सॉफिस्ट्स : प्राचीन ग्रीक विचारवंतांचा एक वर्ग. इ. स. पू. पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात तो उदयाला आला. ‘विश्वाचे अंतिम किंवा खरे स्वरुप काय आहे?’ ‘विश्वात जी अनेकता, विविधता, परिवर्तने दिसतात, त्यांचा उलगडा कसा करावयाचा?’ असे प्रश्न ग्रीक तत्त्वज्ञानाच्या आरंभकाळात ( इ. स. पू. सहावे शतक ) ग्रीक तत्त्वज्ञ उपस्थित करीत होते आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत होते तथापि पुढील सु. शंभर वर्षांच्या कालखंडात ज्या घडामोडी झाल्या, त्यांतून ग्रीकांच्या सामाजिक-राजकीय जीवनात लक्षणीय परिवर्तने घडून आली. ग्रीकांची समाजरचना बदलत गेली. एके काळचे राजे, योद्घे ह्यांच्या वर्चस्वाखाली ज्या प्रकारची समाजरचना होती, तिची जागा अथेन्स, स्पार्टा, मेगारा ह्यांसारख्या नगरराज्यांनी घडविलेल्या समाजरचनांनी घेतली होती. प्रत्येक नगरराज्याचे कायदे भिन्न होते. ह्या सर्व नगरराज्यांमध्ये अथेन्सला सर्वाधिक महत्त्व आणि अग्रेसरत्व प्राप्त झाले होते. अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धती असल्यामुळे अथेन्सच्या नागरिकांना कायदे करणे, राज्याचे धोरण ठरविणे, न्यायदानात सहभागी होणे, त्यासाठी वादविवाद करणे हे सर्व करावे लागत होते. ह्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, त्याच्याशी सुसंगत अशी व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची आखणी, न्यायाची संकल्पना अशा विषयांशी निगडित अशा प्रश्नांना महत्त्व आले. नैतिक-सामाजिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे प्रयत्न होऊ लागले. ह्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणारा, त्याचप्रमाणे राजकीय-सामाजिक जीवनातील वादविवादांत आपली बाजू प्रभावीपणे कशी मांडावी, हे शिकविण्याचा व्यवसाय करणाऱ्या विचारवंतांचा एक वर्ग अपरिहार्यपणे निर्माण झाला. हेच सॉफिस्ट्स ( ज्ञानी माणसे ) होत.

सॉफिस्ट हे व्यावहारिक द्दष्टिकोनातून विचार करणारे होते. आपण लोकांना सद्‌गुण शिकवितो, असा दावा करणाऱ्या सॉफिस्टांची सद्‌गुणांबद्दलची धारणा अशी होती : सद्‌गुण म्हणजे चांगल्या प्रकारे वागणे आणि चांगले वागणे म्हणजे चांगले काम देणाऱ्या एखाद्या वस्तूसारखे असणे. उदा., चांगले काम देणारा चाकू म्हणजे चांगला चाकू. त्याचप्रमाणे चांगला, सद्‌गुणी माणूस म्हणजे यशस्वी रीत्या जगणारा माणूस. एखाद्या नगरराज्यात यशस्वीपणे जगायचे, तर तिथल्या रुढी-परंपरांचा, कायदेसंकेतांचा अभ्यास हवा. तिथल्या न्यायसभेत प्रभावीपणे बोलता आले पाहिजे. नगरराज्यात एखादे सत्तास्थान प्राप्त करुन घेण्यासाठी आवश्यक त्या तंत्रांवर आणि कौशल्यांवर प्रभुत्व असायला हवे. हे जे कौशल्य, त्यालाच सद्‌गुण म्हणावयाचे आणि तेच आम्ही शिकवितो.

सॉफिस्टांची ही धारणा पाहता, न्यायाची वस्तुनिष्ठ अशी संकल्पना असू शकत नाही, असा विचार स्वीकारावा लागतो आणि सॉफिस्टांचे तेच म्हणणे होते. त्यांच्या मते, अथेन्समध्ये अथेन्सच्या कायद्यांप्रमाणे वागणे म्हणजे न्याय्य वर्तन. स्पार्टामध्ये स्पार्टाच्या कायद्यांप्रमाणे वागणे म्हणजे न्याय्य वर्तन. एक प्रसिद्घ सॉफिस्ट प्रोटॅगोरस ( इ. स. पू. सु. ४८०– ४१०) हा प्लेटोच्या थीएटेटस ह्या संवादात नैतिक सापेक्षतावादाचे समर्थन करताना दिसतो. त्याच्या मते, न्याय्य असणे म्हणजे न्याय्य मानले जाणे. कुठल्याही वस्तूचे ‘खरेखुरे स्वरुप काय?’ हा प्रश्नच उपस्थित होत नाही. आपण पाहतो त्या वस्तूचे आपल्याला प्रतीत होणारे गुण हे आपल्यापुरते आणि आपल्याला प्रतीत होईतो खरे असतात. त्याचप्रमाणे कोणत्याही कृत्याचा चांगलेपणा-वाईटपणा त्याकडे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून असतो.

ह्या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो : अथेन्समध्ये असताना अथेन्सचे कायदे पाळणाऱ्या माणसाचे खरेखुरे स्वरुप काय आहे ? अथेन्सचा नागरिक हे त्याचे अंगभूत स्वरुप नव्हे. अथेन्समध्ये राहणारा म्हणून तो अथेन्सचा नागरिक. अशा प्रश्नाला सॉफिस्टांचे उत्तर असे होते, की कोणतीही व्यक्ती ही मुळात एक ‘नैसर्गिक मानव ’ असते. नैसर्गिक माणूस हा स्वार्थी आणि आक्रमक असतो पण आपल्याप्रमाणे इतरही माणसे तशीच असल्यामुळे ती आपल्या स्वार्थाला आणि जीवितालाही धोका निर्माण करु शकतात, ह्याची जाणीव झाल्यावर आपल्या स्वार्थाला, मर्यादा घालणारे काही नियम करण्याचा विचार त्याला आणि त्याच्यासारख्याच असलेल्या इतरांनाही सुचतो. असे नियम तयार होतात आणि त्यांतले बरेच नीतिनियम म्हणून स्वीकारण्यात येतात. ह्या नियमांच्या आड आपले नैसर्गिक स्वरुप तो लपवत असतो. त्यामुळे ‘न्याय म्हणजे काय?’ ह्या प्रश्नाची सॉफिस्टांच्या दृष्टीने दोन उत्तरे देता येतील : (१) अथेन्सचा नागरिक म्हणून अथेन्सचे कायदे पाळणे म्हणजे न्याय्य वर्तन.(२) आपला स्वार्थ साधेल असे वर्तन म्हणजे न्याय्य वर्तन. ह्या दोन उत्तरांपैकी दुसरे उत्तर मुख्य उत्तर म्हणता येईल कारण ते माणसाच्या मूळ स्वरुपावर आधारलेले आहे.

सॉफिस्टांच्या ‘नैसर्गिक मानवा’ च्या संकल्पनेवर आक्षेप घेता येतील. ‘नैसर्गिक मानव’ ‘स्वार्थी’ असतो असे म्हणताना ‘स्वार्थी’ कोणाला म्हणावे ह्याचा विचार काही नीतिनियमांच्याच आधारे केला जात असतो. त्यामुळे ‘नैसर्गिक मानवा’ चे हे नीतिनिरपेक्ष वर्णन आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र ‘नैसर्गिक मानवा ’ ची संकल्पना पश्चिमी नीतिशास्त्रात पहिल्यांदा अवतरली, ती सॉफिस्टांमुळे.

कुलकर्णी, अ. र.

सॉफिस्टांनी मांडलेले सामाजिक, नैतिक व राजकीय सिद्घांत महत्त्वाचे होते. सॉफिस्टांच्या काळात इतिहासाविषयी जे विविध विश्वास प्रचलित होते, त्यांत एक असा होता की, ‘मुळात सर्व काही चांगले होते ’ (यालाच ‘आदिमवाद’– प्रिमिटिव्हिझम–म्हटले जाते ). दुसरा असा होता, की चक्रनेमिक्रमाने चांगला आणि वाईट काळ येत असतो. या पार्श्वभूमीवर सॉफिस्टांनी असा सिद्घांत मांडला की मानवी समाज हा कला, कारागिरी, प्रशासन आणि मानवी जीवनाचे नियमन यांबाबतीत उत्तरोत्तर प्रगतिपथावर आहे.

सॉफिस्टांचे सद्‌गुणांच्या बाबतीत असे म्हणणे होते, की सद्‌गुण शिकविता येतो. जन्मामुळे, कुळामुळे, वर्गामुळे माणसे श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतात, या प्रचलित कल्पनेला छेद देणारा हा विचार होता. कारण त्यानुसार कोणालाही शिक्षणाने सद्‌गुणी माणूस किंवा राजकीय सत्तेसाठी लायक व्यक्ती बनणे शक्य होते. लोकशाही राज्यव्यवस्थेला पूरक असा हा विचार होता. या विचारांमुळे प्रोटॅगोरस या सॉफिस्ट विचारवंताला, लोकशाही शासनाला सैद्घांतिक आधार पुरवणारा, पहिला विचारवंत मानले जाते.

सॉफिस्टांनी असेही मानले की नैतिकतेचे स्पष्टीकरण आणि युक्तिवादांच्या आधारे समर्थनही करता आले पाहिजे. अशा प्रकारच्या नीतिविषयक वादविवादांसाठी युक्तिवाद पुरवण्याचे काम सॉफिस्टांनी केले. सॉफिस्टांचे हे महत्त्वाचे वैचारिक योगदान होते. त्यामुळे यूरोपात तात्त्विक नीतिशास्त्राचा आरंभ करण्याचेही श्रेय सॉफिस्टांना दिले जाते.

पहा : ग्रीक तत्त्वज्ञान.

गोखले, प्रदीप

संदर्भ : 1. Freeman, K. Companion to the Presocratic Philosophers, Oxford, 1946.

२. रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७४.