संदर्भकक्षा : ( युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स ). संकल्पना किंवा विधान ज्या विवक्षित विचारक्षेत्रात अर्थपूर्ण असते, त्या विवक्षित विचार-क्षेत्राला त्याची संदर्भकक्षा असे म्हणतात. ‘संदर्भकक्षा’ या संज्ञेला ‘विचारविश्र्व’ किंवा ‘संदर्भविश्र्व’ अशा पर्यायी संज्ञाही प्रचलित आहेत. ‘दशमुखी रावण’ किंवा ‘कालियामर्दन’ यांची संदर्भकक्षा अनुक्रमे रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये असून ‘प्लासीची लढाई’ची संदर्भकक्षा ‘भारताचा वास्तव इतिहास’ आहे. यावरून संकल्पनांची अथवा विधानांची संदर्भकक्षा ऐतिहासिक वास्तव विश्र्व, काल्पनिक साहित्य-विश्र्व इ. भिन्न प्रकारची असते.

‘संदर्भकक्षा’ या संकल्पनेचे मूळ आपल्याला इंग्रज गणितज्ज्ञ आणि तर्कशास्त्रज्ञ ⇨ ऑगस्टस द मॉर्गन (डे मॉर्गन ) यांच्या फॉर्मल लॉजिक (१८४७) आणि ⇨जॉर्ज बूल याच्या ॲन इन्व्हेस्टिगेशन ऑफ द लॉज ऑफ थॉट, ऑन वुइच आर फाउंडेड द मॅथेमॅटिकल थिअरिज ऑफ लॉजिक अँड प्रॉबॅबिलिटीज (१८५४) या गंथांत आढळते. द मॉर्गन म्हणतात, “पुष्कळ, किंबहुना बहुतेक विधानांची विचारकक्षा संपूर्ण विश्र्वाहून खूप मर्यादित असते, तेव्हा आपण चर्चेसाठी त्या चर्चाविषयाची कक्षा निश्र्चित करतो. याला मी ‘चर्चाविषयाचे विश्र्व’ म्हणतो येथे ‘विश्र्व’ म्हणजे प्रस्तुत चर्चेच्या संदर्भात ज्या विचारांचा स्पष्ट उल्लेख झाला आहे किंवा जे स्वीकारले गेले आहेत, त्यांचे ‘ विचारविश्र्व ’. याला द मॉर्गन ‘मर्यादित विश्र्व ’ ( लिमिटेड युनिव्हर्स ) असे म्हणतात.

द मॉर्गन आणि नंतरच्या तर्कशास्त्रज्ञांनी ही संकल्पना ⇨ ॲरिस्टॉटलच्या तर्कशास्त्रातील अभावपदांची व्याप्ती निश्र्चित करण्याच्या संदर्भात प्रामुख्याने वापरली आहे. भावपदाला ‘न’ हा उपसर्ग लावून अभावपद तयार होते.उदा., ‘निळा’ याचे अभावपद ‘न-निळा’. ‘न-निळा’ या अभावपदाची व्याप्ती ‘रंगीत पण निळे नाहीत’ अशा पदार्थांपुरतीच मर्यादित आहे. द मॉर्गन या रंगीत पदार्थांच्या संदर्भविश्र्वाला ‘मर्यादित विश्र्व’ म्हणतात.

‘मर्यादित विश्र्व’ ही संकल्पना नंतर वास्तव विश्र्वापुरतीच मर्यादित न राहता ती धार्मिक-पौराणिक विश्र्व, परिकथा, कादंबरी, काव्य इ. साहित्य- विश्र्वांना लावली गेली. त्या विश्र्वांतील व्यक्ती व घटना वास्तव सत्य नसल्या, तरी त्या त्या कल्पना-विश्र्वांत सत्य असून वास्तव विश्र्वाहून भिन्न अशा स्वतंत्र विश्वाचे अस्तित्व मानले गेले. अशा तऱ्हेने द मॉर्गन यांची मर्यादित विश्र्वाची संकल्पना अमर्याद विश्र्वे मानण्यात परिणत झाली.

सुसान स्टेबिंग या विदुषीने ‘संदर्भकक्षा आणि अस्तित्ववाची विधाने’ ( द युनिव्हर्स ऑफ डिस्कोर्स अँड एक्झिस्टेन्शियल प्रपोझिशन्स ) या आपल्या छोटेखानी टिपणात ‘संदर्भकक्षा’ या संकल्पनेतून निर्माण झालेल्या वास्तव विश्र्वाहून भिन्न काल्पनिक विश्र्वांचे अस्तित्व मानण्याच्या या गैर-समजावर नेमके बोट ठेवले आहे. तिचे प्रतिपादन असे आहे की, हा गैरसमज तार्किक प्रमादातून निर्माण झाला असून ⇨ बर्ट्रंड रसेल प्रणीत अस्तित्ववाची विधानांच्या तार्किक विश्लेषणाव्दारा तो नाहीसा होतो.

रसेल आणि सुसान स्टेबिंग यांच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की, पुराणकथा आणि अन्य साहित्य-विश्र्वांतील इंद्र, रावण, इंदू काळे, सरलाभोळे इ. विशेषनामे व्यक्तिनिर्देशक वाटत असली, तरी ती वर्णनात्मक म्हणून गुणार्थक आहेत. उदा., ‘दशमुखी रावण होता’ अशा अस्तित्ववाची विधानांचे विश्र्लेषण ‘रामायणात एक शरीर, दहा तोंडे, दोन पाय, सीतेचेहरण करणाऱ्या व्यक्तीचे पात्र चितारलेले आहे’. हे कथेतील काल्पनिक पात्र असल्यामुळे त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न व्याज ठरतो. अशा प्रकारे परिकथा, पुराणे आणि अन्य साहित्यांतील पात्रांचे काल्पनिक स्वरूप स्पष्ट होऊन वास्तव विश्र्वाला समांतर अन्य स्वतंत्र विश्वे मानण्याचा प्रमाद होत नाही आणि भिन्न विश्वांचे अस्तित्व मानण्याचा प्रश्र्न निकाली निघतो.

संदर्भ : 1. Boole, George, An Investigations of the Laws of Thought, 1916.

2. Cohen, Morris Nagel, Ernest, An Introduction to Logic and Scientific Method, London, 1954.

3. De Morgan, Augustus, Ed. Taylor, A. E. Formal Logic, 1926.

4. Joseph, H. W. B. An Introduction to Logic, Oxford, 1946.

5. Mackenzie, J. S. A Manual of Ethics, London, 1957.

6. Stebbing, L. S. A Modern Introduction to Logic, London, 1957.

अंतरकर, शि. स.