बाउमगार्टेन, आलेक्सांडर गोटलीप : (१७ जुलै १७१४–२६ मे १७६२). क्रिस्तीआन व्होल्फ (१६७९–१७५४) आणि इमॅन्युएल कांट (१७२४–१८०४) यांच्या दरम्यानचा सर्वश्रेष्ठ जर्मन तत्त्ववेत्ता. कांटच्या तत्त्वज्ञानावर बाउमगार्टेन यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. जन्म बर्लिन येथे. त्यांचे उच्च शिक्षण हाल येथील विद्यापीठात झाले. १७३५ मध्ये एम्. ए. ची पदवी प्राप्त करून घेतल्यावर त्यांची तेथेच प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १७४० मध्ये ‘फ्रँकफुर्ट अन डर ओडर’ विद्यापीठात ‘पूर्ण प्राध्यापक’ म्हणून त्यांना नेमण्यात आले. मृत्यूपर्यंत ते तेथेच राहिले.

बाउमगार्टेन यांना तत्त्वमीमांसक म्हणून कांट अतिशय मान देत असत व तत्त्वमीमांसा आणि नीतिशास्त्र ह्या विषयांवर आपल्या विद्यार्थ्याना व्याख्याने देताना बाउमगार्टेन यांची मेटॅफिजिक्स आणि प्रॅक्टिकल फिलॉसॉफी ही पाठयपुस्तके म्हणून वापरीत असत. तत्त्वमीमांसेतील त्यांच्या कामगिरीचे वर्णन ⇨ क्रिस्तीआन व्होल्फचे सिद्धांत, त्यांत काही बदल करून त्यांनी नव्याने मांडले, असे करता येईल. पण त्यांची खरी महत्त्वाची कामगिरी सौंदर्यशास्त्राच्या क्षेत्रात आहे.

सौंदर्यशास्त्रासाठी पाश्चात्त्य भाषांत वापरण्यात येणारा ‘ईस्थेटिक्स’ हा शब्द बाउमगार्टेन यांनी तत्त्वज्ञानात्मक परिभाषेत प्रविष्ट केला. ईस्थेटिक्स ह्याचा शब्दशः अर्थ ‘संवेदनशास्त्र’ असा आहे. ⇨जी. डब्ल्यू. एफ्. लायप्मिटस व व्होल्फ यांच्या मते खरे ज्ञान विवकेजन्य असते. इंद्रियसंवेदनांपासून प्राप्त होणारे, संवदेनाधिष्ठित ज्ञान, हे विवेकाष्ठित ज्ञानाचेच संदिग्ध आणि म्हणून कनिष्ठ असे रूप असते. पूर्णपणे स्पष्ट आणि निःसंदिग्ध असणारे विवेकाधिष्ठित ज्ञान प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेतील ती अगोदरची पायरी असते. संदिग्ध संवेदनाधिष्ठित ज्ञानाची जागा अखेरीस निःसंदिग्ध अशा विवेकाधिष्ठित ज्ञानाने घ्यायची असते.

ह्याच्या उलट बाउमगार्टेन यांनी संवेदनाधिष्ठित ज्ञानाला स्वतःचे असे स्वतंत्र महत्त्व आहे, असे प्रतिपादन केले. ह्या संवेदनाधिष्ठित ज्ञानाच्या दोन प्रमुख रीती म्हणजे विगमन व दृष्टांत. ज्या क्षेत्रात विवेकाधिष्ठित ज्ञान उपलब्ध होऊ शकत नाही तेथे संवेदनाधिष्ठित ज्ञानाचा आधार घ्यावा लागतो व हे ज्ञान विवेकाधिष्ठित ज्ञानाइतकेच विश्वसनीय असते, अशी बाउमगार्टेन यांची भूमिका आहे. ज्ञान संवेदनाधिष्ठित तरी असते किंवा तार्किक तरी असते. तर्कशास्त्र हे तार्किक ज्ञानाचे शास्त्र होय. संवदेनाधिष्ठित ज्ञानाच्या शास्त्राचा निर्देश करण्यासाठी बाउमगार्टेन यांनी ईस्थेटिक्स (संवेदनशास्त्र) हा शब्द घडविला. संवेदनशास्त्र व तर्कशास्त्र मिळून मानवी ज्ञानाचे शास्त्र बनते.

बाउमगार्टेन ⇨ सौंदर्यशास्त्राचा अंतर्भाव संवेदनशास्त्रात करतात संवेदनात्मक प्रत्यय ही काव्य आणि इतर ललितकला यांची सामग्री असते. पण कलाकार ह्या सामग्रीत भावनाही मिसळतो. म्हणून रसिकाला संवेदनात्मक प्रत्यय देताना कलाकृती त्याच्या भावनाही उत्तेजित करते. कलाकृतीच्या ठिकाणीही सुस्पष्टता असते पण ही तार्किक  सुस्पष्टता नसते. तार्किक सुस्पष्टता हा संकल्पनांचा गुण असतो. संकल्पनेच्या आशयामध्ये काही मोजके निश्चित धर्म समाविष्ट असतात. उलट कलाकृतीच्या अंगी वेगळ्या प्रकारची सुस्पष्टता असते. तिच्यात अनेक  भिन्न विशेषांची, विशिष्ट घटकांची संपन्न अशी जुळणी झालेली असते. नेमक्या धर्मांचा स्वतःमध्ये अंतर्भाव करणाऱ्या आणि इतरांना वगळणाऱ्या संकल्पनेमध्ये हा संबंध आशय सामावला जात नाही, ह्या अर्थाने कलाकृती संदिग्ध असते. हा तिचा दोष नाही, तर गुण आहे.

कलाकृतीला एक सूत्र (थीम) असते. तिच्या अनुरोधाने कलावंत तिच्या संवेदनात्मक आणि भावनात्मक आशयाची जुळणी करतो आणि वेगळे जगच निर्माण करतो. कलाकृती हा एक पूर्ण असतो. पण कलावंताने निर्मिलेले हे भिन्न जग जग आपल्याला सत्याचे, खऱ्याखुऱ्या जगाचे संवेदनात्मक ज्ञान प्राप्त करून देते व ह्या ज्ञानाला उत्तेजित भावनांचे अंग असते.

बाउमगार्टेन यांनी ज्ञानाच्या आणि कलाकृतीच्या स्वरूपाचे हे जे विश्लेषण केले आहे, त्याची कांट यांच्या भूमिकेशी तुलना केली, तर बाउमगार्टेन यांचा ⇨ इमॅन्युएल कांटवर किती प्रभाव होता, हे स्पष्ट होईल.

बाउमगार्टेन यांचे ग्रंथलेखन लॅटिनमध्ये असून त्यांतील काही ग्रंथाची इंग्रजीत भाषांतरेही झाली आहेत. त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ रिफ्लेक्शन्स ऑन पोएट्री (१७३५, इं. भा. १९५४), Metaphysica (१७३९), Ethica Philosophiac (१७४०), Aesthetica (२ खंड, १७५०, १७५८), Initia Philosophiac Practicae Primae (१७६०), Acroasis Logica (१७६१), Philosophia generalis  (संपा. १७६९) इ. होत.

संदर्भ :Cassirer, Ernst:Trans, Koelln, F.C.A.Pettergrove. J. D. The Philosophy of the Enlightenment. Princeton, N. J., 1954.

रेगे, मे. पुं.