उद्देशानुसारिता : (टेलीऑलॉजी). मानवाच्या वागण्याला काही तरी प्रयोजन वा हेतू असतो. मानव शेतात बी पेरतो ते त्यापासून पीक निघून खायला मिळावे म्हणून. मानवाच्या वर्तनाचा अर्थ लावायचा असेल, तर त्या वर्तनाच्या पूर्वीच्या घटनाच फक्त विचारात घेऊन भागत नाही, तर त्या वर्तनाची परिणती कशात होणार आहे याचाही विचार करावा लागतो.

उद्देशवादानुसार केवळ मानवी व्यवहारच नव्हे, तर साऱ्या सृष्टीतील घटनांची उपपत्ती लावायची असेल, तर त्या घटनांच्या मागचा हेतू शोधणे आवश्यक आहे. मानवाची भूक भागावी म्हणून दयाघन परमेश्वराने वनस्पती हेतुपूर्वक निर्माण केल्या असे ईश्वरवादी म्हणतात [→ ईश्वरवाद]. प्लेटोच्या म्हणण्याचा आशयही असाच आहे. त्याच्या मते मानवाची तहान भागावी म्हणून पाणी व भूक भागावी म्हणून वनस्पती अस्तित्वात आहेत.

ॲरिस्टॉटलच्या मते सृष्टीतील पदार्थ आपल्या आदर्शभूत अवस्थेस पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. प्रत्येक वस्तू ही आपल्या खालच्या तत्त्वाच्या तुलनेने आकार व वरच्या तत्त्वाच्या तुलनेने उपादान आहे. संगमरवर हे मूर्तीच्या तुलनेने उपादान आहे, पण संगमरवर ज्यापासून बनवतात त्याच्या तुलनेने ते आकार आहे. म्हणजे संगमरवर करण्यासदेखील एका अशोधित व असंस्कृत वस्तूची जरूर आहे. या वस्तूला आकार देऊनच संगमरवर बनतो. सर्वश्रेष्ठ आकार म्हणजे ‘शिव’. सर्व पदार्थ हाच आकार प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत असतात. [→ॲरिस्टॉटल].

ॲरिस्टॉटलची ही शिवकल्पना प्लेटोमतातही थोड्याफार फरकाने आढळते. त्याच्या मते शिव ही मध्यवर्ती कल्पना आहे. शिव हा पूर्णाचा धर्म आहे त्याच्या भागांचा धर्म नाही. भाग पूर्ण पदार्थात योग्य ठिकाणी आहेत की नाहीत, यावरून ते शिव आहेत की नाहीत हे ठरते. अर्थात भागांचे अस्तित्व पूर्णासाठी असते [→ प्लेटो].

प्लेटोच्या पूर्वी सॉक्रेटीसनेदेखील शिवाची कल्पना मांडली. तो म्हणतो, ‘तुरुंगात राहणे योग्य ठरल्यामुळे, मी तुरुंगात राहिलो. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तू आहे तशीच आहे कारण तसे असणे ही तिची अत्युत्तम अवस्था आहे’ [→ सॉक्रेटीस].

ग्रीक तत्त्वज्ञांत ॲनॅक्सॅगोरसलादेखील हेतुवादी समजतात. कारण त्याच्या मते ‘नाऊस’ या आद्यतत्त्वाने सृष्टीला प्रेरणा दिली पण एकदा अशी प्रेरणा दिल्यानंतर तिच्यात काहीही ढवळाढवळ केली नाही. डायोजीनीझचे आद्यतत्त्व ‘वायू’, हे नाऊसयुक्त कल्पिलेले आहे.

भारतीय दर्शनांतील सांख्यांचा परिणामवाद उद्देशाधिष्ठित आहे. प्रकृती पुरुषासाठी परिणाम पावते. न्यायदर्शनाच्या मते सृष्टीतील पदार्थ अनेक घटकांची रचना होऊन बनलेले आहेत. रचना हेतूशिवाय घडू शकत नाही. हा हेतू ईश्वराचा होय [→ सांख्यदर्शन न्यायदर्शन].

आधुनिक तत्त्वज्ञांमध्ये रने देकार्तने ईश्वराचे व्यवहार हेतुपूर्ण असतील असे मानले पण त्याबरोबर त्याचे हेतू आपल्याला कळणे शक्य नाही असेही म्हटले. बेकनने ॲरिस्टॉटलची अंतिम कारणाची कल्पना, म्हणजे सृष्टीतील प्रत्येक घटना हेतुपूर्ण असते, ही कल्पना अंधश्रद्धेच्या स्वरूपाची मानली. तरीपण साऱ्या विश्वात ‘मन’ हे तत्त्वच भरून राहिलेले आहे, असेदेखील त्याचे मत होते. हॉब्जने हेतूची कल्पना त्याज्य मानली. त्याच्या मते कारणाचे स्वरूप गती हे आहे आणि कारणांचे शास्त्र म्हणजे गतीचे शास्त्र. स्पिनोझानेदेखील मनाव्यतिरिक्त जड विश्वामध्ये हेतूचे अस्तित्व मानले नाही. निसर्गाचे व्यापार हेतुयुक्त असतात असे मानणे म्हणजे, जड हे मनावर अधिष्ठित आहे असे मानण्यासारखे आहे. लायप्निट्सने विश्वाचे व्यापार यंत्रासारखे मानले पण या यंत्राच्या मुळाशी ईश्वराची सहेतुक सत्तादेखील मानली. त्याच्या तत्त्वज्ञानात ‘मॉनॅड’ (पूर्णैक) नावाची अनेक तत्त्वे मानलेली आहेत. हे मॉनॅड गवाक्षरहित असतात. म्हणजे त्यांचा इतर कशाशीही संबंध नसतो. ते स्वयंपूर्ण असतात. असे असूनदेखील त्यांच्यात साऱ्या विश्वाचे प्रतिबिंब पडते. साऱ्या विश्वाशी त्यांचा पूर्वनियोजित सुसंवाद असतो. हे सर्व ईश्वरी इच्छेने घडते [→ लायप्निट्स, गोटफ्रीट व्हिल्हेल्म फोन].

कांट म्हणतो, की ज्या विश्वात सुंदर तारकांनी अलंकृत केलेले आकाश आहे, त्या शिव व मांगल्य आहे ते निर्हेतुक असेल हे संभवत नाही [→ कांट, इमॅन्युएल]. लोत्सेच्या मते निर्हेतुक जगाला काही अर्थ वा नैतिक मूल्य असू शकत नाही. पण नैतिक मूल्य हे सत्य आहे. म्हणून जग हे एका नैतिक सूत्रात गोवलेल्या आध्यात्मिक तत्त्वाचा आविष्कार आहे असे मानावे लागते [→ लोत्से, रूडॉल्फ हेर्मान].

संदर्भ : 1. Broad, C. D. The Mind and its Place in Nature, London, 1951.

             2. Tolman, E. C. Purposive Behaviour in Animals and Men, New York, 1932.

वऱ्हाडपांडे, नी. र.