्र करून ईश्वर ते सर्व सुख साठवून ठेवतो. ह्या साठ्याचा सारख्या प्रमाणातला वाटा प्रत्येक माणसाला तो देतो. सर्व माणसे जन्मजात सारखीच पापी असल्यामुळे इतरांपेक्षा आपल्याला अधिक सुख लाभावे, असा अधिकार कोणत्याच व्यक्तीला नसतो. सर्वांना बर्‍यावाईटाचा सारखाच अधिकार असतो. त्यामुळे बरेवाईट जे काही मिळायचे, ते सर्वांना सारख्याच प्रमाणात मिळायला हवे. म्हणूनच सर्व माणसे मिळून जे सुख निर्माण करतात, त्याचे सारखे वाटे किंवा विभाग करून प्रत्येक माणसाला त्याच्या मृत्यूनंतर एक एक विभाग देतो. आता आपण जर सुख निर्माण करण्यात कुचराई केली असेल, किंवा स्वार्थीपणाने इतरांना प्राप्त होईल, असे अधिक सुख निर्माण करण्यापेक्षा माझ्या स्वतःच्या वाट्याला येईल असे कमी सुख निर्माण करण्यावर भर दिला असेल, तर सुखाचा सामूहिक साठा जेवढा वाढला असता, तेवढा तो वाढणार नाही. त्यामुळे माझाही हिस्सा इतरांबरोबर कमीच होईल. मला मिळणार्‍या सुखाचा हिस्सा मला मरणोत्तर अनंतकाळपर्यंत भोगायचा असल्यामुळे एकंदर हिशोब करता मला तोटाच होणार. ह्या युक्तिवादात पैसे जसे मोजता येतात, तसे सुखदेखील मोजता येते, असे गृहीत धरलेले आहे.


इंग्लंडमधील उपयुक्ततावादी तत्त्वज्ञ जेरेमी बेंथॅम (१७४८—१८३२) हा उपयुक्ततावादी नैतिक पंथाचा संस्थापक म्हणता येईल. उपयुक्ततावादी नैतिक उपपत्तीच्या केलेल्या सुव्यवस्थित मांडणीसाठी बेंथॅम मुख्यतः प्रसिद्ध आहे. माणसाला कृती करण्यास दोनच प्रेरणा कारणीभूत ठरतात आणि त्या म्हणजे सुखप्राप्ती आणि दुःखपरिहार. माणसाची ओढ निव्वळ सुखाकडे असते आणि त्याला दुःख नको असते, असे त्याचे प्रतिपादन होते. सुखाचे मोजमाप तो खालील गुणधर्मांनुसार करतो : (१) सुखाची तीव्रता — सौम्य सुखापेक्षा उत्कट सुख अधिक चांगले, (२) क्षणिक सुखापेक्षा दीर्घकाळ टिकणारे सुख जास्त चांगले, (३) निश्चितता—जे सुख प्राप्त होणे अनिश्चित आहे, त्या सुखापेक्षा निश्चितपणे मिळणारे सुख चांगले, (४) समीपता — दूरच्या सुखापेक्षा जवळचे सुख अधिक इष्ट, (५) प्रसवक्षमता — ज्या सुखापासून भविष्य-काळात आणखी सुखाची निर्मिती होऊ शकते, ते सुख अधिक महत्त्वाचे, (६) शुद्धता — दुःखमिश्रित सुखापेक्षा शुद्ध सुख अधिक चांगले, (७) विस्तार — कमी व्यक्तींना मिळणार्‍या सुखापेक्षा जास्त लोकांना मिळणारे सुख अधिक चांगले.

माणसांनी जास्तीत जास्त सुखाची निर्मिती करावी. सुखाचे वाटप करताना ते न्यायाने करावे, म्हणून प्रत्येक माणसाला एक म्हणूनच मोजावे कोणालाही तो इतरांहून कोणी अधिक आहे, असे मानू नये, असे बेंथॅमचे मत होते.

बेंथॅम, हेन्री सिज्विक आणि जॉन स्ट्यूअर्ट मिल हे सर्व उपयुक्ततावादी होते आणि इंग्रज तत्त्वज्ञ डेव्हिड हार्ट्ली (१७०५ — ५७) ह्याच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. हार्ट्लीच्या मते फक्त सुख आणि दुःख माणसाला कृती करायला उद्युक्त करते. हार्ट्लीच्या विचारांनुसार सुख आणि दुःख ही संवेदनांची नावे आहेत. त्याचे असेही प्रतिपादन आहे, की ज्या सुखाची मला अपेक्षा असते आणि जे सुख मला आकर्षित करते ते माझे सुख असते त्याचप्रमाणे ज्या दुःखापासून मी दूर जात असतो, ते माझे  दुःख असते. ह्या विचारापासून जो निष्कर्ष निघतो, तो असा की माणसाची प्रत्येक कृती स्वहितवादाने प्रेरित झालेली असते. असे असले, तरी उपयुक्ततावादी हे ‘ अधिकांचे अधिकतम सुख ’ हाच कृतीचा एकमेव — किंवा किमान मध्यवर्ती — निकष मानतात. ही विसंगती आहे का ? बेंथॅम असे गृहीत धरतो, की माणसाची प्रत्येक कृती स्वहितवादाने प्रेरित झालेली असली, तरी ‘ अधिकांचे अधिकतम सुख ’ ह्या सूत्राप्रमाणे माणसांना वागण्यास शिकावे लागेल.

मिलचा युक्तिवाद दोन प्रकारचा आहे. पहिला युक्तिवाद असा : सुख सर्वांनाच हवे असते आणि दुःखाचा अभाव सर्वांनाच हवा असतो. ह्याचाच अर्थ, प्रत्येकजण स्वतःचे सुख इच्छितो. सर्व माणसांची तशी इच्छा असते आणि ज्या अर्थी सर्व माणसांची ती इच्छा असते, त्या अर्थी  सुख हे निश्चितच वांच्छनीय असते. दुसरा युक्तिवाद असा : व्यक्तीचे हित आणि समाजाचे हित एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे करता येत नाही. माणसामध्ये सामाजिकतेची भावना प्रबळ असते आणि सांस्कृतिक विकासाच्या ओघात ती अधिक बलिष्ठ होत जाते. त्यामुळे प्रत्येकाने शय तितके सुख निर्माण केले पाहिजे. येथे असे अभिप्रेत दिसते, की प्रत्येकाने सर्वांचे सुख इच्छिले पाहिजे.

संदर्भ : 1. Broad, C. D. The Five Types of Ethical Theory, London, 1930.

           2. Ewing, A. C. Ethics, London, 1953.

           3. Gauthier, D. Ed., Morality and National self Interest, Englewood, Cliffs, 1970.

           4. Nagel, T. The Possibility of Altruism, Oxford, 1970.

           5. Rashdall, Hastings, Theory of Good and Evil, Oxford, 1924.

           6. Sharp, F. C. Ethics, New York, 1928.

 

कुलकर्णी, अ. र.