नव–टॉमस मत: (नीओ-टॉमिझम). स्कोलॅस्टिसिझमने अलीकडच्या कालखंडात धारण केलेले प्रमुख रूप म्हणजे नव-टॉमस मत हे होय. एकोणिसाव्या शतकात विचाराच्या अनेक आधुनिक प्रणाली निर्माण झाल्या होत्या. त्याचा परिणाम म्हणून स्कोलॅस्टिक तत्त्वज्ञानात एक प्रकारची सर्वसंग्राहकवृत्ती रुजली होती. म्हणून स्कोलॅस्टिक विचारातील एकात्मता टिकवून धरून ती बळकट करण्यासाठी कित्येक प्रमुख धर्मविद्यावेत्ते, तत्त्वचिंतक आणि विशेषतः पोप लीओ तेरावे (१८७९) यांनी ⇨ सेंट टॉमस अक्वाय्‌नसच्या विचाराचे परत एकदा परिशीलन व्हावे असा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. कारण ख्रिस्ती धर्मातील ईश्वरी प्रसादाने प्रकट केलेले सत्य व प्राचीन ग्रीक विचार-विशेषतः ॲरिस्टॉटलचे विचार-यांचा सुंदर समन्वय करण्यात मध्ययुगात अक्वाय्‌नसने चांगलेच यश मिळविले होते, असे त्यांचे मत होते व म्हणून आपल्या वैज्ञानिक युगासही हे तत्त्वज्ञान, त्याच्या वास्तववादी भूमिकेमुळे, मानवणारे ठरेल, असेही त्यांना वाटत होते.

टॉमस अक्वाय्‌नसच्या विचारांचा शक्य तितका अचूक शोध परत एकदा घेण्यासाठी त्याच्या ग्रंथांचा ऐतिहासिक दृष्टीने अभ्यास करणे, असे या टॉमस मताच्या नवीनीकरणाचे सुरुवातीच्या काळातील स्वरूप होते. विश्वाच्या रचनेसंबंधी अथवा आकाशस्थ ताऱ्यांसंबंधीची त्याची मते गेल्या शतकात स्वीकारण्यासारखी राहिली नव्हती, हे स्पष्टच आहे तथापि त्याची धर्मविद्याविषयक मते व तत्त्वज्ञानात्मक विचार यांत त्या वेळीही पटू शकतील असे अनेक सिद्धांत मांडलेले असल्याचे लक्षात आले. परंतु प्रश्न असा होता, की देकार्त, ह्यूम व कांट यांच्या विचारांशी परिचय झाल्यामुळे अधिकच संशयवादी बनलेल्या आधुनिक बुद्धिवंतांपुढे अक्वाय्‌नसचे काही विशिष्ट विचार कशा रीतीने मांडावेत?

आधुनिक काळातील काही टॉमस मताच्या पुरस्कर्त्यांना आधुनिक संशयवाद्यांची भूमिका समजावून घेण्याची निकड वाटली नाही. अक्वाय्‌नसच्या सिद्धांतांचा काहीसा शब्दशः अर्थ घेऊन त्याच्या संदर्भात आधुनिक समस्यांचा विचार करणेच त्यांना युक्त वाटे. ⇨ झाक मारीतँ हा याच मताचा होता.

डी. मेर्स्याअर (१८५१–१९२६) व त्याचे ‘लूव्हाँ स्यूपिरिअर इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी’ (बेल्जियम) येथील अनुयायी यांसारखे काही तत्त्वचिंतक टॉमस मत हे आधुनिकांचे आक्षेप खोडून काढू शकते, हे दाखवून देण्यास उत्सुक असत. हे सर्वच आक्षेप अक्वाय्‌नसला आधीच जाणवले होते, असा त्यांच्या म्हणण्याचा रोख नव्हता. अक्वाय्‌नसच्या विचारपद्धतीत अशी काही तत्त्वे आहेत, की ज्यांचा आधार घेऊन या आक्षेपांना उत्तर देता येते, एवढेच त्यांना म्हणावयाचे होते. उदा., लूव्हाँ येथील जोसेफ मारेशाल एस्. जे. (१८७८–१९४४) याने टॉमस मताचा सखोल अभ्यास करून असे दाखविण्याचा प्रयत्न केला, की अक्वाय्‌नसने घालून दिलेल्या भूमिकेपासून सुरुवात केल्यास कांटने तत्त्वमीमांसक ज्ञानासंबंधी उपस्थित केलेल्या चिकित्सक आक्षेपांचे निवारण करता येईल, अगदी अलीकडे तत्त्वज्ञानांचा एक इतिहासलेखक एत्येन झील्साँ (१८८४– ) याने टॉमस मतप्रणीत तत्त्वज्ञानाच्या काही मुद्यांची मांडणी करून असे दाखवून दिले, की टॉमसच्या विचारपद्धतीत आधुनिक अस्तित्ववाद्यांचेही समाधान करू शकतील असे बरेच विचार आहेत. टॉमस मताच्या तत्त्वज्ञानाचा आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनाशी अत्युत्तम मेळ घालणारा ग्रंथ म्हणजे बी. लोनेर्जेन याचा इनसाइट : अ स्टडी ऑफ ह्यूमन अंडरस्टँडींग (१९५७) हा होय.

नव-टॉमस मत तत्त्वज्ञानातील एक विचारप्रवाह आहे व अनेक अभ्यासक अजूनही त्याच्यात भर घालीत आहेत. पुणे येथील ‘पाँटिफिकल अथेनियम’ हे नव-टॉमस मताच्या अध्यापनाचे एक केंद्र आहे. कोणत्याही विशिष्ट धर्मश्रद्धेशी संलग्न नसलेली विचारपद्धती म्हणून तत्त्वज्ञानात नव-टॉमस मत मांडता येते. ते निखळ तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे चिद्वाद वा जडवाद यांच्यामागे न लागता अध्यात्मवादी व वास्तववादी दृष्टिकोन पतकरणाऱ्या सर्वांना ते उपयुक्त वाटते.

संदर्भ : 1. Donceel, J. Natural Theology, New York, 1962.

            2. Gilson, Etienne, The Christian Philosophy of Thomas Aquinas, London, 1957.

जे. डी. मार्नेफ, एस्. जे. (इं.) दीक्षित, मीनाक्षी (म.)